आध्यात्मिक लोकशाहीचा आविष्कार sakal
संपादकीय

आध्यात्मिक लोकशाहीचा आविष्कार

शेकडो वर्षांची परंपरा असलेली वारी अध्यात्माची पेरणी करत असतानाच काळानुरूप बदलत आहे. जुन्या-नव्या पिढीचा मेळ घालणारा हा वैष्णवांचा मेळा साऱ्या जगात औत्सुक्याचा आणि आदराचा ठरत आहे. त्याविषयी...

डॉ. सागर देशपांडे

शेकडो वर्षांची परंपरा असलेली वारी अध्यात्माची पेरणी करत असतानाच काळानुरूप बदलत आहे. जुन्या-नव्या पिढीचा मेळ घालणारा हा वैष्णवांचा मेळा साऱ्या जगात औत्सुक्याचा आणि आदराचा ठरत आहे. त्याविषयी...

डॉ. सागर देशपांडे

“ते रावं शतक हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील फार महत्त्वाचं शतक आहे. याच शतकात महाराष्ट्रात क्रांतीपर्व सुरू झालं. त्याला ‘क्रांतीपर्व'' म्हणावं, ‌‘परिवर्तनपर्व'' म्हणावं की ‌‘प्रबोधनपर्व'' म्हणावं असा प्रश्न नेहमी पडतो. या पर्वाचे तीन आयाम आहेत. म्हणावं तर त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, नि म्हणावं तर ते परस्परपूरक आहेत.” (संदर्भ-पृष्ठ क्र.१६, ‌‘निवडक सार्थ नामदेव'', डॉ. अशोक कामत यांनी लिहिलेल्या ग्रंथाला डॉ. यु.म. पठाण यांनी लिहिलेली प्रस्तावना)

डॉ. पठाण यांनी सांगितलेल्या वरील तीनही पर्वांचा आविष्कार आपल्याला पंढरपूरच्या वारीमध्ये दिसतो. म्हणूनच आजच्या भाषेत वारी म्हणजे भारताची आध्यात्मिक लोकशाही आहे, असं म्हटले तरी वावगे ठरू नये. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या काही भागात विठ्ठलभक्तांची मांदियाळी दिसते. श्री विठ्ठल हे विष्णूचे रूप मानले जाते. त्याचे मूळ क्षेत्र कर्नाटकातील असल्याचे सांगण्यात येते. म्हणून ‌‘कानडावो विठ्ठलु, कर्नाटकु’ असे म्हटले जाते. शेकडो वर्षांची ही विठ्ठलभक्तीची परंपरा ‌‘वारी''च्या रूपानं ज्या प्रांताने अक्षय ठेवल्याचे दिसते, तो प्रांत म्हणजे महाराष्ट्र.

श्री विठ्ठलाच्या अधिष्ठानामुळे आज पंढरपूरची ओळख भक्तीपंथाचं आद्यपीठ म्हणून दृढ झालेली आहे. इथले विठ्ठलाचे मंदिर पूर्वीच्या काळी लहानच होते. पुढे रामचंद्र देवराय यादव आणि हेमाद्री पंडित यांनी मंदिराचा विस्तार केला. पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये या दोन्ही यात्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेकडो वर्षे झाली तरी आषाढी आणि कार्तिकी वारीची परंपरा अखंड आहे. ती बदलत्या काळानुसार बदलतही आहे.

जगभरात पोहोचली वारी

वारीसाठी आळंदीहून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांची आणि देहूतून तुकोबारायांची अशा पादुकांच्या पालख्या पंढरीला येतात. वेगवेगळ्या भागांतून, वेगवेगळ्या संतांच्याही दिंड्या वर्षानुवर्षे, आपली परंपरा आणि दिनक्रम सांभाळून यामध्ये सहभागी होतात. पंढरीची वारी महाराष्ट्राच्या जडण-घडणीमधली जगभरात अभिमानानं सांगितली जावी, अशी वैशिष्ट्यपूर्ण प्रथा आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून लक्षावधी स्त्री-पुरुष वारकरी प्रचंड गर्दी, सेवा-सुविधांचा अभाव, कोसळणारा पाऊस या कशाचीही तमा न बाळगता येतात.

विठ्ठलमूर्तीच्या क्षणभराच्या दर्शनाची आस लागलेल्या या वारकऱ्यांकडे पाहिले की, महाराष्ट्राच्या संतपरंपरेच्या अस्तित्वाची साक्ष पटू लागते. अशी विठ्ठलदर्शनाची प्रचंड आस लागलेली माणसं पाहिली की, निर्मळतेच्या झऱ्यांचा वेगळा शोध घेण्याची गरजच पडत नाही. अठरापगड जाती-धर्मातले लोक कोणताही भेदभाव न करता परस्परांच्या गळाभेटी घेत घेत हरीनामामध्ये रंगलेले असतात. आपल्या महाराष्ट्राची ही वेगळ्याच प्रकारची श्रीमंती आहे. कुणाच्याही निमंत्रणाशिवाय स्वयंस्फूर्तीने शेकडो वर्षे सुरू असलेला वारी हा जागतिक पातळीवरील एकमेव ‌‘इव्हेंट’ असावा.

ज्ञानेश्वर महाराजांनी लावलेले हे भागवत धर्माचे रोपटे आता वटवृक्षात रुपांतरीत झाल्याचे आपल्याला वारीच्या निमित्तानं प्रत्ययाला येते. सहिष्णुता, मानवता, उदारता, समानता, सहयोग आणि या साऱ्याला लाभलेले भक्तीचे अधिष्ठान ही मूल्ये या पंढरीच्या वारीने समाजात पेरली. जात-पात-पंथ-भेद विसरून या मूल्यांच्या रुजवणुकीसाठी विचारांचे खतपाणी घातले. अभंग, कीर्तन आणि नर्तनातही दंग झालेल्या लक्षावधी वारकऱ्यांच्या दिंड्या हे वारीचे लोभसवाणे चित्र केवळ महाराष्ट्रातच दिसते. चुकीच्या रुढी-परंपरांवर प्रहार करणाऱ्या संतविचारांचा जागर करत, सामाजिक समतेचा संदेश प्रत्यक्षात आणणारी आणि प्रपंचात राहूनही परमार्थ साधता येतो, या मूलभूत विचारांचा प्रत्यय देणारी ही ‌वारी म्हणूनच आपल्या सगळ्यांचे विचारविश्व आणि जीवनविश्व व्यापून राहते.

कालसुसंगत परिवर्तन

शेकडो वर्षांची वारीची ही प्रथा कालसुसंगतपणे बदललेली दिसते. वारी आता आधुनिक युगात तंत्र-विज्ञानस्नेही बनू लागली आहे. तिची एक स्वतंत्र व्यवस्थापनयंत्रणा विकसित झाली असून, दिंडी प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली तिचे व्यवस्थापन राबवले जाते. वारीमध्ये केवळ ग्रामीण भागातल्या स्त्री पुरुषांचा आता सहभाग राहिलेला नसून, तरुण पिढीतली मंडळीही आवर्जून सहभागी होताना दिसतात. माहिती-तंत्रज्ञानाच्या (आयटी) क्षेत्रात काम करणारे उच्चशिक्षित, आधुनिक तंत्रस्नेही युवक-युवतींनाही वारीचे आकर्षण आहे.

वाहन सुविधेबरोबरच मोबाईलच्या उपलब्धतेमुळे एका हातात टाळचिपळ्या घेतलेले वारकरी स्त्री-पुरुष दुसऱ्या हातातील मोबाईलवरून गावाकडच्या मंडळींशी संपर्क साधताना दिसतात. सरकारबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, तरुण मंडळे वारीमध्ये सहभागी वारकऱ्यांसाठी निवास आणि भोजन सुविधेबरोबरच आरोग्यसुविधाही पुरवतात. रक्तदान, नेत्र व आरोग्य तपासणीसारखे उपक्रम राबवतात. मोफत चष्मे दिले जातात. काही ठिकाणी अध्यात्मविषयक पुस्तकांचं वितरण केले जाते. पर्यावरणस्नेही मंडळी वारकऱ्यांना भेटून त्यांच्या वारीच्या वाटेवर जागोजागी टाकण्यासाठी वेगवेगळ्या झाडांच्या बियांची पाकिटे देतात. दुसरीकडं देहू-आळंदी ही तीर्थक्षेत्रे ‘ज्ञानतीर्थक्षेत्रे'' व्हावीत अशी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांची इच्छा आहे, त्यादृष्टीने त्यांनी आळंदी येथे काही उपक्रमही राबवले आहेत.

भारतातच नव्हे तर आता जर्मनी, रशिया, अमेरिकेतील अभ्यासकांनाही या वारीची भुरळ पडली आहे. ज्ञानेश्वरी, हरिपाठ, तुकाराम गाथेसह संतसाहित्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक परदेशी अभ्यासक भारतात येत आहेत. गरज आहे ती आपणच ‘ग्लोबल'' होत चाललेल्या वारीचे महत्त्व ओळखण्याची, ते जपण्याची!

(लेखक ‘जडण-घडण’ मासिकाचे संपादक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT