dhing tang sakal
satirical-news

ढिंग टांग : महाराष्ट्र सदनात अप्सरा आऽऽलीऽऽ..!

ब्रिटिश नंदी

कलियुगापूर्वीची कमलपत्रावरील कमलकथा. इंद्रदेवाच्या दरबारातील एक विद्युल्लता नामक अप्सरा तपोभंग करण्याच्या ड्यूटीवर रवाना झाली. तथापि, तपोभंगासाठी मर्त्यलोकात आल्यानंतर तिजला येका धर्मदत्त नावाच्या राजाने चंमतग दाखवली. ती होती चित्रपटांची.

रुपेरी पडद्यावर झाडांच्या मागे, उद्यानात, धबधब्याखाली, हिरवळीवर, राईच्या शेतात, ट्यूलिपच्या गालिच्यावर मौजमज्जा करणारी फिल्मी अभिनेत्री बघून विद्युल्लतेचे मन हरखले, व ती येथेच रमली. तपोभंगाच्या ड्यूटीत कर्तव्य बजावण्यात कसूर केल्यामुळे इंद्रदेव रागावला, आणि त्याने तिच्यावर चौकशी पेंडिंग निलंबनाची कारवाई केली.

विद्युल्लतेस पृथ्वीतलावरच राहाणे क्रमप्राप्त होते. तिने इंद्रदेवाची मनधरणी केली व उ:शाप मागितला. इंद्रदेव म्हणाला, मर्त्यलोकात जाऊन समाजकंटकांचे निर्दाळण आणि विकासपुरुषाची आराधना करुन पाच वर्षे दिल्लीत राहून जनतेची सेवा केलीस, तरच सेवेत परत घेण्यासंबंधी विचार केला जाईल. परंतु, विद्युल्लतेने बॉलिवुडनगरीनामक राज्यात बस्तान बसवले. तेथे ती अत्यंत लोकप्रिय झाली.

चित्रपटातील तिच्या भूमिका पाहून आईस्क्रिम आणि पॉपकॉर्न खाऊ लागली. विद्युल्लतेने चंदेरी दुनियेसाठी आपले मूळ नाव त्यागून ‘नंदनादेवी’ असे टोपणनाव घेतले. चहुदिशांनी नंदनादेवी, नंदनादेवी असा गजर होऊ लागला. नंदनादेवी बुद्धिमान स्त्री असल्याने तिच्याभोवती प्रज्ञेचे वलय चमकू लागले. तिच्या निर्भय वावरण्यामुळे समाजकंटक बिचकू लागले.

एका समाजकंटकाने तिचा राहाता महाल बुल्डोझरने पाडून टाकला. परंतु, नंदनादेवी बधली नाही. तिने कमळनगरीचा आश्रय घेऊन सदरील समाजकंटकाचे राज्यच खालसा केले. पुढे नंदनादेवींनी मागे वळून पाहिले नाही. कां की त्यांनी मागे वळून पाहावे, असे काही (कोणी) उरलेच नव्हते.

पुढे काय झाले? नंदनादेवी दिल्लीदरबारी निवडून गेल्या. परंतु, दिल्लीत एक मोठी समस्या होती. तेथील सर्व मोठमोठाल्या हवेल्या आधीच बुक झाल्या होत्या. राहायचे कुठे? खायचे काय? असे मूलभूत प्रश्न उभे ठाकले. अखेरीस महाराष्ट्रसदन नावाच्या एका पंचतारांकित महालात एखादे दालन मिळू शकते, अशी माहिती मिळाली. नंदनादेवी त्वरेने पालखीत बसून महाराष्ट्र सदनाची पाहाणी करण्यासाठी पोचल्या…शी:!! काय भयानक अवस्था त्या महालाची!!

भिंतींना बटबटीत रंग दिलेला. सोफ्यावर पाचपन्नास जण बसून गेलेले. कोण कुठले मेले कुणास ठाऊक? जेवणाचे मेन्यू कार्ड बघितले तर भरली वांगी असा पदार्थ दिसला. वांगी कोण खाते? वांगी खाणारी अप्सरा कुणी पाहिली आहे का? शीशीशी!! नंदनादेवींचा तीळपापड झाला. तो पापड तेवढा त्यांनी खाल्ला. बाकी काही खाण्यासारखे नव्हतेच.

तेवढ्यात नंदनादेवींना एक सुंदर दालन दिसले. ते अत्यंत सुशोभित होते. शिवाय रिकामेच होते. नोकरचाकर अदबीने वागत होते. नंदनादेवींनी जाहीर केले : ‘मी बै इथ्थंच राहणार! इथंच राहून जनतेची सेवा करणार!’ सदरील दालन महाराष्ट्राच्या मुख्य कारभाऱ्याचे असून राजशिष्टाचारानुसार ते कुणालाही देता येणार नाही, असे नंदनादेवींना नम्रपणे सांगण्यात आले. नंदनादेवींनी थेट कारभाऱ्यांनाच फोन लावला.

तेव्हा ते ठाण्यातील किसननगरात वडापाव खात होते. ‘मेरेको दालन दो’ असे नंदनादेवींनी फर्मावताच कारभाऱ्यांचा घास घशात अडकला. त्यांनी ‘हुंहुहुफ’ असे उत्तर दिले. नंदनादेवींना प्रश्न पडला की दिल्लीत चांगली राहण्याची सोय नसेल तर जनसेवा कशी करणार? कशी करणार? कशी करणार?

महाराष्ट्राच्या कारभाऱ्यांनी घास गिळून पडेल आवाजात सांगितले, ‘देवीजी, मीच रातोरात दिल्लीला जाऊन परत येतो. मुक्काम टाकत नाही. तुम्हीही तसंच करा!’

त्यानंतर नंदनादेवी तडक पालखीत बसून रवाना झाल्या. उ:शापाची पाच वर्षे अजूनही बाकी आहेत. तेवढी सहन करणे जनतेच्या हिताचे आहे. इत्यलम.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT