Hous of Bamboo sakal
संपादकीय

हौस ऑफ बांबू : मराठीचा गजर, जमुना के तीर...!

नअस्कार! निकले थे जापान, पहुंच गये चीन? इचलकरंजीला निघायचं म्हणून बॅग भरायला घेतली, आणि चक्क दिल्लीला जाण्याची पाळी आली.

कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! निकले थे जापान, पहुंच गये चीन? इचलकरंजीला निघायचं म्हणून बॅग भरायला घेतली, आणि चक्क दिल्लीला जाण्याची पाळी आली. आमचे काश्मिरी परममित्र आणि साहित्य‘भुमरो’ श्रीश्रीसंजय नहार यांनी आख्खंच्या आख्खं साहित्य संमेलन पळवून दिल्लीलाच नेलं. इचलकरंजीकर बघत बसले!

वाचकहो, आगामी ९८ वं अखिल भारतीय साहित्य संमेलन राजधानी दिल्लीत तालकटोरा स्टेडियमवर दणक्यात होणार आहे. त्यासाठी ‘सरहद’वाल्या संजय नहार यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. मागल्या एका खेपेला त्यांनी पंजाबातील घुमान इथं संमेलन नेलं होतं. यावेळी डायरेक्ट दिल्लीत!! अर्थात संमेलनाच्या तारखा अजून जाहीर व्हायच्या आहेत.

पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्चमध्ये संमेलन दिल्लीच्या गार हवेत पार पडेल, अशी चिन्हं आहेत. मराठी साहित्यिक आणि साहित्यरसिकांना विशेष सूचना : कृपया गरम कपडे सोबत न्यावेत! कुडकुडाल!! साहित्य महामंडळाच्या स्थळनिवड समितीनं सात ठिकाणांमधून दिल्ली निवडलं म्हणे.

सातपैकी चार ठिकाणं बसल्या जागी बाद करण्यात आली. औंध, औदुंबर, धुळे अशी तीन ठिकाणं तर आपोआप यादीतून कटली. छोट्या गावात संमेलन घेतलं तर कुणी फिरकत नाही आणि फिरकणारे खूप कटकटी करतात, असा अनुभव आल्यानं मोठ्या गावांवरच बोट ठेवण्यात आलं.

मुंबईतल्या कलिन्याच्या परिसरात (पक्षी : नजीक बांद्रा) मोकळी जागा बघितली होती. पण ती जागा विद्यापीठाच्या कॅम्पसची होती. मुंबईत हॉटेलव्यवस्था चांगली असली तरी ती मराठी साहित्यिकांना पर्वडणारी नाही. पाहुणेरावणे बोलावले तर त्यांची व्यवस्था पंचतारांकित हाटेलात करावी लागेल, आणि आयोजक हुळहुळत बसतील, अशी भीती वाटणं साहजिकच होतं.

परिणामी, मुंबईचा पत्ता कटला. इचलकरंजीचं जवळपास नक्की होणार होतं. पण काय तरी बिनसलं. साठ वर्षांपूर्वी इचलकरंजीत झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष पु. ल. देशपांडे होते. ते संमेलन इचलकरंजीकरांनी (आणि पुलंनी) गाजवलंही होतं.

जुन्या नाटकांमध्ये ‘तत: प्रविशति सखी:’ किंवा ‘तत: प्रविशति विदूषक:’ असं सूत्रधारानं जाहीर केल्यानंतर पात्र रंगमंचावर प्रवेश करत असे. तस्साच प्रवेश संजय नहार यांचा झाला. संजय नहार हे काश्मिरात पुण्याचे म्हणून ओळखले जातात, आणि पुण्यात त्यांना (का कुणास ठाऊक) पण काश्मिरी समजतात.

साहित्यक्षेत्रातही त्यांचं काम बेश्ट दर्जाचं राहिल्यानं त्यांची दिल्लीदरबारी वट राहिली आहे. पंजाबात मराठी लेखक त्यांनीच नेऊन आणले. तिथल्या मुक्कामात लस्सीवस्सी पिऊन मराठी साहित्यिक शारीरिक वजनही वाढवून आले, असं बोललं गेलं. मी म्हणत्ये, वाढलं वजन तर बिघडलं कुठं? चहाटळ मेले!!

आता यावेळी दिल्लीत झोकात संमेलन होणार, म्हणून साहित्यिक मंडळींनी चौकश्या सुरु केल्या आहेत. प्रत्येक साहित्यिकाला दिल्लीला गेल्यावर आगऱ्याचा ताज महाल बघावा लागणारच! लाल किल्ला, कुतुब मिनार तर आहेतच. साहित्यासरशी एखादं आनंद पर्यटन सहकुटुंब उरकता येईल, असं काही प्याकेज जाहीर होतंय का, याची वाट तमाम मराठी साहित्य जगत पाहात आहे, याची नोंद महामंडळानी (आणि संजय नहार यांनीही) घ्यावी!!

खरी मेख पुढेच आहे : तब्बल सत्तर वर्षांनंतर दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणार आहे. १९५४ साली तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली राजधानीत संमेलन पार पडलं होतं. यावेळीही अध्यक्ष तालेवारच असायला हवा, हे मागणं काही लई म्हणता यायचं नाही. पण तो तालेवार हवा, शिवाय तगडा, तंदुरुस्तही हवा, अशीही पूर्वअट आहेच. आता स्थळनिश्चितीनंतर अध्यक्षनिश्चितीचं मोठं काम पार पाडावं लागणार आहे. आहे कोणी संभाव्य नाव तुमच्या मनात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT