yoga trainer prashant iyengar sakal
संपादकीय

योग संशोधनातील वटवृक्ष

प्रख्यात योगशिक्षक प्रशांत अय्यंगार गेली अनेक वर्षे योगशिक्षण आणि योगप्रसाराच्या कार्यात आहेत. त्यांची उद्या मंगळवार (ता. २ जुलै) रोजी पंचाहत्तरी आहे.

डॉ. दिलीप सातभाई, चार्टर्ड अकाउंटंट

प्रख्यात योगशिक्षक प्रशांत अय्यंगार गेली अनेक वर्षे योगशिक्षण आणि योगप्रसाराच्या कार्यात आहेत. त्यांची उद्या मंगळवार (ता. २ जुलै) रोजी पंचाहत्तरी आहे. त्यानिमित्त अय्यंगार यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेल्या साधकाने त्यांच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना.

सध्याच्या काळात योगविद्येच्या प्रशिक्षणाविषयी अधिकारवाणीने कोणी बोलू शकत असेल तर ते म्हणजे प्रशांत अय्यंगार. त्यांची केवळ देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘योगअभ्यासक’ ही ओळख निर्माण झाली आहे, ती त्यांच्या अथक संशोधनकार्यामुळे.

योगाचार्य बीकेएस अय्यंगार यांचे सुपुत्र असलेल्या प्रशांतगुरुजींनी त्यांचा वारसा समर्थपणे सांभाळला. सर्व योगासनांची शास्त्रीय माहिती व ज्ञान त्यांनी केवळ वाचले वा लहानपणापसून अनुभवलेच असे नाही, तर खुद्द वडिलांकडून त्याचा वसा घेतला असल्याने प्रत्यक्षात अनुभवून त्यात ते पारंगत झाले आहेत.

प्रशांत अय्यंगार यांनी विस्तृत लिखाण केले असून त्यांची ७५ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. केवळ प्रशिक्षक म्हणून नव्हे तर या विषयातील संशोधक म्हणूनही त्यांनी नाव कमावले आहे. त्यांच्या अस्खलित इंग्रजी संभाषणकलेवर, वाक्चातुर्यावर व पिंडी ते ब्रह्मांडीमध्ये असणाऱ्या विविध विषयांची सखोल माहिती सांगणाऱ्या सरांच्या विद्वत्तेवर सगळे श्रोते फिदा असतात व म्हणूनच शेकडो देशी-विदेशी विद्यार्थी त्यांच्या योगज्ञानाचा ‘युट्युब चॅनेल’वरूनही लाभ घेत आहेत. त्यांचे संस्कृत विषयावरील प्रावीण्य व भगवद्‍गीतेवरील अभ्यास स्पृहणीय आहे. पतंजली योगसूत्रांचा सखोल अभ्यास त्यांनी केला आहे.

त्यांच्या मते गीतेमध्ये मानवाने आपले जीवनाचे आचरण कसे असावे, याचे अलौकिक मार्गदर्शन केले आहे. त्यात योगाचा समावेश आहे. योगामुळे ते साध्य होण्यास मदत मिळते, असे त्यांचे सांगणे आहे. मानवाला योगामुळे जी शहाणीव येते, त्यामुळे त्याची निर्णयक्षमता अचूक होते. जीवनातील या चैतन्यदायी विद्येचा उफयोग केवळ व्यावसायिक कारणांसाठी केला जाणे, ही खेदाची गोष्ट आहे, असे ते म्हणतात.

ते नेहमी म्हणतात की, सर्वसामान्य व्यक्ती ब्रह्मांडामध्ये असणाऱ्या अब्जावधी आकाशगंगा, खर्बावधी तारे, अगणित ग्रह, अजूनही ज्ञात नसलेला डार्क मॅटर, या सर्वाना आपल्याभोवती फिरवणारी अज्ञात डार्क एनर्जी या सगळ्या गोष्टीविषयी कुतूहल दाखवितात, परंतु आपल्या पाठीच्या कण्यात स्थित असणाऱ्या ब्रह्मांडाबाबत म्हणजे दैवी ऊर्जा असणाऱ्या योगशक्तीबाबत ती दाखवत नाहीत.

याविषयी जाणून घेणे हे कल्याणकारी आहे, तरीही त्याविषयी अनभिज्ञ राहणे यात ज्ञानी माणसाचे अज्ञान दिसते, अशी खंत ते व्यक्त करतात. सध्या योगविद्येचे व्यापारीकरण झाल्याने फायद्याऐवजी प्रशिक्षणार्थीचे नुकसानच होईल, अशी त्यांना भीती वाटते, याचे कारण ज्ञानवंत योगशिक्षकच उत्तम योगविद्येचे प्रशिक्षण देऊ शकतो असे त्यांना वाटते.

भारतात योगविद्या शास्त्रीय पद्धतीने शिकविली जावी व ती ‘रोड शो’ सारखी असू नये, असे त्यांना वाटते आणि याबाबतीत केंद्र व राज्य सरकारने लक्ष घालावे, अशी प्रेमाची विनंती ते करतात. कोणतेही आसन करायचे म्हणून न करता त्यातून आपली ‘चित्तशुद्धी’ होताना शरीराला काय मिळते आहे हे जाणून घ्यायला हवे. याविषयी त्यांचा कटाक्ष असतो.

योगामुळे आपोआप शरीरावर चैतन्य निर्माण करणारा परिणाम होत असतो, तो बदल जाणण्यासाठी आत्मनिरीक्षण व्हायला हवे असे त्यांचे मत आहे. ज्याप्रमाणे आकाशात चाळीस हजार फूट उंचीवर विमान चालवताना वैमानिक खिडकीतून न पाहता ऑटो पायलट मोडद्वारे विमान चालवितो तद्वत योग्य आसानाचा वापर झाल्यास शरीरावर आपोआपच सकारात्मक परिणाम होऊन चैतन्य निर्माण होते, असे त्यांचे प्रतिपादन आहे.

‘योग’ घडतो म्हणजे नेमके काय होते ?

जेव्हा योगासनात पूर्णत्व येते त्यावेळी आपल्या शरीरात पाठीच्या कण्यात जी दैवी ऊर्जा आहे, तिला साद घातली जाते व त्याचा प्रतिसाद म्हणून शरीरातून काही तरी प्रवाहित झाले असे वाटते. तो थंडावा शरीराला, मनाला शांतता प्रदान करणारा असतो. डोळ्यातून किंचित पाणी येते, ते डोळ्यातील प्रेशर कमी झाल्याचे द्योतक असते व मन शांत होण्याची प्रक्रिया असते.

कानातून, नाकातून प्रवाहित होणारी ऊर्जा समजते व हळूवार प्रसन्नता वाढते. यालाच योग घडत आहे, असे म्हटले जाते. ही अवस्था मन आनंद व दुःख यांच्यापलीकडे म्हणजे समतोलावस्थेत नेते. असे योगज्ञान आत्मसात केल्यानंतर व्यक्तीच्या चित्तवृत्तीत सकारात्मक बदल होतात. अपप्रवृत्तींचा त्याग होतो व चांगल्या प्रवृत्तींकडे आपोआपच मन वळते.

योग म्हणजे चैतन्याची व्याप्ती; जी संपूर्णतः परमोच्च शांततेच्या अवस्थेत पोहोचण्यासाठी असलेला आध्यात्मिक मार्ग आहे. स्वास्थ्य हा त्याचा केवळ एक फायदा आहे. योगामुळे आचरणाची दिशा मिळते. शहाणीव रुजल्याने निर्णय चुकत नाहीत. योगसाधनेतून जीवनामृत मिळते, जे ज्ञान-विज्ञानस्वरूप व आत्मानंद स्वरूप असते. त्या सर्वांचे अवांतर फळ म्हणजे स्वास्थ्य- आरोग्य- बल- सामर्थ्य असते. हा दृष्टिकोन साधकांमध्ये रुजविण्यासाठी प्रशांतगुरुजी सतत प्रयत्नशील असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Cha.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT