aaditya mahajan 
सप्तरंग

नंदनवनातलं भावविश्‍व (आदित्य महाजन)

आदित्य महाजन mahajanadi333@gmail.com

काश्‍मीरबद्दल अनेक कलाकृती मोठ्या आणि छोट्या पडद्यावर आल्या असल्या, तरी "हक से' ही वेब सिरीज त्यातले आणखीही काही पदर उलगडून दाखवते. विशेषतः तिथल्या मुलींचं भावविश्‍व आणि नंदनवनातलं वास्तव या गोष्टी ही सिरीज वेगळ्या पद्धतीनं रेखाटते. काश्‍मिरी वातावरण उत्तमपणे दाखवणाऱ्या या सिरीजविषयी...

काश्‍मीर म्हणजे भारतीयांसाठी एकीकडं जिव्हाळ्याचा; पण तरीही अज्ञानाचाही विषय. छानछोकीचं आयुष्य जगणाऱ्या प्रत्येकाला नक्की त्या प्रांतात घडतंय काय, काय आहे तिथल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, काय आहे काश्‍मीरवासीयांचं दुःख हे सगळं बऱ्यापैकी सांगणारी आजच्या काळातली एक दमदार रचना म्हणजे "हक से' ही वेब सिरीज. टीव्हीवर दिसणाऱ्या काहीशा ओळखीच्या चेहऱ्यांना जेव्हा नीट पारखून, एका सुंदर आणि साजेशा साच्यात ठेवून, त्यांच्या अभिनयाची पातळी ओळखून दिग्दर्शक समोर आणतो, तेव्हा गोष्टीतलं प्रत्येक पात्र मनाच्या नकळत हळूहळू जवळ येतं. असंच काहीसं सुरवातीच्या पहिल्या दोन भागांमध्ये "टिपिकल' वाटणाऱ्या "हक से'बद्दल घडतं.

ही गोष्ट आहे मिर्झा कुटुंबाची. अनेक वर्षं वडील सियाचीनमध्ये लष्करात कामावर असताना, घरातली आई आणि तिच्या चार मुली काश्‍मीरमध्ये आपल्या छोट्याशा जगात खूप सारी लहान-मोठी स्वप्नं बाळगत जगत असतात. सर्वांत थोरली मेहेर (सुरवीन चावला) हिनं आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं असतं आणि ती नौशाद रिझवी (राजीव खंडेलवाल) नामक एका उत्तम; पण अति शिस्तबद्ध आणि माणूसघाण्या अशा स्पष्टवक्‍त्या डॉक्‍टरकडं आपली उमेदवारी करत असते. गोष्टीची तशी नायिका आहे दोन नंबरची बहीण जन्नत (पारुल गुलाटी). एक हाडाची पत्रकार, पुरोगामी विचारांची आणि स्वतःच्या परखड आणि चोख लेखणीनं नेहमीच चर्चेत असणारी तरुणी. तीन नंबरची बानो (आंचल शर्मा) ही आपल्या सगळ्यांचा मनात "काश्‍मिरी मुलगी' असं म्हटल्यावर जे चित्र उभं राहील तशी. संगीताची आवड आणि त्यातली तिची कला ही बानोची जमेची बाजू. नम्रता, लाजरेपणा आणि स्वतःत मग्न राहणं ही तिची खासियत. बानोच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध असते मिर्झा कुटुंबातली सगळ्यांत धाकटी अमाल, जिचं स्वप्न एकच असतं, ते म्हणजे सगळ्या जगानं तिला सुंदर म्हणावं आणि तिनं बॉलिवूडमध्ये अभिनय क्षेत्रात खूप मोठं नाव कमवावं. अति उर्मटपणा, स्व-कौतुक, दुसऱ्यांची इर्षा करणं आणि स्वतःच्या फायद्यासाठी कुठल्याही थराला जाणं, अशी अमालची वृत्ती. पतीच्या गैरहजेरीत आणि खूप सारी भीती असतानाही खूप संयमानं या सर्वांना सांभाळत असते त्यांची अम्मी राबियाह मिर्झा (रुखसर रहमान). या मुलींची मावशी फातिमा (सिमोन सिंह) हीसुद्धा या कुटुंबाचा भाग असते आणि याच फातिमाच्या काश्‍मीरच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सुरू असलेल्या प्रेमकहाणीनं गोष्टीला सुरवात होते.

पुढं या प्रकरणावरून लागलेली ठिणगी हळूहळू पसरते. जन्नतचे लेख काश्‍मीरच्या वातावरणात फारच खळबळ उडवत असतात. जन्नतच्या नेहमीच पाठी उभा राहणारा तिचा बालमित्र ताबिश, म्हणजेच जन्नतचा "आझी' (पवेल गुलाटी) याची मदत आणि प्रोत्साहन घेऊन जन्नत नवनवीन विषयात हात घालत असते. ताबिश जन्नतच्या प्रेमात असतो, फक्त जन्नतला ह्याची काहीही खबर नसते. दुसरीकडं मेहेर आणि डॉ. रिझवी कधी त्यांच्या वादांमधून एकमेकांच्या प्रेमात पडतात, हे त्यांनाच कळत नाही. डॉ. रिझवी एक घटस्फोटित असतो आणि त्याला आलिया ही एक पाच वर्षांची मुलगी पण असते. अतिशय गोंडस आलिया आणि ती आली की खुलून जाणारी मेहेर, असे या दोघींचे काही खूपच गोड प्रसंग आपल्याही गालांवर अलगद काश्‍मिरी लाली आणून जातात.

बऱ्यापैकी सुरळीत चालणारं मिर्झा परिवाराचं आयुष्य ताबिशच्या वाढदिवसाच्या पार्टीपासून बदलायला लागतं. बानोच्या संगीताला आणि आवाजाला प्रोत्साहन म्हणून ताबिश तिला त्याच्या पार्टीमध्ये सादरीकरण करायला सांगतो. बानो आणि तिचा बॅंड सादरीकरण करतानाचा व्हिडिओ ताबिश सोशल मीडियावर टाकून देतो. सकाळपर्यंत बानोचं गाणं आणि बॅंड वायरल होतो. लवकरच ताबिश बानोच्या बॅंडला घेऊन एक मोठा लाइव्ह प्रोग्रॅम आखतो आणि बानोला ऐकायला शेकडोंची गर्दी पैसे देऊन येते. मात्र, मूलतत्त्ववादी या सगळ्याला विरोध करतात आणि ते धमक्‍यांपाठोपाठ त्या कार्यक्रमात येऊन या मुलींवर हल्ला करतात.

जन्नत या सगळ्यावर तिच्या टोपणनावानं परत एक परखड लेख लिहिते. हा लेख गाजतो. जन्नतच्या लेखाची स्तुती अमलला बघवत नाही आणि ती सगळ्या जगासमोर त्या टोपणनावामागची व्यक्ती जन्नत आहे हे तिच्या रागात उघड करते. अशातच रघू थापर (करणवीर शर्मा) नामक एक प्रख्यात डॉक्‍युमेंटरी बनवणारा जन्नतच्या शोधात तिच्या घरी येतो- ज्याला बानोच्या बॅंडची गोष्ट डॉक्‍युमेंटरीतून सादर करायची असते. त्यांचं नातं अचानक जुळतं आणि ते प्रेमात पडतात. पुढं एका भीषण घटनेला मेहेर सामोरी जाते आणि हा प्रसंग सगळ्या बहिणींना एकत्र आणतो. या बहिणींच्या आयुष्यात घडणाऱ्या एकेक घडामोडी, बदलणारी नाती, काश्‍मीरमधलं वास्तव या सगळ्या गोष्टी दाखवत सिरीज पुढं सरकते.

ही सिरीज एकदा पाहायला सुरू केली, की पुढचा एपिसोड लगेच बघू इतकी ती खिळवून ठेवते; पण तिचा शेवट तितका दमदार नाही करता आला. शेवटचे दोन एपिसोड तुम्हाला गोष्टीत वेगळं असं काही सांगत नाहीत. कदाचित ते या सिरीजच्या पुढच्या सीझनच्या दृष्टीनं उत्सुकता वाढवण्यासाठी असेल. अभिनयाचा एक उत्तम आदर्श म्हणून या सिरीजकडं बघता येईल. यातली कुठलीही व्यक्तिरेखा काश्‍मिरी नाही असं आपल्याला वाटत नाही. पारुल गुलाटी आणि सुरवीन चावला यांचा अभिनय, त्यातलं नाजूक हसणं, बोलणं आणि आक्रोशही लाजवाब आहे. पवेल गुलाटीचा ताबिश आपल्याला आवडून जातो, तर डॉ. रिझवीच्या भूमिकेतला राजीव खंडेलवाल खूपच साजेसा. सिरीजमधल्या सगळ्या काश्‍मिरी मुली दाखवताना त्यांच्या वेशभूषेकडं खास लक्ष देण्यात आलं आहे. मुलींच्या गालावर काश्‍मिरी हवामानानं आलेला गुलाबीपणासुद्धा खूप नैसर्गिक वाटतो. सुंदर, टुमदार, फुलांच्या बागेत सजलेली, मुघल पद्धतीची घरं, त्यातल्या आलिशान खोल्या, काश्‍मिरी राहणीमानात आढळणाऱ्या गोष्टी आणि वस्तू या गोष्टीसुद्धा कॅमेऱ्याद्वारे खूप नेमक्‍या पद्धतीनं टिपण्यात आल्या आहेत. काश्‍मीर आणि तिथली पात्रं दाखवताना त्यात उर्दूमिश्रित हिंदीचा अतिशय प्रभावी वापर "हक से'मध्ये आहे. तुम्ही थोडे जरी उर्दूप्रेमी असाल, तर त्या भाषेच्या नाजूक जागांना खूप सहजपणे न्याय देण्यात आला आहे, हे तुम्हाला जाणवेल. उर्दूच्या प्रेमात नाही पडलात, तरी डॉ. रिझवी आणि मेहेरच्या खट्याळ; पण तरी गोड प्रेमकहाणीत नक्की अडकाल. तिथून वाचलात तर अगदी तीन-चार सीन्समध्ये आलेल्या आलियाच्या प्रेमात पडाल. एक धाडसी आणि वास्तवाच्या अगदी जवळून चालणारी ही सिरीज आपल्याच काश्‍मीरसाठी आवर्जून पाहावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

SMAT 2024-25: कॅप्टन श्रेयस अय्यर-ऋतुराज गायकवाड येणार आमने-सामने; मुंबई-महाराष्ट्र संघात आज लढत

सातारा जिल्ह्यातील नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटी; महायुतीच्या आमदारांसोबत उदयनराजेंनी घेतली फडणवीस, पवारांची भेट

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Latest Marathi News Updates : अंधेरी परिसरात इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT