‘युनेस्को’ने शालेय विद्यार्थ्यांना स्मार्टफोनचा वापर करायला देऊ नये, अशी सूचना केली आहे. जगभरातील २५ टक्के देशांनी शाळेत फोन आणण्यास बंदी घातली आहे, तर बहुतांश देशांमधे मुख्याध्यापकांवर तो निर्णय सोपवला आहे. स्मार्टफोन हे कितीही प्रभावी साधन असले तरी ते दुधारी शस्त्र आहे. हे लक्षात घेता ‘युनेस्को’ची सूचना सयुक्तिक वाटते.
- मिलिंद नाईक
नुकताच ‘युनेस्को’ने शालेय विद्यार्थ्यांना स्मार्टफोनचा वापर करायला देऊ नये, असा सल्ला दिला. या बातमीमुळे स्मार्टफोनच्या उपयोग-दुरुपयोगाची चर्चा अधिक प्रकर्षाने आणि तीव्रतेने सुरू झाली. बातमी वाचताना शाळेत असताना ''विज्ञान शाप की वरदान'' या विषयावरचा निबंध लिहावयास सांगितला जात असे, त्याचीही आठवण झाली.
त्या निबंधाचा शेवट आपण बहुतांश लोक विज्ञान हे वाईट नसून त्याचा वापर कशासाठी केला जातो, यावर ते अवलंबून आहे, कुठलेही शस्त्र असो वा शास्त्र, आयुध असो वा साधन; मुळात वाईट नसतेच; तर त्याचा उपयोग हा चांगल्यासाठी होणार की वाईटासाठी हे त्या पाठीमागे वापरणा-याच्या डोक्यावर अवलंबून असते वगैरे वगैरे,
असा करत असू. तसेच काहीसे स्मार्टफोनचे होणार असे सुरुवातीला वाटत होते, पण अधिक चिंतन करता युनेस्कोचेच मत सयुक्तिक वाटले ! खरे तर शिक्षणामध्ये संगणकाचा चांगला वापर करून घेता येतो. माहितीची उपलब्धता सहज तर होतेच; पण विविध माध्यमांचा उपयोग करता येणार असल्यामुळे अध्यापनामधे त्याचा प्रभावही अधिक असतो.
रंगीबेरंगी चित्रे, वेगवेगळे आवाज, ॲनिमेशन्स, व्हिडिओज या सर्व गोष्टींचा शिक्षण प्रभावी करण्यासाठी निश्चितच उपयोग होतो. टीव्हीवरील अथवा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कार्यक्रम बघण्याची सवय असणाऱ्या आजकालच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात गुंतवून ठेवायचे असल्यास या माध्यमांचा उपयोग करण्याशिवाय शिक्षकाला आता पर्याय नाही.
त्याच्या वापराशिवाय अध्ययन कंटाळवाणेच होईल. म्हणून इंटरनेटसह संगणकाचा वापर तर आवश्यकच; पण म्हणून त्यासाठी स्मार्टफोन विद्यार्थ्याच्या हातात देण्याची गरज वाटत नाही. शिक्षकाने त्याचा वापर स्वतःच्या अभ्यासासाठी व वर्गातील मांडणी करता अवश्य करावा.
पण हे झाले ‘वर्ग’ या संरचनेतील चौकटीतील शिक्षण पद्धतीबद्दल. अलीकडच्या काळात विद्यार्थ्याच्या संपादणुकीनुसार व आकलनाच्या गतीनुसार वैयक्तिक शिकवणी देणारे प्रोग्रॅम तयार झालेले आहेत.
तो प्रोग्रॅम समोरच्या विद्यार्थ्याला कोणत्या व किती प्रमाणात संकल्पना समजलेल्या आहेत, हे पाहून पुढे काय व कसे शिकवायचे हे स्वतःच ठरवतो. एकप्रकारे कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड या प्रोग्रॅमना दिलेली असते.
अशावेळी मात्र काहीतरी उपकरण प्रत्येक विद्यार्थ्याला हातात द्यावे लागते. पण त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा स्मार्टफोन शाळेत आणण्याची खरंच गरज आहे का? शाळेला त्यांच्याकडे उपलब्ध असलेले संरक्षित असे टॅबलेट्स यासाठी वापरता येतात. खरे तर अध्यापनात सदा सर्वकाळ टॅबलेटचा उपयोग सयुक्तिक नसल्याने किमान साधनांमधेदेखील ही गरज भागवता येईल.
अतिरेकी वापराचे धोके
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत संगणकाच्या वापराचा अतिरेक झाला, तर केवळ बौद्धिक क्षमता वाढवून खऱ्या आयुष्यातील समस्या सोडवण्याची संपूर्ण व सर्वांगीण क्षमता निर्माण होत नाहीत. त्यासाठी हाताने काम करणे, प्रयोग करणे, प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणे, या गोष्टी अधिक महत्त्वाच्या.
त्यास अधिक वेळ शाळेत द्यायला हवा आणि म्हणूनच प्रत्येकासाठी वैयक्तिक स्मार्टफोनची गरजही नाही. स्मार्टफोन हे तसे दुधारी शस्त्र! ज्यांना त्याचा योग्य कारणासाठी वापर करता आला त्या सर्वांनीच स्वतःची जलद प्रगती करून घेतली.
माहितीचे प्रचंड साठे सहज उपलब्ध झाल्याने शिकण्याची इच्छा असलेल्या सर्वांनीच त्याचा निश्चितच उपयोग करून घेतला. मात्र ज्यांना ते ज्ञानार्जनापेक्षा मनोरंजनाचे साधन वाटले ते या माध्यमाच्या व्यसनाच्या आधीन झाले व त्यांच्या आयुष्यातील प्रगतीपेक्षा अधोगतीचेच ते कारण झाले.
त्यामुळेच शालेय वयात जेव्हा विद्यार्थ्यांचा स्वतःच्या मनावर स्वतःचा ताबा नसतो, तेव्हा त्यांच्या हातात हे जबरदस्त आकर्षक साधन देणे हे खचितच योग्य नाही. कितीही प्रभावी साधन असले तरी ते दुधारी शस्त्र आहे हे लक्षात ठेवून ज्यांना तारतम्याची जाणीव आहे, अशा प्रौढांच्या देखरेखीखालीच वापराची परवानगी देणे योग्य होय.
स्मार्टफोनच्या वापराच्या अतिरेकामुळे अनेक शारीरिक व मानसिक समस्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाल्याचे आपण पाहतो. आज संपूर्ण जगापुढेच ही एक डोकेदुखी होऊन बसली आहे. व्यक्ती-व्यक्तींमधील मानवी संबंध तयार न होणे व कायम आभासी जगातच राहणे याने मानसिक प्रश्न; तर योग्य आहार-व्यायामाच्या अभावामुळे स्थूलत्वाच्या समस्या निर्माण होत आहेत.
आपल्या देशात सध्या डिजिटलायझेशनचे वारे आहे. डिजिटलायझेशनमुळे भारताचे रूप पालटणार आहे. भारतातल्या शेवटच्या व्यक्तीला अतिशय स्वस्तात शिक्षण मिळायला याचा उपयोग नक्कीच होणार आहे.
यूट्यूब , मूकस् प्लॅटफॉर्मस्, कोर्सेरा, खान अॅकॅडमी, दीक्षा यासारख्या साधनांनी ज्ञानाची दारे मुक्तपणे खुली करून दिली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडेल, असे शिक्षण उपलब्ध झाले आहे हेही खरेच. पण या सगळ्या गोष्टी अर्धसत्य आहेत.
याचे कारण या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती कोर्सला नोंदणी करणाऱ्यांच्या तुलनेत पूर्ण करणाऱ्यांच्या संख्येवरून हे दिसते. ही संख्या धक्कादायकरीत्या फक्त पंधरा टक्के इतकी आहे. याचा साधा अर्थ असा की फक्त ज्ञानाची उपलब्धता करून शिक्षण होत नाही, तर आणखीही काही घटक आहेत ज्यावर विद्यार्थी शिक्षण पूर्ण करणार की नाही हे अवलंबून असते.
ग्रंथालयांमध्ये सर्व प्रकारची पुस्तके अतिशय माफक दरात अथवा मोफत वाचायला उपलब्ध करून दिली, तरी ग्रंथालयातील वाचकांची संख्या वाढलेली आपल्याला दिसत नाही. यामागे जे कारण आहे तेच काहीसे या मोफत ऑनलाइन शिक्षणामागे!
एखादी गोष्ट शिकण्याची प्रेरणा निर्माण झाल्यानंतर ती प्रेरणा गोष्ट शिकून पूर्ण होईस्तोवर टिकेलच असे नाही. इथेच शिक्षकाच्या भूमिकेचे महत्त्व लक्षात येते. शिक्षक विद्यार्थ्याच्या जवळ असल्याशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही.
शालेय वयातील मुलांमध्ये तर ठरवून शिकण्याची प्रेरणा ही तरल असल्यामुळे शिक्षकाचे असणे ही अत्यावश्यक बाब आहे. स्मार्टफोनचा वापर करून शिकत असताना होणारे मनाचे विचलन हीही एक मोठी समस्या असते. गाडी कोणत्या विषयावरून कुठे घसरेल आणि कुठे किती वेळ अडकून पडेल, हे सांगताच येत नाही. रोगापेक्षा औषध जहाल अशी परिस्थिती निर्माण होते.
परिणामकारकतेला बाधा
इलेक्ट्रॉनिक वस्तू हाताळण्याच्या बाबतीत आजकालची मुले मागील पिढीपेक्षा जास्त स्मार्ट आहेत. पालकांना मोबाईल या माध्यमाची पूर्ण माहिती नसेल तर आपले मूल त्याचा वापर कशाकशासाठी करते आहे हे त्यांना काही अपघात होईपर्यंत लक्षातही येत नाही.
केवळ पैशांच्या मागे धावणा-या समाजकंटकांच्या जाहिरातबाजीच्या जाळ्यात अडकलेल्या व वाहावत गेलेल्या मुलांची अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती दिसतात. ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून या साधनाचा वापर पालक व विद्यार्थी दोघेही करताना दिसतात आणि विशिष्ट फोन मिळाला नाही म्हणून टोकाची भूमिका घेणारी मुलेही दिसतात. यातून उद्भवणारे मानसिक प्रश्न हाताळणे हे नंतर पालकांनाही झेपेनासे होते.
हे सर्व विवेचन पालक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्मार्टफोन देतात, या गृहितावर केले आहे. मात्र युनेस्कोने २६ जुलैला प्रकाशित केलेल्या ‘टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन’ या अहवालात मात्र तंत्रज्ञानाने शिक्षणातील गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याचे म्हंटले आहे. किंबहुना स्मार्टफोनच्या अतिरेकी वापराने परिणामकारकता कमीच होते, असे नमूद केले आहे.
जगभरातील २५ टक्के देशांनी शाळेत फोन आणण्यास बंदी घातली आहे, तर बहुतांश देशांमधे मुख्याध्यापकावर तो निर्णय सोपावला आहे. आता राहिला संपर्कासाठी फोनची आवश्यकता. तातडीच्या वेळी संपर्कासाठी फोन द्यावयाचा असल्यास साध्या बटनाच्या फोनवर ती गरज भागवता येईल. स्मार्टफोन दिल्याने शिक्षणातील समस्या संपून सर्व काही उत्तम होईल या भ्रामक कल्पनेत न राहता छुप्या मार्गाने घुसणाऱ्या शत्रूला बाहेर ठेवणेच स्मार्टपणाचे होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.