तराईच्या पहिल्या युद्धात झालेल्या मोठ्या पराभवाचा प्रतिशोध घेण्यासाठी महंमद घोरी एका वर्षाच्या आतच भारतात परत आला हे गेल्या वेळच्या लेखात आपण पाहिलं. इतिहासकार हसन निझामी सांगतो : ‘लाहोरला पोहोचल्यावर महंमद घोरीनं पृथ्वीराजला निरोप पाठवला, ‘बऱ्या बोलानं इस्लामचं श्रेष्ठत्व मान्य कर आणि मुस्लिम धर्माचा स्वीकार कर.’
पृथ्वीराज तोपर्यंत मोठं सैन्य घेऊन तराईच्या युद्धभूमीवर येऊन पोहोचला होता. त्यानं सुलतानाला उत्तर पाठवलं : ‘आमच्या सैन्याच्या शौर्याचा तू अनुभव घेतलाच आहेस. मुकाट्यानं आलास तसाच परत जा. आम्ही तुझं काहीही नुकसान करणार नाही; पण हे ऐकलं नाहीस तर संपूर्ण विनाशासाठी सिद्ध हो.’
मागच्या अनुभवानं शहाणा झालेल्या घोरीनं या वेळी एक कपटी डाव खेळायचं ठरवलं. पृथ्वीराजला त्यानं उत्तरादाखल कळवलं : ‘मी या मोहिमेवर माझ्या थोरल्या बंधूंच्या आज्ञेनं आलो आहे. माघार घ्यायची तर मला त्यांची परवानगी घ्यावी लागेल. त्यांचे पुढील आदेश येईपर्यंत आपण युद्ध स्थगित ठेवू या.’ या निरोपानंतर राजपूत सैन्यात थोडं शैथिल्य आलं. घोरीनं मात्र आपली तयारी व नियोजन सुरूच ठेवलं.
या प्रकारात सुमारे पंधरा दिवस घालवल्यानंतर एके दिवशी मध्यरात्री घोरीच्या काही तुकड्या राजपूत सैन्याच्या पिछाडीवर दबा धरून बसल्या. राजपूत सैन्य पहाटेच्या साखरझोपेत असताना त्यांनी अचानक हल्ला केला. पृथ्वीराजच्या सैन्याचं मोठं नुकसान झालं. अनेक हत्ती मारले गेले.
राजपूत सैन्य या धक्क्यातून सावरून सज्ज होण्याच्या आत घोरीचं सैन्य आपल्या मुख्य सैन्याला जाऊन मिळालं. आता लढाईला तोंड फुटलं. घोरीनं ताज्या दमाच्या तुकड्या राजपूत सैन्यावर सोडल्या. या वेळी घोरीनं आपली रणनीती पूर्णपणे बदलली. समोरासमोर युद्ध झाल्यास राजपूत सैन्य आपल्याला आटोपेनासं होतं हे ओळखून त्यानं दहा दहा हजार घोडेस्वारांच्या तुकड्या तयार केल्या.
या तुकड्यांनी राजपूत सैन्यावर चारही बाजूंनी हल्ले केले. दुपारपर्यंत या अनपेक्षित युद्धनीतीला तोंड देताना राजपूत सैन्य थकून व गोंधळून गेल्याचं पाहून घोरीनं १२००० कडव्या घोडेस्वारांची राखीव पलटण राजपूत सैन्यावर सोडली. आता मात्र राजपूतांची फक्त कत्तल सुरू झाली. एक लाख सैनिक कामी आले.
पृथ्वीराजचा भाऊ गोविंदराज मारला गेला. स्वतः पृथ्वीराज निसटून जाण्याचा प्रयत्न करत होता; पण घोरीच्या फौजेनं त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. एकेकाळी गुलाम असलेला कुतुबुद्दीन ऐबक हा या लढाईच्या वेळी घोरीच्या सैन्यात एका तुकडीचा प्रमुख होता. त्यानं गाजवलेल्या पराक्रमामुळे खूश होऊन घोरीनं त्याला ‘कुतुबुद्दीन’ (श्रद्धावानांचा तारा) ही पदवी दिली व त्याला सैन्याचा प्रमुख केलं. यानंतर पृथ्वीराजचा शिरच्छेद करून घोरीच्या सैन्यानं दिल्ली व अजमेर जिंकून घेतलं व चौहान-राजवटीचा शेवट केला.
कनौजचा राजा जयचंद्र पृथ्वीराजच्या मदतीला न येता त्याच्या पराभवाचा आनंद मानून आपल्या राज्यात बसून राहिला होता; पण हा आनंद फार काळ टिकला नाही. घोरीच्या सैन्यानं सन ११९४ मध्ये कनौजवर हल्ला केला. अत्यंत घनघोर युद्ध झालं.
जयचंद्र जिंकणार अशी लक्षणं दिसू लागली आणि हिंदू राजांच्या बाबतीत नेहमी घडणारी आणि आक्रमकांच्या पराभवाचं रूपांतर विजयात करणारी घटना घडली. हत्तीवर बसलेल्या जयचंद्रला अचानक एक बाण लागून तो खाली कोसळला आणि कनौजच्या सैन्याची पळापळ सुरू झाली.
प्रचंड मोठा खजिना तुर्कांच्या हाती पडला. हे स्पष्ट आहे की, पृथ्वीराज आणि जयचंद्र जर एकत्र लढले असते तर घोरीचा पराभव अटळ होता; पण इतिहासात आणि आयुष्यात ‘जर-तर’ ला काहीच स्थान नसतं हेच खरं.
पृथ्वीराजच्या राज्यातील शहरं आता तुर्की सैन्याच्या ताब्यात होती; पण ग्रामीण भाग मात्र धुमसतच होता. आपला लाडका राजा पृथ्वीराज याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अजमेरच्या आसपासच्या प्रदेशातील राजपूतांनी सन ११९५ मध्ये बंड केलं. त्यांनी गुजरातच्या चालुक्य राजाकडे मदत मागितली.
भारतावर घोंघावणाऱ्या या संकटाची कल्पना आलेली असल्यामुळे त्यांनीही लगेच मदत पाठवली. त्या वेळी अजमेरला तुर्की सैन्याचा प्रमुख कुतुबुद्दीन ऐबक हा होता. इतिहासकार हसन निजामी सांगतो : ‘राजपूतांनी दिवसभर कडवा संघर्ष केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अनहिलवाडचं मोठं सैन्य येऊन पोहोचले तेव्हा मुस्लिम सैन्याचं भरपूर नुकसान झालं. कुतुबुद्दीन ऐबकनं मदतीची विनंती केल्यावर जेव्हा मोठी कुमक आली तेव्हाच राजपूतांचं बंड त्याला मोडून काढता आलं.
चालुक्यांच्या या कृतीचा राग धरून कुतुबुद्दीन ऐबकनं सन ११९७ मध्ये गुजरातवर हल्ला चढवला. माऊंट अबूच्या पायथ्याशी - जिथं नायकीदेवीनं घोरीचा पराभव केला होता तिथंच - दोन सैन्यांची गाठ पडली. घोरीच्या पराभवाच्या आठवणींमुळे तुर्की सैन्याच्या मनात चांगलीच धाकधूक होती.
पुन्हा त्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चालुक्यांच्या सैन्यावर हल्ला चढवला. या वेळी मात्र हिंदूंचा पराभव झाला. सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्तानंतर युद्ध करायचं नाही, यासारख्या धर्मयुद्धाच्या कल्पना विधिनिषेधशून्य शत्रूशी लढताना, हिंदूंच्या गळ्यातील लोढण्यासारख्या होत्या असंच म्हणावं लागतं.
अशा रीतीनं दिल्ली-अजमेर, कनौज व अनहिलवाड (पाटण) ही उत्तर हिंदुस्थानातील तिन्ही प्रमुख राज्ये घोरीकडून पराभूत झाली. भारताच्या मुख्य भूमीत परकीय आक्रमकांनी मिळवलेले हे अत्यंत मोठे विजय होते.
अजमेर आणि गुजरातमध्ये विजय मिळवल्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक जेव्हा दिल्लीला परतला तेव्हा त्यानं इस्लामच्या विजयाप्रीत्यर्थ दिल्लीतील पहिली मशीद बांधायचं ठरवलं. पुढील पिढ्यांना इस्लामच्या वैभवाची आठवण करून देईल अशी भव्य-दिव्य मशीद असावी अशी त्याची योजना होती.
त्यानं दिल्लीतील २७ मंदिरं पाडली आणि भग्न मूर्तींच्या तुकड्यांचा वापर मशिदीच्या बांधकामात केला. अशा रीतीनं उभी राहिली, कुव्वत-अल्-इस्लाम (ग्लोरी ऑफ इस्लाम) ही मशीद. तिच्या शेजारीच त्यांनी इस्लामच्या विजयस्तंभाच्या - कुतुबमिनारच्या - बांधकामाची सुरुवात सन ११९९ मध्ये केली. हे बांधकाम त्याचा मुलगा अल्तमश याच्या राजवटीत सन १२२० मध्ये पूर्ण झालं.
दिल्लीतील विध्वंसाबद्दल इतिहासकार हसन निजामी त्याच्या ‘ताज-उल्-मासिर’ या ग्रंथात म्हणतो : ‘जेत्यानं शहरात प्रवेश केला आणि अवघ्या पंचक्रोशीला मूर्ती व मूर्तिपूजा यांच्यापासून मुक्ती मिळाली. एका देवाच्या भक्तांनी, मूर्तींसाठी उभारलेल्या देवळांच्या जागी मशिदी उभ्या केल्या.’
सन १२०६ मध्ये महंमद घोरीच्या मृत्यूनंतर कुतुबुद्दीन ऐबकनं दिल्लीत स्वतःची राजवट सुरू केली. ती ‘दिल्ली सल्तनत’ या नावानं ओळखली जाते. अशा रीतीनं आजवर भारताच्या वायव्य सीमेवरील काही प्रदेशांपुरती मर्यादित असलेली इस्लामी राजवट भारताच्या मध्यवर्ती भागात प्रस्थापित झाली.
याचा अर्थ, भारत इस्लामी अमलाखाली आणण्याची जी मोहीम अरबांनी सन ६३६ मध्ये सुरू केली होती, तिला खऱ्या अर्थानं पहिलं मोठं यश तुर्कांच्या आधिपत्याखाली सन १२०६ मध्ये, म्हणजे तब्बल ५७० वर्षांच्या संघर्षानंतर, मिळालं.
सन ६३२ मध्ये सुरू झालेल्या इस्लामी साम्राज्यवादाच्या वाटचालीत इतर देशांनी किती टिकाव धरला याची पुन्हा एकदा उजळणी करू या...सीरिया आणि पॅलेस्टाईन : आठ वर्षं, इराक : तीन वर्षं, इजिप्त : दोन वर्षं, इराण : आठ वर्षं, उत्तर आफ्रिका : एकसष्ट वर्षं, मध्य आशिया : शंभर वर्षं, स्पेन व पोर्तुगाल : पाच वर्षं...यांच्याशी तुलना केली की हिंदूंनी केलेल्या ५७० वर्षांच्या या कठोर संघर्षाची व प्रतिकाराची महती पटते.
हे खरंच आहे की, हिंदूंनी आणखी थोडी दूरदृष्टी दाखवली असती तर आणि कूटनीतीचा अवलंब केला असता तर आक्रमणकर्त्यांना भारतात यश मिळालंच नसतं; पण मोठमोठी साम्राज्ये इस्लामच्या आक्रमणासमोर पत्त्याच्या बंगल्यांसारखी कोसळत असताना केलेल्या ५७० वर्षांच्या अजोड संघर्षाचा देशानं अभिमान बाळगायला हवा होता.
त्यापासून प्रेरणा घेऊन, तेव्हा झालेल्या चुका टाळून अधिक आत्मविश्वासपूर्ण आणि शक्तिशाली देश म्हणून उभं राहायला हवं होतं; पण आपल्याला या इतिहासाची लाज बाळगायला शिकवलं गेलं. त्यातून स्वतःबद्दल कमीपणाची, न्यूनगंडाची भावना निर्माण केली गेली.
यापुढं तरी हा खरा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना शिकवला गेला पाहिजे. आक्रमकांची हिंसा, क्रौर्य, जुलूम, धर्मवेड यांच्यापुढे ठामपणे उभं राहून संघर्ष करणाऱ्या वीरांना आणि वीरांगनांना इतिहासात मानाचं स्थान दिलं गेलं पाहिजे. आजवरची दिशाभूल आता थांबलीच पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.