Dhing Tang sakal
satirical-news

ढिंग टांग : निबंधलेखन : एक स्वयंशिक्षा अभियान...!

माणसे मारा किंवा काहीही गुन्हा करा, तीनशे शब्दांचा निबंध लिहून सुटका साधता येते, हे यंदा नवीनच कळले. निबंध लिहिणे ही जन्मठेप अथवा फाशीच्या शिक्षेपेक्षाही कठोर शिक्षा आहे.

ब्रिटिश नंदी

माणसे मारा किंवा काहीही गुन्हा करा, तीनशे शब्दांचा निबंध लिहून सुटका साधता येते, हे यंदा नवीनच कळले. निबंध लिहिणे ही जन्मठेप अथवा फाशीच्या शिक्षेपेक्षाही कठोर शिक्षा आहे, असे आमचे बालपणापासूनच मत होते. या निबंधापायी आम्ही शालेय जीवनात खूप त्रास सोसला.

गुर्जी कायम थर्ड डिग्रीचा अवलंब करीत असत. तथापि, जमाना आता बदलला आहे. दुर्मिळात दुर्मिळ गुन्ह्यासाठी निबंधासारखी कठोरात कठोर शिक्षा ठोठावणारी व्यवस्था आपल्या देशात निर्माण झाली आहे. जय हो!

सदरील निबंध एका पळपुट्या आरोपीने लिहून पाठवला आहे. सदरील इसम हा काही बँकांना फसवून परदेशी पळून गेल्याचा वहीम आहे. त्याला फरफटत भारतात ओढून आणण्याचा आपल्या तपास यंत्रणांचा जुना इरादा आहे. पण पठ्ठ्या काही हाती लागत नाही. परदेशातून तो (गॉगल घालून) हमेशा वाकुल्या दाखवतो. तथापि, सदरील संशयित गुन्हेगारानेही निबंध लेखनाचा अखेरचा पर्याय निवडून मोकळे होण्याचा मार्ग पत्करला असे दिसते.

हे शरणागतीच्याही पलिकडचे आहे, असे आमचे नम्र मत आहे. त्याचाच निबंध येथे देत आहो. तो वाचून त्याला मुक्त करावे, असे काही वाचकांना (संध्याकाळच्या सुमारास) वाटू शकेल! परंतु, शुद्धलेखनाच्या चुका बघून त्याला पुन्हा काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावावी, असेही वाटेल!! वाचा...

टायटल : खंड्या, खंड्या, ये रे...!

नीबंध : भारत माझा देश आहे. जरि मी तिथे राहात नसलो तरी मला भारताची खूप आठवण येते. माझा देश खुप खुप महान आहे. पण मला तिथे जाता येत नाही. मि तिथे गेलो तर पोलिस मला पकडतील, असे लोक म्हणतात. मी खरेच काही गुन्हा केलेला नाही. तरीही मला फरार घोषित करण्यात आले. मि निरागस आहे.

मला खंड्या पक्षी खूप आवडतो. खंड्या पक्ष्यावर मि कविता केली. ‘‘खंड्या, खंड्या ये रे, माझा गिलास भर रे, बाटली गेली फुटून, खंड्या गेला पळून!’’ ही कविता खूप गाजली. मला खंड्याबरोबरच सोन्याचीही खूप आवड आहे. गळ्यात दोन-तीन किलोच्या साखळ्या, हातात दोन-तीन पाव किलोची कडी, अंगठ्या असे घालून मी डझनभर सुंदऱ्यांसमवेत कायम जगभर फिरलो. माणसाला देवाने दहाच बोटे का दिली? याची मला तेव्हा खंत वाटत असे.

कारण माझ्याकडे खुप अंगठ्या आहेत. वीस लाखाचा चष्मा, पंचवीस लाखाचे गॉगल, पाच लाखाचा सूट आणि एक लाखाचा शर्ट असे सगळे मी वापरत असे. यासाठी खुप पैसा लागतो, आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या भारतीय बँकांमध्ये खुप खुप पैसा पडून आहे.

त्याचा वापर करुनच मी माझे छंद जोपासले. या छंदांपायी मी तीन-चार बँकांकडून हजारो कोटींची कर्जे घेतली, आणि नंतर ती फेडलीच नाहीत. आहे की नाही चंमत-ग! माझी एक खंड्या विमान कंपनीदेखील होती. विमानात हवाई सुंदऱ्या होत्या.

एका बँकेचे कर्ज फेडण्यासाठी मी निघालो असता वाटेत एका मनुष्याने मला आलिशान जहाज दाखवले. ते खुप सूंदर होते. मी त्याला विचारले, ‘‘कितीला देतो?’’ तर तो म्हणाला, ‘‘तुमच्यासाठी साहेब, फक्त सातशे कोटी!’’ मी घेऊन टाकले. त्यामुळे मला बँकेचे पैसे बुडवावेच लागले. भारतीय बँकांचा मला खुप अभीमान वाटतो.

माणसाने कोणाची फसवणूक करु नये. श्रीमंतीचे प्रदर्शन कधीही करु नये. आपण बरे, आणि आपला खंड्या बरा! मी आता सूधारलो आहे. जय हिंद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्ष बदलूनही अपयश आलेल्या नेत्यांची वाटचाल कशी राहणार? वेगळा विचार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही!

Latest Maharashtra News Updates : शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची मातोश्रीवर बैठक

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

Jowar-Beet Crackers :थंडीत चविष्ट आणि हेल्दी स्नॅक खावंसं वाटतं? घरच्याघरी बनवा ज्वारी-बिटचे क्रॅकर्स!

Vikas Thackeray : त्सुनामीच्या लाटेत पश्चिमने तारला ‘पंजा’...जनतेची मिळाली ‘विकास’ला साथ

SCROLL FOR NEXT