Ajit Pawar News SAkal
संपादकीय

Ajit Pawar News : पुण्याच्या राजकीय समीकरणांना अभूतपूर्व कलाटणी

NCP Political Crisis : स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा मतदारसंघात असलेल्या एकहाती सत्तेमुळे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला

शीतल पवार shital.pawar@esakal.com

Pune NCP News : स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा मतदारसंघात असलेल्या एकहाती सत्तेमुळे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. जिल्ह्यातील मार्केट, शिक्षण, सहकार अशा संस्थांमध्येही राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे.

या प्राबल्याला पहिल्यांदा धक्का बसला तो २०१४ च्या निवडणुकांमध्ये. २०१४ मध्ये लोकसभेला पुणे जिल्ह्यातून चार पैकी बारामती वगळता इतर तिन्ही ठिकाणी युतीचे (१ भाजप, २ शिवसेना) खासदार निवडून आले.

विधानसभेला पुणे जिल्ह्यातून भाजपचे ११ आणि शिवसेनेचे ३ आमदार निवडून आले. राष्ट्रवादीचे केवळ ३ आमदार निवडून आले होते. विधानसभेला युती किंवा आघाडी नव्हती. मात्र २०१९ मध्ये पुन्हा राष्ट्रवादीने मुसंडी मारली आणि लोकसभेला चार पैकी दोन खासदार निवडून आले.

विधानसभेला १० राष्ट्रवादी, ९ भाजप आणि २ काँग्रेसचे आमदार निवडून आले. पुढे मविआचे सरकार अस्तित्वात आले. पुणे जिल्ह्याला मंत्रिपदात झुकते मापही मिळाले. राष्ट्रवादीचे तीन आमदार मंत्रिमंडळात सहभागी झाले.

अजित पवार तिसऱ्यांदा पुण्याचे पालकमंत्री बनले. बदललेल्या समीकरणांमुळे आगामी निवडणुकांबद्दल अनेक शक्यता समोर येताहेत.

लोकसभा निवडणूक

भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यात बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष दिले गेले. या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचे खासदार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे बारामतीची विशेष जबाबदारी आहे.

मोदी@९ च्या दौऱ्यांचा भर शिरूर मतदारसंघातही राहिला. त्यामुळे ‘अ से अमेठी, ब से बारामती’चे उद्दिष्ट समोर ठेवून असणाऱ्या भाजपला नवी रणनीती सादर करावी लागेल. एरवीही बारामती लोकसभेच्या जुळवाजुळवीत अजित पवार यांचा वाटा महत्त्वाचा असतो.

त्यामुळे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर यानिमित्ताने दबाव आणण्याचे राजकारण होईल, अशीही शक्यता दिसते. मावळ आणि शिरूर इथे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली होती.

त्यामुळे शिवसेना इथे झुकत माप घेईल की नाही यावर श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे यांचे भविष्य निश्चित होईल. मावळमधून पुन्हा एकदा पार्थ पवार यांच्यासाठी अजित पवार आग्रही राहतील का हा प्रश्न अनुत्तरित आहे. पुणे शहरात लोकसभेला राष्ट्रवादीने भाजपला साथ दिली तरी भाजपसमोरचे मविआचे आव्हान संपुष्टात येईल.

विधानसभा मतदारसंघ

पुणे शहरात राष्ट्रवादीचे दोन, काँग्रेसचा एक आणि भाजपचे पाच आमदार सध्या आहेत. राष्ट्रवादीचे विद्यमान दोन्हीही आमदार भाजप उमेदवाराला पराभूत करून निवडून आलेले आहेत. खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अगदी थोड्या मतांमुळे पराभव स्वीकारावा लागलेला आहे.

बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये या तिन्ही मतदारसंघात भाजप की राष्ट्रवादी काँग्रेस, अजित दादा की देवेंद्र फडणवीस हा विद्यमान आणि इच्छुकांसमोरचा प्रश्न आहे. शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, कॅंटोन्मेंट सारख्या मतदारसंघात मविआचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.

पिंपरी चिंचवडमध्ये सध्याच्या भाजप नेत्यांच्या मक्तेदारीवर बदललेल्या समीकरणांमुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच चिंचवड, भोसरी सारख्या मतदारसंघात प्रस्थापितांना विरोध ही भाजपसाठी जमेची बाजू नसेल.

जिल्ह्यातील मतदारसंघांवर राष्ट्रवादीचा प्रभाव अधिक ठळक आहे. सत्तेची फेरमांडणी मावळ, जुन्नर, खेड-आळंदी, दौंड, इंदापूर, शिरूर मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसमोरील अडचणी वाढवणारी आहे.

राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघात भाजपमधील इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरणारी नवीन समीकरणे आज आकाराला आली. पुरंदर आणि भोर मतदारसंघात अजित पवारांसोबत विद्यमान आमदार जुळवून घेतील की नाही यावर आगामी लोकसभा (विशेषतः बारामती लोकसभा) आणि विधानसभेची गणिते अवलंबून असतील. बदललेल्या राजकीय परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील विधानसभेला राष्ट्रवादीचे पारडे भाजपपेक्षा सध्यातरी वजनदार आहे.

पालकमंत्री

अजित पवार यापूर्वी पुणे जिल्ह्याचे तीनदा पालकमंत्री राहिले आहेत. त्यामुळे ते पुन्हा पुण्याचे पालकमंत्री बदलतील का असाही प्रश्न चर्चेत आहे. पुणे जिल्हा भाजपसाठी केवळ सत्ताकेंद्र म्हणून नाही तर विचारकेंद्र म्हणून महत्त्वाचा राहिला आहे.

अजित पवार यांच्यासोबतच्या भाजपच्या समीकरणांबद्दल यापूर्वीच्या शपथविधीनंतरही भाजपच्या विचार परिवारात अनेकदा टीका झाली होती. त्यामुळे सत्ता आणि विचार म्हणून महत्त्वाचे पुणे शहर परिवाराच्या मुशीतून वर आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे कायम राहील की प्रशासनावर पकड असलेल्या अजित पवारांची तिथे वर्णी लागेल हा मुद्दा बदललेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरणार आहे.

महापालिका

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपची सत्ता आली. दोन्हीही महापालिकेत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा टोकाचा संघर्ष आहे.

इच्छुक नगरसेवकांभोवतीची राजकीय अनिश्चितता नव्या परिस्थितीत वाढली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील अनेक नेते भाजपमध्ये आले. त्याचे प्रमुख कारण स्थानिक पातळीवर अजित पवार यांना (किंवा अजित पवारांच्या मर्जीतील उमेदवाराला) विरोध असेही होते. त्यामुळे अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर स्थानिक राजकीय समीकरणांची गुंतागुंत वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT