संपादकीय

वर्षाविहारांचा विचका

भुशी धरणावरील घटना अपवादात्मक नाही. वर्षासहलींचा रंगाचा बेरंग होणे, आपत्तीला आमंत्रण देणे अशा घटना वाढल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सहली, पर्यटनाने आनंद द्विगुणीत होतो. नवचैतन्य मिळते.कोणत्याही सहलीतून माणसाला अनुभवसंपन्नता येते. तथापि, त्यासाठीच्या शिस्तीचे भान सुटले; बेबंद, बेदरकार वर्तन केले तर त्याची मोठी किंमतसुद्धा मोजावी लागते. एवढेच नव्हे तर होत्याचे नव्हते देखील व्हायला वेळ लागत नाही. जूनमध्ये पावसाने ताण दिला तरी मधूनअधून बरसणाऱ्या पावसाने धबधबे वाहू लागले आहेत, धरणातली पाणीपातळी वाढू लागली आहे. रविवारी लोणावळ्याजवळील भुशी धरणाच्या परिसरात पर्यटनाला गेलेल्या पुण्यातील कुटुंबातील पाचजण पाण्याच्या वेगवान लोंढ्याबरोबर वाहून गेले.

या घटनेचा प्रसिद्ध झालेला व्हिडिओ पाहतानाही जीवाचा थरकाप व्हावा, असे दृश्‍य आहे. ते कमी म्हणून की, त्याच्या दुसऱ्याच दिवशी ताम्हिणी परिसरात धबधब्याच्या पाण्यात झेपावून साहस करणारा युवक वाहून गेला. आपत्तीच्या घटनांमधून आपण कोणताच धडा घेत नाही, भलतेच साहस करतो, जीवावर उदार होऊन मौजमस्ती करतो. स्वतःच्या जीवाचीही फिकीर करत नाही, असाच याचा अर्थ आहे. शॉर्टस्, रील्सच्या सध्याच्या जमान्यात बेभान झालेल्या अनेकांना त्याच्या आहारी जात असताना आपण नसत्या आफतीला आमंत्रण देत आहोत, ते जीवावर बेतेल याचे भानही राखत नाही, हे अनेक घटनांमधून समोर आले आहे. औरंगाबादच्या तरूणीचा मृत्यू अशाच घटनेतून घडला होता. आभासी विश्‍वात वावरत असताना वास्तवाचे भान सुटत आहे की काय?

भुशी धरणावरील घटना अपवादात्मक नाही. वर्षासहलींचा रंगाचा बेरंग होणे, आपत्तीला आमंत्रण देणे अशा प्रसंगांची वारंवारिता गेल्या काही वर्षांत वाढलेली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अशा स्वरुपाच्या बातम्या सातत्याने धडकत असतात, ही चिंताजनक बाब आहे. या सगळ्याच्या मुळाशी निसर्गात गेल्यानंतर त्याच्याशी आपला वर्तन व्यवहार कसा असला पाहिजे, तेथे वावरावे कसे, काय काळजी घ्यावी, धाडस करत असतानाच निसर्गाच्या ताकदीचा आदमास घेऊन पुढे पाऊल टाकायचे की, वेळप्रसंग पाहून केव्हा मागे फिरायचे याबाबतचा सद्‍सदविवेक गरजेचा असतो.

नेमका त्याचाच विसर पडतो. साताऱ्याजवळचा ठोसेघरचा धबधबा असो नाहीतर नाशिक परिसरातील दुगारवाडीचा धबधबा किंवा ताम्हिणी, आंबोलीसारखे घाट, वैतरणा, खडकवासला, भुशीसारखा परिसर, महाबळेश्‍वर, पाचगणीचे खुणावणारे पॉईंट अशा सगळ्याच्या सगळ्या ठिकाणी पावसाळ्यात ओसंडून वाहणारी गर्दी दिसते. निसर्गाचा नजारा नजरेत साठवण्याची, त्याचा आनंद लुटण्याची इच्छा चांगलीच. पण त्याला विवेकाची जोड नसेल तर जिवावर बेतते. अनेकदा गड-किल्ले, डोंगरकपारी, समुद्रावरील बीच, अभयारण्यातील जंगलवाटा अशा ठिकाणी मार्गदर्शक सूचनांचे फलक असतात. स्थानिक मंडळी अनुभवाच्या जोरावर हौशी पर्यटकांना तेथे वावरताना काय करावे, काय करू नये, याबाबतचे इशारे देत असतात. शिवाय, जिथे पर्यटकांची गर्दी होते, तेथे पोलिसांचा फौजफाटाही नियंत्रण, नियमनाचे काम करत असतो. अनेक ठिकाणी जीवरक्षकही तैनात असतात. ही व्यवस्थात्मक बाब असली तरी अलोट गर्दीतील प्रत्येकावर लक्ष ठेवणे केवळ अशक्यच असते. त्यासाठीच स्वयंशिस्त, स्वयंभान गरजेचे आहे.

निसर्गप्रेम म्हणावे की हौसमौज, पण गेल्या काही वर्षांत आपण निसर्गात जातानाही तेथील अवकाशाला एक शिस्त आहे, तेथील पर्यावरणाचा समतोल आपण बिघडवता कामा नये, ही संकल्पनाच बासनात गुंडाळून ठेऊ लागलो आहे. भंडारदरा असो नाहीतर कोकण अशा अनेक ठिकाणी काजवा महोत्सवाचे हिरीरीने आयोजन केले जाते. तेथे होणाऱ्या वारेमाप गर्दीमुळे काजव्यांपेक्षा माणसेच अधिक असे चित्र निर्माण होऊ लागले आहे. दोन-तीन दशकांपूर्वी कासच्या पठारावरील आकर्षक, रंगीबेरंगी फुलांचे सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडायचे. आज त्या परिसराला कुंपण घालावे लागले आहे. मुंबई-पुण्यासह विविध ठिकाणांहून येणाऱ्या पर्यटकांच्या लोंढ्याने त्या फुलांचे क्षेत्र बाधित होऊ लागले आहे.

त्यातच बेभरवश्‍याच्या पावसाने त्यांचा हंगामही घटत आहे. खरेतर निसर्गात वावरताना त्याची विशिष्ट आचारसंहिता असते. तेथील वर्तन, वागणुकीला नैसर्गिक शिस्तीची चौकट असते, हे लक्षात घेतले पाहिजे. निसर्गरम्य ठिकाणी किती आणि कशी गर्दी करावी, यालाही मर्यादा आहे, हेच आपण लक्षात घेत नाही. पूर्वी असे सांगत की, आग आणि पाणी यांच्याशी कधीही खेळ करू नये. ते कधी जीवावर उठेल, ते सांगता येत नाही. आजकाल त्याच्या जोडीला ‘गती’चा उल्लेख करावा लागतो. गतीवर स्वार होताना आपण गर्तेत जाऊ नये म्हणून त्यावर नियंत्रण हवे, हेच लक्षात घेतले जात नाही. त्यामुळेच सहल कुठलीही, कुठेही करावी पण शिस्त, आत्मसंयम, विवेकबुद्धी, निसर्गनियमापुढे नतमस्तक होणे याला तरणोपाय नाही, हेच खरे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT