युनिकॉर्न कंपनी म्हणजे एक अब्ज डॉलरचे मूल्यांकन असणारी कंपनी. एक अब्ज डॉलर म्हणजे सात हजारांवर कोटी रुपये.
युनिकॉर्न कंपनी म्हणजे एक अब्ज डॉलरचे मूल्यांकन असणारी कंपनी. एक अब्ज डॉलर म्हणजे सात हजारांवर कोटी रुपये. युनिकॉर्न कंपनी हा विशेषतः भांडवली गुंतवणूकदार संस्थांचा आवडता शब्द. तो उद्योग, प्रशासन व राज्यव्यवस्थेनेही स्वीकारला आहे. कंपनीच्या व्यवसायाचे नियोजन, कंपनीकडे असलेले ग्राहक, मालमत्ता, विस्ताराच्या योजना या साऱ्या घटकांचा विचार करून गुंतवणूकदार संस्था कंपनीमध्ये गुंतवणूक करतात. गुंतवणुकीनंतर कंपनीला अधिक भांडवल उपलब्ध होते, उत्पादन-सेवाक्षमता वाढते आणि कंपनीचा झपाट्याने विस्तार होतो, हा भांडवलशाही बाजारपेठेचा साधासोपा नियम. कंपनीची प्रगती वाखाणण्यासाठी युनिकॉर्न संज्ञा गेल्या दशकात आली आणि ती संज्ञा लोकप्रियही झाली. कंपनीचा दर्जा जोखण्यासाठीही अशा संज्ञांचा उपयोग गेल्या पाच वर्षांत आग्रहाने होऊ लागला. देशाचा अर्थसंकल्प मांडतानाही स्टार्टअप, युनिकॉर्न या शब्दांचा मोह अर्थमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांसह सर्वांना पडला. किती स्टार्टअप निर्माण झाल्या आणि त्यातून किती कंपन्या युनिकॉर्न ठरल्या, हा कुतूहलाचा विषय बनला.
भारतासाठी महत्त्वाचे वर्ष
अशा स्टार्टअपने भारावलेल्या भारतासाठी २०२२ हे धमाल वर्ष ठरेल, अशा साऱ्या शक्यता दिसत आहेत. युनिकॉर्न ठरणाऱ्या कंपन्यांची घोडदौड आणि प्रत्येक स्टार्टअपला युनिकॉर्न बनण्याची आस यामुळे देशात किती स्टार्टअप युनिकॉर्न बनल्या, याचा आढावा अगदी रोज घेतला, तरी अपुरा ठरावा, अशी आजची अवस्था आहे. अगदी कालच आणखी एक कंपनी युनिकॉर्न ठरली. ‘लिव्हस्पेस’ कंपनीचे मूल्यांकन एक अब्ज डॉलरवर पोहोचले. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा संपण्याआधीच युनिकॉर्न ठरलेली ही तिसरी कंपनी. त्याआधी या महिन्यातच पॉलिगॉन आणि पुण्याची ‘इलॅस्टिक-रन’ या स्टार्टअप युनिकॉर्न ठरल्या. युनिकॉर्न स्टार्टअपची एकूण संख्या याच तिमाहीत शंभरावर जाईल. गेल्या दहा वर्षांमध्ये भारतात ८८ कंपन्या युनिकॉर्न बनल्या. त्यापैकी तब्बल ५० कंपन्या जानेवारी २०२१ ते फेब्रु.२०२२ दरम्यानच्या आहेत. आरोग्य, शिक्षण, वाहतूक, दळणवळण, दूरसंचार, सॉफ्टवेअर, औषध उत्पादने, वितरण, खरेदी-विक्री, विमा, अर्थव्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांत स्टार्टअप पसरत आहेत.
समाजातल्या छोट्याछोट्या समस्या शोधणे, त्या समस्यांवर मात करण्यासाठी तंत्रज्ञान बनवणे आणि या व्यवसाय प्रतिमानाचा भौगोलिक मर्यादांपलिकडे विस्तार करणे अशी स्टार्टअपची ढोबळ पद्धत. पारंपरिक किराणा दुकान आणि आज घरात किराणा सामान आणून पोहोचवणारे मोबाईल अॅप यामध्ये फरक आहे तो तंत्रज्ञानाचा. स्टार्टअपमध्ये तंत्रज्ञान हा गाभा. भारतात १९८५ पासून सुरू झालेली संगणक क्रांती, सर्व राज्यकर्त्यांनी धोरणात्मक सुधारणांद्वारे या क्रांतीला सातत्याने दिलेली गती आणि एकविसाव्या शतकातील दूरसंचार क्रांती या तीन घटकांनी स्टार्टअपला पोषक पार्श्वभूमी तयार होत गेली. गेल्या पाच वर्षांमध्ये या सर्व प्रयत्नांचे फळ विविध क्षेत्रांमध्ये नावारूपाला आलेल्या स्टार्टअपमधून दिसते . ‘युनिकॉर्न’ शब्दाभोवतीचे वलय काही काळ कायम राहील. तथापि, केवळ युनिकॉर्न बनणे हेच स्टार्टअपचे उद्दिष्ट बनू नये, अशी रचना तयार करण्याकडेही धोरणकर्त्यांना आणि नवउद्योजकांना वळावे लागेल. मूल्यांकन आणि कंपनीचा वास्तव जमा-खर्च यामध्ये समतोल नसल्याची कुजबूज स्टार्टअप जगतात अधूनमधून होते. एखादी आंतरराष्ट्रीय कंपनी डॉलरमधील मोठी गुंतवणूक स्टार्टअपमध्ये करते आणि त्या बळावर स्टार्टअप थेट हजारो कोटी रुपयांच्या घरात पोहोचते. अशावेळी कंपनीचा पाया भक्कम नसेल, तर वर बांधलेली इमारत डळमळीत होण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी समस्या तंत्रज्ञानाद्वारे जलद सोडविण्याला प्राधान्य देणारी व्यवस्था तयार करावी लागेल. त्यातून स्टार्टअप जगताला व्यापक पाया मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.