julian assange sakal
संपादकीय

भाष्य : असांजवर काळकोठडीचे संकट

शोधपत्रकारितेतून अमेरिकेसारख्या महासत्तेची युद्ध गुन्हेविषयक कृष्णकृत्ये उघडकीस आणणाऱ्या ज्युलियन असांज या विकिलीक्सच्या सहसंस्थापकाची ब्रिटनमधून गच्छंती अटळ दिसते.

विजय साळुंके

शोधपत्रकारितेतून अमेरिकेसारख्या महासत्तेची युद्ध गुन्हेविषयक कृष्णकृत्ये उघडकीस आणणाऱ्या ज्युलियन असांज या विकिलीक्सच्या सहसंस्थापकाची ब्रिटनमधून गच्छंती अटळ दिसते.

शोधपत्रकारितेतून अमेरिकेसारख्या महासत्तेची युद्ध गुन्हेविषयक कृष्णकृत्ये उघडकीस आणणाऱ्या ज्युलियन असांज या विकिलीक्सच्या सहसंस्थापकाची ब्रिटनमधून गच्छंती अटळ दिसते. त्याला अमेरिकेच्या ताब्यात दिले जाऊ नये, यासाठी निकाराचे प्रयत्न सुरू आहेत. पत्रकारांसह विविध संघटना त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

विकिलीक्स या संकेतस्थळाचा सहसंस्थापक व शोधपत्रकारितेत अमेरिकेसारख्या महासत्तेची युद्ध गुन्हेविषयक कृष्णकृत्ये उघडकीस आणणाऱ्या ज्युलियन असांज याचा एकावन्नावा वाढदिवस लंडनजवळील बेलमार्श तुरुंगात एकांतात पार पडला. इक्वेडोरच्या ब्रिटनमधील दूतावासात सात वर्षे आश्रय आणि नंतर ब्रिटीश तुरुंगातील शिक्षा मिळून तो ४२०० दिवस सलग बंदीवासात आहे. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी असांजला अमेरिकेच्या ताब्यात देण्याच्या आदेशावर सही केल्यानंतर त्याच्या सुटकेची शक्यता धूसर झाली आहे. त्याचे कुटुंबिय, चाहते, विकिलीक्स मिळून ब्रिटनमधील कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि पुन्हा कनिष्ठ न्यायालय या सर्व आघाड्यांवर त्याच्या मुक्ततेसाठी शर्थीने प्रयत्न करीत आहेत. अमेरिका व तिच्या मित्र देशांनी २०१० व २०११ मध्ये इराक आणि अफगाणिस्तानात एकतर्फी लष्करी कारवाईत लाखो लोकांना ठार केले. लक्षावधी लोक निर्वासीत झाले. प्रचंड विध्वंस झाला. त्यात अमेरिकी लष्कराकडून गंभीर स्वरुपाचे युद्ध गुन्हे झाले. या सर्व बाबी असांजने विकिलीक्सच्या माध्यमातून जगापुढे आणल्या. बड्या सत्तांचे युद्ध गुन्हे प्रकाशात आणणाराच गुन्हेगार ठरला. अमेरिकेचा गोपनीय कायदा व हेरगिरीविषयक गुन्ह्यासाठी त्याच्यावर १७ आरोपांवरून अमेरिकी न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. त्यात आरोप सिद्ध झाल्यास १७५ वर्षांची शिक्षा त्याला होईल.

राजनैतिक आश्रय संपुष्टात

अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांनी विकिलीक्सने केलेल्या गौप्यस्फोटाचा निषेध केला नाही. असांज याने सत्य उजेडात आणले व ते अप्रिय वाटले तरी ते हिताचेच आहे, असे त्यांनी म्हटले होते. अमेरिकेतील गोपनीय कायदा लष्कराची चुकीची कृत्ये दडपण्यासाठी आहे, असेही त्यांनी नमूद केले होते. असांजवर जे आरोप आहेत असेच आरोप गॅरी मॅकनीन याच्यावर होते. त्याने अमेरिकी संरक्षण खात्याचा संगणक हॅक केला होता. त्याच्या प्रत्यार्पणाचीही अमेरिकेची मागणी होती. थेरेसा मे ब्रिटनच्या गृहमंत्री असताना त्यांनी मॅकनीनचे प्रत्यार्पण रोखले होते. अमेरिकी लष्कराच्या गुप्तचर विश्लेषक चेल्सी मॅनींग यांनी असांजला गोपनीय कागदपत्रे पुरविली होती. त्यांना ३५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची शिक्षा माफ केली होती. अमेरिकेत अध्यक्षांना गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्याचा अधिकार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीच्या अखेरीस अमेरिका तसेच जगभरातून असांज याच्या माफीसाठी त्यांना आवाहन करण्यात आले होते, परंतु ट्रम्प यांनी विविध गुन्ह्यात सापडलेल्या आपल्या मित्रांना, सहकाऱ्यांना माफी दिली. खरे तर ओबामा यांनी असांजवरील कारवाई रोखली होती. परंतु ट्रम्प अध्यक्षस्थानी आल्यावर अमेरिकेच्या न्याय खात्याने पुन्हा खटल्याची तयारी केली. असांज लंडनमधील इक्वेडोरच्या वकिलातीत आश्रयाला असल्याने तेथून त्याला बाहेर काढणे अशक्य होते. इक्वेडोरमध्ये सत्तापालट झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मंजूर करण्याच्या बदल्यात असांजचा राजनैतिक आश्रय संपुष्टात आणण्यात आला. त्या आधी ट्रम्प प्रशासनात परराष्ट्रमंत्री असलेल्या माईक पॉम्पिओ यांनी सीआयए या अमेरिकी गुप्तचर संस्थेला असांजचे इक्वेडोरच्या दूतावासातून अपहरण करून लंडनच्या रस्त्यावर चकमकीच्या बहाण्याने त्याला ठार करण्याचा आदेश दिला होता. त्यात सीआयएला ब्रिटनच्या एमआय-५ या देशांतर्गत गुप्तचर संस्थेचे सहकार्य लाभणार होते. या कटाचा बोभाटा झाल्यानंतर पॉम्पिओ यांनी इन्कार केला नाहीच; शिवाय ही बातमी फोडणाऱ्यांवर खटला भरण्याची धमकी दिली होती.

अमेरिका आणि ब्रिटनमध्ये २००३ मध्ये गुन्हेगारांच्या देवाणघेवाणीचा (प्रत्यार्पणाचा) करार झाला आहे. त्यानुसार असांजच्या प्रत्यार्पण आदेशास संमती देण्यास आपण बांधील आहोत, असा खुलासा प्रीती पटेल यांनी केला होता. असांजच्या प्रत्यार्पण आदेशावर सही केली त्याच दिवशी पटेल यांनी माईक पॉम्पिओंसाठी स्वागत समारंभ आयोजित केला होता. हा योगायोग नव्हता. असांजचे अपहरण व हत्येच्या कटाला ब्रिटनमध्ये फारशी प्रसिद्धी मिळू देण्यात आली नव्हती. परंतु स्पेनमध्ये पॉम्पिओ यांच्यावर या प्रकरणात खटला भरण्यात आला. मात्र पॉम्पिओ जबाब देण्यास हजर राहिले नाहीत.

अमेरिका, ब्रिटन इत्यादी पाश्चात्य सत्ता मानवी हक्क, व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाता मारीत असतात. प्रत्यक्षात त्यांचा व्यवहार विसंगत असतो. असांजच्या प्रत्यार्पणाच्या आदेशावर गृहमंत्री पटेल यांची सही होताच बेलमार्श तुरुंगातील खोलीतून असांजला विवस्त्र बाहेर काढण्यात आले. त्या खोलीत आत्महत्या करण्यास काही उपयुक्त साधने आहेत काय, याचा शोध घेतला. नंतर त्याला एकांत कोठडीत डांबले. त्या आधी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी असांजला पक्षाघाताचा सौम्य झटका आला होता. याबाबतची माहिती डिसेंबरपर्यंत दडपण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कविषयक पथकाला बेलमार्श तुरुंगातील असांजच्या स्थितीचा आढावा घेण्याच्या प्रयत्नापासून रोखण्याचा प्रयत्न झाला.

असांज हा ऑस्ट्रेलियात जन्मलेला व तेथील नागरिक. चेल्सी मॅनींग व एडवर्ड स्नोडेन या अमेरिकनांवर हेरगिरीचे आरोप ठेवले होते. असांजने अमेरिकेच्या भूमीवर कथित गुन्हा केलेला नाही. सबब अमेरिकी हेरगिरी व तत्सम कायद्याच्या कक्षेत तो बसत नाही. त्याच्या बचावाकरिता हा ठळक मुद्दा. त्याच आधारे ऑस्ट्रेलियातील पत्रकार संघटनांनी अमेरिकी कारवाईला आक्षेप घेतला होता. त्याचे अमेरिकेत प्रत्यार्पण होऊन त्याला शिक्षा ठोठावली तर तो पायंडा पडेल. अमेरिकेची कृष्णकृत्ये उजेडात आणणाऱ्या इतर देशातील पत्रकारांना त्यातून धोका निर्माण होईल. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया ही अमेरिकेची प्यादी आहेत. अमेरिकेला दुखावण्यास ती धजावत नाहीत. ऑस्ट्रेलियात नुकतेच सत्तांतर झाले. ॲन्थनी अल्बानीस हे पंतप्रधान होण्याआधी विरोधी पक्षात असताना, ‘असांजला तुरुंगात खितपत ठेवण्यात अर्थ नाही, त्याने जेवढा बंदिवास भोगला तो पुरे झाला’, असे त्यांनी म्हटले होते. वेगळे राजकारण करू म्हणणाऱ्या अल्बानीस यांनी आता असांजच्या मुक्ततेबाबत मौन पाळले आहे. ऑस्ट्रेलियातल्या आधीच्या पाच सरकारांनी असांजसाठी आवाज उठविला नाही. त्याच्या ५१व्या वाढदिवसानिमित्त व्हिक्टोरिया राज्यातील मेलबोर्न येथील ग्रंथालयासमोर मेळावा झाला. त्यात त्याच्या मुक्ततेसाठी आवाहन करण्यात आले. असांजची पत्नी स्टेला मॉरिस, वडिल जॉन, बंधू ग्रॅबियल शिप्टन हे लंडन, न्यूयॉर्कमधून सुटकेची मोहीम चालवित आहेत. दरम्यान असांजच्या वकिलांनी प्रत्यार्पणाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका लंडन उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याआधी ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने अपिल फेटाळताना त्याने नवा युक्तिवाद करावा, असे म्हटले होते.

‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट’चे जगातील १४० देशात सहा लाखांवर पत्रकार सदस्य आहेत. जगभरच्या १४७ पत्रकार संघटना, वृत्तपत्र स्वातंत्र्याचे समर्थक, पेन, रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स, ऩॅशनल लॉयर्स गिल्ड, सेंटर फॉर इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नालिझम, केअर, पंधरा आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्था या सर्वांनी मिळून असांजच्या मुक्ततेसाठी प्रयत्न चालविले आहेत. अमेरिकेतील सहा अध्यक्षांची प्रशासने आणि टोनी ब्लेअर यांच्या सरकारलाही युद्ध गुन्ह्यांसाठी उघडे पाडणाऱ्या असांजला शिक्षा ठोठावून जगभराच्या पत्रकारांना इशारा देण्याची संधी सोडण्यास कोणी तयार होईल, असे वाटत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT