Smoke and Ashes A Writer's Journey Through Opium's Hidden Histories book Sakal
संपादकीय

अफूचा काळा-पांढरा इतिहास

सकाळ वृत्तसेवा

- महेंद्र पंढरपुरे

‘आयबिस’ कादंबरीत्रयीच्या निमित्ताने संशोधन करताना ज्ञानपीठविजेते लेखक अमिताव घोष यांच्याकडे अफू तसेच अफूचा व्यापार अशा गोष्टींविषयी बरीच माहिती गोळा झाली. ‘आयबिस’ची गोष्ट सांगून झाली होती; मात्र या लिखाणाच्या निमित्ताने सांगण्यासारखे खूप राहून जात होते आणि ते मुख्यतः अफूच्या व्यवहाराविषयीचे होते.

‘अफू’ या एका पदार्थाने जगभरातील अनेक समाज, देश, राजवटी, व्यक्ती तसेच संस्था यांचे भागधेय बदलले याची प्रचिती आल्यानंतर अमिताव घोष यांनी अलीकडेच ‘स्मोक ॲंड ॲशेस : अ रायटर्स जर्नी थ्रू अफिम्स हिडन हिस्टरीज्’ या ग्रंथाची निर्मिती केली.

अफू या एका घटकाच्या आधारावर इंग्रजांनी चीन आणि भारताचेही शोषण केले. चीनच्या मोठ्या जनसमुदायाला व्यसनाच्या गर्तेत लोटले.  अफूत दडलेल्या अपरिमित खजिन्याची ओळख होण्यापूर्वी इंग्रजांच्या व्यापार उदीमाला चीनच्या चहाच्या तलफेने संमोहित केले होते. चहाच्या व्यापारावर पोर्तुगीजांनी जम बसवलेला होता.

इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याचा पोर्तुगालची राजकन्या कॅथरिन ब्रॅगान्झाशी विवाह झाला आणि इंग्रजांना दोन गोष्टी मिळाल्या. चीनचा चहा आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील  सहा बंदरांचा छोटासा टापू. हाच टापू पुढे मुंबई म्हणून उदयाला आला.

चहासाठी इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीला कोलकात्यातून  चीनच्या व्यापारी मोहिमा आखाव्या लागत. चहाच्या बदल्यात चीनला चांदी द्यावी लागे आणि तिची बेगमी करताना इंग्रजांना खूप सव्यापसव्य करावे लागे.

इंग्रजांनी चहाच्या शेतीचे तंत्र चीनकडून पळवले आणि भारतात चहाच्या बागा सुरू केल्या. यामुळे चहासाठीचे चीनवरील अवलंबित्व कमी होत गेले. तरीदेखील चांदीची पूर्तता करणे जिकीरीचे होते. आणि येथेच अफूचा प्रवेश झाला. ईस्ट इंडिया कंपनीने अफू हे चलनाचे मुख्य साधन बनविले.

भारतातून जाणाऱ्या अफूची पैदास प्रामुख्याने बिहार, उत्तरप्रदेशांत होत असे आणि त्यावर इंग्रजांची पकड होती. याच काळांत मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आदीच्या माळवा परगण्यात आणि महाराष्ट्राच्या संलग्न भागांत अफूच्या शेतीने जोर धरला; तसेच येथील स्थानिक व्यापाऱ्यांकडून त्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होऊ लागली.

या स्पर्धकांना काबूत आणणे इंग्रजांना जमले नाही. या  भागांतील ग्वाल्हेर, बडोदा, इंदोर राजवटीतील शिंदे, गायकवाड मराठा राज्यकर्त्यांशी सामना करणे शक्य नव्हते. त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकस्त करून इंग्रजांना मराठी मुलखात शिरकाव करणे दुष्प्राप्य केले होतेच.

माळवा प्रांतातून मुंबईमार्गे होणाऱ्या अफूच्या व्यापारावर इंग्रजांनी बंदी घालून पाहिली. ती फोल ठरल्याने मोठे कमिशन आणि कर लादून व्यापारास मुभा दिली. या निर्णयामुळे मुंबईतून अफूची निर्यात वाढली आणि एरव्ही लोढणे ठरलेले मुंबई बंदर इंग्रजांसाठी भरभराटीचे साधन बनले. मुंबईच्या विकासाचा पाया एका अर्थाने पाहता अफूच्या व्यापाराने रचला.

या व्यापाराने इंग्रजांची पकड बळकट झाली; तसेच भारतातील स्थानिक व्यापारीवर्गाची भरभराट झाली. हिंदू, जैन, मारवाडी, मुस्लिम, बोहरी, बगदादी ज्यू, पारशी समुदायांतील अनेक घराण्यांचा उत्कर्ष या व्यापाराने झाला.

धार्मिक आडकाठीमुळे हिंदू व्यापारी मुंबई, कोलकात्यात सीमित राहिले. पारशी व्यापाऱ्यांनी मात्र भारताच्या सीमा ओलांडून चीनमध्येदेखील जम बसवला. भारताच्या औद्योगिक, पोलाद कारखाने, व्यापार उदीम, बॅंकिंग, विमा आदी क्षेत्रांची मुहूर्तमेढ अशाच व्यापाऱ्यांनी रोवली, हे लक्षात घ्यावे लागेल.

जमशेटजी जिजिभाय, डेव्हिड ससून, जमशेटजी टाटा आदी व्यक्तींचे याकामी योगदान अनन्यसाधारण आहे. बंदरे, ग्रंथालये, रुग्णालये, शिक्षणसंस्था आदीचे मोठे जाळे या लोकांच्या अर्थसाह्याने विणले गेले आहे.

अफूच्या व्यापाराची ही सकारात्मक बाब केवळ भारतच नव्हे, तर युरोप, अमेरिकादी देशांतही प्रत्ययास येते. चीनमधील अनेक कला, वस्तू, वनस्पती, उपचारपद्धती, तंत्रांची जगाला ओळख झाली, याचा पुस्तकातील तपशील आपल्या माहितीत भर घालतो.

अफूच्या सेवनास प्रतिबंध करणारे कायदे, नियम जगभरातील देशांत लागू असले तरी अफूच्या व्यापारात खंड पडलेला नाही. कायद्याच्या अंमलबजावणीत राज्यकर्त्यांचे बोटचेपे धोरण, संघटित गुन्हेगारीचा शिरकाव, बड्या औषध कंपन्यांचे गैरव्यवहार यांविरोधात समाजातून निर्णायक विरोध उभा राहिला पाहिजे, असे घोष सांगतात. अफूचा ‘काळा-पांढरा इतिहास’ लिहिताना घोष हीच बाब अधोरेखित करतात.

पुस्तक :  ‘स्मोक ॲंड ॲशेस : अ रायटर्स जर्नी थ्रू अफिम्स हिडन हिस्टरीज्’

प्रकाशक : हार्पर कॅालिन्स

मूल्य : ६९९ रुपये, पृष्ठसंख्या : ३९५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel–Hamas war: इस्राईलच्या हल्ल्यात हिज्बुल्लाचा कमांडर सुहैल हुसेन हुसैनी ठार; शस्त्रपुरवठा विस्कळीत होण्याचा धोका

Suryakumar Yadav: 'मला फक्त पेपरवर कॅप्टन व्हायचं नाहीये, तर...' सूर्याचं टी२० नेतृत्वाबाबत मोठं भाष्य

Dhangar Reservation: धनगर आंदोलक वर्षा निवासस्थानी; जोरदार घोषणाबाजी करत दिला निर्वाणीचा इशारा

Bigg Boss 18 : ज्योतिषाने आधीच मृत्यूबद्दल केलं होतं सावध ; सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत बिग बॉसच्या घरात खळबळजनक खुलासा

Haryana Election 2024: "माझ्या सारख्या महान व्यक्तीच्या नावामुळं विनेश फोगाट जिंकली"; ब्रिजभूषणचा अजब दावा

SCROLL FOR NEXT