महाराष्ट्राला सांस्कृतिक, सामाजिक संघर्षाची आणि त्याचबरोबर सामाजिक चळवळींची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, त्यामुळे ती परंपराही मोठी आहे.
महाराष्ट्राला सांस्कृतिक, सामाजिक संघर्षाची आणि त्याचबरोबर सामाजिक चळवळींची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, त्यामुळे ती परंपराही मोठी आहे. किंबहुना सांस्कृतिक चळवळींचं ‘संत परंपरा ’ हे मोठं अधिष्ठान मानलं जातं. महाराष्ट्रातील सामाजिक संघर्षाला वेगवेगळे कंगोरे आहेत. या सामाजिक संघर्ष आणि चळवळींचा इतिहास व्यापक असून, त्यामध्ये समाजाच्या समंजसपणाची बीजं रोवली गेली आहेत.
या सर्व परिस्थितीचा विस्तृत आणि समकालीन संदर्भांचा अचूक आढावा डॉ. सदानंद मोरे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकयात्रा’ या ग्रंथात घेतला गेला आहे. मुळात अत्यंत व्यापक अशा विषयांची संदर्भासहित केलेली मांडणी हे या ग्रंथाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. केवळ इतिहास न सांगता त्याचे समकालीन समाजावर झालेले परिणाम, त्या-त्या व्यक्तिमत्त्वांमधील संबंधांचे कंगोरे अत्यंत चांगल्या रीतीने उलगडून दाखविले गेले आहेत. त्यामुळे याला संदर्भग्रंथ म्हणणं जास्त उचित ठरेल.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन आधुनिक मूल्यांचा लोकशाही राज्यव्यवस्थेच्या गाभ्याशी थेट अनुबंध आहे. त्याचा अंकुर बाराव्या शतकापासून ऊर्जस्वल बनलेल्या संतांच्या चळवळींमधून धुमारलेला आहे. एरवी सहजासहजी आकलनाच्या कक्षेत न येणारं वास्तव ठळकपणे समाजासमोर आणण्यात या ग्रंथाचं विशेष वेगळेपण आहे. या ग्रंथात केवळ इतिहासाची जंत्री मांडलेली नाही.
त्या-त्या काळात त्या घटनांमागील सामाजिक कारण काय असू शकतं, याचा सर्वांगाने आढावा घेतला गेला आहे. संतपरंपरेबद्दल प्रा. मोरे यांनी आजवर विस्तृत स्वरूपात लिखाण केलं आहे. या ग्रंथात संतांच्या कालखंडाचा आढावा घेत समाजसुधारकांबद्दलही त्यांनी ताकदीने मांडणी केली आहे.
संतांचा मध्ययुगीन कालखंड आणि सुधारकांच्या आधुनिक कालखंडाचं साक्षेपी विवेचन आणि विश्लेषण, हे या ग्रंथाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. सुधारकांच्या कालखंडाचा आढावा घेताना सुधारकांच्या युगातील पर्वाची मांडणी तीन टप्प्यांत विस्तृतपणे करण्यात आली आहे. अगदी सुरुवातीच्या पर्वात महात्मा फुले-रानडेपर्व, दुसऱ्या अर्थात मध्यपर्वाला लोकमान्य टिळक-शिंदे-शाहूपर्व आणि तिसऱ्या म्हणजे अंतिम पर्वाला महात्मा गांधी-विठ्ठल रामजी शिंदे-डॉ. बाबासाहेब आंबेडकरपर्वाची समताधिष्ठित मांडणी या ग्रंथात केली आहे. समतेचा हा प्रवास त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यापर्यंत आणून सोडला आहे. डॉ. मोरे यांनी यादृष्टीने डॉ. दाभोळकरांच्या धर्मचिकित्सेचा दाखला दिला आहे.
डॉ. दाभोलकर ज्याला ‘धर्मचिकित्सा’ म्हणत होते, ती करण्याची दीर्घ परंपरा आपल्याकडे आहे. महाराष्ट्रात ही संतपरंपरा आहे. आधुनिक काळातील सुधारकांना धर्म हा सामाजिक व्यवहारांचा पाया असल्यामुळे समाजसुधारकांची सुरुवात धर्मसुधारणेपासून व्हायला पाहिजे हे समजलं होतं. त्यासाठी धर्मचिकित्सा करत धर्मातील दांभिकतेचे बुरखे त्या-त्या सामाजिक परिस्थितीत फाडले गेले. गोपाळ गणेश आगरकरांचा अपवाद वगळता अन्य सर्व सुधारक धर्मनिष्ठ होते, या सूत्रावर आधारित चिकित्सकपणे मांडणी केलेली आहे.
महाराष्ट्रातील काय किंवा कोणत्या प्रदेशातील काय, लोकयात्रेचा विचार करायचा झाल्यास, त्या-त्या प्रदेशातील धार्मिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थितींचा वेध घेऊन त्यांच्या आपापसांतील संबंधांची दखल घेणं क्रमप्राप्तच आहे. ही दखल या ग्रंथात घेतलेली आहे. महाराष्ट्रातील समाजाच्या स्थितिगतीमध्ये धर्मशास्त्राने घालून दिलेल्या नियमांचा वाटा समजल्याशिवाय समाजाचं पूर्ण आकलन होणार नाही.
महाराष्ट्राच्या लोकयात्रेची म्हणजेच मराठी लोकांची समतेच्या दिशेने कशी वाटचाल झाली, याचा इतिहास लिहिताना संदर्भपद म्हणून वारकरी संप्रदायाचा उपयोग करणं पद्धतिशास्त्रीय दृष्टिकोनातून उचित आणि उपयुक्त ठरतं. या संप्रदायाने आध्यात्मिक समतेचा पुरस्कार केला, या आधारावर सांप्रदायिक मर्यादांच्या पलीकडचा विस्तार या ग्रंथात केला आहे.
महाराष्ट्रातील इतिहास लेखनाबाबत डॉ. मोरे यांनी या ग्रंथात परखड मत मांडलं आहे. महाराष्ट्रातील इतिहास लेखन हासुद्धा महाराष्ट्राच्या लोकयात्रेचा एक भाग आहे. इतिहासकार हा स्वतः माणूसच असल्यामुळे मानवी व्यक्ती म्हणून त्याचे जे काही सामाजिक हितसंबंध असतील, त्याचा परिणाम इतिहास लेखनावर होत असल्याचं मत डॉ. मोरे यांनी या ग्रंथात मांडलं आहे. सामाजिक उत्थानाच्या इतिहासातील संत आणि सुधारक यांचे दोन वेगवेगळे कालखंड असले तरी, त्यांच्यात एक प्रकारचं सातत्य आहे. पहिल्याला पूर्ण नकार देऊन किंवा त्याचा पूर्ण त्याग करून दुसऱ्याचा उदय असं नसून, पहिल्यातील सत्त्वांश ग्रहण करून दुसरा अस्तित्वात आला आहे, ही मांडणी या ग्रंथातून अधोरेखित होते. त्यामुळे वर्तमानाच्या वस्तुनिष्ठ आकलनाबरोबर हा ग्रंथ भविष्यवेधीही आहे.
पुस्तकाचं नाव : महाराष्ट्राची लोकयात्रा
लेखक : डॉ. सदानंद मोरे
प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे (८८८८८४९०५०)
पृष्ठं : ७२४, मूल्य : १२९९ रुपये
www.sakalpublications.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.