subodh kulkarni 
संपादकीय

ज्ञानभाषेसाठी सेतू ‘युनिकोड’चा

सुबोध कुलकर्णी

मराठी भाषा दिन, साहित्य संमेलन जवळ आले, की मायबोलीच्या प्रश्‍नांची चर्चा सुरू होते. बऱ्याच जणांना आपल्या मातृभाषेच्या विकासाची कळकळ असते हे खरेच; परंतु ठोस कार्यक्रमाअभावी दिशा मिळत नाही आणि मग ही ऊर्जा विरून जाते. खरे म्हणजे मराठीसाठी जर नव्या तंत्रज्ञानाचे कोंदण आपण नीट, जाणीवपूर्वक स्वीकारले तर या ज्ञानयुगात तिची प्रगती वेगाने होईल. त्यादृष्टीने सातत्यपूर्ण कार्यक्रम हाती घेतला पाहिजे आणि एखाद्या चळवळीप्रमाणे तो अंमलात आणला पाहिजे. बऱ्याच गोष्टी करता येतील; त्यापैकी एक महत्त्वाची निकड आहे ती म्हणजे देवनागरी लिपीसाठी युनिकोड हे संगणकाच्या स्मृतिपटावर अक्षरे, चिन्हे संकेतबद्ध करण्याचे तंत्र आत्मसात करण्याची. युनिकोड म्हणजे युनिक, युनिफाइड आणि युनिव्हर्सल अर्थात एकमेव, एकात्मिक व वैश्विक संकेत प्रणाली. जगात विविध भाषिकांना आपापल्या भाषा, लिप्या सांभाळून परस्परांशी संवाद साधण्याची, वैश्विक ज्ञानभांडार हस्तगत करण्याची जबरदस्त इच्छा आहे. यासाठी जी साधने वापरायची त्यांबद्दल एकमत व्हायला हवे. युनिकोड ही प्रणाली असे मतैक्‍य साधून विकसित केली गेली आहे. आता स्मार्टफोनमध्येही युनिकोडच बसविलेले आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसेही स्मार्टफोनच्या पडद्यावरच्या अत्यंत सोप्या, झटकन कोणत्याही अक्षराची बाराखडी दाखवणाऱ्या कळांना बोटाने स्पर्श करून, किंवा बोटाने अक्षरे गिरवून किंवा बोलणे अक्षरांत उमटवत शिताफीने मराठीत लेखन करताहेत. गुगलसारख्या समर्थ शोधकयंत्रावर ‘सर्च मारून’ (हे क्रियापद आता बोलीत रुळले आहे) मराठीत पटकन माहिती मिळवताहेत.

जगातील चिनी, अरबी, तुर्की, जपानी, कोरियन अशा अनेक समूहांमधील सर्वसामान्य जनता आणि उच्चशिक्षितही या ‘युनिकोड व्यवस्थे’त मनःपूर्वक सामील झाली आहे. या भाषा ज्ञानभाषा म्हणून समर्थपणे वापरल्या जात आहेत. आंतरजालामुळे निर्माण झालेल्या अचाट क्षमतेच्या बहुभाषिक ज्ञानभांडारात सक्रिय होण्यासाठी युनिकोडचा वापर आवश्‍यक आहे. आपण एक ‘आय.टी.पॉवर’ असूनही या विश्वव्यापी संवादांत भारतीय भाषा अरबी-तुर्की- फारसीच्या तुलनेत इतक्‍या मागे का आहेत? इंग्रजीचे स्तोम नि भारतीय भाषांबद्दल उदासीनता ही मुख्य कारणे आहेतच; पण युनिकोडबद्दलचे गैरसमज आणि अनास्था हेही एक कारण आहे.

संगणक स्मृतिपटावर अक्षरे नोंदविण्यासाठी देवनागरीकरिता युनिकोड वापरल्यास ते जगातील कोणत्याही संगणकास उमगते; तसेच ते विश्वव्यापी वेबच्या सायबर स्पेसमध्ये अदृश्‍य राहत नाही, म्हणून शोधयंत्रांना सहज हुडकता येते. साहचर्यातून ज्ञाननिर्मितीची सुरवात करणाऱ्या सर्वसमावेशक अशा ‘विकिपीडिया प्रकल्पा’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, तोही युनिकोडचा प्रभावी वापर केल्यामुळेच. हे ज्ञानभांडार इतके समृद्ध झाले आहे, की आज त्याची मजल मराठी व इतर भारतीय भाषांसहित जगातील एकूण  भाषांमध्ये लाखो लोकांच्या योगदानातून लिहिलेले अनेक विषयांवरचे पावणेपाच कोटी लेख इथपर्यंत पोचली आहे. विकिपीडियासोबत ‘विकिस्रोत’ हे मुक्त ग्रंथालय आणि ‘विक्‍शनरी’ हा शब्दकोश ज्ञान व्यवहाराच्या क्षेत्रात आघाडीवर आहेत. सर्वांना सहभागी होण्याची संधी, सुलभ संपादनाची प्रक्रिया व युनिकोडचा वापर यामुळे झपाट्याने लोक या प्रकल्पांत स्वेच्छेने सहभागी होत आहेत.
भविष्यातील ज्ञानव्यवहाराचे हे स्वरूप लक्षात घेऊन आपणही सुनियोजितपणे पावले टाकूया. व्यापारी फाँट्‌स व सॉफ्टवेअर्सच्या सापळ्यात अडकून आपल्या भाषांची निष्कारण हानी करणे निश्‍चयपूर्वक थांबवूया. एकदा का युनिकोडची चळवळ जोम धरू लागली, की इतरही उद्दिष्टे साधणे सुलभ होईल. यासाठी सातत्याने विविध पातळ्यांवर ठोस कृती करावी लागेल. डिजिटल ज्ञान व्यवहारासाठी लागणाऱ्या पारिभाषिक शब्द व संकल्पनांची साध्या, सुबोध भाषेत निर्मिती करूया. संबंधित व्यवसाय- जसे टंकन, संपादन, मुद्रण इ.शी संबंधित गटांची चर्चासत्रे आयोजित करणे आणि संबंधित शैक्षणिक अभ्यासक्रमात या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यासाठी पुढाकार घेणेही आवश्‍यक आहे. शासनाकडे ज्याचे प्रताधिकार (कॉपीराइट) आहेत असे सर्व साहित्य, ग्रंथ व कोश तसेच संस्थांना अनुदान देऊन स्कॅन केलेले साहित्य जनतेसाठी खुले करून युनिकोडमध्ये उपलब्ध करणे सहज शक्‍य आहे. लेखकांनी, प्रकाशकांनी आणि विशेषतः आपल्याकडच्या वैचारिक नियतकालिकांनी आपली प्रकाशने काही काळानंतर युनिकोडमध्ये आंतरजालावर उपलब्ध करून दिली तर विचारनिष्ठ समाजघडणीलाही वेग येईल. महाराष्ट्रात वर्षांची परंपरा असलेली अनेक ग्रंथालये आहेत. यातील दुर्मीळ व मौल्यवान ग्रंथसंपदा युनिकोडमध्ये परिवत करून ‘शोधनीय’ करता येईल. या सुविधा वापरून आंतरभारतीय ज्ञान व्यवहार केंद्र उभारूया. अमृताशी पैज लावणारी, शब्दांचीच रत्ने मिरविणारी आपली मायमराठी ही केवळ राजभाषा नव्हे तर लोकांची ज्ञानभाषा करण्याचे आव्हान भाषा दिनी स्वीकारूया!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer IPL Mega Auction 2025 : श्रेयस अय्यर आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला, PBKS ने मोजली तगडी रक्कम

Maharashtra Election Result 2024: विरोधकांचे उरले-सुरले आमदारही सत्तापक्षाच्या संपर्कात; आणखी दोन पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! श्रेयस अय्यवर तब्बल २६ कोटी ७५ लाखांची बोली

Amalner Assembly Election 2024 Result : अमळनेरला मंत्री अनिल पाटलांची बाजी; 33 हजार 445 मतांचे मताधिक्य

तीनही पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी; भाजप-धजद युतीला धक्का, माजी मुख्यमंत्र्यांचे दोन पुत्र पराभूत

SCROLL FOR NEXT