बेटा : (नेहमीप्रमाणे अतिशय उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण…मम्मा, आयॅम बॅक!!
मम्मामॅडम : (कामाची कागदपत्रे हातावेगळी करत) हं!
बेटा : (नर्व्हस होत) कमॉन, क्या स्वागत नहीं करोगी?
मम्मामॅडम : (तोंड भरुन स्वागत करत) हं हं!!
बेटा : (नाराजीनं) याला काय स्वागत म्हणतात? हॅ:!!
मम्मामॅडम : (कामात व्यग्र) वेलकम होम!
बेटा : (भाषणाच्या पवित्र्यात) …देखो भय्या, यही फर्क है उनमें और हममें! हम लोगों का स्वागत करते हैं, और वो लोग नफरत का धंधा करते है…!!
मम्मामॅडम : (कोरडेपणाने) नॉट अगेन, बेटा!!
बेटा : (दुर्लक्ष करत) क्यों की हमारी मुहब्बत की दुकान में स्वागत का माल भरा पडा है!!
मम्मामॅडम : (कंटाळून) कोणाचं स्वागत करायचंय इतकं?
बेटा : (उत्साहानं) काल मला एक निनावी फोन आला होता! उसने कहा की मैं आपका बहुत बडा फॅन हूं!! हम पहले मिल चुके है…इन फॅक्ट त्यानं ओळखसुद्धा दिली!
मम्मामॅडम : (प्रश्नार्थक) चाहता होता की कार्यकर्ता?
बेटा : (खांदे उडवत) फॅन म्हणाला बुवा! भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातून माझी पदयात्रा मुंबईकडे निघाली असताना तो शेवटल्या रांगेत तिसरा उभा होता, अशी ओळख त्यानं दिली! मी म्हणालो, करेक्ट! आता ओळखलं!!
मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) ओह गॉड!
बेटा : (स्टोरी कंटिन्यू…) तर त्या चाहत्यानं सांगितलं की तो ईडीच्या कचेरीत नोकरीला असून माझा हितचिंतक आहे!!
मम्मामॅडम : (नाक मुरडत) त्या कचेरीत आपलं हित बघणारं कुणी असेल, असं वाटत नाही! हुं:!!
बेटा : (आग्रहानं) नाही, नाही, हा खरंच आपला हितचिंतक होता! त्यानं मला गोपनीय टिप दिली! म्हणाला, ‘‘सरजी, आपके घर पर रेड पडनेवाली है, आप तय्यार रहे!’’
मम्मामॅडम : (दचकून) बाप रे!! आता रे?
बेटा : तरीच माझ्या घराच्या खिडकीवर गेले दोन दिवस एक कावळा ओरडून जात होता! कावळा खिडकीवर ओरडून गेला की पाहुणे येतात, असं मला महाराष्ट्रात कुणीतरी सांगितलं होतं!! मला ती अंधश्रद्धा वाटायची, पण खरं असणार! कावळा ओरडून गेला, आणि पाठोपाठ हा हितचिंतकाचा फोन आला!!
मम्मामॅडम : (कपाळाला आठ्या घालून) काहीही स्वागतबिगत करायचं नाही त्यांचं!! काय उचकापाचक करायची ते करा, आणि निघा म्हणावं!!
बेटा : (मृदूपणाने) छे, छे, भलतंच! दाराशी आलेल्या अतिथीचा पाहुणचार करावा, हीच आपली संस्कृती आहे, त्या कमळवाल्यांना ते कधीही समजणार नाही!!
मम्मामॅडम : (चिंताग्रस्त होत) ईडीची रेड पडणार, म्हणजे देशभर खूप आरडाओरडा होणार! कर्मा!!
बेटा : (प्रसन्नपणे) मी त्यांच्यासाठी चहाबिस्कुट तयार ठेवणार आहे! जमलं तर ओवाळीनसुद्धा!!
मम्मामॅडम : (शिसारी आल्यागत) शी:!!
बेटा : (समजावणीच्या सुरात) मी त्या हितचिंतकालाही सांगितलं की, मेरे प्रिय मित्र, मी तुझ्या सहकाऱ्यांचं यथोचित स्वागत करीन! त्यांना चहागिहा पाजीन!! सोयीच्या वेळेत आले तर आमच्या घराजवळ एका खोमच्यावर चांगला गरमागरम समोसा मिळतो, तो मागवीन!! काऽऽही काळजी करु नकोस! मुहब्बत की दुकान में चाय तो मिलतीही है ना!!
मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) कर्म माझं! मग काय म्हणाला तो?
बेटा : (निरागसपणाने) म्हणाला की पाच जण येतील, त्यांच्यासाठी बिनसाखरेचा चहा बनवा, त्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे!! मी म्हणालो, ओक्के!!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.