‘चल ऊठ! पटपट... एक गंमत दाखवायची आहे तुला!’’ रिया अमेयचं पांघरूण ओढत म्हणाली.
‘चल ऊठ! पटपट... एक गंमत दाखवायची आहे तुला!’’ रिया अमेयचं पांघरूण ओढत म्हणाली.
‘अगं काय??? सकाळी सकाळी काय गं तुझं? आणि तू घरात कशी घुसली आमच्या? माणूस आहेस की मांजर?’’ अमेय परत पांघरूण ओढून बडबडत झोपतो.
‘तुझ्या घरात यायला काय लागतंय? काकूच म्हणाल्या ‘घोडा झोपलाय अजून, उठव त्याला.’ मग आले. चल आता...’’ रियानं परत अमेयचं पांघरूण ओढलं.
‘जा ना यार! झोपू दे शांत थंडीचं मला!’’
‘ऐक तर माझं, पटकन चल, नाहीतर तो निघून जाईल.’’
‘कोण तो?’’ अमेय झोपाळू आवाजात म्हणाला.
‘तू उठ आधी, असं नाही सांगणारे मी. खूप युनिक काहीतरी दाखवायचंय तुला.’’
रियानं अथक प्रयत्नांनी अखेर अमेयला उठवलं. ते दोघं स्वेटर आणि कानटोप्या घालून, हात चोळत घराबाहेर पडले.
‘करायचं काये नक्की? इतक्या थंडीत तू मला घराबाहेर काढलं आहेस ते!’’ अमेय कुरकुरत म्हणाला.
‘जरा धीर धरशील का?" रिया म्हणाली आणि ते चालत टेकडीच्या पायथ्यापाशी आले.
‘इथं काये?’’
‘शूऽऽऽऽ... शांत राहा जरा. ते बघ!’’ रियानं बोट दाखवलं. एक साठी पार केलेला, साध्या कपड्यांवर टिपिकल विणलेला स्वेटर आणि खांद्यावर मोठी झोळी घेतलेला एक माणूस तिथून निवांत चालत येत होता.
‘कोणे हा? आपण ह्याचा का पाठलाग करतोय? कोणी सिरिअल किलर वगैरे आहे का हा?’’
‘तू जरा गप्प राहा आणि फक्त चल मागे,’’ रिया अमेयला बजावते.
ते दोघं त्या माणसाच्या मागं साधारण १००-१५० फूट अंतरावर चालत असतात. तो माणूस त्या वाटेवरच्या दोन छोट्या वाळत चालेल्या झाडांना बाटलीतनं पाणी देतो, पुढं जाऊन काही रानटी कुत्र्यांना बिस्किटं टाकतो. कधी तो प्लॅस्टिकचा कचरा उचलायचा, तर कधी पक्षांसाठी धान्य शिंपडायचा. रिया आणि अमेय हे सर्व पाहत होते.
‘सांग ना, कोणे हा? आपण का आहोत ह्याचा मागे?’’ अमेयनं पुन्हा वैतागून विचारलं.
तेवढ्यात तो माणूस त्या टेकडीवरच्या मंदिरापाशी पोचतो, नमस्कार करतो आणि तिथंच बाहेरच्या एका जुन्या तुटलेल्या बाकापाशी येतो आणि त्यावरच्या एका बस्कराखाली ५० रुपयाची नोट ठेवून देतो. मग तसाच तो माणूस थोडं लांब जाऊन दुसऱ्या बाकावर बसतो.
‘इकडे ये!’’ रिया अमेयला बोलावते आणि लांबून येणाऱ्या एका मुलाकडे बोट करून बघायला सांगते. तो ७-८ वर्षाचा मुलगा गरीब घरातून आलाय हे लगेच त्याच्या पेहराव्यावरून कळतं. तो त्या मंदिरात येतो, देवाला फुलं वाहतो, पक्षांना छोट्या मुठीतून तांदूळ, दाणे शिंपडतो आणि मग अगदी रोजची सवय असल्याप्रमाणं त्या बस्कराखालून ५० रुपयांची नोट आनंदानं उचलतो. मग तसाच त्याच्या वाटेला निघून जातो. तिकडं तो म्हातारा माणूस लांब हे सगळं छानपैकी शांत बसून बघत असतो.
‘काये हे सगळं नक्की?’’ अमेय सर्व गोंधळून बघत असताना पुन्हा विचारतो.
रिया शांतपणे सांगते, ‘‘ह्या माणसाचा नातू काही वर्षांपूर्वी गेला. ते दोघं रोज इथं येत असत आणि असाच वेळ घालवत. तो गेल्यानंतर हा माणूस इथं येऊन बसे आणि ह्या मुलाला बघत असे. ह्या मुलाला देवाची पूजा करणे आणि पक्षांना खायला घालणे आवडते हे पाहून ह्या माणसाला त्याच्यात त्याचा नातू दिसायला लागला. एक दिवस तो मुलगा आत मंदिरात गेला असता ह्या माणसानं हळूच त्याच्यासाठी पैसे ठेवले आणि गुपचूप निघून गेला. त्या मुलाला ते देवानं त्याला चांगली कामं केली म्हणून दिलेलं बक्षीस वाटलं आणि आजपर्यंत हे सुरू आहे!’’
अमेयच्या चेहऱ्यावर हे सगळं ऐकताना एक खूप छान स्माईल येतं.
‘तू परवा म्हणत होतास ना, देव असतो... बघ इथं आहे देव अगदी देवळाबाहेरच. त्या माणसाच्या आपुलकीमध्ये, त्या लहान मुलाच्या निरागसतेमध्ये आणि त्यांनी स्वतःसाठी नकळत तयार केलेल्या ह्या इकोसिस्टिममध्ये!’’ रिया अमेयच्या डोळ्यात बघत म्हणते.
अमेयच्या चेहऱ्यावरची स्माईल अजून मोठी होते.
‘पण तुला ही सगळी स्टोरी कशी माहिती?’’
रिया हसते आणि त्या लांब बसलेल्या माणसाला हात करते. तो माणूस सुद्धा रियाला ओळखतो आणि हात दाखवतो.
‘देवळात येत जा, इतकं पण जग रुक्ष नाही झालं अजून तरी!’’ ती अमेयकडं न बघता म्हणते आणि टेकडी उतरायला लागते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.