Mamata Banerjee  Sakal
संपादकीय

राज आणि नीती : मिथ्थेर ममता जाच्छे!

‘मा, माटी, मानुष’ ही घोषणा आता निष्प्रभ ठरताना दिसते आहे. मालिन्य, मरगळ आणि मनगटशाही ही तृणमूल काँग्रेसच्या राजवटीची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. याचा फटका त्या पक्षाला या निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही.

विनय सहस्रबुद्धे

भारताच्या इतिहासात कोलकाता शहराला एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. अध्यात्म, साहित्य, संगीत, चित्रपट अशा अनेक क्षेत्रातील दिग्गजांची ही भूमी आहे आणि विक्‍टोरिया मेमोरियल, फोर्ट विल्यम्स, हावडा ब्रिज, इंडियन नॅशनल म्युझियम अशा अनेक ऐतिहासिक इमारती ही या शहराने एखाद्या अलंकारासारखी आपल्या अंगा-खांद्यावर मिरविलेली अनेक वारसा स्थळेही या शहरात आहेत. पण आज मात्र हे ऐतिहासिक शहर साठलेल्या पाण्यावर धुळीची साय चढावी तसे शिळे-पाके, अचेतन झाल्याचे सर्वदूरचे चित्र आहे. शहरातल्या मोठमोठ्या होर्डिंग्जच्या अनेक जागा ममता बॅनर्जींच्या विशाल फलकांनी व्यापल्या आहेत. भिंतींवरची घोषणा-रंगाई असो कि जागोजाग लावलेले झेंडे; यातही तृणमूल कॉंग्रेसची संख्या अधिक आहे. पाठोपाठ भाजपा आणि मधूनच कुठे कुठे अस्तित्व दाखविण्यापुरती डाव्या पक्षांची वा कॉंग्रेसची उपस्थिती.

पण ‘दिवार-पे-दिदी, दिल में मोदी’ ही प. बंगालच्या इतर भागांप्रमाणेच कोलकाता शहराचीदेखील वास्तविकता आहे. रस्त्यांच्या कडेला, पदपथांच्या भोवती उभी केलेली रेलिंग्ज असोत, किंवा रात्रीच्या वेळी फ्लायओव्हर्सच्या प्रकाशव्यवस्थेचाच भाग बनविलेली एल.इ.डी. दिव्यांची रोषणाई असो; ममता बॅनर्जी यांनी सर्वदूर निळ्या-पांढऱ्या रंगांची बरसात केलेली दिसते. पण निराशा, भीती आणि दडपणाने कुंद झालेल्या कोलकात्याच्या वातावरणात हे रंग आता पार फिके पडले आहेत. ‘मा, माटी, मानुष’ ही घोषणा आता निष्प्रभ ठरते आहे. मालिन्य, मरगळ आणि मनगटशाही ही ‘तृणमूल’च्या राजवटीची आजची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. ममता बॅनर्जींच्या होऊ घातलेल्या पराभवाची बीजे याच वातावरणात आहेत.

कमिशनखोरी (टोलाबाजी), सक्तीची वसुली, हिंसेच्या माध्यमातून दहशत आणि त्या जोडीला ‘भस्मासूर’ ठरत असलेले ‘मतपेढी’चे राजकारण हे सर्व मुद्दे चढत्या क्रमाने ममता बॅनर्जींच्या राजकीय ऱ्हासाला कारण ठरले आहेत. नवा फ्लॅट बुक करणारे मध्यमवर्गीय कोलकाता निवासी असोत, की नवे दुकान थाटणारे व्यावसायिक, कोणालाच ‘तृणमूल’च्या ‘कार्यकर्तारुपी’ गुंडांना ‘प्रोटेक्‍शन मनी’ दिल्याशिवाय नव्या जागेत स्थलांतरित होता येत नाही. कोलकात्यात वस्त्या-वस्त्यांमधून ‘क्‍लब’ नावाच्या संघटना आहेत. पूर्वी कम्युनिस्टांच्या नियंत्रणाखाली असलेले हे ‘क्‍लब’ आता ममता बॅनर्जी व त्यांच्या बहुचर्चित ‘भायपो’च्या(भाचा)च्या नियंत्रणाखाली आहेत. या ‘क्‍लब’च्या दादांनीही सक्तीच्या वसुलीचा मार्ग अवलंबिल्याची अनेक उदाहरणे ऐकायला येतात. याबरोबरच हिंसेच्या आधारावर दहशतीचे साम्राज्य उभे करण्याची कलाही ममता बॅनर्जींच्या पक्षाने आपल्या पूर्वसूरींकडून आत्मसात केली आहे.

भेदक विरोधाभास

इथल्या ज्यूट मिल्सच्या व्यवसायात गेली पाच-पन्नास वर्षे उत्तम जम बसविलेल्या एका राजस्थानी उद्योगपतीकडे ‘रामजन्मभूमी न्यासा’शी संबंधित एक आध्यात्मिक नेते मध्यंतरी पाहुणे म्हणून आले होते. नंतर चारच दिवसात या उद्योगपतीला इथल्या मुख्यमंत्री कार्यालयाने भेटायला बोलावले आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनीच त्यांनी दिलेल्या या पाहुणचाराबद्दलचा आक्षेप नोंदविला.

प. बंगालमधील राजकीय वाऱ्यांची दिशा स्पष्टपणे जाणून ममता बॅनर्जींनी जो मतदारसंघ सोडून दिला, तो म्हणजे भवानीपूर! अलिकडेच ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळविलेला तरुण अभिनेता, पटकथाकार रूद्रनील घोष हा भाजपाचा या मतदारसंघातील उमेदवार. अनेक घरांमधून त्याला येणारे अनुभव बोलके आहेत. बरेचदा त्याला घराच्या आत बोलावून ‘मायमिंग’सारख्या खाणाखुणा करून मतदार सांगतात, की ‘बाबारे, आम्ही कमळाचे बटनच दाबणार आहोत; पण तूर्तास तू इथून निघून जा, याचे कारण ‘तृणमूल’चा ‘कार्यकर्तारुपी’ गुंड हे सारे बघतोय आणि नंतर माझी गाठ त्याच्याशीच आहे.’ दहशतीची ही जीवघेणी गडद छायाच मतदारांना आपल्या मुस्कटदाबीला पूर्णविराम देण्याचा निर्धार करण्यासाठीची प्रेरणा ठरत आहे! यातील भेदक विरोधाभास म्हणजे हिंसा, गुंडगिरी आणि सक्तीच्या वसुलीसाठी प्रसिद्धीस पावलेल्या ज्या डाव्या आघाडीच्या राजवटीविरुद्ध ममता बॅनर्जी यांनी एल्गार केला, त्या सर्व लोकविरोधी कार्यपद्धतीच्या आधारावरच त्यांचेही राजकारण सुरू आहे. गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पार्टीच्या सव्वाशेहून अधिक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. आपल्या कामाच्या आधारावर जनाधार संपादन केलेल्या अनेक तरुण, कर्तृत्ववान भाजपा कार्यकर्त्यांना ठार करून त्यांची प्रेते, गळफास लावलेल्या अवस्थेत गावाबाहेरच्या झाडावर सापडल्याची डझनावारी उदाहरणे आहेत.

या हिंसक राजकारणाला मतपेढीच्या राजकारणाची जोड मिळाल्याने ते आणखी घातक ठरले आहे. मतपेढीचे राजकारण, मग ते काँग्रेसचे असो, डाव्यांचे असो अथवा तृणमूल कॉंग्रेसचे; त्याचा एक स्वाभाविक परिणाम म्हणजे मुस्लिम मतदारांचा अतिरेकी अनुनय व परिणामी त्यांच्या वास्तविक हिताची घोर उपेक्षा! साहजिकच असाउद्दीन ओवैसी किंवा अलिकडेच नावारूपाला आलेले मुस्लिम नेते, पीरजादा अब्बास सिद्दिकी (फुरफुरा शरीफ) यांनी ममतांची पाठराखण करणे सोडून नवी आघाडी स्थापन केली. ममता बॅनर्जी खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाचा विकास साधत नसून त्या अनुनयाद्वारे मतपेढीचे राजकारण करीत असल्याचा आरोप नुसता भाजपाकडूनच नव्हे तर या मुस्लिम नेत्यांकडून होत आहे.

मतपेढीच्या राजकारणाची अनेक उदाहरणे आहेत. ममता बॅनर्जी सरकारने सर्व प्रकारच्या प्रार्थनास्थळांमधील पुजारी वर्गाला मानधनाची योजना जाहीर केली; पण मशिदींच्या इमामांना दरमहा २५०० रु. मिळतात, तर मंदिराच्या पुजाऱ्यांना फक्त १००० रुपये. इमामांना मानधन मिळविण्यासाठी आधिवास प्रमाणपत्र वा आधार कार्डाची गरज नाही; पण हिंदू मंदिरांच्या पुजाऱ्यांना मात्र ते अनिवार्य! रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांनाही हा लाभ मिळावा हा यामागचा हेतू! आज राज्यात ५५ हजार इमामांना मानधन देण्यात येते, तर मानधन देण्यात येणाऱ्या हिंदू पुजाऱ्यांची संख्या आहे फक्त आठ हजार. असेच उदाहरण उर्दू भाषेला प्रोत्साहन देण्याचे आहे. केवळ प. बंगालमध्येच नव्हे तर बांगलादेशातसुद्धा बंगाली भाषाच हिंदू-मुसलमान या सर्वांची समान भाषा आहे. पण आपले वेगळेपण ठसविण्यासाठी काही अविवेकी मुस्लिम नेत्यांनी उर्दू भाषेला प्रोत्साहन व उर्दू शिक्षणाच्या अनुषंगाने उर्दू शिक्षकांच्या भरतीचा आग्रह धरला आणि सरकारने खरोखरच उर्दूची गरज आहे काय, याचा विचार न करता तो मान्य केला. याच मतपेढीच्या जोपासनेसाठी ममता बॅनर्जी बांगलादेशातून होणारी घुसखोरी आणि बांगलादेशात होणारी गाई-गुरांची चोरटी निर्यात या दोन्हीकडे सपशेल डोळेझाक करीत आहेत. २००५ मध्ये याच ममता बॅनर्जी यांनी लोकसभेच्या अधिवेशनात सभापतींपुढे कागदपत्रे आपटून घुसखोरीमुळे बदलणारी प. बंगालची लोकरचना व बांगला संस्कृतीवरील अतिक्रमण याबाबतचा आक्रोश व्यक्त केला होता. पण सत्तेवर येताच हा प्रश्‍न सोडविण्याऐवजी घुसखोरीला प्रोत्साहन देण्याकडे त्यांचा कल आहे. भारत-बांगलादेश सीमेवर काटेरी तारांचे कुंपण घालण्यासाठी केंद्र सरकार उत्सुक आहे, पण प. बंगाल सरकार त्यासाठी आवश्‍यक ती जमीन अधिगृहित करण्याच्या कामात केंद्राला सहकार्य करीत नाही, हे वास्तव आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात होऊ घातलेल्या परिवर्तनाची दिशा स्पष्ट आहे. भाजपविरोधी भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले राजकीय विश्‍लेषकही आता भाजपाचे सरकार येईल, हे मान्य करू लागले आहेत.

मिथ्थेर ममता जाच्छे,

सोत्तेर खौमोता आशछे,

शोनार बांगला होच्छे

म्हणजेच खोटी, ढोंगी ‘ममता’ जाऊन खरी क्षमता येईल व ‘शोनार बांगला’ नक्की होईल, हा विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठीचे भाजपाचे प्रयत्न अखेर बूथ-व्यवस्थापनाच्या आघाडीवर किती व कसे यशस्वी होतात त्यावर सर्व गणिते अवलंबून आहेत. हवा आहेच, कसोटी आहे ती ती हवा पंप लावून तत्परतेने टायरमध्ये भरण्याच्या संदर्भात!

vinays57@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : खेरवाडी उड्डाणपुलावर चालत्या कारने घेतला पेट

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT