solar system sakal
संपादकीय

विज्ञानवाटा : गुरुचा चंद्र खुणावतोय...

आपल्या सूर्यमालेतील शनी, गुरू यांच्यासह अन्य ग्रहांच्या चंद्रांवर मानवी वस्तीस अनुकूल वातावरण, स्थिती आहे काय, याबाबत अभ्यास सुरू आहे.

शहाजी मोरे shahajibmore1964@gmail.com

आपल्या सूर्यमालेतील शनी, गुरू यांच्यासह अन्य ग्रहांच्या चंद्रांवर मानवी वस्तीस अनुकूल वातावरण, स्थिती आहे काय, याबाबत अभ्यास सुरू आहे. त्यातून काही माहिती आशादायी, काही सावध करणारी अशी येत आहे.

आजपर्यंत ‘नासा’, युरोपियन स्पेस एजन्सी या मोठ्या अवकाश संशोधन संस्था आणि जगातील अन्य काही देशांच्या अवकाश संशोधन संस्थांनी प्रामुख्याने चांद्रमोहिमा आणि मंगळ मोहिमा राबविल्या. ‘नासा’ने मात्र बहुतेक सर्व ग्रह, सूर्य आणि सूर्यमालेबाहेरदेखील आपली अवकाशयाने पाठविली आहेत.

‘नासा’ने युरेनस आणि नेपच्यून ग्रहांसाठी विशेष मोहीम राबविली नसली तरी ‘नासा’ने सोडलेले आणि सध्या सूर्यमालेबाहेर प्रवास करीत असलेले व्हॉयेजर यानं या दोन ग्रहांजवळून गेली आहेत आणि त्यांचा थोडा फार अभ्यासही करू शकली आहेत.

अलीकडे मात्र युरोपियन स्पेस एजन्सीने (ईएसए) प्रथमच गुरुच्या चंद्रांवर जाण्यासाठी आपली अवकाश मोहीम आखली आणि या वर्षी त्या मोहिमेंतर्गत गुरू ग्रहाच्या चंद्रांच्या दिशेने एक अवकाशयान १४ एप्रिल २०२३ रोजी अंतरिक्षात झेपावले.

या मोहिमेचे नाव आहे, ज्युपिटर आयसी मून्स एक्स्प्लोरर (ज्यूस). या मोहिमेद्वारा गुरुचे चंद्र गॅनिमिड, कॅलिस्टो आणि युरोपा यांचा अभ्यास केला जाणार आहे. गुरुच्या या चंद्रांशिवाय ‘आयओ’ नावाचा अजून एक चंद्र, असे चार चंद्र १६१०मध्ये गॅलिलिओ यांनी शोधले, म्हणून या चंद्रांना ‘गॅलिलियन मून्स’ असे म्हणतात.

‘ज्युस’ मोहिमेचे उद्दिष्ट

‘ज्युस’ मोहिमेद्वारे गुरू ग्रहावरील चुंबकीय क्षेत्रांचा, वातावरणाचा आणि गुरुच्या या चार चंद्रांवरील वातावरण, चुंबकीय स्थिती, तेथे होणाऱ्या विविध प्रक्रिया, पृष्ठभाग आणि त्याखालील सागर यांचा प्रामुख्याने अभ्यास होणार आहे, त्यासाठी विशिष्ट उपकरणे या मोहिमेमध्ये सहकार्य करणार आहेत. म्हणजेच पृथ्वीबाहेर मानवी वस्ती उभारली जाऊ शकते का याचाही अभ्यास करणे हे या ‘ज्युस’ मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

नेहमीप्रमाणे सूर्यमालेतील ग्रह वा पृथ्वीचा चंद्र यांच्या अभ्यास मोहिमा सोडून गुरुच्या चंद्राकडे युरोपियन अवकाश संशोधन संस्थेने मोहरा का वळवला असावा? पृथ्वीचा चंद्र सोडून अन्य ग्रहांच्या चंद्रांचा अभ्यास करणारी ही पहिलीच मोहीम! आजपर्यंत सर्वाधिक अवकाश मोहिमा मंगळ आणि चंद्र यांच्यासाठी राबविल्या आहेत.

पृथ्वीशिवाय मानव अन्यत्र अवकाशात वस्ती करू शकतो का? त्याचबरोबर या दोन खगोल पिंडांवर सजीव सृष्टीची काही चिन्हे दिसतात का याचा अभ्यास करणे, हा हेतू आहे. आपला चंद्र वैराण आहेच; शिवाय तेथे वातावरण नाही. चुंबकीय क्षेत्र नाही. द्रवरूप पाणी नाही. शिवाय पृथ्वीच्या एक षष्ठांश गुरुत्वाकर्षणामुळे तेथे आपण चालू शकत नाही. (अन्नाची तर गोष्टच सोडा!).

पृथ्वीस अंतर्ग्रहांपैकी सर्वात निकटचा ग्रह म्हणजे शुक्र. पृथ्वीला मंगळापेक्षा शुक्र काहीसा जवळ असला तरी शुक्र पृथ्वीपेक्षा सूर्याच्या अधिक जवळ असल्याने, पृथ्वीवरील सजीवसृष्टीसारख्या सजीवसृष्टीस तेथे योग्य वातावरण आणि स्थिती नाही. शुक्रावरील तापमानामुळे आपली काही सेकंदातच वाफ होऊन जाईल. आपणांस अन्य प्रकारच्या सजीवसृष्टींची माहिती नसल्यामुळे आपण आपल्यासारख्याच सजीवसृष्टीच्या शोधात असतो.

आपल्यापेक्षा वेगळ्या तापमानात जगू शकणाऱ्या सजीवसृष्टीचे अस्तित्व आपण आपल्या सजीवसृष्टीच्या संदर्भात केवळ विचार करून नाकारात आलो आहोत. वेगळ्या स्वरुपातील, वेगळ्या तापमानास जगू शकणारी सजीवसृष्टी विश्वात कोठेतरी असूच शकणार नाही का? या तीनही खगोलीय पिंडांवर सजीवसृष्टी अस्तित्वात असल्याची कोणतीही चिन्हे आढळलेली नाहीत आणि पृथ्वीचा चंद्र, शुक्र व मंगळ हे खगोलीय पिंड मानवी वसाहत स्थापित करण्यास योग्य नाहीत.

मंगळ ग्रह बाह्यग्रहातील पृथ्वीस सर्वात निकटचा ग्रह! मंगळ हा मृत ग्रह आहे, कसल्याही स्वरुपातील जीवनाची कोणतीही चिन्हे मंगळावर अद्याप आढळलेली नाहीत. ओसाड, अतिशीत असा हा ग्रह असून अगदी नगण्य प्रमाणात येथे ऑक्सिजन आहे आणि कार्बन डायऑक्साईड ९५ टक्के आहे. अशा अवस्थेत पाच मिनिटांपेक्षा अधिक काळ माणूस जगणार नाही. द्रवरुप अवस्थेत पाणी नाही, अन्य स्वरुपात पाणी असल्याचे पुरावे मिळाले आहेत ते छायाचित्रांद्वारे आणि इतर शास्त्रीय उपकरणांद्वारे.

अन्नधान्याच्या स्रोताचा तर विचारच नको. शिवाय ते पिकविण्याच्या, निर्माण करण्याच्या प्रक्रियांविषयी तरी विचार न केलेलाच बरा! त्यात सरासरी उणे ५५ अंश सेल्सियस तापमान! पाणी, ऑक्सिजन पृथ्वीवरून नेले तरी त्यांना मर्यादा असणार. (‘मार्शियन’ या चित्रपटातील गोष्ट वेगळी) शिवाय मंगळाचा पृष्ठभाग कमालीचा कोरडा आहे.

पृष्ठभागावरील अनुमानित तळी अतिशय क्षारयुक्त आणि त्यामुळे सजीवसृष्टीस प्रतिकूल असावीत! मंगळावर काही पिकू शकत नाही. परंतु सध्या मंगळसदृश्य वातावरण आणि माती निर्माण करून शेती करण्याचे प्रयोग पृथ्वीवर चालू आहेत. ते मंगळावर यशस्वी होतील का? ते कळायला सध्या तरी मार्ग नाही.

गॅनिमिड, युरोपाकडे लक्ष

पृथ्वीचा चंद्र, मंगळ आणि शुक्र या ठिकाणी (पृथ्वीबाहेर) मानवी वस्ती उभारण्यामध्ये प्रचंड मोठी आव्हाने आहेतच, शिवाय पृथ्वीबाहेर मानवी जीवन तग धरू शकेल का, या बद्दल सध्याच्या तंत्रज्ञानाचा विचार करता काही आशादायक परिस्थिती वाटत नाही. त्यामुळे या ग्रहगोलांशिवाय इतरत्र कशी परिस्थिती आहे.

तेथे मानवी वस्ती शक्य आहे का याची चाचपणी करण्याचा प्रयत्न म्हणजे ‘ज्युस मोहीम’ असे म्हणता येईल. गुरुचा एक चंद्र गॅनिमिड हा बुध ग्रहापेक्षा मोठा आणि मंगळ ग्रहापेक्षा काहीसा लहान आहे. आपल्या सूर्यमालेतील तो सर्वात मोठा चंद्र आहे.

गॅनिमिडच्या पृष्ठभागाखालील समुद्रात पृथ्वीवरील सर्व सागरातील पाण्यापेक्षाही अधिक पाणी असावे, असा अंदाज आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते तर तेथे एकपेशीय सजीव असावेत. गॅनिमिडवर विरळ का असेना पण ऑक्सिजनचे आच्छादन आहे. शिवाय अधिक चुंबकीय क्षेत्र असलेला तो एकमेव चंद्र आहे. त्यामुळे मंगळापेक्षा येथे अंतरिक्ष प्रारणांपासून संरक्षण मिळू शकते.

गुरू ग्रहाचा दुसरा चंद्र म्हणजे ‘युरोपा’. यावरसुद्धा प्रचंड प्रमाणात पाणी आणि बर्फाच्छादित प्रदेश आहेत. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार तेथील समुद्राचा तळ खडकाळ आहे. त्यावरील पाण्याच्या प्रचंड खळबळजनक हालचालींमुळे किंवा घुसळणीमुळे सजीवांना पोषक, रासायनिक घटक मिळू शकतील.

कॅलिस्टो नावाच्या अजून एका गुरुच्या चंद्रावरही विरळ वातावरण असल्याचे आणि या चंद्रावरही महासागर असावेत, असे शास्त्रज्ञ मानतात. अर्थातच हाही चंद्र मानवी वस्तीसाठी उमेदवार आहे. म्हणजेच गुरुच्या या चंद्रांवर मानवी वस्तीसाठी पोषक किंवा योग्य परिस्थिती नसली तरी सूर्यमालेतील अन्य ग्रहगोलांपेक्षा काहीसे आशादायी चित्र वाटते.

गुरुच्या चंद्रावर मानवी वस्ती स्थापण्यासाठी कशी परिस्थिती आहे याची चाचपणी करण्याचा, अभ्यास व संशोधन करण्यासाठी ‘ज्युस’ मोहीम आरंभली आहे. पृथ्वीवरून या चंद्रांवर मानवी वस्ती स्थापण्यास अनुकूल असे फारसे काही लक्षात येत नाही.

प्रत्यक्ष आणि व्यापक मोहिमेमुळे अधिक व परिस्थितीजन्य माहिती मिळू शकते. त्यामुळे हे चंद्र मानवी वस्तीस पृथ्वीवरून वाटतात त्यापेक्षाही अधिक अनुकूल किंवा कदाचित प्रतिकूलही असू शकतील. तेथील परिस्थिती मानवी वस्तीस कितीही अनुकूल असली तरी ती पृथ्वीच्या तुलनेत नगण्यच असणार! त्याशिवाय अशा ठिकाणी मानवी वस्ती उभारणे हे जवळजवळ अशक्यप्राय आव्हान आहे.

परंतु मानवी जिज्ञासा त्याहीपलीकडे असते हेच या मोहिमेचे सार आहे. अर्थातच पृथ्वीसारखे सुखद आणि अनुकूल वातावरण, परिस्थिती कोठे असलीच तरी तेथे जाणे, राहणे, बहरणे या मानवी कल्पनेच्या शेवटच्या टोकाच्या गोष्टी आहेत. तेव्हा गड्या आपली पृथ्वीच बरी! त्यामुळे पृथ्वी वस्तीसाठी यथायोग्य राखणे हेच आपले कर्तव्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT