चित्रपटसृष्टीतील सुंदर तारका असे म्हटले तर चटकन डोळ्यासमोर येते ते बेबी शकुंतला यांचे नाव. त्यांची आज नव्वदावी (ता. १७) जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.
चित्रपटसृष्टीतील सुंदर तारका असे म्हटले तर चटकन डोळ्यासमोर येते ते बेबी शकुंतला यांचे नाव. त्यांची आज नव्वदावी (ता. १७) जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.
मंद सुवास दरवळू लागला की त्यांच्या आगमनाची चाहूल लागायची. पाठोपाठ हलक्या पावलांनी अप्रतिम सौंदर्याच्या धनी बेबीताईंचे आगमन व्हायचे. फिकट निळसर, गुलाबी थवा पिस्ता कलरची साडी! साडी पांढऱ्या रंगाची असेल तर त्यावर बारीक फुलांची नाजूक नक्षी असे. कपाळाला लावलेले कुंकूही कधी बटबटीत नसे. तेही नाजूकच, बेबीताईंच्या नाजूक चणीला साजेसे! स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी कधीच काही वेगळे केले नाही. पण त्यांचा शालीन वावरच लक्षवेधी ठरत असे. मग त्या भालजी आणि लीलाबाई पेंढारकरांना भेटायला बाबासाहेब नाडगोंडे यांच्यासोबत येवोत किंवा कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीने आयोजित केलेल्या एखाद्या कार्यक्रमाला.
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर तारका असे म्हटले तर आजही अनेकांच्या नजरेसमोर चेहरा येतो तो मधुबालाचा. पण मधुबालापेक्षाही अधिक सौंदर्य लाभलेले व्यक्तिमत्त्व बेबीताईंचे होते. बेबीताई म्हणजेच बेबी शकुंतला या अशा रूपवती व अभिनयनिपुण असल्यानेच विमल रॉय, किशोर साहू, बी. आर. चोप्रा यांना त्यांच्यासमवेत काम करण्याचा मोह झाला. वयाची बावीस वर्षे पूर्ण होण्याआधीच सुमारे साठ मराठी-हिंदी चित्रपट करणाऱ्या बेबी शकुंतला यांना त्यांच्या ऐन उमेदीच्या काळामध्ये ‘मेट्रो गोल्डविन मेयर’सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित चित्रपटनिर्मिती संस्थेनेही चित्रपट ‘ऑफर’ केला होता.
कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील वसर्गे गावचे इनामदार खंडेराव तथा बाबासाहेब नाडगोंडे यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर बेबी शकुंतला या सौ. उमादेवी नाडगोंडे बनल्या आणि १९५०च्या दशकातच त्यांनी रूपेरी पडद्याशी कायमची फारकत घेतली. हॉलिवूडची ऑफर किंवा ‘बॉलिवूड’ची मायानगरी बेबीताईंना मोहपाशात खेचू शकली नाही. लग्न झाल्यानंतर डोक्यावरून पदर घेण्याची मनापासून स्वीकारलेली शालीनता व खानदानी अदब लग्नानंतर अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत राहिली.
अविस्मरणीय चित्रपट
लीलाबाई पेंढारकरांसोबत मी असताना एकदा आमचा गप्पांचा फड जमला. जुन्या आठवणींना बेबीताईंकडून आढेवेढे न घेता उजाळा मिळाला. बेबीताई म्हणाल्या, ‘‘मी मूळची पुण्यातील मध्यमवर्गीय महाजन कुटुंबात वाढत असलेली आणि भावे स्कूलमध्ये शिकणारी. वडील मुद्रणालयातील कामाशी निगडित. आपल्या मुलीने चित्रपटांमध्ये काम करणे वगैरे त्यांच्या गावीही नव्हते. उलट अशा गोष्टीला त्यांचा विरोधच होता. ‘प्रभात’च्या चालकांपैकी दामले हे माझ्या आईचे नातेवाईक. त्यांच्या आग्रहामुळे ‘प्रभात’च्या ‘दहा वाजता’ या मराठी आणि हिंदी चित्रपटातून बालकलाकार म्हणून मी चित्रपटसृष्टीत आले. लहान होते म्हणून शकुंतला महाजनचे नामकरण बेबी शकुंतला झाले. राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात मी काम केले तेव्हा माझे वय अवघे दहा वर्षे होते. १९४४ मध्ये ‘रामशास्त्री’ हा चित्रपट आला.
त्यातील अनंत मराठेंसोबत मी पडद्यावर साकारलेले ‘दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव’ हे गाणे लोकांना आवडले आणि मी अक्षरशः मराठी माणसांच्या घराघरात पोचले. चित्रपटामागून चित्रपट मिळत होते. १९४७ मध्ये मो. ग. रांगणेकरांचा ‘कुबेर’ केला. पु.लं.चे पडद्यावरील पदार्पण या चित्रपटात झाले. १९४८ वर्ष हे ‘सीता स्वयंवर’ चित्रपटाचे! ‘मनोरथा चल त्या नगरीला’ हे त्या चित्रपटातील गाणे आजही लोकांच्या लक्षात आहे. याच दरम्यान बाबांचा म्हणजे भालजींचा केव्हातरी फोन आला. माझे वय लहान, त्यामुळे त्यांचे कर्तृत्व मला माहितीच नव्हते. मी त्यांच्याशी पोरकटपणाने बोलत तुम्ही माझ्यासाठी काँट्रॅक्ट केले आहे का? अशी मूर्खासारखी काहीतरी विचारणा केली. बाबांनी ते फारसे मनावर न घेता वडिलांकडे फोन द्यायला सांगितले. नंतर वडिलांनी माझे चांगलेच कान उपटले. त्यानंतर मात्र असा उद्धटपणा माझ्याकडून कधी घडला नाही!’’
गप्पागोष्टींमध्ये विषय मधुबाला व किशोरकुमार यांच्या आठवणींकडे वळला. बेबीताई म्हणाल्या, ‘लोक रूपाबाबत माझी व मधुबालाची तुलना करत; पण ही तुलना आम्हा दोघींच्या मैत्रीच्या आड कधी आली नाही. पी. एल. अरोरा यांच्या ‘परदेस’ चित्रपटात मधुबाला नायिका आणि मी सहनायिका म्हणून एकत्र काम केले. ‘फरेब’, ‘लहरे’ अशा काही चित्रपटांमध्ये मी किशोरकुमारची पडद्यावर नायिका बनले, तर मधुबाला वास्तव जीवनातील किशोरकुमारची नायिका बनली.’
चित्रपटगृहाच्या मालक
आता बेबीताईंच्याही केवळ आठवणी उरल्यात. १९५१ मध्ये त्यांनी ‘शारदा’ या नाटकावर आधारित दिनकर द. पाटील दिग्दर्शित चित्रपटात नायिका रंगवली होती. ‘चिमणी पाखरं’, ‘संत बहिणाबाई’, ‘सौभाग्य’ यासारखे त्यांचे चित्रपटही गाजले. बेबीताईंनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत ‘कलगीतुरा’ या एकमेव तमाशापटात काम केले. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद ‘प्रबोधन’कार ठाकरे यांनी लिहिलेले होते, हे आज खरे वाटेल?
लग्न झालं आणि बेबी शकुंतला यांचा रूपेरी पडद्याशी अभिनेत्री म्हणून संबंध संपला. पण चित्रपटगृहाच्या मालक या नात्याने त्या चित्रपटसृष्टीशी जोडलेल्या राहिल्या. बाबासाहेब नाडगोंडे यांनी कोल्हापुरातील स्वमालकीच्या ‘संध्या’ या चित्रपटगृहाचे नामकरण पत्नी सौ. उमादेवींच्या नावे ‘उमा’ असे केले. जानेवारी २०१५ मध्ये बेबी शकुंतला म्हणजेच उमादेवींनी या जगाचा निरोप घेतला. अजूनही ‘उमा’ टॉकीज परिसरात गेले की वाटते कोठूनतरी पुन्हा बेबीताईंच्या वावराचा सुवास दरवळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.