dhing tang sakal
satirical-news

ढिंग टांग : आम्ही कोण म्हणुनि काय पुसतां?

ब्रिटिश नंदी

वाचकहो, आपुला देश हा विविधतेने विनटलेला आहे. अनेक जातिधर्माचे, वर्णरंगाचे, लांबीरुंदीचे जनलोक या भूमीत युगानुयुगे गुण्यागोविंदाने राहतात. ज्याला आपण भारत देश असे सर्वसाधारणपणे म्हणतो, तेथील मूळपुरुष गुण्या आणि गोविंदा हेच दोघे होते, हे भाषाशास्त्रदृष्ट्या सहज सिद्ध करता येते. यापैकी गुण्या हा वर्णाने थोडासा बैंगणी रंगाचा, आणि गोविंदा हा काहीसा कोहळ्याच्या वर्णाचा असावा, असे मानण्यास जागा आहे. कां की, गुण्यागोविंदाने नांदणारे वंशज अशाच मिश्र वर्णाचे आजही इत्रतत्र दिसतात.

सुप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ आणि परदेशात (राहून राहून) भयंकर नावाजलेले असे जे की पं. सॅमश्री पित्रोडा ऊर्फ अंकल सॅम यांनी मध्यंतरी ‘आपण कोठून आलो?’ या विषयावर आपले मूलभूत विचार मांडले. ‘आपण कोठून आलो?’ हा प्रश्न मुळात गहन आहे. ज्याला आपण सर्वसाधारणपणे महाराष्ट्र असे म्हणतो, त्या प्रांतात सर्वसाधारणपणे मराठी भाषा बोलली जाते. (वाचली जात नाही, असे नवे संशोधन आहे, पण ते एक असो.) या मराठी भाषेत ‘आपण कोठून आलो?’ या प्रश्नाला अतिशय समर्पक उत्तरे आहेत.

उदाहरणार्थ, अंकल सॅम यांनी विचारलेल्या या मूलभूत प्रश्नाला ‘ये दावतो’ असेही कुणी उत्तर देईल! अंकल सॅम यांनी ‘आपण कसे दिसतो?’ किंवा ‘कुणासारखे दिसतो?’ असाही एक उपप्रश्न उपस्थित केला आहे. हा प्रश्नही अतिशय गहन असून यालाही ‘ये दावतो’ असेच उत्तर देता येईल. परंतु, मानववंशशास्त्र म्हटले की खोलात शिरणे आले. त्यानुसार आम्ही खोलात शिरत आहो.

एकंदरीत, भारतीय उपखंडातील विविध संस्कृतींचा भौगोलिक, सामाजिक आणि जीवशास्त्रीय धांडोळा घेतल्यास फार रंजक इतिहास हाती लागतो. भारतातील ईशान्येकडील किंवा आपण ज्याला पूर्व म्हणू, त्या भागातील माणसे चिनी वळणाची, दक्षिणेतील माणसे आफ्रिकी किंवा हबशी ठेवणीची, पश्चिमेकडील माणसे अरबी बांधणीची आणि उत्तरेतील मनुष्ये गोरटेली अर्थात कांतिमान असतात, असे अंकल सॅम यांचे निरीक्षण अत्यंत मनोज्ञ आहे. भारतखंडात हा वर्णसंकर कसा झाला असेल, याचे काही सिद्धांत मांडले जातात. यापैकी काही नुसतेच सिद्धांत असले तरी काही महासिद्धांत आहेत.

प्राचीन काळी महाराष्ट्राच्या बहुतांश मुलखात अरण्य होते. दंडकारण्य वगैरे म्हंटात ते हेच. तेथे पशुपक्षी राहात असत. बहुतेक लोकसंख्या झाडांवर राहात असे. आजही काही मराठी मनुष्ये झाडांवरच राहण्याच्या लायकीची वाटतात. पण तो वेगळा विषय झाला. ‘आपण कसे दिसतो?’ हे शोधून काढण्यासाठी आम्ही स्पेसिमेन म्हणून अंकल सॅम यांनाच निरखायला घेतले. निरीक्षणाअंती आम्ही काही महत्त्वाच्या नोंदी केल्या. त्या पुढेमागे (किंवा मागेपुढे) अभ्यासास उपयोगी ठराव्यात.

निरीक्षण १ : सामान्य माणसाचा वर्ण हा थालिपीठाच्या जवळ जाणारा असून, त्याचे वजनही फारसे नसावे.

निरीक्षण २ : मनुष्य बैठ्या प्रकृतीचा असावा.

निरीक्षण ३ : सदरील स्पेसिमन तोंडाला येईल ते बोलणारा असावा.

निरीक्षण ४ : रिकामटेकडे बसून उगाच दोघा-चौघांत भांडणे लावून स्वतः लांबून मज्जा बघण्याचा या स्पेसिमनास छंद असावा.

निरीक्षण ५ : कुणीही विचारीत नसताना आपल्याला फार कळते, असे दाखवत अन्य जनांस तुच्छ लेखण्याची त्यास खोड असावी.

...आश्चर्याची बाब म्हणजे अंकल सॅम यांच्याठायी आम्हाला चिनी, हबशी, अरबी आणि गौरांग अशी सर्व लक्षणे दिसली. गुण्यागोविंदाची गुणसूत्रे वाहणारा हाच तो संप्रति अवतार असे मानून आम्ही अंकल सॅम यांस वंदन करितो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT