ढिंग टांग  sakal
satirical-news

ढिंग टांग - माघारीचे ‘राज’कारण !

पत्र लिहिण्यास कारण की एका पोटनिवडणुकीत तुम्ही उमेदवार दिला आहे

-ब्रिटिश नंदी

प्रिय मा. श्री. नानासाहेब यांसी जय महाराष्ट्र. गेले काही वर्षे महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल माझा अभ्यास चालू होता, हे आपणांस ठाऊकें आहेच. बरीच पुस्तके वाचून काढली. एखादा ग्रंथ आपल्यालाही लिहिता येईल असा आत्मविश्वास आला आहे. बघू या, ईश्वरेच्छा बलियसी. आपल्या हातात तरी काय आहे?

पत्र लिहिण्यास कारण की एका पोटनिवडणुकीत तुम्ही उमेदवार दिला आहे, असे कळले. लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली की ती लढवू नये, या मताचा मी आहे. कारण तीच महाराष्ट्राची (पक्षी : आमची) संस्कृती आहे. मी आमच्या पक्षातर्फे कधीही अशी निवडणूक लढवत नाही. किंबहुना, आयुष्यातल्या कित्येक निवडणुका मी वेगवेगळ्या माणुसकीच्या कारणास्तव लढवल्या नाहीत, इतकेच नव्हे तर संस्कृती जपण्यासाठी मुद्दाम हरलोदेखील आहे!! अशा निवडणुका शक्यतो बिनविरोध व्हाव्यात. याच विचाराने मी काल रोजी मा. कर्मवीर भाईसाहेबांची भेट घेतली. तर त्यांनी ‘‘कुठली निवडणूक? मी कुठे

लढवतोय? मला कसं माहीत नाही? अरेच्चा!!’’ असे आश्चर्यजनक उद्गार काढले. (ते बघून) मीच तोंडात बोटे घातली!! अखेर कर्मवीरांचा गट या निवडणुकीपासून लांब असून ती फक्त आपला पक्ष लढवतो आहे, अशी माहिती मिळाली. तुम्हाला भेटायचे म्हणजे, तुम्ही ‘घरी येतो’ म्हणणार! मग आपले जेवण होणार! जेवणानंतर ग्यालरीत गप्पा होणार…कारण साग्रसंगीत जेवण हीदेखील महाराष्ट्राची (पक्षी : आमची) संस्कृती आहेच! एवढ्या वेळात निवडणूक आटोपून गेली असती, म्हणून हे तातडीचे पत्र लिहित आहे! असो.

सदरील निवडणुकीतून माघार घेऊन संस्कृती जपावी, अशी माझी विनंती आहे. कां की, माघार घेणेही आपली संस्कृती आहेच. कळावे. आपला, साहेब. (शिवाजी पार्क)

ता. क. : जेवणाचे पत्र नंतर वेगळे पाठवत आहे! हे शुद्ध माघारीची विनंती करणारे पत्र आहे, याची नोंद घ्यावी! प्लीज!!

माननीय साहेब, जय महाराष्ट्र, पत्र पाठवण्याची तसदी उगीच घेतलीत. मी तोच विचार करत होतो. परंतु, गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातील राजकारण एवढे बदलले आहे की, आमदारांची पळवापळवी, खोकेपुराण, एकमेकांचे यथेच्छ अपमान करणे, लाथाळ्या घालणे, गतजन्मीचे शत्रू असल्यागत वर्मी घाव घालणे, शिवीगाळ, या सगळ्याला इतका ऊत आला आहे, की हीच महाराष्ट्राची संस्कृती होत चालली नाही ना, असा कुण्या त्रयस्थाला (पक्षी : ‘दिल्ली’ असे वाचावे!) प्रश्न पडावा!! त्यामानाने पोटनिवडणूक लढवणे,हे घटनेला (आणि संस्कृतीला) धरुन होईल, अशी माझी धारणा झाली होती. तथापि, तुमच्या पत्राने विचारात पाडले खरे! काही महिन्यापूर्वीपर्यंत तुमच्या विनंतीकडे आम्ही सपशेल दुर्लक्ष केले असते. पण आता परिस्थिती बदलली आहे.

आमचा पक्ष हा लोकशाही तत्त्वांनुसार चालणारा असून जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे, हे आपण जाणताच. (आपला अभ्यास दांडगा आहे! ) त्यामुळे माघारीचा निर्णय मला एकट्याला घेता येणार नाही. आमचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करावी लागेल. मा. कर्मवीरांशीही बोलावे लागेल. (दोनदा प्रयत्न केला, दोन्ही वेळेला त्यांनी ’अहो, कुठली निवडणूक?’ असेच त्यांनी विचारले. तिसऱ्यांदा प्रयत्न करणार आहे. काळजी नसावी! ) आपला(ही) नवा जीवश्च कंठश्च मित्र. नानासाहेब फ.

ता. क. : दुसऱ्या वेगळ्या पत्राची वाट पाहातो! बाजारात मासळी बरी यायला लागली आहे, असे कळले आहे!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange News: आम्ही मैदानात उतरलो नाही, तरीही फेल झाले म्हणता... मनोज जरांगेंचा सवाल

IND vs AUS 1st Test : OUCH! विराट कोहलीने खणखणीत Six मारला, चेंडू निवांत बसलेल्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर आदळला, Video

Sunil Shelke Won Maval: तो एक फोटो अन्... भाजप विरोधात तरी सुनील शेळके कसे निवडून आले? अजित पवारांनी सांगितला किस्सा

दिग्दर्शक आदित्य धारबरोबर रणवीरने सुवर्णमंदिरात घेतलं दर्शन ; 'या' बिग बजेट प्रोजेक्टच्या शूटिंगला होणार सुरुवात

Nashik Assembly Election 2024 Result : साडेपाच हजार मतदारांनी वापरला ‘नोटा’; 3 मतदारसंघांत 106 जणांची पोस्टलमधून नकारघंटा

SCROLL FOR NEXT