एका ऐतिहासिक लग्नसोहळ्यातून आम्ही (एकदाचे) मोकळे झालो आहो. पत्रिका पाहण्यापासून मांडवपरतणीपर्यंत चार-सहा महिने हा सोहळा रंगला होता. त्या सोहळ्यात एकसोचालीस करोड वऱ्हाडी सामील झाले होते. अनेकांनी घरातूनच अक्षता टाकल्या. कुणी सोशल मीडियावर (अ)मंगलाष्टके म्हटली. कुणी टीव्हीवरल्या बातम्यांमध्ये लग्नविधी पाहून घेतला. सोहळा आटोपल्यानंतर आम्ही सोफ्यावर बुंदीचा लाडू खात पहुडलो होतो. तेवढ्यात डोळा लागला...
स्थळ : दिवाणखाना ऊर्फ सैपाकघराला लागून असलेली एकमेव खोली. वेळ : दुपारी चहाची. प्रसंग : ‘पाहण्याचा’ कार्यक्रम उरकला असून पसंतीनंतर ‘याद्या’ करण्याचा कार्यक्रम सुरु आहे.
‘‘मी सांगतो, पैठण्या थेट येवल्यात जाऊन घेऊ. सुदामशेठची आपली ओळख आहे,’’ कुठल्या तरी (नगद)नारायणाने मंगलकार्याचा ताबा घेतला.
‘‘सुरतला बरी व्हरायटी मिळते नं? त्यापेक्षा कोच्ची किंवा चेन्नईला जावं. किती दिवस मला अरजकची साडी नेसायची होती,’’ कुणीतरी आत्त्याबाई मुरकल्या.
‘‘इश्श! ती कसली साडी? सवा लाखाची तर आहे, मी जयपूरहून खास सत्तावीस लाखाची मागवणार आहे,’’ विहिणीनं जोडा काढला.
‘‘वरमाईला किमान साडेतीन किलो सोनं घालावं लागेल. शिवाय आमच्या वऱ्हाड्यांना दहा-दहा तोळ्याचं नाणं पत्रिकेसोबत...,’’ थोरले काका गंभीरपणाने म्हणाले.
‘‘साडेतीन किलोनं काय होतंय, चार महिने चालणार सोहळा. तेच तेच दागिने का मिरवायचेत? लोक हसतील!! बारा किलो लिहून ठेवा म्हंटे मी,’’ मावळणीनं निकराने किल्ला लढवला.
‘‘शिवाय आमच्या शामूसाठी तोडे करायचेत! त्याला किमान पाच किलो सोनं लागेल!’’ वरपित्याने आठवण केली.
‘‘शामूशेठला इतकं वजन झेपणार का? ते अवघे साडेतीन वर्षांचे आहेत ना!,’’ वाग्दत्त वधूचा पिता आवंढा गिळत्साता म्हणाला.
‘‘शामू लहान असला तरी रेडा आहे, आमच्या अहमदाबादच्या गोठ्यात असतो,’’ निर्विकार चेहऱ्याने वरपित्याने माहिती पुरवली. वधूपित्याने पुन्हा एक आवंढा गिळला.
‘‘हिऱ्यांचं काय?’’ नगदनारायणानं यादीकडे बघून आठवण केली.
‘‘ह्या, कंडम माणूस...त्यांना बोलावूच नका!,’’ कुणीतरी बेसावधपणे म्हटले.
‘‘डायमंड म्हणतोय मी...बेल्जियमला एक कंपनी आहे, बरीच विश्वासू आहेत ती मंडळी म्हणे! सातेक हजार कोटीत काम होईल!’’ नगदनारायणाने आतली माहिती पुरवली.
‘‘मी म्हणत्ये कशाला उगाच हिंपुटी व्हायचं! ती कंपनीच का नाही विकत घेऊन टाकत?’’ वरमाईने पदर सावरत नवीच आयडिया सुचवली. ती ग्रेटच होती. वरपित्याने मनातल्या मनात आकडेमोड करत ‘जमून जाईल’ अशा अर्थाची मान हलवली. बेल्जियमची डायमंड कंपनी विकत घेणे, अशी नोंद नगदनारायणाने यादीत केली.
‘‘चाळीस विमानं, एकशेतेरा हेलिकॉप्टरं, बारा हजार मर्सिडिझ आणि बीएमडब्ल्यू...ही मिनिमम रिक्वायरमेंट आहे! आता बोला!!,’’ थोरल्या काकांनी निमंत्रणाच्या यादीकडे नजर टाकत हिशेब केला.
‘‘नवरदेवासाठी तीन रोल्स रॉइस सांगून ठेवा!’’ कुणीतरी सुचवले.
‘‘रोल्स रॉइसची चिंता नाही. घरी पाच पडून आहेत...,’’ धाकल्या भावाने सांगून टाकले. त्याची टेसला आहे. वधूपित्याने खळखळ करत बावीस विमानं आणि त्रेपन्न हेलिकॉप्टरवर भागवा, अशी विनंती केली. व्याहीमंडळींची मने नाही म्हटले तरी खट्टू झाली. घरातले मंगलकार्य, त्यात झाला थोडा खर्च तर काय बिघडतं? पण वधूपित्याचे मन कणखर होते. तो बधला नाही.
‘‘शहरातली सर्व पंचतारांकित हॉटेलं बुक करा, जे हॉटेल बुकिंगला नकार देत असेल, ते विकत घेऊन टाका,’’ असा फायनल निर्णय देऊन वरपिता उठला. बैठक संपली. इथून पुढे चार महिने लग्नाची धामधूम सुरु होती. ती धामधूम नुसती बघून आम्हाला जाम थकवा आला. म्हणून म्हटले, लग्न पहावं करुन नव्हे, लग्न पहावं दुरुन...असो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.