Imran Khan Sakal
संपादकीय

भाष्य : इम्रान खानचेही पाय मातीचेच

इम्रान खान आपण गेली २६ वर्षे राजकारणात आहोत आणि आपला तेहरिक-ए-इन्साफ हा पक्ष पाकिस्तानातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचे सांगतात.

विजय साळुंके

इम्रान खान आपण गेली २६ वर्षे राजकारणात आहोत आणि आपला तेहरिक-ए-इन्साफ हा पक्ष पाकिस्तानातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचे सांगतात.

जनरल अयूब खान ते जनरल परवेझ मुशर्रफ या लष्करशहांनी जी राजकीय प्यादी हाती घेतली, ती नंतर त्यांच्या हाताबाहेर गेली. सध्या इम्रान यांच्याबाबतीतही तसेच घडताना दिसते. त्यांचा ‘लाँग मार्च’ सुरू आहे, तो आपल्या मर्जीतील लष्करप्रमुख नेमला जावा, यासाठी.

इम्रान खान आपण गेली २६ वर्षे राजकारणात आहोत आणि आपला तेहरिक-ए-इन्साफ हा पक्ष पाकिस्तानातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचे सांगतात. १९९२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमधील विजेतेपद आणि त्यांच्या माता शौकत खानम यांच्या स्मरणार्थ उभे केलेले कॅन्सर रुग्णालय एवढेच त्यांचे भांडवल. जनरल अयूब खान ते जनरल परवेझ मुशर्रफ या लष्करशहांनी जी राजकीय प्यादी हाती घेतली ती नंतर त्यांच्या हाताबाहेर गेली. हा प्रयोग इम्रान खान यांच्यापर्यंत चालू होता. राजकीय प्यादी स्वतंत्र अस्तित्व दाखवितात, हे लष्कराला मानवणारे नव्हते. त्यासाठी इम्रानसारखे ग्लॅमर असलेले प्यादे २०१४मध्ये हाती घेण्यात आले. पाकिस्तानी लष्कराच्या मदतीनेच इम्रान-ताहिरुल काद्री यांनी राजधानी इस्लामाबादेत १२६ दिवस धरणे धरले. पनामा पेपर्स प्रकरणाचा वापर करीत न्यायालयाद्वारे नवाझ शरीफ यांना पदच्युत करून त्यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली. पंजाब प्रांतात नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) आणि सिंध प्रांतात भुट्टो-झरदारी कुटुंबांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी हे दोन पक्ष कायम मजबूत राहिले आहेत.

२०१८ मधील निवडणुकीत इम्रान यांच्याकडे सत्ता सोपविण्यासाठी न्यायालये, सुरक्षा यंत्रणेचा वापर करीत, प्रसंगी दमदाटी करीत दोन्ही पक्षांतून इम्रानकडे नेते वळविण्यात आले. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर तीन लाख सैनिक तैनात करून इम्रान यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळवून देण्यात आल्या. ऑगस्ट २०१८ ते एप्रिल २०२२ या साडेतीन वर्षांत इम्रान यांच्या मर्यादा उघड झाल्या. अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. पाकिस्तान दिवाळखोरीकडे निघाले होते. पाकिस्तानी जनतेचे काहीही होवो, लष्कराचा निधी वाढता राहिला पाहिजे, अशी भूमिका असल्याने लष्कराने इम्रान सरकारचे कवच काढून घेतले. अविश्वास ठरावापासून पळून जात इम्रान खान यांनी राजकीय विरोधकांप्रमाणेच लष्करावरही दुगाण्या झाडण्यास सुरुवात केली. लष्कराचा तटस्थ राहण्याचा निर्णय त्यांना मानवला नाही. २९ नोव्हेंबर रोजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी आपल्या मर्जीतील ले. जन. फैज हमीद यांना नेमण्याचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून इम्रान यांनी तातडीने निवडणूक घेण्याचा धोशा लावला आहे. त्यांचा ताजा लाँग मार्च त्याच हेतूने सुरू झाला आहे.

आय.एस.आय.च्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन इम्रान यांचा दुतोंडीपणा उघड केला. रात्री गुपचूप लष्करप्रमुखांशी चर्चा आणि दिवसा जाहीर सभेत लष्करावर टीका, हे इम्रान यांचे तंत्र आहे. जनरल बाजवा यांना अमर्याद काळ मुदतवाढ देण्याची तयारी दाखविणाऱ्या इम्रान यांनी ते निवडणूक घेण्यासाठी शाहबाज शरीफ सरकारवर दबाव आणत नाहीत म्हणून लष्करात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. न्यायपालिका, लष्कर व प्रशासनात इम्रान यांचे सहानुभूतीदार मोठ्या संख्येने आहेत. लष्कर हे पाकिस्तानातले एकमेव सत्ताकेंद्र आहे. त्याला धक्का पोचतो आहे, हे लक्षात येताच इम्रान यांना थारा द्यायचा नाही, असा निर्णय झाला आहे. इम्रान हे राजकीय वेशातील माफिया आहेत. प्रसंगी आपल्या आश्रयदात्यालाही ब्लॅकमेल करायला मागेपुढे पाहत नाहीत हे स्पष्ट झाले.

निवडणूक लढविण्यावर बंदी

पाकिस्तानी लष्कराचे व अमेरिकेचे पूर्वापार मधूर संबंध आहेत. इम्रान यांनी ते बिघडवले. ‘अमेरिका व विरोधकांच्या युतीने आपली सत्ता घालविली’, असा ते कांगावा करीत आहेत. पाकिस्तानातील राजकीय नेते, पक्ष, न्यायालय, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा, प्रसारमाध्यमे, राजकीय विश्लेषक हे सर्वच लष्कराची अधिसत्ता मान्य करीत असतात. लष्कर नाराज झाले तर या सर्व गोष्टी आपल्या विरोधात जातील, याची जाणीव झाल्याने इम्रान काहीशी सबुरी दाखवीत आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासात खोटारडेपणा, घूमजाव, साह्य करणाऱ्यांशी गद्दारी सातत्याने दिसली आहे. इम्रान खान यांचे विमान जमिनीवर आणणारा पहिला निकाल पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने दिला आहे.

पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत परदेशी नेत्यांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची लपवालपवी, विक्री व त्यातून मिळालेला नफा या प्रकरणात त्यांचे संसद सदस्यत्व रद्द झाले असून पाच वर्षे निवडणूक लढविण्यावर बंदी आली आहे. संसदेची सध्याची मुदत संपल्यानंतर ते पुन्हा रिंगणात उतरू शकतात. मात्र या गैरव्यवहाराबद्दल त्यांच्यावर फौजदारी खटला चालविला जाईल. आरोप सिद्ध झाल्यास तीन वर्षांची कैद होईल याबद्दल ते राजकीय विरोधकांवर टीका करीत असले तरी एका सर्वसामान्य पत्रकाराने हे तोषखाना प्रकरण उजेडात आणले. इम्रान खान शरीफ आणि भुट्टो-झरदारी कुटुंबांचा ‘चोर, डाकू’ असा उद्धार करीत असतात. त्यांचे आर्थिक व्यवहारही असेच लबाडीचे आहेत. पाकिस्तानातही इम्रान यांचे अंधभक्त मोठ्या संख्येने असून ते त्याकडे डोळेझाक करीत असतात. पाकिस्तानात दर दिवशी १५ हजार तरुण अठरा वर्षे पूर्ण करीत असतात. अशा शहरी, निमशहरी, मध्यमवर्गीयांमध्ये राजकीय जाणिवा विकसित झालेल्या नसतात. त्यांच्या लाटेवर इम्रान खान तरंगत आहेत.

हिमनगाचे टोक

पाकिस्तानातही ‘गोदी मीडिया’ आकाराला आली आहे. तथापि, मोहसीन शाहनवाझ रांझा या पत्रकाराने भेटवस्तूंचा गैरव्यवहार लक्षात घेऊन हे प्रकरण धसास लावले. २०१७ मधील माहिती अधिकारविषयक कायद्याचा आधार घेत त्यांनी इम्रान यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा तपशील मागितला. इम्रान सरकारने इस्लामाबाद उच्च न्यायालयात ही माहिती देण्यास मनाई करण्याची याचिका दाखल केली. इम्रान यांच्या प्रधान सचिवांनी पंतप्रधान कार्यालयात पत्रकार रांझा यांना बोलावून मोठ्या रकमेचे आमिष दाखविले. कोणत्याही प्रकारे हे प्रकरण थांबवा, पाहिजे ते देऊ असा प्रस्ताव मांडला. पत्रकाराने नकार दिल्यानंतर त्याची नोकरी घालविण्यात आली. अशा तीन-चार नोकऱ्यांवर त्याला पाणी सोडावे लागले. भेटवस्तू कोठे विकल्या, त्याच्या किमती किती, ती कोणाच्या खात्यात भरली गेली, भेटवस्तूंचे मूल्यांकन नेमके कोणी केले, अशी विचारणा करणारा त्यांचा अर्ज ‘राइट ऑफ ॲक्सेस टू इन्फर्मेशन’च्या आधारे दाखल झाला होता, अशी माहिती देण्यास दहा दिवसांची मुदत असूनही रांझा यांना ही माहिती आता सत्ताबदलानंतरही मिळालेली नाही. पंतप्रधानांची कोंडी करणारी स्टोरी ‘राष्ट्रीय स्टोरी’ बनते ही कोणत्याही पत्रकाराची आयुष्याची कमाई असते.

ज्या भेटवस्तू मिळाल्या त्यांच्या किमती नाममात्र दाखवून इम्रान यांनी खरेदी केल्या. काही वस्तूंची किंमत ज्याला विकल्या त्यांनीच परस्पर भरली. वस्तूंची खरेदी कोणत्या खात्यातून झाली, ती कोणी भरली, भेटवस्तूंची विक्री होण्याआधी खरेदीदारांकडूनच बेकायदा रक्कम जमा झाली हे सर्व त्यांनी उजेडात आणले. इम्रान यांच्या भ्रष्टाचाराचे हे तर एक हिमनगाचे टोक आहे.

पाकिस्तानच्या निवडणूक नियमात राजकीय पक्षांना परकी व्यक्ती व संस्थांकडून निधी घेण्यास मनाई आहे. इम्रान यांनी गेली दहा वर्षे अनेक बँक खात्यात असा निधी स्वीकारला आहे. फॉरिन फंडिंगचे हे प्रकरण न्यायालयाने दडपून ठेवले आहे. ते सिद्ध झाले तर इम्रान खान यांच्यासह त्यांच्या राजकीय पक्षावर बंदी येईल. कॅन्सर हॉस्पिटलसाठी इम्रान यांनी जगभरातून निधी गोळा केला. ब्रिटनमध्ये तर त्यांनी त्याचा वापर जुगार खेळण्यासाठीही केला.

स्वतःला स्वच्छ म्हणविणाऱ्या इम्रान यांचा जन्म गर्भश्रीमंत कुटुंबातला नाही. आज त्यांची संपत्ती एक हजार कोटींहून अधिक आहे. क्रिकेटमधील मानधन हेच त्यांचे उत्पन्नाचे अधिकृत साधन होते. इतरांवर भ्रष्टाचाराचे वारेमाप आरोप करणारेही पराकोटीचे भ्रष्ट असतात, हेच खरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT