Bird and Monkey Sakal
संपादकीय

भाष्य : निसर्गाचे दान, हवे जपण्याचे भान

भारताची जैवविविधता संपन्न आणि समृद्ध आहे, याच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या एका वर्षात प्राणी, वनस्पती, पक्ष्यांच्या हजाराहून अधिक नव्या जाती, टॅक्सांची नोंद झाली आहे.

संतोष शिंत्रे

भारताची जैवविविधता संपन्न आणि समृद्ध आहे, याच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या एका वर्षात प्राणी, वनस्पती, पक्ष्यांच्या हजाराहून अधिक नव्या जाती, टॅक्सांची नोंद झाली आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देत आहे. त्याचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण सज्ज व्हायला पाहिजे.

सांप्रत काळातील उबगवाण्या राजकारणामुळे विटलेल्या मनाला सुखावणारी बातमी जुलैच्या पहिल्या आठवड्यात आली. राजकारणाच्या मथळ्यांमध्ये खरंतर ती काहीशी लुप्तच झाली. भारतीय जैववैविध्यातील प्राणी-वनस्पती जगतात तब्बल एक हजार तीन नव्या जाती (स्पेसीज) आणि नवे, विविध प्रकारात वर्गीकरण झालेले सजीवांचे गट, म्हणजेच टॅक्सा या सर्वांची निव्वळ २०२२या एकाच वर्षात नोंद झाली.

गेल्या दहा वर्षातील एकाच वर्षात नव्याने गवसलेल्या सजीवांमधील ही विक्रमी नोंद आहे, अशी माहिती प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या संचालक धृती बॅनर्जी यांनी दिली. सरकारने पर्यावरणावर अत्याचार करूनही, निसर्ग अद्याप भारताला भरभरून देतो आहे. निसर्गाचे हे पारितोषिक स्वीकारण्याबरोबर येणारी, या संपदेच्या रक्षणाची जबाबदारी मात्र आपल्यात भिनायला हवी.

भारतीय प्राणी सर्वेक्षण आणि भारतीय वनस्पती सर्वेक्षण या दोन कर्तबगार राष्ट्रीय यंत्रणांनी याचे तपशील आपापल्या अहवालात नुकतेच प्रकाशित केले. अनुक्रमे १९१६ (२०१६ नव्हे, बरं का!) आणि १९५४ मध्ये कार्यरत झालेल्या या दोन संस्था शांतपणे आपले काम योग्यरीतीने पार पाडताना दिसतात. इथे दोन तपशील लक्षात घेणे आवश्यक ठरते.

काही जाती पूर्णतः नव्याने शोधल्या आहेत, याचा अर्थ, विज्ञानाला त्या आजवर जगभरातच माहिती नव्हत्या, त्या आता ज्ञात झाल्या. काही नव्या नोंदी, म्हणजे त्या जाती जगात आधी माहिती होत्या, पण भारतात प्रथमतः नोंदल्या गेल्या. तर टॅक्सा म्हणजे विश्वकोशानुसार- प्रजाती, कुटुंब किंवा वर्ग यासारख्या कोणत्याही श्रेणीचा वर्गीकरण गट.

भारतातील प्राणीजगतात २०२२मध्ये एकूण ६६४ जातींची भर पडली. त्यातल्या ४६७ नव्यानेच शोधल्या गेल्या; तर १९७आधी माहिती असलेल्या जातींची भारतात प्रथमच नोंद झाली. यात प्रमुख उल्लेख करण्यासारखे म्हणजे सस्तन प्राण्यांच्या तीन नव्या जाती शोधल्या, तर एक नवी नोंद झाली. पक्ष्यांच्या दोन जाती भारतात नव्याने नोंदल्या गेल्या; तर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये तीस नव्या जातींची भर पडली आणि दोन नव्या नोंदी झाल्या.

उभयचर प्राण्यांच्या सहा नव्या जाती शोधल्या गेल्या, तर एक नव्याने नोंदवली गेली. मत्स्य कुळातल्या २८ जाती नव्याने शोधल्या गेल्या आणि आठ नव्या नोंदल्या गेल्या. सस्तन प्राण्यांच्या शोधल्या गेलेल्या तीन नव्या जाती म्हणजे लांब बोटांचे वाघूळ (Miniopterus phillipsi), बांबू-निवासी वाघूळ (Glischropus meghalayaus) -या दोन्ही मेघालयात सापडल्या.

तिसरी म्हणजे मॅकॉ प्रकारच्या माकडाची (वानराची नव्हे) सेला मॅकॉ असे नामकरण झालेली जात. चीनने जिथून आक्रमण केले, त्या ‘सेला पास’ खिंडीत त्यांचा शोध लागल्याने त्याचे जीवशास्त्रीय नाव Macaca Selai असे ठेवले आहे. प्राण्यांच्या, आधी अन्यत्र आढळलेल्या पण भारतात प्रथमच गवसलेल्या जातींच्या नोंदींमध्ये पांढऱ्या गालाची मॅकॉ माकडे उल्लेखनीय.

त्यांचे अस्तित्व आजवर आग्नेय तिबेटमध्ये होते, पण आपल्याकडे ती २०२२मध्ये अरुणाचल प्रदेशातील पश्‍चिम सियंग भागात प्रथमच आढळली. शास्त्रीय नाव- Macaca Leucogenys. अशाच प्रथम नोंदींमध्ये एक पक्षीही आहे, तो म्हणजे यलो रम्प्ड (पिवळ्या पोटाचा) फ्लाय कॅचर. आजवर त्याचे अस्तित्व मंगोलिया, दक्षिण चीन, बैकल, पश्चिम जपान इथे असलेले माहीत होते.

अंदमान द्वीपसमूहातील नारकोंडम बेटावर त्याची प्रथमच नोंद झाली. प्राणीजगताबद्दलच बोलायचे झाले तर २०२२ मध्ये अपृष्ठवंशीय (कणा नसलेले) प्राणी सर्वाधिक, म्हणजे ५८३ जातींचे शोधले गेले आहेत; तर कणा असलेले ८१ जातींचे. अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये संख्येने सर्वात जास्त आहेत ते कीटक (३८४ जाती).

कणा असणाऱ्या प्राण्यांमध्ये मासे सर्वाधिक संख्येने शोधले गेल्याचं दिसतं (२८ जाती), त्यांच्या खालोखाल सरपटणारे प्राणी, नंतर उभयचर, त्यानंतर सस्तन प्राणी आणि सर्वात कमी पक्षी. या सर्वच नव्या शोधलेल्या आणि नोंदलेल्या जातींसह आता भारताचे प्राणीवैविध्य एक लाख तीन हजार ९२२ जाती इतके पोहोचले आहे.

देता किती घेशील...

वनस्पती सर्वेक्षणातूनही बरीच रोचक माहिती समोर आली आहे. आजवर भारतात ४४ हजार ५००जातींच्या वनस्पती नोंदल्या गेल्या होत्या. त्यात २०२२मध्ये ३३९ टॅक्सांची भर पडली. यात ३१९ जाती आणि २० ‘इन्फ्रा-स्पेसिफिक’ टॅक्सा आहेत. १८६ टॅक्सा नव्याने सापडल्या आहेत तर १५३ ज्ञात टॅक्सांची भारतात प्रथम नोंद झाली.

नव्याने शोधलेल्यांमध्ये ३७% बीजधारी वनस्पती, २९% बुरशा, १६% दगडफुले (लायकेन्स), ८% शैवाल, ६% अमुली (मुळे नसणाऱ्या- ब्रायोफाइट्स), ३% जीवाणू आणि फक्त १% अबीजी (बीजे न धारण करणाऱ्या- टेरिडोफाईट्स) असे तपशील कळतात. बीजधारी वनस्पती सर्वाधिक संख्येने आढळल्या आहेत.

त्यात द्विदल ७३%, तर एकदल २७%. नव्या शोधल्या गेलेल्यांमध्ये १२५ आवृत्त-बीज सपुष्प (ॲनजिओस्पर्म्स) एक प्रकटबीज सपुष्प (जिम्नोस्पर्म्स), पाच अबीजी, १९ अमुली, ५५ दगडफुले, ९९ बुरशा, २७ प्रकारचे शैवाल आणि नऊ जिवाणू आहेत. शोधलेल्या नव्या प्रजातींमध्ये (जीनस), दोन शास्त्रीय नावात एक मराठी शास्त्रज्ञ आहे, -एक आहे Nandadevia pusalkar उत्तराखंडमध्ये हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारी, आणि दुसरी पश्चिम घाटाच्या दक्षिणी भागातली प्रदेशनिष्ठ- Nilgiriella pusalkar.

हे पुसाळकर मूळचे कोकण भागातले; त्यांचे बरेच काम हिमालयन वनस्पतींवर आहे. (आणखी कमीतकमी चार पुणेकरांच्या नावाने वनस्पतींची शास्त्रीय नावे पूर्वीच ठेवली गेली आहेत. हे शास्त्रज्ञ म्हणजे वा.द..वर्तक, श्री. द. महाजन, माधव गाडगीळ आणि मंदार दातार.)

थोडक्यात अनंत हस्ते निसर्गाने भारताला हे पारितोषिक दिले आहे. देता किती घेशील दो कराने. पण कोणत्याही पारितोषिकाबरोबर एक जबाबदारी येते. आजमितीला भारतातील सर्वोत्तम जैविक वैविध्य असणाऱ्या चार बायोडायव्हर्सिटी हॉट स्पॉट्समधले ९० टक्के क्षेत्रफळ नष्ट झाले आहे. त्या जागांमधील २५ प्रजाती कायमस्वरुपी नामशेष झाल्या आहेत.

२०१५ ते २०२० या वर्षांमध्ये सरकारी कृपेने सरासरी सहा लाख ६८हजार ४००हेक्टर जंगले नष्ट झालीत. संरक्षित क्षेत्रांमध्ये वाढती घुसखोरी आणि चराई होते आहे. २०१८पासून पुढील पाच वर्षात पर्यावरण खात्याने वनेतर उठाठेवींसाठी तोडून दिलेले जंगल आहे ८८हजार ९०३ हेक्टर! ज्येष्ठ जैववैविध्य शास्त्रज्ञ एहरलिच आणि एहरलिच (१९८१) यांनी जैववैविध्य नष्ट झाल्यास होणाऱ्या नुकसानीचं वर्णन ‘रिव्हेट हायपोथेसिस’ म्हणजेच एका छोट्या खिळ्याचं निसटणं असं रूपक देऊन अत्यंत समर्पक रीतीनं केलं आहे.

विविध जाती-प्रजाती, म्हणजे एखाद्या विमानाच्या दोन्ही बाजूच्या पंखात बसवलेले छोटे छोटे खिळे अशी जर कल्पना केली; तर एक-दोन खिळ्यांचं निखळणं यामुळे काही संपूर्ण पंखा मोडत/तुटत नाही. पण असे आणखी चार-दोन कालौघात सतत निखळत राहिले, तर एक दिवस तो मोडून पडून विमानाला अपघात अटळ असतो.

या अपघाताची लक्षणं आधीपासून दिसत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून आपण तो आणखी लवकर ओढवून घेतो. हे टाळायचे असेल तर सरकारने आता छोट्या सस्तन प्राण्यांसाठी व्याघ्र प्राधिकरणासारखे वेगळे महामंडळ स्थापणे, जैव-विविधता कायद्याची सर्व पातळ्यांवर कडक अंमलबजावणी करणे, विनाशकारी जंगलतोड थांबवणे, धोरणनिश्चिती करताना, प्रकल्प उभे करतांना पर्यावरणाचा विचार केंद्रस्थानी ठेवणे, परदेशी कंपन्यांना आपली जैविक संसाधने बेबंद रीतीने वापरायला परवानगी न देणे असे काही ठोस उपाय आवश्यक आहेत. तरंच पारितोषिकानंतरची जबाबदारी आपण पार पाडली, असे होईल.

(लेखक पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT