-ओंजळ
डॉ. शेफाली भुजबळ
भारतीय संस्कृतीचा, संस्कारांचा अभ्यास करताना जीवनातले असंख्य बारकावे शिकायला मिळतात. या अभ्यासातून लक्षात येते की, आपण या सगळ्यांपासून अजूनही खूप दूर आहोत. संस्कृती सातत्याने जीवनोपयोगी विचार, आचार, उच्चार देत असते. ते आपल्या कृतीत आणण्याचा प्रयत्न केला तर वाटचाल यशाच्या दिशेने होते. त्यासाठी जे चांगले ते कृतीत उतरवणे, हा सर्वोत्तम उपाय आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकाच कुटुंबात कितीतरी व्यक्ती गुण्यागोविंदाने राहात असत. आता ती संख्या रोडावत ‘हम दो हमारा एक’वर पोहोचली आहे. त्यामुळे जीवन शिक्षणाचा मोठा भाग आपण गमावत आहोत. माणसांचा अभ्यास, त्यांच्या स्वभाव-विभावांची चिकित्सा करीत पुढे जाणे हे मागे पडत आहे. एकाच कुटुंबातल्या व्यक्ती जरी रक्ताच्या नात्याने एकमेकांशी बांधलेल्या असल्या तरी त्या एकाच स्वभावाच्या नसतात. परस्परभिन्न विचारांची, कृतीची माणसे या व्यवस्थेत एकत्र राहातात; किंबहुना आजही तसे राहिले पाहिजे. याचे कारण काय तर ही पद्धती आपल्याला लवचिक बनवते. कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही स्वभावाच्या व्यक्तीशी आपले वर्तन कसे असावे, याचा वस्तुपाठ कुटुंबातूनच मिळतो. त्यामुळे वैचारिक साम्य नसले तरी समोरच्याचा मतांचा आदर कसा करावा, प्रसंगी त्याचा हात हातात घेऊन मार्गक्रमण कसे करावे, हेही यातून कळते.
जी गोष्ट कुटुंबात आपण शिकतो त्याप्रमाणेच माणसाचा पिंड तयार होत जातो. मग ज्यावेळी शिक्षण, नोकरी या निमित्ताने समाजात पाऊल ठेवावे लागते त्यावेळी त्याच्या व्यक्तिमत्त्वाची असंख्य किरणे इतरांवर पडतात आणि इतरांचीही त्याच्यावर पडत असतात. जी गोष्ट कुटुंबाची तीच गोष्ट नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणची आहे. नोकरीतही वेगवेगळ्या समाज घटकातून माणसे एकत्र येतात. ठरवून दिलेले विशिष्ट काम एकमेकांच्या सहाय्याने पुढे नेतात. याला आता आपण ‘वर्ककल्चर’ म्हणतो. जो माणूस एकांडा, एककल्ली असतो तो अशा ‘वर्ककल्चर’मध्ये फारसा रमत नाही. त्याचे कुणाशी ना कुणाशी खटके उडतात. त्यामुळे इतरांना त्रास होतोच; पण त्यालाही कैकपटीने त्रास होतो. म्हणून बालपणापासूनच ‘स्व’ची घडण करताना सर्वांचे ऐकून घेत स्वतःचे शुद्ध मत तयार करणे, ते परस्परांच्या विचारांचा आदर करत ऐकवणे आणि त्यातून यशाला गवसणी घातली पाहिजे.
माणसाला त्याच्या समाजशील असण्याची जाणीव अगदी प्रारंभापासून करून दिली जाते; पण त्यातील बरकावे त्याला सांगितले जातात का, जोपर्यंत त्याचे मन चिखलाच्या गोळ्याप्रमाणे आकार देण्यासाठी अनुकूल आहे तेव्हाच हे सारे तपशील हळूहळू त्याला सांगावेत. कळत्या-नकळत्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जर त्याच्यावर हे बिंबवले तर मूल आदर्शांच्या दिशेने वाटचाल करेल. किंबहुना प्रत्येक निर्णय घेताना तो कुटुंब, समाज यांची चौकट डोळ्यापुढे ठेवून वाटचाल करेल. जी व्यक्तिमत्वं अशा चौकटींचा विचार करत पुढे जातात तीच त्या चौकटी मोठ्या करत असतात. आपण आपल्यासारखे जगावे, इतरांचा विचार करून जो जगतो त्याला मनाप्रमाणे जगता येत नाही; असेही आपण अनेकांकडून ऐकतो. स्वातंत्र्य-समता आणि बंधुता या संकल्पनेत हे येते का? तर याचे उत्तर नाही, असे आहे. कारण स्वातंत्र्य हा शब्द बंधुता आणि समता यांच्या अनुषंगाने आपल्याकडे सांगितला आहे; किंबहुना ही शब्दत्रयी हाच जीवनाचा मूलभूत आधार आहे. त्यामुळे मी-माझे ही स्वार्थीपणाची कडेलोट करणारी भावना असू नये. बंधुतेच्या आणि समतेच्या अंगाने ‘स्वातंत्र्या’चा विचार व्हावा. ‘बंधुते’चा विचार स्वातंत्र्य आणि समता या शब्दांबरोबर व्हावा आणि ‘समता’देखील स्वातंत्र्य व बंधुता यांच्या नात्यातून प्रकट व्हावी. असे केल्याने द्वेष, अविचार, अविवेक निर्माण होत नाही. आपल्या संतांनी हाच विचार आयुष्यभर सांगितला. संत तुकोबाराय म्हणतात-
‘कोणाही जीवाचा न घडो मत्सर
वर्म सर्वेश्वर पूजनाचे...’
हे आचरणात आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आणि सर्वकाळ आहे. एकदा वाचून, एकदा बोलून, एकदा सांगून हे काम होणार नाही. या कामात सातत्य गरजेचे आहे. एखाद्या गोष्टीतील सातत्य हेच त्या क्षेत्रातील यशाचे गमक असते. ते कोणीतरी करेल, मग आपण करू असे विसंबून राहिल्यास आपले आयुष्य आपल्या हातातून निसटून जाईल आणि ते परवडणारेही नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.