नअस्कार! टळटळीत दुपार होती...नेमकं सांगायचं तर प्रत्यक्ष रामराणा जन्मला ती वेळ आणि तोच दिवस. तसल्या त्या उन्हात मूळचा गुलाबी रंग लालबुंद झालेली एक स्वरुपसुंदर युवती शिरोळे रोड (पुण्यात हो... दरवेळी काय विचारता?) वर तरवडे क्लार्क्स इन हॉटेलचा पत्ता शोधत हिंडत होती. हॉटेलच्या लॉबीतच खळखळून हसण्याचा आवाज आला, आणि पत्ता सापडल्याचं लक्षात आलं. तिथल्या रिसेप्शनिस्टनं तोंडभर हसून विचारलं : ‘फुटाणेनानांच्या कार्यक्रमाला आलाय ना? वर जा!’
अखिल महाराष्ट्राचे नाना ऊर्फ रामदास्वामी फुटाणे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या भोजनाला उपस्थित राहण्याचं भाग्य मला लाभलं, त्या प्रसंगाची ही गोष्ट. कुणीतरी अफवा पसरवली होती की आमचे फुटाणेनाना एक्यांऐशी वर्षांचे झाले. सोशल मीडियामुळे हल्ली काहीही थापेबाजी चालते. फुटाणेनानांसारख्या हँडसम तरुणाला कोण ऐंशीच्या घरात पाठवेल? काहीतरीच!!
...पण तरीही अफवेवर विश्वास ठेवून हॉलमध्ये बघितलं. मधोमध एका गोल टेबलाशी कोंडाळं दिसलं. कोंडाळ्याच्या मधोमध फुटाणेनाना असणार, हे कुणीही ओळखलं असतं. मधोमध उत्सवमूर्ती सदाबहार, सदाहसतमुख, चिरतरुण, रामदासस्वामी फुटाणे बसलेले!! चेहरा नुकताच ‘हा जामखेडहूनच येतोय’ असा!! जामखेड या गावाचं नाव सांगून कुणीही त्यांना खिश्यात टाकावं. (मीसुद्धा जामखेडचीच, असं एकदा सांगून बघणार आहे, बघू बोलावतात का ‘शोध मराठी मनाचा’ संमेलनाला!) असो.
...फुटाणेनानांच्या बाजूला सुधीर गाडगीळ (उगीचच) सूत्रसंचालन करत बसले होते. ही गर्दी आपल्यामुळेच आहे, असं त्यांना वाटून गेलं असणार! दुसऱ्या टेबलाशी महाराष्ट्राचे दुसरे नाना ऊर्फ मारुती कांबळे ऊर्फ डॉ. मोहननाना आगाशे (टोपीसकट) बसले होते. जेवणाची वेळ जवळ येत गेली, तसतसे आणखी पाहुणे यायला लागले.
तेवढ्यात सुप्रसिद्ध कवि आणि थोर निर्माते-दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांची जबर्दस्त एण्ट्री झाली. कोंडाळ्यावरचा फोकस हलला. नागराजअण्णांनी आल्या आल्या फुटाणेनानांचा पदस्पर्श केला. मग मंजुळेअण्णांसोबत सेल्फी घेण्याचा कार्यक्रम सुरु झाला...
फुटाणेनानांवर त्यांच्या नातवंडांनी एक झक्क दृकश्राव्य फीत केली आहे. त्यात असंख्य ऐतिहासिक क्षणचित्रं होती. फुटाणेनानांचा लोकसंग्रह कित्येक पुढाऱ्यांनाही हेवा वाटावा, असा आहे. त्याचं चित्र या फितीमध्ये दिसलं.
कार्यक्रम अनौपचारिक होता. पण तो पुण्यात होता!
त्यामुळे थोडीफार भाषणं, पुष्पगुच्छ, हारतुरे वगैरे ओघानं आलंच. (खुलासा : पुण्यात मौंजीबंधनाचा कार्यक्रम असेल तरी एखादं भाषण, आभारप्रदर्शन वगैरे असतंच! शिका जरा पुणेकरांकडून!!) स्टेजवर मोहननाना आगाशेंनी माईक हातात घेऊन फुटाणेनानांच्या जुन्या मैत्रीच्या आठवणी सांगितल्या. त्या ओघात ‘सामना’ चित्रपटाच्या वेळी फुटाणेनानांनी दिलेला सव्वाशे रुपयांचा चेक बाऊन्स कसा झाला, हेही सांगितलं.
ही आठवण त्यांनी सोळाव्यांदा सांगितली असावी! फुटाणेनानांचंही हे चुकलंच. आता निदान सहस्त्रचंद्रदर्शनाच्या मुहूर्तावर तरी त्यांनी आगाशेनानांचे सव्वाशे परत करायला हवे होते. निदान जीपे तरी करावेत!! ही आठवण ऐकून नागराजअण्णांनी पंढरपूरच्या काव्यसंमेलनात फुटाणेनानांनी मला तीनशे रुपये ‘क्याश’ दिली होती, अशी उलटी आठवण सांगून आगाशेनानांना थोडं जळवलंन!!
कार्यक्रमात फुटाणेनानांनी ‘ब्रेकिंग न्यूज’ दिली. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटाच्या निर्माते-दिग्दर्शकांना दरसाल ‘सामना सन्मान’ बहाल करण्याची घोषणा त्यांनी केली. नागराजअण्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपला नाही! ते तातडीने कामाला लागले आहेत म्हणे!!
पहिला ‘सामना सन्मान’ खुद्द ‘सामना’कार फुटाणेनानांनी स्वत:जवळच ठेवावा. दुसऱ्याची निवड राष्ट्रीय चित्रपट समिती करेल!!फुटाणेनाना, तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार! भारत कधी कधी तुमचा देश असला, तरी मी मात्र सदैव तुमचीच आहे हं!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.