अरबस्तानातील बहुतेक भाग वाळवंटानं व्यापलेला आहे. रखरखीत वाळवंट, माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा बघणारं अत्यंत कठोर हवामान आणि अशा परिस्थितीत भटक्या टोळ्यांमध्ये विखुरलेले कडवे लढवय्ये लोक.
अरबस्तानातील बहुतेक भाग वाळवंटानं व्यापलेला आहे. रखरखीत वाळवंट, माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा बघणारं अत्यंत कठोर हवामान आणि अशा परिस्थितीत भटक्या टोळ्यांमध्ये विखुरलेले कडवे लढवय्ये लोक. राणी झेनोबियाचं अल्पकाळ टिकलेलं राज्य सोडलं तर या अरब लोकांनी कधी आपली राज्यं स्थापन केली नाहीत. झेनोबियाचं राज्य रोमनसम्राट ऑरेलियन यानं सन २७२ मध्ये संपवलं. त्यानंतर हे लोक टोळ्या करून वाळवंटात भटकत राहिले. कुठलीही शासनव्यवस्था नाही, कुणी अधिकारी नाही, संकटसमयी कुणाकडे मदत-दाद मागावी अशी व्यवस्था नाही...यामुळे आपल्या टोळीशी बांधिलकी आणि निष्ठा हाच अरब लोकांच्या जगण्याचा एकमेव आधार होता. जगण्याची साधनं मर्यादित असल्यामुळे त्यांच्यासाठी टोळ्यांमध्ये होणारे संघर्ष आणि हिंसा या बाबी नेहमीच्याच होत्या.
अरबस्तानातील बहुसंख्य लोक भटके टोळीवाले असले तरी काही एकाच ठिकाणी राहून व्यापारउदीम करणारे व स्थिर जीवन जगणारेही होते.
या व्यापारीकेंद्रांमधलं सगळ्यात महत्त्वाचं केंद्र होतं मक्का. मक्केमध्ये काबा या शिळेभोवती उभं असलेलं एक प्राचीन मंदिर होतं. ज्यू-ख्रिश्चन-इस्लाम या तिन्ही धर्मांचा प्रमुख प्रवर्तक अब्राहम यानं ते,मंदिर बांधलं अशी स्थानिकांची श्रद्धा होती. या मंदिराच्या परिसरात कुठलीही हिंसा करण्यावर प्रतिबंध होता. त्यामुळे व्यापाऱ्यांचे जथे इथं येऊन देवाण-घेवाणीचे व्यवहार करत असत.
या मंदिराचं व्यवस्थापन कुरैश या जमातीकडे होतं. हे लोक उत्तरेला सीरिया व दक्षिणेला येमेनकडे व्यापाऱ्यांचे गट घेऊन जात असत. व्यापार-उद्योगासाठी करावा लागणारा प्रवास, त्यातून निर्माण झालेलं हितसंबंधांचं आणि संपर्काचं जाळं या गोष्टींचा पुढं इस्लामच्या प्रचारासाठी खूप उपयोग झाला. कुरैश जमातीला मिळणारा मान व त्यांचं आर्थिक, राजकीय नेतृत्व आणि भटक्या टोळ्यांचं शौर्य आणि पराक्रम यांचा संगम इस्लामच्या प्रसारासाठी पुढं निघालेल्या मोहिमांमध्ये अतिशय महत्त्वाचा ठरला.
महंमद पैगंबर यांचा जन्म कुरैश जमातीत सन ५७० मध्ये झाला. सन ६०० मध्ये त्यांनी कडव्या एकेश्वरवादी इस्लाम धर्माचा प्रचार करायला सुरुवात केली. एकमेव सच्चा ईश्वर हा गॅब्रियल या देवदूतामार्फत त्याचा एकमेव सच्चा प्रेषित असलेले महंमद यांच्याकडे आपले संदेश पाठवतो. ‘या संदेशांचं पालन करणाऱ्या लोकांना मृत्यूनंतर स्वर्गाचा लाभ होईल व इतर सगळ्यांना भयानक नरकात यातना सोसाव्या लागतील,’ असं या धर्माचं सांगणं होतं. अनेक देवांवर श्रद्धा ठेवणं, मूर्तिपूजा करणं म्हणजे महंमदांच्या शिकवणुकीनुसार नरकवासाला आमंत्रण देणं होतं. ही शिकवणूक म्हणजे, मक्केतील मंदिरामुळे तिथं भरभराटीला आलेल्या अर्थव्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे, असं वाटून मक्केत महंमद पैगंबर यांना मोठा विरोध होऊ लागला. सन ६२२ पर्यंत हे प्रकरण बरंच हातघाईवर आलं. त्याच वेळी मक्केपासून ३२० किलोमीटरवर असलेल्या मदिना या गावातील लोकांनी आपापसातील भांडणाचा निवाडा करण्यासाठी महंमद यांना बोलावलं.
अबू बकर, उमर, उथमान, अली आणि काही मोजक्या सहकाऱ्यांना घेऊन महंमद यांनी मदिनेकडे प्रयाण केलं. या स्थलांतराला इस्लाममध्ये ‘हिजरा’ हे संबोधन आहे. मदिनेत महंमद यांना अधिकाधिक समर्थक मिळत गेलं आणि त्यांनी काही लोकांशी तह, तर काही जणांशी लढाया करून आपलं एक छोटं राज्य उभं केलं.
मक्केकडे जाणाऱ्या व्यापारीजथ्यांवर हल्ले करून त्यांनी मक्केतील आपल्या शत्रूंची नाकेबंदी करायला सुरुवात केली. सततच्या लढायांनंतर शेवटी सन ६२८ मध्ये मक्केतील लोकांशी त्यांचा तह झाला, तर सन ६३० मध्ये मक्केनं त्यांचं वर्चस्व मान्य केलं. त्यानंतर त्यांनी स्वतः काबामंदिरातील मूर्तींचा विध्वंस केला व त्या संपूर्ण प्रदेशावर इस्लामचं वर्चस्व प्रस्थापित झालं.
सन ६३२ मध्ये महंमद पैगंबर यांचा मृत्यू झाल्यानंतर अबू बकर यांची खलिफा म्हणून निवड करण्यात आली. या वेळी अरबस्तानातील काही टोळ्यांनी इस्लामपासून फारकत घेण्याची तयारी सुरू केली. ही बंडाळी मोडून काढण्यासाठी खलिफा अबू बकर यांनी ठिकठिकाणी आपलं सैन्य रवाना केलं. ही सगळी सैन्ये बंडाळीचा यशस्वी बीमोड करून मदिनेला परत आली. या लढाया ‘रिद्दा’ या नावानं प्रसिद्ध आहेत. सतत लढण्याची सवय लागलेल्या व एकामागून एक मिळणाऱ्या विजयांनी बेभान झालेल्या या सैन्याला काही तरी दिशा देणं आणि पुढच्या विजयाचं ध्येय त्यांच्यासमोर ठेवणं फार गरजेचं होतं. नाहीतर या टोळ्या पुन्हा आपापसात लढायला सुरुवात करतील हा धोका होता.
शिवाय, मदिनेची हुकूमत संपूर्ण अरबस्तानात निर्विवाद स्थापन झाल्यानंतर युद्धात विजय मिळवलेल्या वीरांच्या कथा जसजशा सगळीकडे पसरू लागल्या तसतशा अरबांच्या अनेक टोळ्या युद्धांमध्ये सहभागी होऊन, आपणही अशीच कीर्ती मिळवावी, या आशेनं मदिनेला एकत्र येऊ लागल्या. अशा रीतीनं प्रेषितांच्या शिकवणुकीनं प्रेरित झालेल्या, नव्या धर्मात उत्साहानं समाविष्ट झालेल्या, युद्धातील विजयासाठी आतुर झालेल्या लढवय्यांची सेना तयार असल्यामुळे त्यांना दिशा देण्यासाठी इस्लामप्रसाराच्या मोहिमांची आखणी खलिफा अबू बकर व त्याच्या सहकाऱ्यांनी सुरू केली.
यानंतर धर्मप्रसाराच्या ईर्ष्येनं झपाटलेल्या अरब सैन्यानं पश्चिमेला स्पेन ते पूर्वेला सिंधपर्यंतचा प्रचंड भूप्रदेश ज्या झपाट्यानं पादाक्रान्त केला ते पाहून संपूर्ण जगानं तोंडात बोटं घातली. आक्रमणाच्या या प्रलयंकारी आवेशाचं आणि वेगाचं वर्णन ‘मानवी सुनामी’ या शब्दांतच करता येईल. अरबस्तानाच्या पूर्वेचा प्रदेश पर्शियन साम्राज्याचा भाग होता, तर पश्चिमेकडे बायझंटाईन साम्राज्य पसरलेलं होतं. सुमारे एक हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेली ही त्या काळातली दोन मोठी आणि शक्तिशाली साम्राज्ये होती.
एकमेकांत सतत होणाऱ्या लढायांमुळे या दोन्ही साम्राज्यांची शक्ती काहीशी कमी झाली होती असं मानलं तरी त्यांचा दरारा आणि दबदबा टिकून होता; पण या दोन्ही साम्राज्यांतले प्रदेश अरबांनी ज्या वेगानं जिंकून घेतले ते विलक्षणच होतं. सीरियामध्ये व पॅलेस्टाईनमध्ये तेव्हा ग्रीक भाषा प्रचलित होती व लोक ख्रिश्चन धर्माचे उपासक होते. बायझंटाइन साम्राज्याचं या प्रदेशातून अवघ्या आठ वर्षांत उच्चाटन झालं आणि सीरिया हळूहळू एक अरब देश म्हणून ओळखला जाऊ लागला. इराकमधील राज्यकर्त्यांचा धर्म पारशी असला तरी बहुतेक लोक ख्रिश्चन अथवा ज्यू होते. इराक अवघ्या तीन वर्षांत अरबांच्या आधिपत्याखाली आला आणि बघता बघता अरबसंस्कृतीचं केंद्र म्हणून ओळखला जाऊ लागला. महाशक्तिशाली पर्शियन साम्राज्यावर अरबांनी मिळवलेला हा वेगवान विजय केवळ आश्चर्यकारक होता. इजिप्तमधील प्रमुख धर्म ख्रिश्चन, तर भाषा ग्रीक होती.
अरब सैन्यानं अवघ्या दोन वर्षांत संपूर्ण इजिप्त पादाक्रांत केलं. अवघ्या आठ वर्षांत संपूर्ण इराणवर संपूर्ण विजय मिळवून अरबांनी पर्शियन साम्राज्याचा अंत घडवून आणला. मोरोक्को, अल्जीरिया, लीबिया हा संपूर्ण उत्तर आफ्रिकेचा ख्रिश्चनधर्मीय प्रदेश केवळ ५१ वर्षांत जिंकून घेण्यात आला. कझाकस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान या मध्य आशियातील प्रदेशांत शूर आणि क्रूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुर्की लोकांचं वास्तव्य होतं. हा संपूर्ण प्रदेशदेखील अरबांनी केवळ शंभर वर्षांत जिंकून घेतला. स्पेनवरील चढाईदेखील अशीच झंझावाती ठरली. अवघ्या पाच वर्षांत स्पेन इस्लामी अमलाखाली आला. अशा रीतीनं पूर्वेला अफगाणिस्तानची सीमा ते पश्चिमेला स्पेनपर्यंतचा प्रचंड भूप्रदेश अरबांनी अवघ्या १२५ वर्षांत जिंकून घेतला. काल-परवापर्यंत वाळवंटात भटकणाऱ्या अरबांनी अचानक मिळवलेला हा विश्वविजय म्हणजे जगाच्या इतिहासातला एक चमत्कारच होता.
अलेक्झांडर, चेंगीजखान यांच्यासारख्या आक्रमकांनी इस्लामप्रमाणेच वादळी मोहिमा चालवून प्रचंड मोठ्या भूप्रदेशावर अल्पावधीतच ताबा मिळवण्याचा चमत्कार केला होता; पण त्यांना या सर्व भूप्रदेशात आपला धर्म, भाषा व संस्कृती कायमस्वरूपी रुजवता आली नाही. कारण, त्यांच्या मोहिमांचं उद्दिष्ट धर्मप्रसार हे नव्हतंच. त्या मुख्यतः साम्राज्यविस्तारासाठी काढल्या गेलेल्या मोहिमा होत्या. इस्लामच्या मोहिमांचं ध्येयच धर्मप्रसार हे होतं. साम्राज्यवाद हा त्याचा ‘बायप्रॉडक्ट’ होतं असं म्हणता येईल. जिंकलेल्या संपूर्ण प्रदेशातील सगळ्या लोकांना मुस्लिम धर्म व अरेबिक भाषा स्वीकारायला लावण्याचं कार्य दहाव्या शतकापर्यंत पूर्ण झालं होतं. म्हणजेच, पश्चिमेला स्पेन ते पूर्वेला अफगाणिस्तानपर्यंत पसरलेल्या प्रचंड भूभागावर मुस्लिम धर्माचा व अरबी भाषेचा झेंडा फडकवण्याचं काम अवघ्या साडेतीनशे वर्षांत पूर्ण झालं. हा मात्र जगाच्या इतिहासातील एकमेवाद्वितीय असा चमत्कार होता.
भारतानं इस्लामी आक्रमणांना दिलेल्या प्रतिसादाचं आकलन ज्या जागतिक पार्श्वभूमीवर करणं आवश्यक आहे ती समजून घेतल्यानंतर, आता पुढच्या लेखात आपण इस्लामी आक्रमणाच्या लाटा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आदळू लागल्या तेव्हा भारतात काय परिस्थिती होती व नेमकं काय घडलं हे समजून घेऊ या.
(लेखक ब्रँडिंग-तज्ज्ञ असून, ‘असत्यमेवजयते?’ या इतिहासविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलं आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.