सप्तरंग

भूमिकांचा अभ्यासू शोध..

अभिनेते गिरीश ओक यांचं ताजं पुस्तक म्हणजे ‘तो कुणी माझ्यातला.’ शीर्षकापासूनच पुस्तकाची संकल्पना स्पष्ट होणाऱ्या या पुस्तकात गिरीश ओक यांनी आपल्या विविध भूमिकांचा आढावा घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

- अश्‍विनी देव

अभिनेते गिरीश ओक यांचं ताजं पुस्तक म्हणजे ‘तो कुणी माझ्यातला.’ शीर्षकापासूनच पुस्तकाची संकल्पना स्पष्ट होणाऱ्या या पुस्तकात गिरीश ओक यांनी आपल्या विविध भूमिकांचा आढावा घेतला आहे. संजय मोने यांनी या पुस्तकात जे दोन शब्द लिहिले ते आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांचंही मनोगत ओक यांच्या पुस्तकाची भूमिका स्पष्ट करतात. गंगाराम गवाणकर यांची प्रस्तावना जे पुस्तकात मांडले आहे त्याबद्दल विशेष सांगून जाते.

‘तो मी नव्हेच’ या अत्यंत लोकप्रिय नाटकातील लखोबा लोखंडेची भूमिका करताना पणशीकर यांचं मार्गदर्शन कसं मिळालं हे तर ओक यांनी इथं सांगितलंच आहे; पण पणशीकरांनी त्यांना जे किस्से सांगितले, ते किस्से वाचकांना वेगळीच भेट ठरेल. ‘कुसुम मनोहर लेले’ यासारख्या वेगळ्या वळणाच्या नाटकात विनय आपटे यांनी भूमिकांच्या अदलाबदलीचा जो प्रयोग केला होता त्यामुळं त्या नाटकाची चर्चा झाली होती.

या सगळ्याच प्रयोगाबद्दल आणि नाटकाबद्दल ओक यांनी नेमकी माहिती दिली आहे. रंगभूमीवरच्या या वेगळ्या प्रयोगाची त्या प्रयोग करणाऱ्याकडूनच माहिती मिळाल्यामुळे वाचकांना नाटकामागचं नाट्य उलगडेल यात शंका नाही. त्याचबरोबर गिरीश ओक यांनी इतक्या प्रकारच्या वेगवेगळ्या भूमिका केल्या, त्या भूमिकांचा वेध घेताना त्या-त्या भूमिकेचे अंतरंग उलगडून दाखविले आहेत.

ती भूमिका कशी सापडत गेली याचा मागोवा ओक यांनी वेधकपणे घेतला आहे. नाट्यशास्त्रावरच्या पुस्तकांच्या यादीत हे पुस्तक निश्चित जाईल यात शंका नाही; मात्र काही तरी शिकवतो असा आव कुठेही आणलेला नसल्यामुळे पुस्तकात कुठेही रूक्षता येत नाही, तर रंजकपणे रंगभूमीचा इतिहासच वाचकांसमोर येतो. मराठी रंगभूमीच्या वैभवी पर्वातील अनेक लखलखत्या भूमिकांचा हा ताळेबंद आपल्याला अंतर्मुख करतोच.

‘षडयंत्र’ या नाटकात भूमिका करताना ऐनवेळी केलेल्या बदलांमुळे त्यांचे तत्कालीन सहकारी रमेश भाटकर यांचा कसा गोंधळ झाला; पण प्रयोग चालू असताना सगळेच जण कसे एकमेकांना सांभाळून घेतात त्याची गंमत त्यांनी सांगितली आहे. या रहस्यप्रधान नाटकातील अनेक गंमतशीर रहस्यं त्यांनी कथन केली आहेत. रंगभूमीवरच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांचा अनेकांशी संबंध आला. वैयक्तिक संबंध कसे जपले जातात हे सांगताना सहजपणे खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ कसा करून पाठविला ते त्यांनी सांगितलं आहे.

त्याचबरोबर एका प्रयोगाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद नवलकर आले होते; त्या प्रयोगात ओक यांनी केलेल्या दोन्ही भूमिका कशा ओळखल्या आणि बाळासाहेबांमधील कार्टुनिस्टची नजर किती वेगळी आहे याची ओळख कशी झाली त्याचा किस्सा ते सांगतात. ओक मूळचे नागपूरचे त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांतील बड्या नेत्यांशी त्यांच्या ओळखी; पण राजकारणापलीकडे त्यांनी ही मैत्री कशी जपली हेही त्यांनी येथे आवर्जून मांडलं आहे.

डॉक्टर असलेल्या ओक यांना मुंबईत आल्यावर कलाकार म्हणून घडण्यापर्यंतच्या काळातील संघर्ष चुकला नव्हता. या संघर्षाचं त्यांनी उगीच येथे भांडवल केलेलं नाही. मात्र तटस्थपणे हे अनुभव सांगताना काही महत्त्वाची निरीक्षणं देखील नोंदवली आहेत. मग ती मुंबई शहराबद्दलची असोत किंवा उमेदवारीच्या काळातील अनुभवांबद्दल, तसेच लोक रिॲक्ट कसे होतात तेही स्पष्टपणे नोंदवले आहे.

सुरेश खरे यांच्या अत्यंत लोकप्रिय अशा ‘संकेत मिलनाचा’ या नाटकामध्ये काम करताना विक्रम गोखले यांच्याबरोबर काय अनुभव आला ते सांगताना विक्रम गोखले यांचा कुठेही अपमान होणार नाही; पण आपण भूमिकेसाठी काय केलं ते प्रांजलपणे त्यांनी सांगितलं आहे.

गोखले यांच्यासारखा मोठा नट मार्गदर्शन करत असतानाही त्यांच्या प्रतिमेचे कुठलेही दडपण न घेता आपल्याला काय सांगायचं आहे हे ओक यांनी निर्भीडपणे त्यांच्यासमोर मांडले आणि आपल्याला ती भूमिका जशी मांडावीशी वाटते तशीच मांडली. गोखले यांना देखील ती पटली हे महत्त्वाचे. मात्र हा किस्सा सांगताना नटाने एखाद्या भूमिकेचा शोध कसा घ्यायचा असतो आणि अकारण कुणाच्या व्यक्तिमत्त्वाचं दडपण कसे घ्यायचे नसते हेच ओक नकळतपणे सांगून जातात.

पुस्तकातील विविध भूमिकांबद्दलचे लेख वाचताना अनेक वेळा याचा प्रत्यय येतो. एका स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाने भूमिकांचा केलेला अभ्यास आपल्यासमोर येतो आणि त्याचबरोबर नाट्यसृष्टी गेल्या २५ वर्षांत कशी बदलत गेली याचाही उलगडा होतो. ओक यांच्या अनुभव सांगणाऱ्या या पुस्तकाचं शब्दांकन शिरीष देखणे यांनी समजून उमजून केलंय. रंगभूमीवर वावरणाऱ्या सर्वच मंडळींना आणि रंगभूमीबद्दल सजगतेतून आस्था असलेल्या सगळ्यांनाच हे पुस्तक वेगळा आनंद देणारे ठरेल यात शंका नाही.

पुस्तकाचं नाव : तो कुणी माझ्यातला

लेखक : डॉ. गिरीश ओक

प्रकाशक : अनुबंध प्रकाशन, पुणे

(संपर्क - ९३७३७१८६६६)

पृष्ठं : १९२ मूल्य : ३५० रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT