शिक्षक दिनानिमित्त ज्यांनी ज्यांनी आपापल्या शिक्षकांना वंदन केले, त्या सर्वांस आमचे वंदन असो. शिक्षक दिनानिमित्त आम्ही काही निवडक समाजश्रेष्ठींना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची विनंती केली. त्यातील निवडक काही भावनांना आम्ही येथे शब्दरुप देत आहो.
कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे): ज्याला गुरुबद्दल आदर आणि आत्मीयता वाटते, तो त्याचा चरित्रपट काढतोच. ते त्याचे कर्तव्यच आहे. सध्या माझे गुरु कोण आहेत, हे साऱ्यांनाच माहीत आहे. आमचे आयुष्य एक खुली किताब आहे. कोणीही यावे, आणि काहीही वाचून जावे. आम्ही घरात बसून राहणारे नाही. काही काही लोकांच्या चरित्रातली पाने गहाळ असतात.
एकमेकांना चिकटलेली असतात किंवा पान नंबर उलटसुलट झालेले असतात. आमच्या आयुष्याच्या किताबाला बाइंडिंगच नाही. मी अनेक वर्ष गुरुविना काढली. शेवटी दीड वर्षापूर्वी मला गुरुप्राप्ती झाली. एक दिवस... सॉरी... एका रात्री एक दिव्य पुरुष हुडी आणि गॉगल परिधान करुन प्रकट झाला. त्याने मजला सुरतचा मार्ग दाखवला. ‘वत्सा, माझ्या मागोमाग चालत रहा. मागे वळून पाहू नकोस. तुजप्रत कल्याण असो’ असा आशीर्वाद त्याने दिला.
तेव्हापासून मी मागे वळून न पाहता वेगाने वाटचाल करत आहे. कधी ना कधी मी माझ्या गुरुजींच्या जीवनावर चरित्रपट काढीन, आणि शिक्षकदिनी तो रीलीज करीन, असे मी ठरवले आहे. शिक्षकदिनाला गुरुंना वंदन करण्यासारखे सुख नाही. मी नेहमीच माझ्या गुरुंचे स्मरण करतो, आणि वारंवार वंदन करतो. देवेंद्राय नम: नमो नम:
नानासाहेब फडणवीस : आमचे परमगुरु श्रीमान नमोजी यांचा सदैव विजय असो. त्यांच्या चरणकमळी आमचे मस्तक सदैव विराजमान असो! आज मी जो काही आहे, तो माझ्या गुरुवर्यांमुळे. त्यांनी दाखवलेल्या मार्गानेच मी चालत आहे. खूप वर्षांपूर्वी त्यांनी मजवर अनुग्रह केला. सारी विद्या मजला शिकवली. माझे गुरु हिमालयात शिकले, असे म्हणतात. हिमालयात असताना त्यांनी दूरस्थ संपर्काने माझ्याठायी चेतना जागविली. ‘मजला अनुग्रह द्या, स्वामी’ असे मी त्यांस विनविले, तेव्हा त्यांनी कानात गुरुमंत्र दिला. म्हणाले, ‘आधी चहा करायला शीक!’ मी शिकलो!!
दर वर्षी शिक्षकदिनाला मी उपवास करतो. सकाळी तीन प्लेट साबुदाणा खिचडी, पाच-सात साबुदाणा वडे, रताळ्याचा तीन बश्या कीस, आणि बटाट्याचा अर्धा किलो चिवडा एवढ्याच माफक आहारावर दिवस काढतो. दीड वर्षापूर्वी गुरुवर्यांनी मला स्वत:चा आश्रम स्थापून अनुयायी जमा करण्याची अनुमती दिली. सांगावयास अभिमान वाटतो की, कर्मवीरांच्या रुपाने मजला शिष्योत्तम मिळाला.
ज्याप्रमाणे धनुर्धर पार्थाने आचार्य द्रोणांना ‘मला फक्त पोपटाचा डोळा दिसत आहे’ असे बाणेदारपणाने सांगितले, तसेच कर्मवीर भाईसाहेबांनी मजला उत्तर दिले. इतकेच नव्हे तर पोपटाचा डोळा फोडून दाखवला!! याला म्हणतात नेमबाज!! त्यांना माझे अनेक आशीर्वाद! शिक्षकदिनी मी वंदन करितो, आणि स्वीकारतोही!! नमो नम:
दादासाहेब बारामतीकर : का माझ्या जखमेवर मीठ चोळता? शिक्षकदिनी गुरुवर्यांस वंदन कसे करणार? असे का विचारता? माझ्या मनाला घरे पडतात. एकलव्य भेटताच गुरु द्रोणांनी शिष्योत्तम पार्थाला नाकारावे, तसे माझ्याबाबत घडले आहे. माझ्या गुरुवर्यांनी वंदन स्वीकारण्यास नकार दिला आहे.
इतकेच नव्हे, तर त्यांची तसबीर वापरण्यासी मनाई केली. यापुढे मी त्यांची मानसपूजा करीन! मनोमन त्यांच्या पादुकांचे पूजन करीन. कारण काहीही झाले तरी तेच माझे गुरु आहेत, राहतील!! पुन्हा या असल्या प्रतिक्रिया विचारायला आलात तर याद राखा!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.