इतिहासपुरुष साक्षी आहे. आश्विनातली ती एक सुंदर सकाळ होती. आश्विनात फक्त चांदरातीच सुंदर असतात असे नाही, एखादी सकाळ किंवा (फॉर दॅट मॅटर) संध्याकाळही सुंदर असू शकते. त्या सुंदर सकाळी शिवतीर्थाच्या बालेकिल्ल्यात राजे सचिंत मुद्रेने विचारमग्न बसले होते. विचार करता करता त्यांनी तीन-चार कप चहा मागवला.
पाच टोलनाके उभारुन मुंबईची नाकेबंदी करणाऱ्या शत्रूस चारी मुंड्या चीत कसे करावे? ही मसलत त्यांच्या डोक्यात घोळत होती. टोलनाक्यांचा विषय मनात आला तरी राजियांच्या तळपायाची आग मस्तकाला जात असे. ‘जाळून टाका ते टोलनाके, फेकून द्या ते आडवे बांबू, आणि फोडून टाका ती टोलवाल्यांची डबडी’ ऐसा आदेश देवोन आज बारा वर्षे झाली. तरी नाकावर टिच्चून हे टोलनाके उभेच आहेत.
एखाद्या रात्री टोलनाक्यावर टोळधाड टाकोन कळस कापून न्यावेत, तर या दळिद्यांच्या नाक्यांना कळसच नाहीत! नुसती डबडी!! कापून काय आणणार? आपले राज्य आले की सरसकट सगळे टोलनाके उचलून अरबी समुद्रात खोलवर नेऊन बुडवण्याचा निर्धार त्यांनी मनोमन केला.
याच टोलनाक्यांची कटकट कायमची नष्ट करावी म्हणून आमच्या शेकडो महाराष्ट्रसैनिकांनी तडीपाऱ्या भोगल्या, कारागृहातील कष्टप्रद जीवन भोगिले, ते टोलनाके हे महाराष्ट्राच्या भूमीला लागलेले डाग आहेत, डाग! उलथून टाकलेच पाहिजेत. आमचे राज्य आले की पहिल्या निर्णयात टोलनाके उडवू, असे त्यांनी मनोमन ठरवून टाकले. तेवढ्यात- घाईघाईने बाळाजीपंत नांदगावकर अंत:पुरात विनावर्दी शिरले, आणि म्हणाले :
‘राजे, घात झाला! गनिमानं डाव साधला!!’
‘कायॅय?,’’ तंद्री बिघडवल्यानंतर जितक्या प्रेमार्द्र आवाजात बोलता येते, तेवढ्या आवाजीत राजियांनी विचारले. त्याला सामान्य लोक खेकसणे असे म्हणतात.
‘गनिमानं टोलनाके सफई गुंडाळले!,’’ बाळाजीपंतांनी बातमी फोडली. ‘‘क्क्काय? टोलनाके गुंडाळले म्हणजे?,’’ राजियांनी आश्चर्याने विचारत हाताची घट्ट मूठ वळली. तोंडात बोटे घालण्याची उबळ येवो नये, यासाठी काय काय करावे लागते! ह्या:!!
‘मुंबईला वेढणारे पाचही टोलनाके रातोरात गुंडाळण्याचे हुकूम सुटले आहेत! नो टोल, नो टोलनाका!,’ खबर पोहोचती करताना बाळाजीपंतांची दमछाक झाली नव्हती.
‘हे आपल्यामुळे घडलं, बाळाजीपंत! आमची जरब बसली म्हणून गनिमानं बऱ्या बोलानं गाशा गुंडाळला! बारा वर्ष आम्ही त्या टोलरुपी जिझिया कराच्या विरोधात लढा दिला, गनिमास त्राही माम करोन सोडिले! तेव्हा कुठे यांना आज उपरती जाहली! श्रेय आमचंच आहे, बाळाजीपंत, पेढे वाटा, पेढे!,’ ताड ताड पावले टाकीत राजे विजयी मुद्रेने म्हणाले. बाळाजींपतांना एवढेच कळले की काहीतरी आनंदाची घटना घडली आहे. परंतु, सत्ताधीशांनी टोलनाके गुंडाळले, म्हणून आपण का पेढे वाटायचे, हे त्यांस कळेना!!
‘देतो ऑर्डर पेढ्यांची!,’ ते मान खाली घालून विनम्रपणे म्हणाले.
‘टोलनाके बंद झाले, हे श्रेय फक्त आमचंच! दुसऱ्या कुणाचंही नाही, सत्तेवर आलो की आम्ही ते बंद करणारच होतो, पण काही हरकत नाही, आता आम्ही दुसरं काहीतरी बंद करु!,’ राजे समाधानाने म्हणाले.
‘बरं, बरं, पण काय बंद करायचं आपण?,’ भीत भीत बाळाजीपंतांनी विचारले.
‘बंद करण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत, या महाराष्ट्रात! त्याची चिंता तुम्हास नको, बाळाजीपंत! आम्ही समर्थ आहोत,’ राजियांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. बराच वेळ कोणीही काही बोलले नाही. शेवटी मनाचा हिय्या करोन बाळाजीपंतांनी महाराष्ट्राच्या मनातला ‘तो’ सवाल विचारलाच. त्यांनी पुशिले : ‘टोलनाके तर इतिहासजमा झाले, मग राजे, आपण आता फोडायचं तरी काय?’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.