briton queen elizabeth sakal
संपादकीय

ब्रिटिश अस्मितेचे प्रतीक

राणी एलिझाबेथ यांचं निधन हा एका प्रदीर्घ पर्वाचा अंत ठरला आहे. इतिहासजन्य वादविवादाची वादळे त्यांच्याभोवती घोंघावत राहतील.

सकाळ वृत्तसेवा

राणी एलिझाबेथ यांचं निधन हा एका प्रदीर्घ पर्वाचा अंत ठरला आहे. इतिहासजन्य वादविवादाची वादळे त्यांच्याभोवती घोंघावत राहतील.

- शशी थरूर

राणी एलिझाबेथ यांचं निधन हा एका प्रदीर्घ पर्वाचा अंत ठरला आहे. इतिहासजन्य वादविवादाची वादळे त्यांच्याभोवती घोंघावत राहतील. पण आपल्या प्रदीर्घ जीवनकाळात त्या या सगळ्याच्या पलीकडच्या राहिल्या आणि आता त्यांच्या देहावसनानंतरही त्या तशाच राहतील.

राणी एलिझाबेथ यांचं निधन ही भारतासह जगभरात सर्वाधिक महत्त्वाची बातमी ठरली. तब्बल ७० वर्षे त्या सिंहासनारूढ होत्या. त्यामुळे त्यांचं असणं इतकं नित्याचं वाटत होतं, की या निधनवार्तेवर विश्वास बसत नव्हता. दुसरं असं, की (मृत्यूच्या आदल्याच दिवशी त्यांनी नियुक्त केलेल्यांसह) एकूण पंधरा ब्रिटिश पंतप्रधान, पंधरा भारतीय पंतप्रधान,चौदा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आणि सात पोप इतक्या साऱ्यांचा शासनकाळ या सम्राज्ञीने आपल्या कारकिर्दीत पाहिला. त्यांचे निधन हा खरोखरच एका प्रदीर्घ पर्वाचा अंत ठरला आहे.

राणी एलिझाबेथ यांचा राज्यारोहण समारंभ १९५२ मध्ये झाला. भारत, पाकिस्तान आणि तेव्हाचा सिलोन (सध्याचा श्रीलंका) या देशांनी त्याअगोदर स्वातंत्र्य मिळवलेले होते. त्याहीवेळी ब्रिटिश साम्राज्य पंचखंड व्यापून होते. २१ व्या वाढदिवसाच्या वेळी केलेल्या भाषणात या साम्राज्याबद्दलचे आपले कर्तव्य आयुष्यभर निष्ठापूर्वक पार पाडण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली होती. आज त्यांच्या कारकीर्दीच्याअंती हे साम्राज्य ढासळून पडलेले दिसते. ब्रिटन वगळता मूठभर दुर्गम बेटेच काय ती आता या साम्राज्यात उरली आहेत.

प्रथम या अवाढव्य साम्राज्याच्या आणि मग ब्रिटिश कॉमनवेल्थच्या नामधारी प्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या. ब्रिटिश कॉमनवेल्थ हा वसाहती ताब्यातून गेल्यानंतरही उरलेल्या ब्रिटिश प्रभावाचे धागे जपण्याचा थोडाफार यशस्वी प्रयत्न होता. तथापि त्यांच्या साम्राज्याच्या अधोगतीशी मात्र राणी एलिझाबेथ यांचा काहीही संबंध नव्हता. एव्हढंच की झालेल्या बदलाशी त्यांना जुळवून घेत रहावं लागलं. त्यांची राजवट ही नेहमीच शोभेची राहिली. त्यांच्याकडून नुसती असण्याची, दिसण्याची अपेक्षा असायची; राज्य करण्याची नव्हे. ही अपेक्षा त्यांनी डौलाने पूर्ण केली. राजसिंहासनावरील त्यांचे वर्तन आत्मलुप्त, धीरगंभीर आणि पूर्णतः स्व-विस्मृत असे. पदाबरोबर येणारा पोशाख, हालचाली, वर्तन इत्यादींबाबतच्या रीतिरिवाजांचे त्यांना पुरते भान असे आणि त्याबाबत त्या सदैव निष्ठापूर्वक जागरूक असत. मात्र राजकीय बाबतीत कोणताही निर्णय त्या कधी घेत नसत. परिणामत: सरकारच्या कृतीची कसलीही जबाबदारी त्या कधी घेत नसत.

वॉल्टर बॅजेटच्या १९ व्या शतकातील अभिजात सूत्रीकरणानुसार घटनात्मक राजसत्तेतील सार्वभौम राजप्रमुखास तीन हक्क प्राप्त होतात : ‘सल्लामसलत केली जाण्याचा हक्क, प्रोत्साहन देण्याचा हक्क आणि इशारा देण्याचा हक्क.’ हे तिन्ही हक्क राणी एलिझाबेथ यांनी नक्कीच बजावले. परंतु जी धोरणे अनुसरण्यासाठी जनतेने आपल्याला निवडून दिले आहे अशी खात्री पंतप्रधानांना वाटते त्या धोरणांची अंमलबजावणी करू नका, असा सल्ला त्यांना देणे हे राणी एलिझाबेथ यांना बहुदा अनुचित वाटले असावे. प्रमुखपदाची भूमिका निभावणे, उदघाटनाच्या फिती कापणे, शाही दौऱ्यावर जाणे, येणाऱ्या बड्या असामींचे आगतस्वागत करणे आणि ब्रिटनच्या वैभवाचे मूर्त रूप बनणे एवढ्याच गोष्टी त्यांच्या हक्काच्या होत्या आणि त्यातलीही प्रत्येक गोष्ट काटेकोर आखून दिलेली असे. तब्बल सात दशके ही आखीव चाकोरी त्यांनी कधीही ओलांडली नाही. हे श्रेय तर त्यांना द्यावेच लागेल. त्यांच्या हातून अशोभनीय वर्तन कधी घडले नाही. लोकापवादाचा वारा त्यांना शिवला नाही. त्यांचे सारे जीवन निष्कलंक राहिले.

मात्र शोकाकूल लाटेत सगळेच सहभागी नव्हते. स्वतःला आर्थिक स्वातंत्र्यसैनिक म्हणवणारा एक गट दक्षिण आफ्रिकेत आहे. त्यांनी तात्काळ एक निवेदन प्रसृत केलं. त्या निवेदनात ‘जगभरातील कोट्यवधी लोकांवरील अत्याचारावर उभारल्या गेलेल्या, पोसलेल्या आणि टिकून राहिलेल्या एका संस्थेची प्रमुख’ असे राणीचे वर्णन केले गेले आहे. वसाहतीकरणामुळे झालेले शोषण, लूट आणि गुलामगिरी यांचे स्मरण करून देत ब्रिटिश राजघराणे आणि ‘त्यांच्यासारखे दिसणाऱ्या’ लोकांच्या समृद्धीसाठी इतरांच्या राष्ट्रीय संपत्तीचा जो अपहार केला गेला, त्याचा या गटाने निषेध केला आहे.

आपण भारतीय लोक याच सुरात बोलू शकलो असतो. आपण तसं करणं टाळलं ते केवळ मृताचा सन्मान राखण्याच्या परंपरेमुळे नव्हे. त्या असतानाही आपल्या देशात त्यांना आदरच दिला जाई. पूज्यभावाच्या जवळपास जाणारा नितांत आदर. वासाहतिक लूट आणि जुलूम याबाबत बव्हंशी ‘विसरा आणि क्षमा करा’ हाच दृष्टिकोन स्वीकारायला भारतीय लोक एव्हाना शिकले आहेत.आपल्यापैकी काहींना ब्रिटिशांबरोबर निर्माण झालेलं आपलं नातं आजही महत्त्वाचं वाटतं. जगभर राणी एलिझाबेथ या एक सौम्य आणि दयाळू व्यक्तिमत्त्व म्हणूनच ओळखल्या जात. सर्वाधिक काळ सिंहासनावर असलेल्या या सम्राज्ञीबाबत सर्वदूर कौतुकाची भावना होती. काही अंशी ही भावना आपल्यातही रुजली आहे. त्यांच्या निधनवार्तेसंदर्भात आपण दाखवलेली आपुलकी मनस्वी होती. जागतिक पातळीवर विचार करणाऱ्या अनेक भारतीयांना राणीच्या निधनामुळे झालेलं दुःख स्पष्ट दिसत होतं. तथापि राणीवर एक ठपका ठेवता येईल. त्यांचे पद व संपत्ती यांचा आधार असलेल्या वसाहतीक काळातील शतकानुशतकांच्या लुटीबद्दल आणि क्रौर्याबद्दल त्यांनी कधी अवाक्षर उच्चारले नाही. क्षमायाचना दूरच, त्याची साधी कबुलीही त्यांनी कधी दिली नाही.

दोन्ही बाजूंनी फायद्यात

काही बाबतीत राणी दोन्ही बाजूंनी फायद्यात असे. मुलूख दिग्विजय आणि त्यातून मिळणारी लूट यांच्याच जोरावर त्या दिमाखात जगू शकत असत; परंतु प्रत्यक्षत: राजपदावरील व्यक्ती संबंधित आदेश स्वतःहून देत नसल्यामुळे या लुटीबद्दल क्षमायाचना करण्याचे त्यांना प्रयोजन नसे. शेवटी राणी तर केवळ एक प्रतीक होती आणि अखेरपर्यंत प्रतीकच राहिली. ‘पण प्रतीक कशाची?’ या प्रश्नाचे उत्तर ते देणाऱ्या व्यक्तिगणिक बदलत असे : ब्रिटिश साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक.

राजेशाहीच्या भव्यतेचे प्रतीक. प्रजेच्या उच्चतर आशाआकांक्षा आणि निष्ठांचे प्रतीक. आणि जिथे शिरकाव करण्याचा त्यांना कोणताच अधिकार नव्हता अशा दूरदूरच्या देशात तिच्या देशाने, त्या देशाच्या सैनिकांनी, प्रशासकांनी केलेले अन्याय आणि अत्याचार यांचेही प्रतीक ! सगळ्याच गोष्टींना एकदा प्रतीक बनवून टाकले की एक तर तुम्हाला सगळ्याचीच जबाबदारी घ्यावी लागते किंवा मग कशाचीच घ्यावी लागत नाही. सम्राज्ञी म्हणून राणी एलिझाबेथ यांचे स्थान या सगळ्या वादविवादाच्या पलीकडे चार अंगुळे वर होते. साऱ्या गोष्टींच्या लाभार्थी असल्याने त्या या साऱ्यात वाटेकरी तर होत्याच; पण प्रत्यक्ष सहभाग नसल्याने निर्घृण कांडांबद्दल त्यांना दोषी मात्र ठरवता येत नसे.

ते काही असो. ९६ वर्षाची एक सौजन्यशील, सुसंस्कृत वृद्धा हे जग सोडून गेली आहे. त्यांच्या प्रत्येक उद्‍गाराची, भावमुद्रेची बातमी होत असे, तो काळ उलटूनही आता कित्येक वर्षे लोटली आहेत. माणूस म्हणून अत्यंत आदरणीय होत्या त्या. व्यक्ती म्हणून अतिशय प्रेमळ, दयाशील आणि समंजस होत्या. विनोदबुद्धीचे वरदान त्यांना लाभले होते. इतिहासजन्य वादविवादाची वादळे त्यांच्याभोवती घोंघावत राहतील. पण आपल्या प्रदीर्घ जीवनकाळात त्या या सगळ्याच्या पलीकडच्या राहिल्या आणि आता त्यांच्या देहावसनानंतरही त्या तशाच राहतील.

जालियनावाला बाग : ना खेद, ना खंत

ब्रिटिश वसाहतीतील काही अमानुष कृत्ये तर प्रत्यक्ष त्यांच्याच राज्यारोहणानंतर घडलेली आहेत. केनियातील छळछावणीत ‘माऊ माऊ’ स्वातंत्र्यसैनिकांचा निर्घृण छळ करण्यात आला आहे. मलेशियातील कम्युनिस्ट उठावाच्या वेळी मलेशियन लोकांची अंदाधुंद कत्तल केली गेलेली आहे. या दोन्ही घटना घडल्या तेव्हा राणी एलिझाबेथ याच सिंहासनावर होत्या. बेजॉटच्या सूत्रानुसार त्यांचा ‘सल्ला’ याप्रसंगी घेतला होता का, त्यांनी अशा अत्याचाराला ‘उत्तेजन’ दिले का किंवा सरकारला यासंदर्भात काही ‘इशारा’ देण्याचा विचार त्यांनी कधी केला असेल का हे सांगता येणार नाही. पण शतकानुशतकांचे वसाहतीक भयकांड हे राजघराण्याच्याच नावे घडवण्यात येत होते. पतीसह जालियनवाला बागेला भेट दिली तेव्हा पाहुण्यांसाठी असलेल्या अभिप्राय वहीत राणींनी आपलं नाव तेवढं लिहिलं. ब्रिटिशांनी केलेल्या त्या सामूहिक हत्याकांडाबद्दल खेदाचा एक शब्दही त्यांनी उच्चारला नाही.

(लेखक राजनीतिज्ञ व साहित्यिक आहेत.)

(अनुवाद : अनंत घोटगाळकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT