स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : एक धगधगीत सकाळ.
राजाधिराज उधोजीमहाराज आपल्या अंत:पुरात दणादणा फेऱ्या मारत आहेत. त्यांना प्रचंड त्वेष आला असून समोर येईल त्या गनिमाची खांडोळी करण्याचा इरादा स्पष्ट दिसतो. त्वेषातच ते तलवारीचे हात अदृश्य शत्रूवर करतात.
अंत:पुरात इतस्तत: आपट्याच्या पानांच्या डहाळ्याच डहाळ्या पसरल्या आहेत. त्यातलीच एक डहाळी उधोजीराजांच्या हातात तलवारीसारखी तळपते आहे.
अब आगे...
उधोजीराजे : खामोश! हिंमत असेल तर असे समोर येऊन दोन हात करा!! खांबामागे काय लपता भेकडासारखे!! या, या असे समोर या!! कोण, कोण आहे रे तिकडे?
संजयाजी फर्जंद : मुजरा महाराज! आपण याद केलीत?
उधोजीराजे : (चमकून) आम्ही कशाला तुम्हाला याद करु? उलट तुमची याद भुलवण्याचा प्रयत्न करतो आहोत…
फर्जंद : कोण आहे तिकडे? असा आवाज दिलात म्हणून आलो जी!!
उधोजीराजे : (तडफेने गर्रकन मान वळवत) रात्र वैऱ्याची आहे, होश्शियार!! आता बेसावध राहोन उपेग नाही!! शत्रू प्रबळ होत चालला आहे!!
फर्जंद : (बिनधास्त अंदाजात) कोण प्रबळ होत चाललंय? ते मिंधे? फू:!! ऐकेल कुणी!! काल दसरा मेळाव्यातच तुम्ही त्यांना असं काही लंबे करुन ठेवलंय, की ज्याचं नाव ते!!
उधोजीराजे : (स्तुतीने थोडेसे खुशालून) आमच्या समोर कोण टिकाव धरेल म्हणा!!
फर्जंद : (हाताची घडी घालत) दसऱ्याच्या दिवशी तुम्ही जो काही टग्या दम दिला आहे, त्यानं सगळे सुतासारखे सरळ आले आहेत!!
उधोजीराजे : (सात्त्विक संतापाने) द्यावाच लागला दम! का नाही द्यायचा? किंबहुना दिलाच पाहिजे! दिल्याशिवाय राहणार नाही! देणार म्हंजे देणारच!! समजतात काय स्वत:ला? अरे, पावणेतीन लाख कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर काढून पैसा ओढता? लोकांचा पैसा असा चोरांनी लुटलेला आम्ही उघड्या डोळ्यांनी कसा पाहू?
फर्जंद : (जी हुजुरी करत) अक्षी खरं!! या लुटमारीत सगळेच सामील आहेत!! एकेकाला असाच लंबे केला पाहिजेलाय!!
उधोजीराजे : दोन महिने थांबा! आमचं राज्य आलं की लेकाच्यांना तुरुंगातच घालतो! त्या कमळेला तर तीनदा हत्तीच्या पायी देऊन चौवेळा कडेलोट करीन!! मिंध्यांना तोफेच्या तोंडी देईन!! त्यांना साथ देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांनाही चिंचेच्या फोकानं बडवीन!! सोडणार नाही!! सगळे लेकाचे विकले गेले आहेत! न्यायालयांनाही-
फर्जंद : (घाईघाईनं) कधी एकदा हे सगळं घडतंय, याची महाराष्ट्र वाट पाहून ऱ्हायला आहे!! तुम्ही शिलंगण केलंत, आता मोहीम फत्ते करुनच परत यायचं, बरं का!!
उधोजीराजे : (निर्धारानं) अलबत! ग्रहांचं साह्य शूरांनाच असतं, फर्जंदा!! बघालच तुम्ही आता या उधोजीच्या तलवारीची कमाल!!
फर्जंद : (गुडघ्यावर बसत) मी आहेच तुमच्यामागे, सावलीसारखा!!
उधोजीराजे : माझ्या महाराष्ट्राचं कोटकल्याण करण्यासाठी आम्हाला आता एल्गार पुकारावाच लागणार! सोनं म्हणून नुसतीच आपट्याची पानं वाटण्याचा यंदाचा हा शेवटला दसरा मेळावा होता! पुढल्या विजयादशमीला आम्ही खरीखुरी सोन्याची पानं वाटू!!
फर्जंद : तुम्ही दिलेली आपट्याची पानंही आमच्यासाठी सुवर्णाचीच आहेत!! महाराजांचा विजय असो!!
उधोजीराजे : (फर्जंदाच्या पाठीवर थाप मारत) ऊठ, लेका, ऊठ! सोन्याची पानं कोण वाटतंय? (डोळे मिचकावत) आम्ही वाटणार आपट्याचीच पानं! पण यंदा वाटली ती आपटण्याची पानं!! वाटण्याऐवजी फेकून मारली इतकंच! कळलं? जा आता!! जगदंब जगदंब!!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.