Hitler sakal
सप्तरंग

हिटलर अभी जिंदा है!

जर्मनीचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर मरण पावला असेल; पण त्याची विचारधारा आणि आक्रमक राजकीय महत्त्वाकांक्षा जगभरात पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याचे चित्र आहे.

अवतरण टीम

- मालिनी नायर

जर्मनीचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर मरण पावला असेल; पण त्याची विचारधारा आणि आक्रमक राजकीय महत्त्वाकांक्षा जगभरात पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याचे चित्र आहे. त्याचा वेळीच बोध न घेतल्यास, मागच्या वेळी फक्त जर्मनीचे नुकसान झाले; पण आता फक्त एकाच देशाचे नुकसान होणार नसून ते मानवजातीचे पतन असेल!

ऑस्ट्रियातील ‘ब्राऊनौ अम इन’मध्ये १३५ वर्षांपूर्वी २० एप्रिल १८८९ रोजी ॲडॉल्फ हिटलर याचा जन्म झाला. ऑस्ट्रियात जन्म घेणारा हा जर्मन पुढे जाऊन विसाव्या शतकातील एक प्रभावशाली आणि कुख्यात व्यक्ती बनणार आहे, हे तेव्हा कुणाला माहीत होते? नाझी पक्षाचा नेता म्हणून त्याचा उदय झाला आणि १९३३ मध्ये तो जर्मनीचा चॅन्सलर झाला. त्यानंतर १९३४ मध्ये ‘फ्यूरर अण्ड रिआयस्कन्झलर’ उपाधी त्याने धारण केली.

भौगोलिक विस्तार आणि वांशिक श्रेष्ठत्व अशा दोन संकल्पनांभोवती हिटलरचा जागतिक दृष्टिकोन फिरत होता. त्या विचारधारेतूनच त्याने पोलंडवर आक्रमण केले, दुसरे महायुद्ध सुरू केले आणि ‘होलोकॉस्ट’च्या दरम्यान सहा दशलक्ष ज्यू आणि लाखो इतर लोकांच्या हत्या घडवून आणल्या. हिटलरने त्या काळातील राजकीय सुंदोपसुंदी, आर्थिक संकट आणि जनतेचा असंतोष यांचा फायदा नाझी पक्षाच्या उदयासाठी केला.

जोसेफ गोबेल्सच्या प्रोपगंडाने हिटलरला एक अतिमानवी शक्ती म्हणून प्रस्थापित केले. हिटलरच्या व्यक्तिमत्त्वाचा भलाबुरा प्रभाव आजही जगावर कायम आहे. धोरणे आणि शासन पद्धतीचा जगावर दीर्घकालीन परिणाम झाला. महत्त्वाचे म्हणजे, कोविड महामारीनंतर तर हिटलरच्या विचारधारेचे पुनरुत्थान होत आहे.

अतिउजव्यांचा उदय

युरोपमध्ये अतिउजव्या ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी पार्टी’चा (एएफडी) उल्लेख शॉल्झ याने केला आहे. देशांतर्गत गुप्तचर संस्थेने त्याला संशयित उजवा अतिवादी गट म्हटले आहे. ‘एएफडी’च्या वरिष्ठ नेत्यांच्या एका बैठकीत परदेशी नागरिकांच्या सामूहिक हद्दपारीची चर्चा करण्यात आली, असे गुप्तचर अहवालात म्हटले गेले आहे. त्यामुळे त्या पक्षाच्या विरोधात सर्वत्र निदर्शने झाली.

‘एएफडी’सोबतच जर्मनीत इतर उजवे अतिवादी गटही आहेत. उदाहरणार्थ, रिआयस्बर्गर्स आणि निओ नाझी नेटवर्क्स हेही उजवे अतिवादी गट म्हणून समोर आले आहेत. त्या गटांची विचारधारा राष्ट्रवादी, ज्यूविरोधी, वंशवादी आणि न्यूनगंडग्रस्त आहे.

उजव्या विचारसरणीचा उदय केवळ जर्मनीपुरता मर्यादित नाही. ती एक जागतिक प्रक्रिया आहे. अनेक देशांमध्ये उजव्या विचारांच्या पक्षांना जनाधार मिळत आहे. आर्थिक परिस्थिती, स्थलांतराच्या समस्या किंवा राष्ट्रवादी भावना अशी अनेक कारणे त्यामागे आहेत.

अमेरिकेत श्वेत राष्ट्रवाद, वंशवाद आणि लोकानुनय अशा गोष्टींशी निगडित असलेल्या अतिउजव्या चळवळीचे वर्णन करण्यासाठी ‘अल्ट राईट’ संज्ञा वापरली जाते. काही इतिहासकारांच्या मते ही चळवळ आणि हिटलरचा नाझी पक्ष यांच्यात साम्य आहे. हे दोन्ही गट सत्ता मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी एकाच प्रकारच्या डावपेचांचा वापर करतात, असे त्यांचे मत आहे.

भारतात भाजप हा उजवा पक्ष म्हणून ओळखला जातो. काही टीकाकार हे हिटलर आणि भाजपच्या विचारधारेत साम्य असल्याचे सांगतात. मोदी हे हिटलरसारखा राष्ट्रवादाचा वापर करतात, असेही म्हटले जाते. हिंदू राष्ट्र स्थापन करू पाहणाऱ्या ‘हिंदुत्व’ विचारसरणीची तुलना उजव्या अतिवादाशी करण्यात येत आहे. विविध भांडवलदारांना मोठमोठे प्रकल्प देण्याच्या बदल्यात निवडणूक रोखे घेण्याचे भाजपचे प्रकरण उजेडात आले आहे. व्लादिमीर पुतीन यांची पूर्वीचा सोव्हिएत संघ पुन्हा एकदा उभा करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. कॅनडा आणि न्यूझीलंडनेही अलीकडच्या काळात उजव्या विचारसरणीची वाढ झाल्याचे मान्य केले आहे.

अतिवादाचा धोका वाढतोय

युरोपमध्ये उजव्या अतिवादाचा धोका पुन्हा एकदा डोके वर काढतो आहे. उजव्या विचारसरणीच्या वाढीचा प्रभाव लक्षणीय असू शकतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध, देशांचे धोरण आणि सामाजिक नियम यात बदल होऊ शकतात. युरोपमधील इटली, जर्मनी, पोलंड, हंगेरी, ऑस्ट्रिया, बेल्जियम आणि नेदरलँडमध्ये उजव्या शक्ती प्रबळ आहेत. पोलंडमध्ये लॉ ॲण्ड जस्टीस पार्टी २०१५ मध्ये सत्तेत आली.

ऑक्टोबर २०२३ मधील संसदेच्या निवडणुकीत बहुमत गमावूनही ती शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. हंगेरीमध्ये व्हिक्टर ऑर्बन यांच्या नेतृत्वाखाली ‘फिडेज’ हा पक्ष मागील दहा वर्षांपासून सत्तेवर आहे. २०२२ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला. बेल्जियममध्ये सध्या आघाडीवर असलेले दोन्ही पक्ष अतिउजवे आहेत. त्यातील अनेक उजवे पक्ष आणि गट अगदी देशांच्या सीमा ओलांडून एकमेकांशी सहकार्य करतात.

स्थलांतर, राष्ट्रवाद, आर्थिक संरक्षणवाद, पुराणमतवादी कौटुंबिक मूल्ये (महिलाविरोधी आणि एलजीबीटीक्यू हक्क) हा त्यांचा समान दुवा असतो. उदाहरणार्थ, युरोपमधील अनेक अतिउजवे पक्ष स्थलांतरावर समान भूमिका घेतात. ते कठोर स्थलांतर धोरणे आणि सीमा नियंत्रणाचे समर्थन करतात. जर्मनीतील अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी, नेदरलँडमधील फ्रीडम पार्टी आणि फ्रान्समधील नॅशनल फ्रंट हे पक्ष युरोपियन युनियनच्या बाह्यसीमांवरील बंधने अधिक घट्ट करणे आणि युरोपकडे होणारे स्थलांतर थोपवणे याचे समर्थन करतात.

उजव्या पक्षांची वाढ २०१४ पासून झालेली दिसत असली, तरी कोविड महामारीनंतर त्याने वेग घेतला आहे. इटलीमध्ये जॉर्जिया मेलोनी यांचा अतिउजवा ‘ब्रदर्स ऑफ इटली’ हा पक्ष २०२२ मध्ये सत्तेत येऊन त्याची सुरुवात झाली. त्यानंतर लगेच स्वीडनमध्ये स्वीडन डेमोक्रॅट्सने उजव्या सरकारशी हातमिळवणी केली. लगोलग फिनलंड आणि ग्रीसमध्ये उजव्या पक्षांचा विजय झाला; तरी स्पेन आणि पोलंडमध्ये दोन मोठ्या उजव्या पक्षांची पीछेहाट झाली.

स्पेनमध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह पॉप्युलर पार्टीचा पराभव पेद्रो सॅन्चेझ यांच्या नेतृत्वाखालील प्रगतीशील आघाडीने; तर पोलंडमध्ये लॉ ॲण्ड जस्टीस पक्षाचा पराभव डोनाल्ड टस्क यांच्या नेतृत्वाखालील उदारमतवादी सरकारने केला. पण, जेव्हा नेदरलँडमध्ये गीर्ट विल्डर्स फ्रीडम पार्टीने २३ टक्के मते घेऊन निवडणूक जिंकली तेव्हा मोठा धक्का बसला.

पीव्हीव्हीने अद्याप सरकार स्थापन केले नसले, तरी त्यांनी देशातील अनेक उदारमतवादी लोकांचा शक्तिपात केला आहे. येत्या जूनमध्ये युरोपियन महासंघाच्या निवडणुका होत आहेत. ७२० प्रतिनिधींना ब्रुसेल्सला पाठवण्यासाठी ४०० दशलक्ष मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि या वेळी अतिउजव्या शक्तींचा धोका मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यावर्षी युरोपियन संसदेत उजव्या विचारांचे असंख्य प्रतिनिधी निवडून जातील, असे ओपिनियन पोलचे अंदाज सांगत आहेत.

युरोपियन महासंघाची परिस्थिती

संसदेत उजव्या प्रतिनिधींचे प्राबल्य झाल्यामुळे युरोपियन युनियनच्या कार्यकारी शाखेचे अध्यक्षपद, युरोपियन कमिशन वगैरे ठरवण्यात त्यांचाच वरचष्मा ठरणार असल्याचे दिसत आहे. उजव्या विचारांनी भरलेली संसद युरोपियन युनियनमधील काही महत्त्वाच्या धोरणांवर प्रभाव टाकू शकते. युरोपचा राजकीय लंबक उजवीकडे वळला, तर काय होईल? पहिली गोष्ट म्हणजे युक्रेनला असलेला युरोपचा पाठिंबा कमी होईल.

हंगेरीचे व्हिक्टर ऑर्बन हे युक्रेनबरोबर सुरू असलेल्या चर्चेत अडथळे आणत आहेत. तसेच, युक्रेनला देऊ केलेली ५० बिलियन युरोची आर्थिक मदत आणि २० बिलियन युरोच्या लष्करी मदतीतही व्यत्यय आणला जात आहे. ऑर्बनचा रशियाकडे असलेला ओढा काही नवीन नाही. पण, तो इतक्या थेटपणे व्यक्त करणे हा निव्वळ योगायोग नक्कीच नाही. राजकीय वारे आपल्यासाठी अनुकूल आहे, अशी त्याची खात्री आहे. मेलोनी यांच्यासह उजव्या विचारांच्या नेत्यांनी आतापर्यंत युक्रेनचे समर्थन केले आहे. मात्र मेलोनी यांचा ओढाही पुतीन यांच्याकडे असल्याच्या अलीकडे घडलेल्या काही घटना सांगून जातात.

दुसरी महत्त्वाची समस्या आहे हवामानाची. उजवे विरोधी पक्ष वाढत आहेत आणि युरोपियन हरित करार कमकुवत होत आहे. विशेषतः शेती आणि जंगलतोड या प्रश्नांवर दुर्लक्ष होत आहे. येणाऱ्या काही दिवसांत हे संकट वाढण्याची शक्यता आहे. कार्बनमुक्तीची प्रक्रिया यामुळे पूर्णपणे थांबेल असे नाही; पण तंत्रज्ञानात्मक नवोन्मेष आणि औद्योगिक धोरणांमधून यात भर पडत राहील. उजव्या विचारसरणीचा युरोप संरक्षणाला तत्त्वतः समर्थन देईल; पण त्यासाठी लागणाऱ्या निधीत वाढ करण्यास मान्यता देण्याची शक्यता कमीच आहे.

अनेक युरोपियन लोक स्थलांतराच्या प्रश्नाबाबत चिंतित असतात; पण हा प्रश्न सोडवण्याबद्दल फारच कमी उत्सुक असतात. युरोपभरातील सर्व उजव्या पक्षांचे अनियमित स्थलांतर नको, याबद्दल एकमत आहे; पण याची जबाबदारी कुणी घ्यावी, याबाबत त्यांचे एकमत नाही. परिणामी ते ज्या देशातून स्थलांतर होत आहे, त्यांना जबाबदार मानतात. अर्थात, युरोप उजवीकडे कलल्याने खंडातील उदारमतवादी लोकशाही संपुष्टात येईल, असे नाही.

उजव्या विचासरणीच्या प्रसाराचा धोका

युरोपच्या बाहेर दोन महत्त्वाच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यातील भारतात एप्रिल-मे आणि अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये निवडणूक होत आहे. सध्या भारतात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उजव्या विचारधारेचे सरकार आहे. ट्रम्प समर्थक अमेरिकेत रिपब्लिकन पक्ष सत्तेत यावा या प्रयत्नात आहेत.

जर भारतात मोदी आणि अमेरिकत रिपब्लिकन परत सत्तेवर आले, तर जगातील तीन महत्त्वाचे खंड म्हणजे आशिया, उत्तर अमेरिका आणि युरोप हे उजव्या विचारधारेच्या अंमलाखाली येतील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्य कमकुवत करणे, मानवाधिकाराचे अवमूल्यन करणे, पर्यारणरक्षणांच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणे यांसारख्या गोष्टी घडू शकतात. सध्या जग रशिया-युक्रेन आणि इस्राईल-गाझा युद्धाला समोरे जात आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. तसेच, चीनची दृष्टीही तैवानकडे वळली आहे.

उजव्या विचारसरणीच्या नेतृत्वात वाढ होणे म्हणजे जगभरातील लोकांच्या त्रासात वाढ होणे होय. स्थलांतरित बाहेर फेकले जातील. तसेच, वंशवाद, लिंगभेद, झेनोफोबिया या गोष्टी वाढीस लागून त्या समुदायातील लोकांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल. नेट झिरो कार्बन इनिशिएटिव्हसारखे उपक्रम बंद केले जातील. ज्यामुळे जागतिक तापमानवाढीस प्रोत्साहन मिळेल. मुस्लिमविरोधी प्रोपगंडा वाढीस लागून अनेक प्रदेशातील लोकांच्या उपजीविका धोक्यात येतील. जगभरातील उजव्या विचारधारांची दिवसेंदिवस सरशी झाली, तर आपण खरोखर अंधारलेल्या काळात प्रवेश करू.

हिटलर मरण पावला असेल; पण त्याची विचारधारा आणि आक्रमक राजकीय महत्त्वाकांक्षा पुन्हा एकदा डोके वर काढू शकते आणि यावेळी आपल्याला जगातील प्रत्येक भागात हिटलर दिसत आहेत. खरे तर उजव्या विचारधारेच्या नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या थेट लाभाचा आणि तात्काळ समाधानाचा लोभ जनतेने सोडला पाहिजे. राहणीमानाचा वाढता खर्च, बेरोजगारी, संसाधनाचे असमान वितरण यावर शाश्वत समाधान शोधण्याचे ध्येय ठेवले पाहिजे.

जबाबदारीने मतदान केले पाहिजे. लक्षात ठेवा मागच्या वेळी एका व्यक्तीने समस्येचे तत्काळ निराकरण करण्याचे वचन दिले आणि एका देशाचे नुकसान झाले. भूतकाळातील चुकीची पुनरावृत्ती न करणे आपण इतिहासातून शिकले पाहिजे. मागच्या वेळी फक्त जर्मनीचे नुकसान झाले; पण या वेळी फक्त एकाच देशाचे नुकसान होणार नसून ते मानवजातीचे पतन असेल!

nairmalini2013@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : विकासकामे न करणाऱ्यांकडूनच टीका : शंभूराज देसाई; सुपने येथे प्रचार सभा, टीका न करता कामे करत राहण्याचा निर्वाळा

Nepal Tourist Places: नेपाळमधील 'ही' पाच ठिकाणे आहेत नयनरम्य, अनेक पर्यटकांनाही नसेल माहिती

Google Spam Detection Tool : ट्रूकॉलरला टक्कर द्यायला गुगलने आणलं नवं फीचर, तुमच्या फोनमध्ये कसं वापराल? वाचा

The Sabarmati Report : 12th Fail फेम विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'ची जादू पडली फिकी ; पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा

SCROLL FOR NEXT