सप्तरंग

परदेशातलं शिक्षण आणि आव्हानं

आजच्या मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आपली शिक्षण पद्धती सुद्धा कशी कळत-नकळत मुक्त होत गेली, हे कदाचित कुणालाच समजलं नसेल.

सकाळ वृत्तसेवा

- अनिल जंगम, saptrang@esakal.com

आजच्या मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आपली शिक्षण पद्धती सुद्धा कशी कळत-नकळत मुक्त होत गेली, हे कदाचित कुणालाच समजलं नसेल. दिवसेंदिवस परदेशी शिक्षण घ्यायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वेगानं वाढतंय. केंद्र सरकारच्या एका आकडेवारीनुसार जवळजवळ एकूण आठ लाख मुलं २०२२ मध्ये परदेशात शिक्षणासाठी गेली.

एकप्रकारे ही एक चांगली गोष्ट आहे, की विद्यार्थी आणि पालक त्यांच्या आजूबाजूला घडणारे सामाजिक आणि आर्थिक बदल, त्यांच्या स्वतःबद्दलच्या भविष्यातील अपेक्षा आणि धोरणांबाबत जागरूक आहेत. अर्थात हे करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. या विषयाला केंद्रस्थानी ठेवूनच आपण या गोष्टींचा ऊहापोह इथं करणार आहोत.

परदेशी शिक्षणाचा विचार करत असताना अग्रभागी प्रश्न येतो तो म्हणजे आपले परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा मूळ उद्देश काय आहे? अशी कुठली गोष्ट आहे, की जी आपल्याला भारतात राहून मिळविता येणार नाही? ह्या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत आणि ते समजावून घेणं महत्त्वाचं आहे.

सर्वप्रथम थोडं नेमकं पद्धतीनं मांडणी करायची आहे म्हणून आपण परदेशातील उच्च शिक्षण पद्धत आणि भारतातील उच्च शिक्षण पद्धत यातील फरक लक्षात घेऊ. साधारणपणे चार वर्षांच्या पूर्णवेळ पदवी म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स (B.S.) प्रशिक्षणानंतर दोन वर्षांची मास्टर ऑफ सायन्स (M.S.) ची पदव्युत्तर पदवी असते. म्हणजे परदेशातील आणि भारतातील उच्च शिक्षण समानच आहे, परंतु परदेशातील शिक्षणाचा महत्त्वाचा फरक आणि विशेषतः परदेशातले पदवी आणि पदव्युत्तर हे दोन्ही शिक्षण हे संशोधनावर आधारित असते.

तसेच परदेशातील सरकारी व्यवस्था ही प्रचंड प्रमाणात संशोधन आणि तंत्रज्ञानावर इथल्या विद्यापीठांसोबत परस्पर सहयोग तत्त्वावर काम करते, त्यांना वित्त पुरवठा करते. म्हणजे अगदी सुरुवातीच्या पदवी काळातच विद्यार्थ्यांना संशोधन आणि त्याबाबतचे संशोधनात्मक प्रकाशन (research papers) करण्याची संधी भरपूर प्रमाणात मिळते. तसेच काही मुख्य विषय सोडले तर इतर सर्व विषय हे विद्यार्थी त्याला ज्या क्षेत्रात आपली कारकीर्द घडवायची आहे, त्या प्रमाणं निवडू शकतो. आपण या मुद्द्याकडं पुन्हा येऊयात.

परदेशी शिक्षणासाठी जाणं हा आर्थिक बाजूनं एक खर्चीक आणि महागडा पर्याय आहे. सर्वसाधारणपणानं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यास किमान दोन वर्षे लागतात. यामध्ये ट्युशन फी, राहण्याचा, खाण्याचा खर्च आणि मेडिकल इन्शुरन्स हा किमान खर्च आहे आणि तो साधारण चाळीस ते पन्नास लाखांत जातो.

आज अनेक मध्यमवर्गीय पालक हा परदेशी शिक्षणासाठी होणारा खर्च करतात असं दिसतं. काही प्रकरणांत हे शक्य नसेल, तेव्हा बँकेचं शैक्षणिक कर्ज घेऊन हे उच्च शिक्षण तडीस नेण्याचा अनेक विद्यार्थी आणि पालक मिळून प्रयत्न करत असतात. अर्थात यातील प्रत्येक प्रयत्न निश्चितच प्रामाणिकपणे केलेला असतो यात शंका नाही.

परदेशात शिक्षण सुरू असताना बहुतांश विद्यार्थी सुरुवातीला आपल्या शिक्षणाशी निगडित एखाद्या कंपनीत शिकाऊ उमेदवार म्हणून ठरावीक दिवसांची तात्पुरती नोकरी शोधतात. अर्थात हा अनुभव त्या दोन वर्षांच्या शिक्षणाचाच भाग असतो आणि तो आपण घेतलेल्या शिक्षणाचा व्यावहारिक जगात कसा उपयोग होतो, याबद्दल अनुभव मिळवून देतो.

पुढं जाऊन हे विद्यार्थी आपापल्या प्रशिक्षणाच्या क्षेत्रात पूर्णवेळ नोकरी सुद्धा मिळवू शकतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इथं पूर्णवेळ नोकरीसाठी किंवा आपली व्यावसायिक कारकीर्द घडविण्यासाठी ठरावीक काळ राहण्याचा परवाना मिळवावा लागतो परंतु या लेखाचा या परवान्याची चर्चा करण्याचा उद्देश नाही.

आपण संशोधनाच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडं वळू या. मास्टर ऑफ सायन्स (M.S.) ची पदव्युत्तर पदवी झाल्यानंतर पुढं डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (PhD) म्हणजे डॉक्टरेटचा अभ्यास करण्याची संधी असते. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे संशोधनावर आधारित असतं त्याचा मूळ उद्देश हाच असतो, की त्यातल्या निवडक विद्यार्थ्यांना, ज्यांना संशोधनाची आवड आहे, त्यांना त्यांचा संशोधनाचा पाया या दोन्ही पदवी आणि पदव्युत्तर टप्प्यांमध्ये तयार करता येतो.

यासंदर्भात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे ती अशी, की मास्टर ऑफ सायन्स (M.S.) पदव्युत्तर पदवीमध्ये अभियांत्रिकी प्रकल्प आधारित (प्रोजेक्ट बेस्ड) आणि संशोधनावर (थिसीस बेस्ड) आधारित असे दोन प्रकारचे पर्याय असतात. संशोधनावर (थिसीस बेस्ड) आधारित पर्यायाचा एक अजून महत्त्वाचा फायदा म्हणजे काही प्रमाणात का होईना, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यापीठांकडून संशोधन शिष्यवृत्ती किंवा आर्थिक अनुदान (research assistantship) मिळू शकते, जे त्यांच्या एकूण होणाऱ्या खर्चास हातभार लावू शकते.

बहुतांश भारतीय विद्यार्थी जे मास्टर पदवीच्या शिक्षणासाठी येतात, त्यात असं जाणवतं, की ते प्रकल्प आधारित (प्रोजेक्ट-बेस्ड) चा मार्ग निवडून आपले पदवी शिक्षण पूर्ण करतात. यात सर्वसाधारण समज असा असतो, की संशोधनावर (थिसीस बेस्ड) आधारित अभ्यास हा अभियांत्रिकी प्रकल्प आधारित (प्रोजेक्ट बेस्ड) अभ्यासक्रमापेक्षा थोडा आव्हानात्मक असतो.

यात थोड्या प्रमाणात तथ्य असलं, तरी संशोधनावर (थिसीस बेस्ड) आधारित अभ्यासक्रम हा तितका अवघड नाही परंतु बहुतांश विद्यार्थी हा पर्याय नाकारण्याची एक महत्त्वाची चूक करतात जी पुढे जाऊन त्यांची एक यशस्वी व्यावसायिक कारकीर्द घडवण्यास मारक ठरू शकते. तसेच, जे विद्यार्थी संशोधनावर (थिसीस बेस्ड) आधारित अभ्यासक्रम घेतात, ते पुढे जाऊन त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या संशोधनात सात्यत्य ठेवू शकत नाहीत.

यामध्ये अनेक कारणे असू शकतात जसे की आवश्यक तितका वेळ न देऊ शकणे किंवा योग्य मार्गदर्शन न मिळणे. परंतु यातली अनेक कारणं ही स्वयंनिर्मित असतात. हे प्रश्न PhD म्हणजे डॉक्टरेटचा अभ्यास पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना येत नाही कारण त्यांचं पूर्णवेळ काम हे संशोधन करणं हेच असतं.

दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे, की परदेशातील बहुतेक सर्व माहिती तंत्रज्ञान (IT) कंपन्या या प्रॉडक्ट बेस्ड म्हणजे एक ठरावीक उत्पादन निर्मितीवर आधारित असतात आणि ही उत्पादनं ही जागतिक पातळीवर विकली जातात. जागतिक पातळीवर टिकण्यासाठी प्रत्येक कंपनीला आपलं उत्पादन सतत नवनवीन वैशिष्ट्यांसहित बाजारात आणावे लागते.

ही नवनवीन वैशिष्टे केवळ नवनवीन संशोधनावरच अवलंबून असतात. या संशोधनावर आधारित कंपनीतील शास्त्रज्ञ हे नवनवीन उत्पादनांचं पेटंट मिळवत असतात. ज्याचे इतरही अनेक फायदे आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थाने PhD म्हणजे डॉक्टरेटचा अभ्यासच केला पाहिजे असे नसले, तरी त्यांनी त्यांच्या मास्टर ऑफ सायन्स (M.S.) पदव्युत्तर पदवीमध्ये संशोधनावर (थिसीस बेस्ड) आधारित पर्याय निवडला, तर त्यांच्यातील संशोधन वृत्तीस प्रवृत्त करण्यास आणि तिला चालना देण्यास त्याची नक्की मदत होईल. अन्यथा आपण सगळे शेवटी फक्त कुशल अभियांत्रिकी मनुष्यबळ म्हणूनच कार्यरत राहतो आणि एक संशोधक म्हणून आपला दृष्टिकोन कधी तयारच होत नाही.

आज भारतामध्ये सुद्धा स्टार्टअप संस्कृती तयार होते आहे जी एक महत्त्वाची गोष्ट आहे. जागतिक पातळीवर आज तंत्रज्ञानाचा विचार केला, तर इंटरनेट आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता) या क्षेत्रात फार झपाट्यानं प्रगती होत आहे. आज आपल्याला जेवढी कुशल अभियांत्रिकी मनुष्यबळाची आवश्यकता आहे, तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त संशोधकांची पण भारतासारख्या विकसनशील देशाला गरज आहे.

नवनवीन उत्पादनं तयार करत असताना ती इतर स्पर्धा करणाऱ्या उत्पादनांपेक्षा कशी वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रगत असतील याचा विचार संशोधनात्मक दृष्टिकोन असल्यास जास्त परिपक्वपणानं करता येतो. तसंच विद्यार्थी आपलं शिक्षण पूर्ण करून जेव्हा भारतात परत येतात, तेव्हा ते केवळ शैक्षणिक पदवी न घेता आपल्यातील एक संशोधक आपल्यासोबत घेऊन येऊ शकतात.

संशोधनात्मक दृष्टिकोन तयार करण्यास खूप वेळ, संयम, प्रयत्न आणि सातत्य लागते. प्रतिभा प्रत्येकाकडं असते, तिला फक्त दिशा द्यावी लागते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे परदेशातल्या सर्व शिक्षणसंस्था संशोधनाबाबतच्या सगळ्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक अनुदान पुरवत आहे.

आपण फक्त त्या समजावून घेऊन त्याचा पूर्णपणे आणि संपूर्ण आत्मविश्वासाने स्वीकार केला पाहिजे आणि त्याचा उपयोग स्वतःच्या आणि तसेच आपल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी निश्चितच होऊ शकतो. प्रत्येक विद्यार्थी आणि त्याचं कुटुंब अनेक आर्थिक आणि सामाजिक आव्हानांचा सामना करत परदेशात येतात, तेव्हा यशस्वी होण्यास पर्याय निश्चितच नाही.

हा संशोधनात्मक दृष्टिकोन उच्च शिक्षणाच्या योग्य काळातच जर तयार करता आला, तरच परदेशात येऊन उच्च शिक्षण घेण्याचा खरा उद्देश सार्थ होईल असं माझं मत आहे. अर्थात प्रत्येक विद्यार्थ्यानं आणि पालकांनी याचा एकत्र बसून विचार करणं हे खूप महत्त्वाचं आहे.

(लेखकांनी स्वतः मास्टर ऑफ सायन्स (M.S.) ची पदवी संशोधनावर (थिसीस बेस्ड) आधारित अभ्यासक्रम परदेशात पूर्ण केला असून माहिती तंत्रज्ञानविषयक कंपनीत कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT