abhimat University sakal
सप्तरंग

अभिमत विद्यापीठाचा कला प्रवास

२ मार्च १८५७ रोजी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् कॉलेज मुंबईत सुरू झाले. आजपर्यंत जे. जे. स्कूलने अनेक महान चित्रकार, शिल्पकार आणि वास्तुविशारद दिलेत.

विजय राऊत

२ मार्च १८५७ रोजी जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् कॉलेज मुंबईत सुरू झाले. आजपर्यंत जे. जे. स्कूलने अनेक महान चित्रकार, शिल्पकार आणि वास्तुविशारद दिलेत. एवढेच नव्हे, तर नाटक व चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंतही दिले. १९६५ मध्ये मुंबईच्या डी. एन. रोडवरील भव्य परिसरात सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टची खरी वाटचाल सुरू झाली. अनेक आव्हाने उभी राहिली; पण आपली एक वेगळी ओळख निर्माण करून संस्था कलावंत घडवत राहिली.

एकोणिसाव्या शतकातील पूर्वार्धात युरोपातून दुसऱ्या महायुद्धाला नुकतीच सुरुवात झालेली होती. संपूर्ण जगातच अशांततेचे वातावरण होते. ब्रिटिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतातही यापेक्षा काही वेगळी स्थिती नव्हती. एकीकडे भारतातील स्वातंत्र्य उठावातील रोजच्या घडणाऱ्या घटना व त्यात हे दुसऱ्या महायुद्धाचे सावट... अशा अस्थिरतेच्या वातावरणात सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या परिसरात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली...

ब्रिटिश बॉम्बे गव्हर्न्मेंटतर्फे थॉमस कमेटी आलेली आहे आणि ती जे. जे. स्कूल आर्टबद्दल स्वतःचे कला-छंद जोपासणारी संस्था व त्यातून व्यावसायिक काहीही साध्य होणार नाही, अशा आशयाचा अहवाल सादर करून ही संस्था बंद करणार आहे. मुळात या संस्थेला ब्रिटिश बॉम्बे गव्हर्न्मेंटच्या तिजोरीतून मदत मिळत होती.

दुसऱ्या महायुद्धात सरकारला व्यावसायिकदृष्ट्या अकार्यक्षम असणाऱ्या संस्थेची आर्थिक मदत बंद करून अशा संस्थाच बरखास्त करायच्या होत्या आणि झालेही तसेच. थॉमस कमेटीने आपला अहवाल सरकारला सादर केला. सर जमशेदजी जीजीभॉय यांच्या अथक प्रयत्नातून व त्यांच्या एक लाख रुपयांच्या देणगीतून उभी झालेली एक कला चळवळच बंद होण्याच्या स्थितीत आली होती.

१८५७ मध्ये मुंबईतील प्रख्यात व्यावसायिक सर जमशेदजी जीजीभॉय यांनी ब्रिटिश सरकारकडे कला महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी मागितली आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन मुंबईच्या एलफिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट ॲण्ड इंडस्ट्रीची स्थापना झाली.

प्रथम प्राथमिक कलावर्ग, हस्तकला, अजिंठा वेरूळ येथील म्युरल्सच्या प्रतिकृती निर्माण करून रोजगारनिर्मितीसाठी कलावंतांना प्रोत्साहन देणे एवढाच या संस्थेचा हेतू होता. पुढे मुंबईच्या मुख्य न्यायाधीशांनी एका समितीची स्थापना करून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या नावे ही संस्था चालविण्याची परवानगी दिली. १९६५ मध्ये मुंबईच्या डी. एन. रोडवरील भव्य परिसरात सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टची खरी वाटचाल सुरू झाली.

मिस्टर लॉकवूड किपलिंग हे जे. जे.चे पहिले प्राचार्य. त्यांनी आर्ट ॲण्ड क्राफ्टचे, तर त्यांचे सहकारी मिस्टर ग्रीफिट्स यांनी अजिंठा येथील म्युरलच्या रिप्रॉडक्शन चळवळीला चालना दिली. मिस्टर किपलिंग, मिस्टर ग्रीफिट्स आणि मिस्टर होगिन्स यांनी आर्किटेक्चर, आर्ट ॲण्ड क्राफ्ट आणि डेकोरेटिव्ह डिझाईनचे वर्गही या परिसरात सुरू केले.

याच काळात पेस्तनजी बोमनजी, पीठावाला व एम. व्ही. धुरंदर यांसारख्या मातब्बर कलावंतांचा उदय झाला. पुढे रावबहादूर धुरंदर, मि. तासकर, मि. आगसकर यांनी तर ड्रॉइंग ॲण्ड पेंटिंगच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली.

भारतात यापूर्वीही राजा रविवर्मा व आबालाल रेहमान यांच्यासारखे प्रसिद्ध चित्रकार होऊन गेले; परंतु त्यांना राजाश्रय होता आणि राजाश्रयाविना कला जगवणे कठीण असते व त्याचाच प्रत्यय जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासक्रमातून येत होता. म्हणूनच मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर मिस्टर लॉर्ड रे यांनी व्यावसायिक कलेचे सेमिनार घ्यायला सुरुवात केली.

हस्तकलेचेही त्यांनी अनेक सेमिनार घेतले जे लॉर्ड रे यांचे वर्कशॉप म्हणूनही ओळखले जातात व त्यातूनच मग आर्ट ॲण्ड क्राफ्ट म्युझियमची निर्मिती झाली. हळूहळू जे. जे. स्कूलने कला चळवळीचे रूप धारण केले होते, ज्यात भारतीय कलावंतांनी स्वतःची एक शैली निर्माण केली. त्या शैलीसोबतच कलेबाबतच्या स्वतंत्र भारतीय विचारधारेचीही निर्मिती झाली.

काळ पुढे सरकत होता; परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. जे. जे.च्या रूपाने निर्माण झालेली कला क्रांतीच आज नष्ट होणार होती. सर्व एका थॉमस कमिटीने संपविले होते. जे. जे.तील कला विद्यार्थी व शिक्षक दोघेही हतबल होते. अशा वेळी त्या काळी जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे डीन म्हणून कार्यरत असणारे मिस्टर सोलोमन यांनी एक अहवाल सरकारला सादर केला.

त्यात जे. जे.मधील विद्यार्थी हे दुसऱ्या महायुद्धात भारतीय तरुणांना भाग घेण्यासाठी कसे प्रेरित करू शकतात याचा आराखडा सादर केला व याच आराखड्यातून अनेक भारतीय तरुण ब्रिटिश सरकारतर्फे जर्मनीसोबत युद्ध करायला तयार झाले. सरकारलाही पटले की, कला ही स्वत:च्या छंदापुरती मर्यादित नसून सामाजिक व व्यावसायिक दृष्टिकोनातूनही कलेचा वापर केला जाऊ शकतो.

सरकारने शेवटी स्कूल ऑफ आर्ट बंद करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली. पुढे अप्लाईड आर्टसारख्या व्यावसायिक कला अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढायला लागला. तसेच एखाद्या वास्तुविशारदाकडे फक्त ड्राफ्ट्समन म्हणून काम करणारे विद्यार्थी आर्किटेक्चरमधील नवनवीन प्रयोगात सहभागी व्हायला लागले. याच प्रायोगिक अभ्यासक्रमातून १९५८ मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्ट तीन विभागांत विभागले गेले.

पहिले जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, दुसरे जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आणि तिसरा विभाग म्हणजे जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर. १९५८ ते आजपर्यंत जे. जे. स्कूलने अनेक महान चित्रकार, शिल्पकार, आर्किटेक्ट दिलेत. एवढेच नव्हे, तर नाटक व चित्रपटसृष्टीत काम करणारे कलावंतही दिले.

नाना पाटेकर, रवी जाधव, दामू केंकरे, पुरुषोत्तम बेर्डे, लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यांपैकीच काही नावे. प्रा. शांताराम पवार, संभाजी कदम, धनंजय वर्मा, सुहास बहुलकर, तिरोडकर, प्रो. साठे यांसारखे शिक्षकही घडविले. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यासारखे कलावंत, व्यंगचित्रकार व राजकीय नेतेसुद्धा याच स्कूलने निर्माण केले. कालांतराने उद्धव ठाकरे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

अरुण कोल्हटकर, प्रभाकर बर्वे, आर. के. जोशी, गोपी कुकडे यांच्यासारखे व्यावसायिक कलावंत; तर अच्युत कानविंदे, बाळकृष्ण जोशी, मॉन्टे सिल्वा, दीव्हिता रॉय, अब्दुल्ला हुसेन यांच्यासारखे वास्तुविशारदही जे. जे. स्कूलने घडविले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक रेमो फर्नांडिससुद्धा याच जे. जे. आर्किटेक्चरचा विद्यार्थी आहे.

जे. जे. खऱ्या अर्थाने इतर सर्व शैक्षणिक संस्थांपेक्षा आपली एक वेगळी ओळख निर्माण करून जगण्याचा मार्ग शोधत होती व कलावंत घडवत होती. जी संस्था १८५७ मध्ये कलावंतांना प्रेरणा देण्यासाठी म्हणून उभी राहिली होती, ज्या संस्थेमुळे महाराष्ट्रात शेकडो कला संस्था स्थापन झाल्या, क्षेत्रातील पदविका, पदवी आणि उच्च पदवीपर्यंतचे शिक्षणही महाराष्ट्रातील शहरा-शहरात मिळायला लागले, हजारोंच्या संख्येने कलाशिक्षक झाले; परंतु शोकांतिका ही होती की, महाराष्ट्र सरकारकडे एवढ्या कलाशिक्षकांना सामावून घेईल इतक्या जागाच नव्हत्या.

कलावंत घडले; परंतु चित्रे विकत घेणारा वर्ग मर्यादित असल्यामुळे कालावंतही बेरोजगार झाला, प्रत्येकाच्या घरात फोटोशॉप आणि इलस्ट्रेटरसारखे सॉफ्टवेअर व कॉम्प्युटर असल्यामुळे अप्लाईड आर्टमधून शिक्षण घेणारे विद्यार्थीही काही प्रमाणात बेरोजगार झाले. वास्तुविशारदांचीही अवस्था याहून काही वेगळी नाही आणि हे असे का घडले? तर येथील अभ्यासक्रमाबाबत सरकारची असलेली अनास्था आणि काळानुसार त्यात न घडलेले योग्य बदल.

पुन्हा जे. जे. परिसरावर बंद होण्याची वेळ येते की काय, असेही वाटायला लागले होते. एका सुंदर व विलोभनीय परिसराची अशी दुरवस्था बघताना मन हेलावत होते; परंतु, पुन्हा एक चमत्कार झाला. पुन्हा एकदा जे. जे.मध्ये क्रांतीचे बीज उगवायला लागले. अनेक आजी-माजी विद्यार्थी, माझे शिक्षक वर्ग व चाहते एकत्र आले. ‘जे. जे. बचाव’ म्हणून आंदोलन करायला लागले.

या आंदोलनात खरी वाचा फोडली ती इथल्याच काही विद्यार्थ्यांनी. त्यामध्ये आशुतोष आपटे व सतीश नाईक प्रामुख्याने सहभागी होते. जे. जे.मध्ये कार्यरत असणारे महाराष्ट्र राज्याचे कलासंचालक राजीव मिश्रा व जे. जे. स्कूल ऑफ अप्लाईड आर्टचे डीन विश्वनाथ साबळे व संतोष क्षीरसागर हेही आंदोलनात सक्रिय सहभागी होते.

या सर्वांची मागणी एकच होती, ‘जे. जे.ला डीनोव्हो म्हणजेच अभिमत विद्यापीठचा दर्जा प्राप्त व्हावा’; परंतु तत्कालीन सरकारची व काही कलावंतांची मात्र महाराष्ट्र राज्य कला विद्यापीठ व्हावे, अशी इच्छा होती. या दोन्ही बाजूंच्या इच्छापूर्तीसाठी पुन्हा एकदा जे. जे. स्कूलच्या आणि बाहेरील विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष सुरू झाला. अर्थात दोघांचेही त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबरच होते.

ज्या राज्यात १५०च्या वर कला संस्था आहेत त्याचे स्वतःचे कला विद्यापीठ असावे ज्याद्वारे कलावंत व कला शिक्षकांचे प्रश्न सोडविले जातील व रोजगार प्राप्त होईल, तसेच शैक्षणिक प्रयोगाची त्यांनाही संधी मिळेल, असे त्यांना वाटत होते; परंतु जे. जे.तील विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना फक्त जे. जे. हेच अभिमत विद्यापीठ व्हावे, असे वाटत होते.

शेवटी सरकारच्या सहकार्याने जे. जे.च्या आजी-माजी विद्यार्थी आंदोलनाला यश आले आणि १९ ऑक्टोबर २०२३ला डीनोव्हो (अनन्य) दर्जा मिळवून जे. जे. स्कूल अभिमत विद्यापीठास मान्यता मिळाली. पुन्हा एकदा जे. जे. स्कूलला नवीन जीवनदान मिळाले.

दुसऱ्या महायुद्धाने ज्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टला नवनवीन शाखा निर्माण करण्याची शक्ती दिली होती तीच डीनोव्हो दर्जामुळे मिळाली, अशी आशा करायला आता हरकत नाही; परंतु त्यात एकच शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे ती म्हणजे, आजच्या कलाविश्वाची प्रगती बघता जे. जे. स्कूल ऑफ आर्टने कला व टेक्नॉलॉजीचा अंतर्भाव असणारे अभ्यासक्रम सुरू करावयास पाहिजे, कारण आजची ती गरज आहे.

ॲनिमेशन, एआर, व्हीआर, कॉम्प्युटर ग्राफिक्स गेमिंग, एआयमुळे आज कला शिक्षणाची व्याख्याच बदललेली आहे. आज येथे सुरू असणाऱ्या पारंपरिक अभ्यासक्रमातही बदल गरजेचा आहे. मग ड्रॉइंग ॲण्ड पेंटिंग, अप्लाईड आर्ट, आर्किटेक्चर यांपैकी कुठल्याही शाखेचा अभ्यासक्रम असू द्या, तो प्रायोगिक असावा आणि अशा प्रायोगिक अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने भरभरून मदत करावी.

सरकारने फक्त जे. जे. स्कूलचाच विचार न करता ज्या सर जमशेदजी जीजीभॅाय यांच्या प्रेरणेतून संपूर्ण महाराष्ट्रात कला संस्था व कला चळवळ निर्माण झाली, त्या कला संस्थाही दर्जेदार व प्रायोगिक करण्यासाठी महाराष्ट्र कला विद्यापीठाची स्थापना करावी. जे. जे.च्या रूपाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात नव्या कलापर्वाची सुरुवात होवो व जे. जे. जगी जगण्याचा नव आनंद कलावंतास मिळो, हीच मनस्वी इच्छा!

rautvijay@icloud.com

(लेखक अमरावतीतील दी कॉलेज ऑफ ॲनिमेशन बायोइंजिनीअरिंग ॲण्ड रिसर्च सेंटरचे संचालक आणि मुंबईतील दी बॉम्बे आर्ट सोसायटीचे माजी अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT