ahilyadevi holkar jayanti 2024 Sakal
सप्तरंग

रणधुरंधर अहिल्यादेवी होळकर

सकाळ वृत्तसेवा

- प्रा.विशाल गरड

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची नुकतीच जयंती झाली. १७२५ मध्ये ३१ मे रोजी महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील चौंडी गावी जन्माला आलेली मुलगी पुढं होळकर साम्राज्याची महाराणी झाली. तब्बल २८ वर्ष राज्यकारभार चालवून मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं आणि लोकोद्धाराचं कार्य केवळ माळवा प्रांतापुरतं मर्यादित न ठेवता संपूर्ण देशभर करून त्यांनी त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवला.

देशातील कोणत्याही धार्मिक स्थळावर जा तिथं दिसणारे बहुतांशी बांधकाम अहिल्यादेवींनी केलेलं दिसेल, महत्त्वाचं म्हणजे जीर्णोद्धाराच्या कामास लागणारा निधी त्यांनी स्वअर्थकोषातून खर्च केला पण कुठेही स्वतःच्या नावाची पाटी लावली नाही ना कुठं नाव कोरून ठेवलं. हल्ली सरकारी तिजोरीतून खर्च करून बांधलेल्या इमारतींवर सुद्धा आपल्याला नावांची भली मोठी यादी दिसते.

आई-वडील, सासू-सासरे, पती, मुलगा, मुलगी, जावई यांचं डोळ्यासमोर निधन झालं. आयुष्यात रक्ताची इतकी माणसं त्यांना सोडून गेली, तरी ही लोकमाता धैर्यानं राज्यकारभार करत राहिली. माता अहिल्यादेवींच्या वाट्याला आलेला संघर्ष आणि त्यांनी बांधलेली मंदिरे यामुळं लोकांच्या मनात त्यांना देवीची जागा प्राप्त झाली.

दुःखाचा डोंगर काय असतो ते या माउलीनं नुसता पाहिला नाही, तर त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेले डोंगराएवढे दुःख हृदयाच्या मुळाशी ठेवून त्यावरच होळकरशाहीचा झेंडा दिमाखात उभारला आणि साऱ्या जगात कल्याणकारी राज्यकारभाराचं निशाण फडकवत ठेवलं.

जात, धर्म, उच्च-नीच न पाहता कर्तृत्व आणि पराक्रम पाहून कन्या मुक्ताचं लग्न लावून देणारी. खंडेरावांच्या निधनानंतर सती न गेलेली. राज्यकारभार चालवताना कधीही नातीगोती आडवी न येऊ दिलेली, देशभरातील मंदिरं, नदीघाट, प्रसादालयं, प्रार्थनास्थळं, सभामंडपं, विहिरी स्वखर्चातून बांधलेली,

शत्रूला फक्त एक पत्र लिहून ते युद्ध जिंकणारी, पाच हजार स्त्रियांची खडी फौज निर्माण करणारी, पानिपतच्या युद्धात विधवा झालेल्या सुमारे सव्वालाख स्त्रियांना रोजगार देऊन त्यांच्या मुलाबाळांचे सामुदायिक विवाह लावलेली, वेळप्रसंगी हातातले शिवलिंग मंदिरात ठेवून हातात तलवार, लेखणी आणि पुस्तक घेणारी. साहित्यसंपन्न, रणधुरंधर, महापराक्रमी, महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी आपल्या मातीत जन्माला आली ही जगाला अभिमानानं सांगण्यासारखी गोष्ट आहे.

आपल्या समाजात अजूनही विधवा महिलांना मिळणारी वेगळी वागणूक पाहून खरंच आपण माता अहिल्येच्या लेकी होऊ शकतो का ? असा प्रश्न विचारावासा वाटतो. घरोघरी अहिल्या तर जन्मावीच पण त्या आधी मुलाचा मृत्यू झाल्यावर आपल्या विधवा सुनेच्या हातात राज्यकारभार सोपवणारे मल्हारराव होळकर यांच्यासारखे सुधारक आणि रणधुरंधर सेनानी समाजात निर्माण होणं, ही काळाची गरज आहे.

“माझी सून सक्षमपणे राज्यकारभार चालवते म्हणून आम्ही तलवार गाजवतो,” असे म्हणणारे मल्हारराव पुन्हा होणे नाहीत. ही अठराव्या शतकातली गोष्ट आहे पण आज आपण एकविसाव्या शतकात जगतोय तरी काही धार्मिक किंवा शुभ कार्यात विधवा स्त्रिया कुठेतरी कोपऱ्यात बसलेल्या दिसतात. सुवासिनी नसल्यानं त्यांच्या मनात होणाऱ्या वेदना आपण कधी ऐकणार आहोत की नाही.

अहिल्याबाईंचं चरित्र सर्वांसाठीच पथदर्शी आहे पण त्यातल्या त्यात विधवा स्त्रियांसाठी तर अहिल्याचरित्र म्हणजे जणू एक प्रेरक ग्रंथच आहे. ते वाचल्यानंतर चुकीच्या चौकटी तोडून अद्वितीय साम्राज्य उभं करण्याचं सामर्थ्य मिळतं.

मी स्वतः माझ्या लग्नात बायकोची ओटी भरण्याचा मान माझ्या विधवा आत्याला दिला होता. कोरोना महासाथीच्या आजारात ज्या हजारो स्त्रियांचं कुंकू पुसलं गेलं त्यांनी अहिल्याबाईंचं स्मरण करावं. अवघ्या २१ वर्षांचा संसार अहिल्यादेवींना लाभला. तिथून पुढची तब्बल ४० वर्ष या लोकमातेनं वैधव्य पत्करून रयतेला कुटुंब मानलं.

इतिहास फक्त मिरवण्यासाठी नसतो तर तो आपल्या जीवनात मुरवून आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी असतो. जयंती-पुण्यतिथी लक्षात ठेवायची त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायचे ते यासाठीच. फोटो आणि पुतळे जसे वाजतगाजत मिरवतो तसे महापुरुषांचे विचार जर व्याख्यानातून मिरवले, तर अन्याय आणि अत्याचार आपल्या जवळही फिरकणार नाही.

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT