Arab Attack sakal
सप्तरंग

अरबांच्या घोडदौडीला अटकाव

अवघ्या १२५ वर्षांत निम्मं जग जिंकून घेणाऱ्या अरब आक्रमकांना भारतातील पहिल्या विजयासाठी ७५ वर्षं कसं झगडावं लागलं हे आपण याआधीच्या लेखात पाहिलं.

- अभिजित जोग

अवघ्या १२५ वर्षांत निम्मं जग जिंकून घेणाऱ्या अरब आक्रमकांना भारतातील पहिल्या विजयासाठी ७५ वर्षं कसं झगडावं लागलं हे आपण याआधीच्या लेखात पाहिलं. मिळवलेल्या सिंधवरील विजयानंतर अरबांची भारतातील पुढील वाटचाल कशी झाली हे आता बघू.

‘चचनामा’मधील नोंदीनुसार, राजा दाहीरच्या दोन कन्या, सूर्यादेवी आणि परिमलदेवी - मोहम्मद बिन कासिमच्या हाती पडल्या. त्यानं खलिफाला भेट म्हणून त्यांची रवानगी दमास्कसला केली. ‘आम्हाला दमास्कसला पाठवण्याआधी मोहम्मद बिन कासिन यानं आमचा उपभोग घेतला,’ असं दोघींनी खलिफाला खोटंच सांगितलं. (आपल्या माता-पित्यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी त्यांनी हे असत्यकथन केलं होतं). यावर खलिपा संतापला.

मोहम्मद बिन कासिम याला लाकडी पेटाऱ्यात बंद करून दमास्कसला पाठवण्याचा हुकूम त्यानं दिला. मोहम्मद बिन कासिम यांचा गुदमरून प्रवासातच मृत्यू झाला. यानंतर दोन्ही राजकन्यांनी खलिफाला खरं काय ते सांगितलं. आपल्या हातून एका कार्यक्षम, विजयी सेनापतीचा विनाकारण मृत्यू झाला या टोचणीमुळे राग अनावर झालेल्या खलिफानं दोन्ही राजकन्यांना घोड्याच्या पायाला बांधून त्या मरेपर्यंत त्यांना दमास्कसच्या रस्त्यावरून फरफटत नेण्याची शिक्षा फर्मावली.

काही इतिहासकारांच्या मते, ही कथा कपोलकल्पित असून, त्यांच्या म्हणण्यानुसार, नवा खलिफा सुलेमान याचा अल् हजाजवर राग होता. त्याच्या जवळच्या मानल्या गेलेल्या सर्व सरदारांना त्यानं दूर केलं. यासाठीच त्यानं मोहम्मद बिन कासिमलाही परत बोलावलं व तुरुंगात टाकून, छळ करून ठार केलं.

अरबांनी भारतावर आक्रमण केलं होतं ते प्रेषितांच्या इच्छेनुसार संपूर्ण भारतावर इस्लामचा अंमल प्रस्थापित करण्यासाठी. त्यामुळे सिंधवरील विजयानंतर त्यांनी भारतात खोलवर मुसंडी मारून आपल्या राज्याचा विस्तार करण्याची योजना आखली.

मोहम्मद बिन कासिमला परत बोलावल्यानंतर खलिफानं इतर नव्या दमाचे सेनाधिकारी सिंधकडे रवाना केले. यापैकी जुनैद अल् रहमान या सेनाधिकाऱ्यानं राजपूताना, गुजरातमधील भडोच व पूर्वेकडे उज्जैनच्या दिशेनं आक्रमण सुरू केलं.

‘भारतातील छोटी राज्ये आपापसातील मतभेद व भांडणं यामुळे कधीच एकत्र येऊ शकली नाहीत आणि म्हणून त्यांचा नेहमीच परकीय आक्रमकांसमोर पराभव होत राहिला,’ असं आपल्याला इतिहासात शिकवलं जातं. मात्र, जुनैद अल् रहमानच्या मोहिमेचा इतिहास यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.

या वेळी मेवाडचा राजा बाप्पा रावल यानं गुर्जर प्रतिहार राजा नागभट्ट व राष्ट्रकूटांचा राजा जयसिंह वर्मन यांना एकत्र येऊन परकीय शत्रूविरुद्ध लढण्याचं आवाहन केलं. सिंध-राजपूताना सीमेवर या संयुक्त सैन्याची अरबांशी गाठ पडली. या लढाईत हिंदू सैन्यानं अरबांचा मोठा पराभव केला. ग्वाल्हेर इथं अकराव्या शतकात होऊन गेलेला राजा भोज याचा एक शिलालेख सापडला आहे. त्यात त्यानं ‘गुर्जर प्रतिहार राजवंशाचा संस्थापक नागभट्ट यानं सद्गुणांचा संहार करणाऱ्या म्लेंच्छांच्या शक्तिशाली सैन्याचा दारुण पराभव केला’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

बाप्पा रावलच्या शौर्याचा धसका घेतलेल्या अरबांनी सिंधपलीकडे पूर्वेच्या दिशेनं भारतात आपल्या राज्याचा विस्तार करण्याची स्वप्नं सोडून दिली. यानंतर बाप्पा रावलनं वायव्येकडे मोहिमा काढून सिंध, बलुचिस्तान, गझनी, कंदाहार, खुरासाण व पार इराणपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला व भारताच्या वायव्य सरहद्दीचं संरक्षण करण्यासाठी रावळपिंडी या शहराची स्थापना केली. राणा संग, महाराणा प्रताप यांसारखे मेवाडचे पराक्रमी राजे बाप्पा रावलचे वंशज होते.

मोहम्‍मद बिन कासिम, गझनी, घोरी या आक्रमकांचा इतिहास जपणाऱ्या आपल्या देशानं बाप्पा रावलचं नाव मात्र पुसूनच टाकलं. त्याच्या पराक्रमाच्या कथा आपण शाळेतील मुलांनाही सांगितल्या नाहीत अन् नाटक-चित्रपट-साहित्य आदी माध्यमांतून त्या जपूनही ठेवल्या नाहीत. शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणून ‘राजस्थान हेरिटेज कॉन्झर्व्हेशन अँड प्रमोशन ॲथॉरिटी’च्या वतीनं बाप्पा रावलचा १५ फुटी अश्वारूढ पुतळा उदयपूर इथं बसवण्यात आला ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं.

सिंधमधून अरब सैन्यानं दुसरी आघाडी उघडली ती उत्तरेच्या दिशेनं. उत्तर भारत पादाक्रांत करण्याचे अरबांचे मनसुबे उधळून लावले ते काश्मीरमधील कारकोटा वंशाचा सम्राट ललितादित्य मुक्तापीड यानं. कांग्रामध्ये त्यानं अरबांच्या सैन्याला धूळ चारली व पंजाबला इस्लामच्या आक्रमणापासून सुरक्षित ठेवलं. त्यानंतर त्यानं सिंधू नदीपलीकडे भरारी घेऊन दर्दीस्तान, बुखारा, बाल्ख यांसारखे मध्य आशियातील प्रदेश पादाक्रांत केले. या महापराक्रमी सम्राटाला तरी आपण इतिहासात काय स्थान दिलं? तर हे नावदेखील आपण विस्मृतीत ढकलून दिलं.

त्या वेळी अरबांच्या झंझावाती आक्रमणांसमोर जगातली मोठमोठी साम्राज्ये कोसळून पडत होती. मध्य आशियापासून स्पेनपर्यंत कुणीही त्यांच्यासमोर उभंही राहू शकत नव्हतं. अशा वेळी त्यांना धडा शिकवण्याचा पराक्रम ज्यांनी गाजवला, त्या भारतातील वीरांच्या कथा आपल्या मुलांना शिकवायचं सोडून भारताची ‘एक पराभूत देश’ ही ओळख निर्माण करण्यात आपण धन्यता मानली.

पश्चिमेला बाप्पा रावल व उत्तरेला ललितादित्य यांच्याकडून मार खाल्लेल्या इस्लामी आक्रमकांनी पश्चिमेच्या बाजूनं त्यानंतर तीनशे वर्षं भारताकडे डोळे वर करून बघितलं नाही.

सन ६३४ मध्येच पश्चिमेच्या दिशेनं भारतावर इस्लामी आक्रमणाची सुरुवात झाल्याचं आपण याआधी पाहिलं. त्यानंतर काही वर्षांतच वायव्येच्या दिशेनं आक्रमणाची दुसरी आघाडी उघडण्यात आली. सन ६५० मध्ये इराणवरील विजयानंतर अरब साम्राज्याच्या सीमा भारताच्या सीमेवरील काबूल व झाबूल या दोन हिंदू-राज्यांना येऊन मिळाल्या. सिंध प्रांतानजीकची ही दोन राज्ये भारताच्या वायव्य सीमेवरील शेवटची राज्ये होती. या राज्यांमध्ये सध्याच्या पाकिस्तानमधील बलुचिस्तान व वायव्य सरहद्द प्रांत, तसंच सध्याचा अफगाणिस्तान व इराणच्या काही प्रदेशाचा समावेश होता.

इतिहासात यांचा उल्लेख ‘हिंदू-शाही’ राज्ये असा केला जातो. अवघ्या आठ वर्षांत इराणमधील पर्शियन साम्राज्यावर संपूर्ण विजय मिळवल्यानंतर, सन ६५० मध्ये अरब साम्राज्याचा विस्तार सुरू ठेवण्यासाठी व विशेषतः हिंदू मूर्तिपूजकांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी अरब सैन्यानं काबूल व झाबूल यांच्याकडे आपली नजर वळवली; पण इराणवर झपाट्यानं विजय मिळवलेल्या सैन्याला या दोन छोट्या राज्यांशी तब्बल दोन शतकं झगडूनही विजय मिळवता आला नाही.

सन ६५० मध्ये बसराचा अरब प्रमुख अब्दुल्ला इब्न अमीर यानं अल् रबी इब्न झियाद याला हिंदू-राज्यातील सिस्तान या प्रांतावर चालून जाण्याची आज्ञा केली. रबीच्या सैन्याला सिस्तानमध्ये कडव्या प्रतिकाराला सामोरं जावं लागलं आणि सपशेल माघार घ्यावी लागली. इराणमध्ये लागोपाठ विजय मिळवणाऱ्या अरब सैन्याला मिळालेला हा मोठाच धक्का होता. सन ६५३ मध्ये अब्दुल्ला इब्न अमीर यानं अब्दुर रहमान याच्यावर सिस्तान व कबूल यांच्यावर ताबा मिळवण्याची जबाबदारी सोपवली.

अब्दुल रहमाननं काबूलकडून नियमित खंडणी कबूल करून घेतली; पण त्याची पाठ फिरताच काबूलच्या राजानं खंडणी देण्यास नकार दिला. सन ६८३ मध्ये अरब सरदार यासिद इब्न झियाद काबूलवर चाल करून गेला. त्याच्या सैन्याचा हिंदू-शाही सैन्यानं दारुण पराभव केला व त्याला जीव गमवावा लागला. मात्र, अरबांची साम्राज्यवादी वृत्ती व धर्मवेड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. सन ६९२ मध्ये त्यांनी सिस्तानवर पुन्हा ताबा मिळवला व तिथला सरदार अब्दुल्ला याच्या नेतृत्वात काबूलवर परत चढाई केली. हिंदूंनी अरब सैन्याला थोडं पुढं येऊ दिलं व डोंगरांमधील अवघड खिंडीत नेमकं गाठले.

अब्दुल्लानं काबूलच्या राजाशी तह करून परत जायचं मान्य केलं; पण खलिफानं तह नाकारला आणि अल् हजाज जेव्हा इराकमधील अरब सैन्याचा प्रमुख झाला तेव्हा त्यानं सिस्तानमध्ये अरबांचा सरदार उबैदुल्लाच्या नेतृत्वात नवी मोहीम आखली. उबैदुल्लाचाही सणसणीत पराभव झाला आणि त्याच्या तीन मुलांना ओलीस ठेवून, ‘पुन्हा आक्रमण करणार नाही,’ अशी कबुली देऊन त्याला माघार घ्यावी लागली. सन ६३२ पासून चारही दिशांना विजयी आगेकूच करणाऱ्या अरबांना काबूल व झाबूल या छोट्याशा हिंदू-शाही राज्यांनी लागोपाठ पराभवाची चव चाखायला लावली.

यानंतर खलीफा सुलेमान (सन ७१५ ते ७१७), खलिफा अल् मन्सूर (सन ७४५ ते ७७५) यांच्या कारकीर्दीत आक्रमणं होत राहिली; पण हिंदू-राज्यांनी त्यांचा यशस्वी सामना करून आपलं स्वातंत्र्य सन ८७० पर्यंत अबाधित राखलं. यापुढं अरबांनी कबूल व झाबूल यांच्यावर परत आक्रमण केलं नाही. यानंतर त्यांना संघर्ष करावा लागला तो अफगाणिस्तानातून येणाऱ्या तुर्की आक्रमकांशी. अरबांना वारंवार पराभवाची चव चाखायला लावणारा हिंदू राजा रत्नपाल याची कीर्ती तेव्हा संपूर्ण मध्य आशियात पसरली होती.

इतिहासकार अल् मसूदी त्याच्या ‘मुरुज-उल्-जेहाब (The Meadows of Gold) या ग्रंथात रत्नपालबद्दल म्हणतो, ‘...सिंधू नदीच्या खोऱ्यातील राजपुत्र - ज्यानं पूर्व पर्शिया जिंकल्यानंतर टायग्रिस व युफ्रेटिसच्या किनाऱ्यावरील प्रदेशाकडे आगेकूच केली’ यावरून माघार घेणाऱ्या अरबांचा पाठलाग करत त्यानं पार इराकपर्यंत धाव घेतली होती असं दिसतं; पण या पराक्रमी वीराचं नाव आपल्या इतिहासात चुकूनही आढळत नाही. अशा रीतीनं ज्या अरबांच्या झंझावाती आक्रमणांसमोर बायझंटाइन व पर्शियन साम्राज्यांसारखी महाशक्तिशाली साम्राज्ये पाला-पाचोळ्यासारखी उडून गेली त्यांना काबूल व झाबूल या दोन लहानशा हिंदू-राज्यांवर दोनशे वर्षं झगडूनही विजय मिळवता आला नाही.

यानंतर सुमारे शंभर ते दीडशे वर्षं - मोहम्मद गझनीच्या आक्रमणापर्यंत - इस्लामी आक्रमकांनी भारताकडे बघितलं नाही. म्हणजेच सन ६३६ मध्ये केलेल्या ठाण्यावरील पहिल्या आक्रमणानंतर साडेतीनशे वर्षं उलटून गेली तरी भारताच्या सीमेवरील काही छोटे, किरकोळ प्रदेश सोडले तर इस्लामी आक्रमकांना भारतात सतत पराभवाचाच सामना करावा लागला; पण दुर्दैवानं या कठोर संघर्षाचा गौरवशाली इतिहास आपल्याला कुणी सांगितलाच नाही. आपल्याला सांगण्यात आली ती फक्त भारताच्या पराभवाची कहाणी!

(लेखक ब्रँडिंग-तज्ज्ञ असून, ‘असत्यमेवजयते?’ या इतिहासविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलं आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT