‘शोले’, ‘जंजीर’ फेम सलीम-जावेद या विख्यात पटकथाकार जोडगोळीला मैलोगणती मागे टाकणारी संजय-नबाब ही नवी जोडी क्षितीजावर तळपते आहे, या जोडगोळीच्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेला आमचे अनुक्रमे वंदन व आदाबअर्ज!! संजयाजी आणि नबाबभाई यांनी सध्या एक ब्लॉकबस्टर चित्रपट लिहिण्यास घेतला असून हा महाचित्रपट अनेक अर्थांनी युनिक आहे. युनिक अशासाठी की, संजयाजी-नबाबभाई एकेक सीन लिहितात, आणि ताबडतोब तो सीन प्रदर्शित होत्साता रसिकांच्या पसंतीस उतरतो. दुर्दैवाने पटकथेच्या धंद्यात हल्ली काही संधीसाधू नवपटकथाकार आपापल्या स्टोऱ्या रेटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आम्ही संजय-नबाब या जोडगोळीची प्रदीर्घ मुलाखत घेतली. मुलाखत संपूर्णपणे देण्यात काहीच हशील नाही. थोडासा अंश मात्र देत आहो :
आम्ही : (आमचा एक केपांचा आवाज...) तुमची ही स्टोरीबिरी कधीपर्यंत चालणार?
संजयाजी : (रोखून बघत) कोणाची माय व्यालीये असा प्रश्न विचारण्याची?
नबाबभाई : (शायराना अंदाज...) शुरुआत उन्होनें की थी, खतम हम करेंगे!
आम्ही : (नाद सोडत) तुम्ही जोडीनं पटकथा लिहिता... कसं जमतं तुम्हाला?
संजयाजी : (गुरकावून) हे विचारणारे तुम्ही कोण? सीबीआय की ईडी की एनसीबी?
नबाबभाई : (एनसीबीचं नाव ऐकल्याने पित्त खवळून) आ देखें जरा किसमें कितना है दम...!
आम्ही : (आमचा आणखी एक सुटा फटाका...) तुमचे स्पर्धक पटकथाकार नानासाहेब फडणवीस यांनी बॉम्ब टाकून तुमच्या चित्रपटाचा क्लायमॅक्स बदलायचा प्रयत्न केला, तुमची प्रतिक्रिया द्या!
संजयाजी : (हाताची घडी घालून) पिक्चर अजून इंटर्वलपर्यंतदेखील आलेलं नाही, क्लायमॅक्स कसला?
नबाबभाई : (गुप्त भानगड सांगताना काढतात, तसल्या आवाजात...) ते काय क्लायमॅक्स आहेत? मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहेत!
आम्ही : (थकलेल्या आवाजात) तुम्ही डांबरी फटाका लावायचा, मग त्यांनी आपटबार फोडायचा. तुम्ही लक्ष्मी तोटा उडवायचा, त्यांनी सुतळी बॉम्ब मडक्यात फोडायचा, त्यांनी अटम बॉम्ब फोडला की तुम्ही हैड्रोजन बॉम्बचा महास्फोट घडवून आणायचा!...असं किती दिवस चालणार?
नबाबभाई : (आत्मविश्वासाने) फुल टर्म...पांच साल!
संजयाजी : (उग्र आविर्भावात) पंचवीस...पंचवीस वर्ष! काय म्हणणं आहे? कोणाची माय व्यालीये...(वगैरे वगैरे.)
आम्ही : (घाबरुन विषयाला बगल देत) तुमच्या पटकथा पातळ...आय मीन डायल्यूट करण्यासाठी सोमय्या-फडणवीसांसारखे काही नवे पटकथाकार त्यांच्या स्टोऱ्या प्रमोट करताना दिसत आहेत! ही निरोगी स्पर्धा वाटते का?
संजयाजी : (पुढे जाऊन मागे येत) कोण नवे पटकथाकार? मी ओळखत नाही! कुणाची हिंमत आहे आमच्याशी स्पर्धा करण्याची?
नबाबभाई : (येळकोट न गेल्याने) हम से ना टकराना! हमसे जो टकरायेगा, मिट्टी में मिल जाएगा!
आम्ही : (एक पोपटबार फोडण्याचा क्षीण प्रयत्न करत) तुमच्या चित्रपटाचा खरा हिरो कोण?
संजयाजी : (अभिमानाने) एक सोडून दोन आहेत! काय म्हणणं आहे?
नबाबभाई : (दर्पोक्तीने) म्हणून तर आम्हीसुद्धा हिरोपेक्षा एक रुपया जास्त मानधन घेतो!
आम्ही : (आंबट सुरातला आंबट प्रश्न) तुमच्या चित्रपटात आयटम साँग आहे का?
संजयाजी : (किंचित हसत) अर्थात! मीच लिहिलंय! म्युझिकही माझंच आहे!
नबाबभाई : (न्यूट्राँन बॉम्ब फोडत) मीडियाचा नाच याच आयटम साँगवर आहेत! कळला काय?
(इथे प्रचंड मोठा स्फोट होऊन धूर निघाला, आणि आम्ही बेशुध्द पडलो व मुलाखत संपली!)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.