Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : ...येथे भाकरी फिरवून मिळेल!

माझी अवस्था सध्या एकाच हौसिंग सोसायटीत चार घरी सैपाकपाण्याला जाणाऱ्या भगिनीसारखी झाली आहे.

ब्रिटिश नंदी

आजची तिथी : शोभन संवत्सर श्रीशके १९४५

आषाढ कृ. तृतीया.

आजचा वार : नमोवार...याने की गुरुवार!

आजचा सुविचार : आधी ‘हाता’ला चटके, तेव्हा मिळते भाकर!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) माझी अवस्था सध्या एकाच हौसिंग सोसायटीत चार घरी सैपाकपाण्याला जाणाऱ्या भगिनीसारखी झाली आहे. प्रत्येकाला वाटते की, चपातीवाल्या बाईंनी फक्त आपल्या घरी यावे! दुसऱ्याच्या घरी काय रांधले, याची हळूच माहिती द्यावी!! एकाच्या घरी दांडी मारुन दुसऱ्याच्या घरी भाकऱ्या थापल्या की बाकीच्या तीन घरांमध्ये कटकट होते. भाकऱ्या भाजायचा हा उद्योग मला लौकर आवरता घ्यायला हवा, अन्यथा भलतीच भानगड होईल.

काठवटात पीठ घेऊन भाकरी थापणे हे एकवेळ सोपे आहे. पण तव्यावर फिरवणे कर्मकठीण! त्याने हात भाजतो. अगदी एक्सपर्ट सुगरणीचाही हात भाजू शकतो. नजर हटी, दुर्घटना घटी! हाच नियम भाकरीलाही लागू आहे. अशा कित्येकांच्या भाकऱ्या करपलेल्या मी पाहिल्या आहेत.

मी स्वत: मात्र भरपूर प्रॅक्टिस करुन भाकऱ्या फिरवण्यात एक्सपर्ट झालो आहे. याचे श्रेय वंदनीय मा. मोटाभाई यांनाच द्यायला हवे. ते फुंकणी घेऊन शेजारीच उभे राहायचे! मी भाकऱ्या फिरवायला त्यांच्या हाताखालीच शिकलो. तेच मला चार घरी भाकरी फिरवण्याची कामे मिळवून देतात.

भाकरी फिरवण्यात माझ्याइतका एक्सपर्ट माणूस उभ्या महाराष्ट्रात आढळणार नाही. म्हणून काही लोक माझ्यावर जळतातही! ‘कशाला उगाच लष्करच्या भाकऱ्या भाजताय?’ असे मला वारंवार सांगितले जाते. ते लोक माझ्यावर नजर ठेवतात. मग मी वेषांतर करुन भाकऱ्या भाजायला जातो!! शक्यतो मी रात्री-अपरात्रीच ही कामे करतो. मला भाकऱ्या भाजायचा छंदच आहे म्हणा ना!

भाजण्यापेक्षा मला भाकरी फिरवायला भारी आवडते. गोलगोल भाकरी, पाणी लावून फिरवायची, आणि थप्पकन उलटायची. नंतर थोडावेळ चुलीपाशी उभी करुन ठेवायची. अगदीच टम्म फुगली असेल तर बोटाने भोक पाडून तिची वाफ घालवायची.!! ...हे सगळे मला नीट येते!

राजकारणात भाकरी फिरवण्याला अपरंपार महत्त्व आहे. अनेक राजकीय पक्षांना भाकरी फिरवायची असते. पण भाकरी फिरवताना हात भाजेल अशी भीती वाटून ते माझ्याकडे येतात. मग मी त्यांना भाकरी फिरवून देतो. या घटकेला महाराष्ट्रातल्या बहुतेक राजकीय पक्षांच्या भाकऱ्या मीच फिरवून दिल्या आहेत. भाकरी वेळेत फिरवली नाही तर ती करपते. जळते. काही पक्षांचे असेच झाले...

मध्यंतरी आमच्या जुन्या मित्र पक्षाला भाकरी फिरवण्याची गरज आहे, हे माझ्या लक्षात आले. त्यांनी भाकरी खाणेच सोडले होते. रोज पावभाजी खायचे! पावभाजी रोज खाल्ली की पोट बिघडते. मग मी त्यांना भाकरी फिरवून दिली. आता ते पावभाजीवरुन वडापाववर आले आहेत. वडापाव वाईट लागत नाही, असे ते सांगू लागले आहेत. असो.

आमचा आणखी एक छुपा मित्र पक्ष आहे. छुपा म्हंजे वरकरणी आमचं भांडण आहे, पण आतून मेतकूट!! त्यांना भाकरी फिरवण्याची इच्छा झाली. आज फिरवू, उद्या फिरवू, असं करता करता भाकरीचा पत्ताच उरला नाही. मग मी एका रात्री जाऊन त्यांची भाकरी फिरवून दिली.

आता तर मी ‘येथे भाकरी फिरवून मिळेल’ असा बोर्डच दाराशी लावणार आहे. हा माझा नवा ‘स्टार्टप’ आहे. परवा मा. मोटाभाईंनी फोन करुन नवी ऑर्डर दिली. म्हणाले, ‘सांभळो! आता आपल्याच पक्षात भाकरी फिरवावी लागणार आहे! तयारीत रहा!’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT