Religious places of Chalukyas sakal
सप्तरंग

चालुक्यांची धार्मिक स्थळं

ऐहोळे आणि बदामीचा परिसर कला, स्थापत्य, धार्मिक-सांस्कृतिक, भौगोलिक, पुरातत्त्वीय आणि राजकीयदृष्ट्या अतिशय संपन्न आहे.

सकाळ वृत्तसेवा

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

ऐहोळे आणि बदामीचा परिसर कला, स्थापत्य, धार्मिक-सांस्कृतिक, भौगोलिक, पुरातत्त्वीय आणि राजकीयदृष्ट्या अतिशय संपन्न आहे. ऐहोळे ते बदामी एकूण अंतर आहे तीस किलोमीटर. या दोन गावांमध्ये चालुक्यांची अतिमहत्त्वाची ठिकाणे वसली आहेत. त्यामध्ये महाकूट, पट्टडकल, सिद्धनकोल्ला, हुळीगेम्मनकोल्ला, हळे महाकूट यांचा मुख्यत्वे समावेश होतो.

साधारण बाराशे ते चौदाशे वर्षांपूर्वी या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात विविध प्रकारे उलाढाल झाली आहे. यापैकी पट्टडकलविषयी आपण थोडक्यात पण महत्त्वाची माहिती मागील भागात घेतलीच आहे. आता चालुक्यांच्या अद्‍भुत विश्वातील काही अपरिचित किंवा अल्पपरिचित ठिकाणांची माहिती आपण या भागात घेऊ या.

महाकूट हे ठिकाण बदामीपासून केवळ १२ किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिण काशी म्हणून या ठिकाणाचा उल्लेख करण्यात येतो. चालुक्यांच्या काळातील बदामी किल्ला ते महाकूट हा राजमार्ग आजही स्थानिक लोक पर्यटकांद्वारे वापरात आहे. हा रस्ता चालुक्य काळापासून असल्याचे स्थानिक मानतात. खरेतर इथे महाकुटेश्वराची दोन स्थान आहेत. हळे महाकूट म्हणजे जुने महाकूट हे सध्याच्या प्रसिद्ध महाकुटेश्वर मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे.

तेरच्या त्रिविक्रम मंदिराप्रमाणे हेही मंदिर गजपृष्ठाकार आहे. पण काही अमंगल कारणामुळं हे स्थान उत्तरेस सरकले. पुढे तेथे महाकुटेश्वर, मल्लिकार्जुन मंदिर आणि काही छोट्या-मोठ्या मंदिरांची निर्मिती झाली. एक मोठी नैसर्गिक पाण्याने युक्त पुष्करणी बांधण्यात आली, जिच्यामध्ये सदाशिवाची प्रतिमा एका छोट्या मंदिरात चालुक्यांद्वारे निर्माण करण्यात आली. असे म्हणतात, की या पुष्करणीमध्ये गंगा अवतरते. महाकूटला महत्त्व असण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे या जागेशी निगडित असलेले दोन शिलालेख.

राणी दुर्लभदेवी आणि राजा विजयादित्याची उपस्त्री विनापोती या महत्त्वाच्या स्त्रियांनी मंदिराला जे दान दिले किंवा जी व्यवस्था लावली, त्याचा उल्लेख असणारे दोन लेख या मंदिराशी निगडित आहेत. त्यात, दुर्लभदेवीनं मंदिराच्या व्यवस्थेसाठी दहा गावांची नियुक्ती केली होती, ज्यात ऐहोळे आणि पट्टडकल यांचा समावेश होता. तर विनापोतीने महाकुटेश्वराला मौल्यवान पाचूंनी सजवले होते आणि चांदीचं छत्र अर्पण केलं होतं.

दुर्लभदेवीचा शिलालेख एका खांबावर होता, ज्याचा उल्लेख ‘जयधर्म स्तंभ’ असा केला गेला तर विनापोतीचा लेख मंदिराच्या भिंतीवर कोरलेला आहे. राजघराण्याशी संबंधित असलेले चालुक्यांच्या दैवताचं ठिकाण फार प्रसन्न आणि अतिशय सुंदर आहे.

ऐहोळे गावापासून बदामीकडं जाताना एक छोटेसं गाव लागतं, सिद्धनकोल्ला. त्या गावातून एक रस्ता डोंगराकडं, दक्षिणेस जातो. त्या रस्त्यानं पुढं गेल्यास दोनेक किलोमीटर अंतरावर आपल्याला मुख्य मंदिराचा परिसर नजरेस पडतो. एका छोट्याशा झऱ्याच्या काठावर चार-पाच मंदिरांचा समूह आणि झऱ्याला चिकटून एक छोटी कपार आपलं लक्ष वेधून घेते. कोल्ला म्हणजे दरी. हे ठिकाण दरीच्या तोंडावर निर्माण करण्यात आलं आहे.

इथलं मुख्य मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आज मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे. मुख्य मंडप आणि सभामंडप पूर्णपणे कोसळला आहे. झऱ्याच्या बाजूला असलेल्या कपारीत एक शिवलिंग, खूप सारे दगड एकावर एक रचून ठेवलेले दिसतात. जवळ जाऊन पाहिल्यास या दगडांमध्ये आपल्याला लज्जागौरीचे शिल्प कातळात खोदलेले दिसते. जे दांपत्य निपुत्रिक आहेत, त्यांनी मूल होण्यासाठी किंवा आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी अशाप्रकारे दगडावर दगड रचून छोटे मिनार उभे करण्याची पद्धत इथं रुजली आहे.

हे लज्जागौरीचे शिल्प विशेष आहे आणि दख्खन भागात चालुक्यांनी मोठ्या प्रमाणात लज्जागौरीची उपासना सुरू केली होती, त्याचे प्रतीकही आहे. बाजूलाच छोट्या-छोट्या मंदिरांत आपल्याला अनेक विशेष प्रतिमा दिसतात, ज्यामध्ये सप्तमातृका आहेत, सूर्य आहे. सप्तमातृकांच्या मंदिराचे द्वारपाल म्हणून नैगमेश आणि छगवक्र यांना नियुक्त केले आहे.

कार्तिकेयाचे हे दोन सेनापती, बालाग्रही म्हणजेच लहान मुलांना त्रास देणारे ते नंतर लहान मुलांचे रक्षण करणारे, मातृत्वाच्या देवतांचे द्वारपाल म्हणून झालेला त्यांच्या संकल्पनेचे स्थित्यंतर आपल्याला यातून पाहायला मिळते. पट्टडकलपासून जवळ असणारे हुळी गेम्मनकोल्ला हेही ठिकाण तितकेच महत्त्वाचे आहे.

एका धबधब्याचा कपारीमध्ये बारा शिव मंदिरांची उभारणी करण्यात आली आहे. यातील एका छोट्या मंदिरावर एक शिलालेख अभ्यासकांना आढळून आला, जो चालुक्य राजा ‘विक्रमादित्य दुसरा’ याच्या कालखंडातील होता. सर्वसाधारण लोकांचा समज आहे, की बारा ज्योतिर्लिंगाचे प्रतिरूप म्हणून इथे बारा शिवलिंगाची स्थापना केली आहे.

पण, अभ्यासकांच्या मते, हे ज्योतिर्लिंगाचे प्रतिरूप नसून चालुक्य राजाची स्मृतिमंदिरे आहेत, चालुक्यांची स्मशानभूमी आहे. हे अतिशय महत्त्वाचे ठिकाण आज केवळ त्या धबधब्यामुळे प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणाला अतिशय कमी पर्यटक भेट देतात आणि जे इथे येतात त्यांना माहीतही नसतं, की चालुक्यांच्या इतिहासाशी निगडित एक महत्त्वाचा दुवा या ठिकाणी निर्माण करण्यात आला आहे.

चालुक्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी बांधलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या धार्मिक ठिकाणी पाण्याला प्रचंड महत्त्व दिले आहे. बदामी येथील अगत्स्य तलाव, ऐहोळे, पट्टडकल येथील मलप्रभा नदी, बनशंकरी देवीच्या मंदिरासमोर बांधलेली भव्य पुष्करणी, हुळीगेम्मन कोल्ला आणि सिद्धन कोल्ला येथील छोटे-मोठे धबधबे या गोष्टीची सुनिश्चिती करतात. चालुक्यांचा हा भू-राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि कला-स्थापत्यकीय इतिहास अतिशय रोचक, आकर्षक आणि भुरळ पाडणारा आहे. त्याकडे डोळस नजरेने पाहिले, तर दख्खनच्या पूर्ण मध्यकालीन इतिहासाचे अनेक पैलू आपल्यासमोर उलगडण्यास मदत होते. कधी ऐहोळे-बदामी भागात गेलात, तर या ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका.

(लेखक पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT