Dhing tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : बघता काय, सही करा!

‘एक सही संतापाची’ या आमच्या उपक्रमाला माझ्या महाराष्ट्राच्या नागरिकांनी (शाई) भरभरुन प्रतिसाद दिला, याचा विशेष आनंद वाटतो.

ब्रिटिश नंदी

‘एक सही संतापाची’ या आमच्या उपक्रमाला माझ्या महाराष्ट्राच्या नागरिकांनी (शाई) भरभरुन प्रतिसाद दिला, याचा विशेष आनंद वाटतो. काळ मोठा कठीण आला आहे. कोण कोठल्या पक्षात जात आहे, आणि कोण येत आहे? काही कळेनासे झाले आहे. अशा परिस्थितीत मतदाराच्या हाती काय उरते? फक्त एक सही!!

हल्लीच्या काळात शाई ही (दुसऱ्याच्या) तोंडाला काळे फासण्यासाठी असते, असा गैरसमज पसरला होता. परंतु, या द्रवाचा उपयोग संतापाला वाचा फोडण्यासाठीही केला जाऊ शकतो, हे आता लक्षात आले!! पूर्वीच्या काळी या द्रवाचा उपयोग काही अजाण लोक चक्क लिहिण्यासाठी करत असत. दौत नावाची एक बाटली असे. त्यात शाई असे. दौत फुटली की शाई पसरे. काही लेखण्याही पाझरणाऱ्या असत. त्याने बोटांस शाई लागत असे. हल्ली कोणी शाईचे पेन वापरत नाही. बॉलपेनदेखील कालबाह्य होत चालले. -आता सगळे अंगठेबहाद्दर! अंगठ्यांनी मोबाइलची बटणे दाबून, दाबून लिहितात!!

पण सही करण्यासाठी शाई लागते. काही लोक सही ठोकतात, करतबिरत नाहीत. संतापाची सही ही ठोकायची सही आहे. आमच्या उपक्रमात अनेकांनी चौकाचौकात उभे राहून सह्या ठोकल्या! जागोजाग फलक (पक्षी : फ्लेक्स) लावले होते. पेन उचलायचे, सही ठोकायची, असा कार्यक्रम होता. अनेकांनी सहभाग घेऊन आपण साक्षर असल्याचा पुरावा दिला. त्यांचे पुनश्च एकवार अभिनंदन! तथापि, या सही उपक्रमाचा (अधिक) गैरवापर होऊ नये म्हणून काही मौलिक सूचना येणेप्रमाणे:

१. खोटी सही करु नये!

२. धनादेशावर सही इंग्रजीत, आणि ‘एक सही संतापाची’च्या फलकावर मराठीत, असे चालणार नाही! सही चालणारीच हवी!!

३. सही व्यतिरिक्त काही आक्षेपार्ह मजकूर काही फलकांवर आढळून आला. उदाहरणार्थ, ‘बंटी मोरे, माझे हजार रुपये वापस कर’ हा जाहीर इशारा सहीसोबत लिहिण्याचे कारण नाही. कोणत्याही प्रकारचा अवमानकारक मजकूर लिहिणेही योग्य नव्हे!! चित्रे काढणे हा तर दखलपात्र गुन्हा मानण्यात येईल!!

४. आमच्या महाराष्ट्रसैनिकांनी निष्ठेने ही मोहीम राबवली आहे. फलकाच्या बाजूस उभ्या असलेल्या म. सैनिकांस ‘पेनातली शाई संपली, दुसरं द्या’ असे उर्मटासारखे सांगू नये! खिशातले पेन काढून निमूटपणाने सही करावी.

५. स्वत:च्या स्वाक्षरीला जागा करण्यासाठी दुसऱ्याच्या सह्या फडक्याने पुसणे, स्वार्थीपणाचे आहे. अशाने महाराष्ट्राचे नवनिर्माण कसे होणार?

६. ‘एक सही संतापाची’ हा एक कल्पक आणि अभिनव उपक्रम आहे. लोकांच्या मनातील असंतोषाला वाट मिळावी, म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला. तो सेल्फी पॉइण्ट नव्हे!! सह्या करुन सेल्फी घेण्याचे प्रकार टाळावेत!!

७. काही फलकांपाशी गर्दी झालेली बघून उद्यमशील उत्तर भारतीय बांधवांनी तेथे भेळपुरीच्या गाड्या लावल्याचे आढळून आले आहे! ‘एक भेळपुरी संतापाची’ या नावाचा आपला उपक्रम नाही, याची नोंद घ्यावी.

८. संतापाच्या भरात सही चुकते. पण म्हणून आठ-दहा सह्या करुन ठेवणे शहाणपणाचे नाही.

९. धनादेशावरील सहीत फरक पडला म्हणून बँकेत क्याशर रोख रक्कम देत नाही, हे मान्य. परंतु, फलकावर अचूक सही केली तरी कोणीही रक्कम देणार नाही, याची नोंद घ्यावी.

आणि सर्वात महत्त्वाचे-

१०. सह्यांनी फलक भरल्यावर तो उचलून कोणीही शिवाजी पार्क, दादर येथील पत्त्यावर आणून ठेवू नये!! तसे केल्यास ‘एक तडी संतापाची’ देण्यात येईल!! या ‘सत्कारा’साठी ‘शिवतीर्था’च्या दाराशीच काही निवडक महाराष्ट्र सैनिक नामजाद करणेत आले आहेत. जय महाराष्ट्र. सही-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT