स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
राजाधिराज उधोजीमहाराज अस्वस्थ होत्साते अंत:पुरात येरझारा घालीत आहेत. इकडून तिकडे, तिकडून इकडे...त्यांचे लक्ष दरवाजाकडे आहे. कमरेची तलवार चालताना मध्ये मध्ये येत असल्याने ते वैतागले आहेत. अब आगे...
उधोजीराजे : (दाराकडे पाहात मोठ्यांदा...) कोण आहे रे तिकडे? कान फुटले काऽऽ...! (राजे आणखीनच अस्वस्थ होतात. तलवार उपसत दारावर मुठीने ठोकतात.) अरे बाहेर कुणी आहे का? उघडा ना दार!!
संजयाजी : (खिडकीतून प्रवेश करत) मुजरा महाराज! आपण याद केली होती का?
उधोजीराजे : (गळ्यावर बोटांचा पाचुंदा हलकेच हापटत) याद? ओरडून ओरडून घसा सुकला माझा! कुठे तडमडलेत सगळे? घटकाभर हाका मारतोय, कुणी येईल तर शपथ!!
संजयाजी : (हाताची घडी घालून) सगळे बिझी आहेत, महाराज! जरा सबुरीनं घ्यावं!!
उधोजीराजे : (संतापून) खामोश! सगळे बिझी आहेत, आणि आम्ही तेवढे रिकामे आहोत का? गर्दन मारीन!!
संजयाजी : (मान तुकवून) आपली इच्छा महाराज! तलवार तुमची, मान तुमची!
उधोजीराजे : (संतप्त तारस्वरात) कुठे गेलेत सगळे? आणि तुम्ही असे खिडकीतून का आलात?
संजयाजी : (शांतपणाने) आज थोरल्या साहेबांचा वाढदिवस! त्यांचं अभीष्टचिंतन करण्यासाठी सर्वजण तेथे गेले आहेत, महाराज! मीदेखील तिथूनच परतलो!
उधोजीराजे : (सर्द होत) खिडकीतून ये-जा करता?
संजयाजी : (अदबीने) बरं पडतं महाराज! शॉर्टकट आहे! शिवाय लोकांच्या नजरेत न आलेलं बरं असतं!
उधोजीराजे : (संशयानं) पाहातॉय, पाहातॉय आम्ही! हल्ली तुमचा तिकडेच राबता वाढलाय!
संजयाजी : (अतिनम्रतेनं) गैरसमज होतो आहे, महाराज!
उधोजीराजे : (डोळे गरागरा फिरवत) तुम्ही आमचे प्रवक्ते आहात की त्यांचे? त्यांची स्तुती करताना तुमच्या जिभेवर रसवंती नाचते! आम्हाला नुसते, ‘महाराज’ म्हटले की झाले!! असंच ना?
संजयाजी : (पायाशी लोळण घेत) नका, नका! महाराज, काळजाला घरं पाडणारे बोल लावू नका!
उधोजीराजे : (कमरेवर हात ठेवत टेचात) हल्ली तुम्ही त्यांच्याच बंगल्यावर जास्त असता, असा रिपोर्ट आलाय आमच्याकडे! पार्टी बदलायचा विचार आहे वाटतं! एक लक्षात ठेवा, घड्याळाच्या काट्यावर धनुष्यातून बाण सुटत नसतो!!
संजयाजी : (कानावर हात ठेवत) ऐकवत नाहीत हे आरोप, महाराज!
उधोजीराजे : (भावव्याकुळतेने गुणगुणत)...बहरला पारिजात दारि, फुले कां पडती शेजाऽऽआआआरीऽऽ...!
संजयाजी : (हात जोडून) आम्ही तो एक साधासा पूल आहोत महाराज! खाशांच्या गाड्या आमच्यावरुन गुजरल्या की आम्ही धन्य होतो! तेवढीच आमची योग्यता!!
उधोजीराजे : (गुळमुळीतपणे) तुमचीच ‘तिकडे’ जास्त उठबस असते, म्हणून भाव खाऊ नका!
संजयाजी : (गुपित सांगितल्याच्या सुरात) तिकडे आमचा राबता आहे, हे खरं! पण तीच चतुर राजकीय खेळी आहे, महाराज! त्यामुळे बाकीचे घड्याळवाले आपल्याला दबकून राहतात! गंमत म्हंजे हल्ली त्यांचेच प्रवक्ते मला सकाळी फोन करुन विचारतात की, ‘साहेब, आम्ही आज काय बोलू?’ हाहा!!
उधोजीराजे : (गुरकावून) ते सगळं ठीक आहे, पण निष्ठा सांभाळा, निष्ठा!
संजयाजी : (बेपर्वाईने) ती आहेच की!
उधोजीराजे : (उसनं) आम्हीदेखील चांगला चार मजली पुष्पगुच्छ पाठवलाय बरं का त्यांना!
संजयाजी : (थंडपणाने) बघितला! इथून मीच पाठवला, आणि तिथं मीच टेम्पोतून उतरुन घेतला!!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.