class-room 
संपादकीय

शिक्षणप्रसाराची `व्हर्च्युअल’ दिशा

डॉ. अ. ल. देशमुख

विशिष्ट ठिकाणी आणि शहरांमध्ये बंदिस्त झालेले शिक्षण, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन खेडोपाड्यांपर्यंत पोचवले पाहिजे. डिजिटल तंत्राधिष्ठित शिक्षण (व्हर्च्युअल एज्युकेशन) हे त्याला उत्तर आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून दृश्‍य माध्यमाच्या साह्याने सहजपणे तज्ज्ञ, अनुभवी, व्यासंगी, प्रभावी व्यक्तींद्वारे सर्वसमावेशक व परिणामकारक शिक्षण देणे शक्य होईल.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण शिक्षणाचा प्रसार व प्रचार याबाबतीत समाधानकारक प्रगती केली आहे. गेल्या दहा वर्षांत आपण शिक्षणामधून गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांचे फलित म्हणून सर्वत्र गुण मिळवण्याची स्पर्धा सुरू  झाली. परीक्षेतील गुण म्हणजेच गुणवत्ता हे समीकरण दृढ झाले. त्याचा परिणाम म्हणून पुढील गोष्टी जाणवू लागल्या. १) समाजात शिक्षणामधून अघोरी स्पर्धा सुरू झाली. २) विशिष्ट अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा सुरू झाल्या. ३) वरील स्पर्धेत यश प्राप्त करण्यासाठी खासगी शिकवण्यांचे प्रमाण वाढले. ४) खासगी वर्गाचे शुल्क आकाशाला भिडले. ५) ग्रामीण भागातील लोक शेती विकून आपल्या मुलाचे भवितव्य घडवण्यासाठी खासगी शिकवण्यांचे शुल्क भरू लागले. ६) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे शुल्क जबरदस्त असल्यामुळे ६० टक्के विद्यार्थ्यांना यापासून वंचित राहावे लागत आहे. ७) शिक्षण, करिअर, भविष्य फक्त श्रीमंतांचेच घडू लागले. त्यातून हळूहळू गरीब आणि श्रीमंत ही दरी वाढू लागली. निकोप समाजाच्या दृष्टीने हे योग्य नाही.

 गरीब कुटुंबांमध्ये आणि ग्रामीण भागात जन्माला येणे, म्हणजे शिक्षणाच्या संधीवर पाणी सोडण्यासारखे आहे. तशी परिस्थितीच आज निर्माण झाली आहे. हे चित्र बदलून ग्रामीण व शहरी भागातील गरीब विद्यार्थ्यांना परवडेल, अशी स्वस्त शैक्षणिक मार्गदर्शन करण्याची सुविधा निर्माण केली पाहिजे. तसेच विशिष्ट ठिकाणी आणि शहरांमध्ये बंदिस्त झालेले शिक्षण, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन खेडोपाड्यांपर्यंत पोचवले पाहिजे. डिजिटल तंत्राधिष्ठित शिक्षण (व्हर्च्युअल एज्युकेशन) हे त्याला उत्तर आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून दृश्‍य माध्यमात सहजपणे तज्ज्ञ, अनुभवी, व्यासंगी, प्रभावी व्यक्तींद्वारे सर्वसमावेशक व परिणामकारक शिक्षण देणे म्हणजे आभासी शिक्षण होय.

आजचे युग हे जागतिकीकरणाचे युग आहे. माहिती-तंत्रज्ञानात झालेली प्रगती हे जागतिकीकरणाचे प्रमुख अंग आहे. अवघे जग बदलून टाकण्याची ताकद माहिती-तंत्रज्ञानात आहे. स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, यू-ट्यूब, मेमरी कार्ड, इंटरनेट, फेसबुक, ट्विटर, विकीपीडिया आणि व्हर्च्युअल क्‍लास हे शब्द तरुणाईला, शालेय विद्यार्थ्यांना नवे नाहीत. ही एक प्रकारची क्रांतीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जगातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘सब का साथ सब का विकास, सब का विश्‍वास’ करण्याचा संकल्प करून डिजिटल इंडियाचा संकल्प सोडला आहे. पण वस्तुस्थिती काय आहे? शहरांमधून तंत्रज्ञान, आधुनिक साधने, तज्ज्ञ मार्गदर्शक, अनुभवी शिक्षक यांची रेलचेल आहे. परंतु ग्रामीण भागात आजही यांची उणीव जाणवते. अशा परिस्थितीत तेथील विद्यार्थ्यांनी काय करायचे? निराश होऊन गप्प बसायचे का? नाही.`व्हर्च्युअल’ शिक्षण हा त्यावर प्रभावी उपाय आहे.

`व्हर्च्युअल’ शिक्षणामध्ये माध्यमनिहाय, विषयनिहाय व परीक्षेच्या स्वरुपानुसार तज्ज्ञ, अनुभवी शिक्षक पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार स्टुडिओमधून व्याख्यान देतात. स्टुडिओमध्ये व्हाइट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, माईक व्यवस्था व पोडियम असते. तसेच दोन कॅमेरे केंद्रस्थानी असून, त्यातील एक कॅमेरा शिकवणाऱ्यावर केंद्रित केलेला असतो आणि दुसरा सफेद फलकावर केंद्रित केलेला असतो. शिकवणाऱ्या शिक्षकाला स्वतःचा पाठ पाहण्यासाठी समोर दूरचित्रवाणी संच असतो. विद्यार्थी ज्या केंद्रावर किंवा घरी किंवा शाळेत जिथे कुठे शिकणार आहे, तिथे कॅमेरा, एलसीडी प्रोजेक्‍टर व स्क्रीन हे साहित्य असते. स्टुडिओमधून शिक्षक शिकवतात व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसनही करतात. शाळेतील कॅमेरा व माईकद्वारे शाळेमधून किंवा घरून विद्यार्थी स्टुडिओमधील शिक्षकांशी संवाद साधतात, प्रश्‍न विचारतात. स्टुडिओमधील शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देतात, यालाच अंतर्क्रिया (इंटरॲक्‍टिव्ह) असे म्हणतात. `व्हर्च्युअल’ शिक्षणात विषयाचे आशय व्यवस्थापन महत्त्वाचे असते. शिकवणाऱ्याने ४०-५० मिनिटांत चांगले कसे शिकवावे, शैक्षणिक साधने कोणती वापरावीत, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनचा वापर कसा करावा, प्रयोग कसे दाखवावेत, विद्यार्थ्यांशी अंतर्क्रिया कशी करावी, याला आशयाचे व्यवस्थापन म्हणतात.

`व्हर्च्युअल’ शिक्षणात आभासी वातावरणनिर्मिती महत्त्वाची असते. सध्या जेईई किंवा नीट या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो विद्यार्थी लाखो रुपये खर्चून राजस्थानात कोट्याला जातात. एवढा खटाटोप आणि खर्च करण्याऐवजी कोट्यालाच छोटासा स्टुडिओ तयार करता येईल. तिथे शिक्षक शिकवतील आणि ते सर्व भारतात दिसेल. `जेईई’ व `नीट’प्रमाणे सर्व महाराष्ट्रभरातून सध्या एमपीएससी व यूपीएससीच्या मार्गदर्शनासाठी बहुसंख्य विद्यार्थी पुण्यामध्ये येतात. जिथे जागा मिळेल तिथे राहतात. जेवणाचे हाल सहन करतात. हे करण्याऐवजी पुण्यातून स्टुडिओतून उत्तम शिक्षकांनी एमपीएससी - यूपीएससीचे व्याख्यान घेतले तर सर्व ग्रामीण भागात ते पाहता येतील. अशा सोयी आता झालेल्या आहेत; पण त्या बोटावर मोजण्याइतक्‍याच आहेत. सर्व मोठमोठ्या क्‍लासचालकांनी `व्हर्च्युअल’ शिक्षणाचा वापर केला पाहिजे. `व्हर्च्युअल’ शिक्षणात जगातील कोणत्याही व्यक्तीचे ज्ञान, भाषण, मार्गदर्शन आपण ऐकू शकतो आणि त्या व्यक्तीशी आपण बोलूही शकतो. `व्हर्च्युअल’ शिक्षणासाठी सध्या उपग्रहाची मदतही होऊ शकते.

`व्हर्च्युअल’ शिक्षण हे अधिक सखोल, दूरगामी आणि सर्वसमावेशक आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेपासून उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत आपण ते वापरू शकतो. पूर्वीच्या काळी शिक्षण देताना शालेय पुस्तकातील छोटेसे चित्र छायाचित्र म्हणून दाखवले जात होते. पण आता `व्हर्च्युअल’ शिक्षणाद्वारे विषयानुरूप असंख्य चित्रे, त्यासंदर्भात पूर्वी झालेली भाषणे, व्याख्याने, प्रयोग, प्रकल्प, उपक्रम, उपकरणे आदी गोष्टी सहजपणे मुलांना दाखवता येतात. पूर्वी रक्ताभिसरण संस्था शिकवताना आपण हृदयाचे चित्र किंवा प्रतिकृती दाखवत होतो. आता मल्टिमीडियाचा वापर करून प्रत्यक्ष हृदयच आपण पडद्यावर दाखवू शकतो. मानवी शरीरातील सर्व संस्था आपण आभासी शिक्षणामधून लाईव्ह स्वरुपात दाखवू शकतो. पूर्वीच्या काळी एखाद्या विचारवंताचे ज्ञान शिकायचे, कवीची कविता शिकायची तर त्या काळातील वर्णन समजावून सांगताना खूप अडचणी येत असत. वर्ल्डस्वर्थच्या डापोडीलस्‌ या कवितेत इंग्लंडमधील रानफुलांचे वर्णन आहे.इंग्लंडमधील ही फुले भारतात कुठून आणणार? आज इंटरनेटवरून डोलणाऱ्या डॅपोडीलस्चे चित्र दाखवून त्यातील निसर्गात्मक व काव्यात्मक कल्पना `व्हर्च्युअल’ शिक्षणामधून समजावून देता येणे सहजशक्‍य आहे.या शिक्षणाचा सर्वांत महत्त्वाचा उपयोग म्हणजे डॉ. माशेलकर, डॉ. भटकर, डॉ. नारळीकर यांसारख्या विख्यात शास्त्रज्ञांचा संवाद आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांशी घडवून आणू शकतो. शिक्षणातील नवे विचार, नव्या कल्पना, नवा अभ्यासक्रम, नवी मूल्यमापनपद्धत, नव्या अध्यापनपद्धती यांची प्रशिक्षणे अशा प्रकारच्या शिक्षणामधून प्रभावी व परिणामकारकरीत्या कार्यान्वित करता येतात. सारांश, कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचे असेल, तर `व्हर्च्युअल’ शिक्षण हा एक उत्तम पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT