पंधरा दिवसांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी, भांडारकर रोडवरून फिरायला चाललो होतो. अंधारून आलेलं. एका बियर बारशेजारच्या कट्ट्यावर मिहिर दिसला. वय १८-१९. इंजिनियरिंगचा विद्यार्थी. मला पाहताच चेहरा लपवण्याचा त्याचा प्रयत्न माझ्या लक्षात आला. मीही लक्ष नसल्यासारखं दाखवलं. घरी पोहोचलो तरी त्याचा घाबरलेला आणि भकास चेहरा समोर येत राहिला. काही महिन्यांपूर्वी त्याची आई भेटून गेली होती. मिहिरविषयी बऱ्याच गोष्टी सांगत होती. त्याची काळजी वाटत होती. सतत घराबाहेर राहाणं, घरात चिडचिड करणं, उलट उत्तर देणं, सतत टीव्ही पाहात राहाणं, रात्री उशिरापर्यंत मोबाईल आणि इंटरनेटवर खेळत राहाणं, या आणि अशाच अनेक तक्रारी सांगत होती. मी म्हटलं कदाचित वयाचा दोष असेल. या वयात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल मुलांमध्ये घडत असतात. growing pains. काही काळ लक्ष ठेवा. आत्ताच घाबरून जाण्यात अर्थ नाही.
पण आज काहीतरी बिघडल्याचं जाणवलं. मी मिहिरच्या घरी फोन केला. चौकशी केली. आई म्हणाली, ‘‘सर, काय सांगू? रोज उशिरा येतोय, अजिबात अभ्यास करत नाहीये. अभ्यास होतच नाही म्हणतो. परीक्षेत नापासच होईल बहुदा. काही विचारलं की संतापतो. जेवणा-खाण्यात लक्ष नाही. काय करू मी? तुम्हाला माझी परिस्थिती माहितीय. गेल्या वर्षी मेरीटमध्ये आलेला हा मुलगा. नियमित अभ्यास करणारा. काय झालं हे अचानक?’’ दुसऱ्या दिवशी भांडारकर रोडवर मुद्दामच मिहिरला गाठलं. म्हटलं, चल जरा गप्पा मारू. थोडासा वेळ देशील माझ्यासाठी? त्याला हे अनपेक्षित होतं; पण त्यालाही थोडसं मोकळं व्हायचं असावं. आला बरोबर. बीएमसीच्या ग्राऊंडवर दोघांत अंतर ठेवून बसलो. त्याला म्हटलं, ‘‘तुझ्या आईनं कुठलीही तक्रार केली नाहीय. मलाच काल तुझी अस्वस्थता जाणवली. मदत कराविशी वाटली. आणि इथं बोलायला छान वाटेल. हो की नाही? सांग बरं कसं चाललंय तुझं? अभ्यास... परीक्षा!’’ त्यानं हुंदके द्यायला सुरुवात केली. म्हणाला, ‘‘खूप अस्वस्थ वाटतं हल्ली. अभ्यासात लक्ष लागत नाही. एकाग्रताच होत नाही. अभ्यासाला बसलं की दुसरेच विचार मनात येतात. आपल्या हातून काहीच घडणार नाही... आपण अपयशीच राहाणार, असे सारखे विचार येत राहातात मनात. झोप येत नाही. आयुष्यात अर्थ नाही, असं वाटतं. मरून जावंसं वाटतं. सारखे लैंगिक विचार, घाणेरडे विचारसुद्धा मनात येत राहातात. मित्रांच्या नादानं कधी कधी बियर, सिगारेट पिण्याची सवय लागलीय. खरं तर मला हे आवडत नाहीय; पण शांतच वाटत नाही. बाबा नाहीत. आई एकटी सगळा गाडा ओढतेय. मी नापास झालो तर तिला काय वाटेल? मित्र-मैत्रिणी हसतील. करियर कसं होईल. कलंक ठरेन. डाग लागेल कायमचा.’’ माझ्या लक्षात आलं ही लक्षणं नैराश्याच्या आजाराची आहेत.
मिहिरला यातून बाहेर काढायलाच हवं. त्याला म्हटलं, ‘‘मिहिर तुला किती त्रास होत असेल मी समजू शकतो, पण आयुष्याचा शेवट करण्याचा विचार करणं किंवा व्यसनांच्या आहारी जाणं हा मार्ग असू शकत नाही. त्यापेक्षा समस्येच्या मुळापर्यंत जाणं आणि तिचं निराकरण करणं शक्य आहे. तुझी समस्या एकाग्रतेची आहेच, त्याचबरोबर एकूणच आयुष्यात आपल्याला नेमकं काय मिळालं तर आपण सुखी होऊ याच्या उत्तराची आहे. दृष्टिकोन बदलाची आहे. मिहिर तू यातून निश्चित बाहेर येशील. मी तुला मदत करीन. भले या वर्षी तुला मार्क्स कमी पडतील, विषय राहतील किंवा अगदी नापास होशील. पण हळूहळू पायरी पायरीने एकाग्रता व्हायला लागेल. आपली एकाग्रता कशामुळे गेलीय, ती कशी मिळवायची, आयुष्यात काय महत्त्वाचं आहे, हे सगळं तुझ्या लक्षात येईल. अंतिमत: तुझं ध्येय तू गाठशील. आयुष्यात आनंदी होशील आणि इतरांना आनंद देत राहशील. पण उद्यापासून काही गोष्टी करायच्या. आपण या परिस्थितीवर मात करू शकतो.’’ मिहिरचे डोळे चमकले. त्याला सांगितलं उद्यापासून आपण काही गोष्टी शिकणार आहोत. भावनांवर ताबा कसा मिळवायचा, आनंद कसा मिळवायचा आणि कसा टिकवायचा, परिस्थितीशी जुळवून कसं घ्यायचं व समस्येतून मार्ग कसा काढायचा, तणावाचा उगम/स्रोत कसा शोधायचा, सकारात्मक दृष्टिकोनाची जोपासना कशी करायची, आयुष्यातील प्राथमिकता कशी ठरवायची/ कशी बदलायची, योजनाबद्ध पद्धतीने, पायरी पायरीने विचार व कृती करण्याची सकारात्मक पद्धत शिकायची, अर्थात नकारात्मक पद्धत बदलायची. एकाग्रता साधण्यासाठीची तंत्रे शिकायची.
मिहिर म्हणाला, हे सगळं मला जमेल? म्हटलं का नाही? अनेकांना हे जमलंय. तणाव नियोजनाच्या विविध पद्धती (Eastern व Western) आपण शिकू या. प्रत्येक क्षणात, वर्तमानात, स्वस्थ कसं राहावं, तसेच तटस्थपणे स्वतःकडे व परिस्थितीकडे कसं पाहावं हे शिकू या. काही ध्यानाच्या पद्धती शिकू या, ज्या योगे चित्त शांत होईल. आणि याबरोबरच रोज भरपूर व्यायाम करू या. ज्याने चांगली संप्रेरक शरीरात स्त्रवतील. आपलं औदासिन्य कमी व्हायला मदत मिळेल. अभ्यासात एकाग्रता वाढायला लागेल. मिहिर प्रथमच हसला. म्हणाला, ‘‘सर, खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. उद्या भेटू या आपण. सुरू करू.’’ ‘‘आणि बियर?’’ मी विचारलं. ‘‘आजपासून संपलं सगळं सर. सगळं ठीक होणार असेल तर कशाला हवीय ती?’’ मी स्वस्थ झालो होतो, एक आयुष्य मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली होती.
परीक्षेच्या अतिरिक्त ताणामुळे, अपरिपक्व विचारसरणीमुळे, नैराश्यामुळे, फुलणाऱ्या कळ्या, उमलणारी व्यक्तिमत्त्व कोमेजून जातात. वेळेवर काळजी घेतली तर आपण असं घडणं टाळू शकतो. त्यांना पुन्हा एकदा सुंदर आयुष्य मिळायला मदत करू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.