ajintha caves sakal
सप्तरंग

थक्क करणारा वारसा...

अजिंठ्याच्या लेणींबद्दलची काही माहिती आपण मागील लेखांमधून घेतली आहे.

सकाळ वृत्तसेवा

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

अजिंठ्याच्या लेणींबद्दलची काही माहिती आपण मागील लेखांमधून घेतली आहे. अजिंठ्याच्या निर्मितीचे टप्पे, राजकीय पार्श्वभूमी, ब्रिटिशांच्या कालखंडात अजिंठ्याच्या प्रसिद्धीसाठी करण्यात आलेले प्रयत्न आणि एकूणच अजिंठ्याचा उत्कर्ष आपण समजून घेतला आहे. आता अजिंठ्याच्या लेणींमध्ये असलेल्या काही थक्क करणाऱ्या गोष्टींची माहिती या लेखामधून घेऊ या.

अजिंठा इथल्या लेणींवर भरपूर जणांनी काम केलंय. पण सर्व इतिहास अभ्यासक, संशोधकांमध्ये अव्वल क्रमांक कुणाचा असेल तर डॉ. वॉल्टर स्पिंक यांचा. तब्बल ६५ वर्षे अजिंठ्याचा कोपरा न् कोपरा त्यांनी धुंडाळला, अभ्यासला. त्याच्या आधारावर नवी मांडणी केली. डॉ. स्पिंक यांनी इतिहासाला दिलेली सर्वांत मोठी देणगी म्हणजे ‘शॉर्ट क्रोनॉलॉजी’ म्हणजे ‘लघु कालक्रम’.

कित्येक जण सांगतात, अजिंठ्यामधील लेणी तयार व्हायला तब्बल नऊशे वर्षे लागली. काही सांगतात, ही लेणी २००-२५० वर्षांमध्ये तयार करण्यात आली. पण वॉल्टर स्पिंक यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले, की अजिंठ्यांची लेणी तयार व्हायला केवळ आणि केवळ १८ वर्षांचा कालावधी लागला. हा दावा खळबळजनक होता. पण त्यामागे डॉ. स्पिंक यांचे अफाट संशोधन होते.

‘अजिंठा : हिस्ट्री ॲन्ड डेव्हलपमेंट’ या शीर्षकाचे त्यांनी आठ खंड लिहिले आहेत. अजिंठा येथील लेणी, त्याचं स्थापत्य, तिथल्या प्रतिमा, काढण्यात आलेली चित्रं एवढंच नाही तर लेणींमध्ये असणाऱ्या दरवाजाच्या-खिडक्यांच्या चौकटी, खांबाच्या रचना, वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या मानवनिर्मित खाचा, लेणींचे खगोलशास्त्रीय संबंध यावर सुद्धा त्यांनी अतिशय सखोल भाष्य केलंय. या सर्वांच्या आधारावर त्यांनी अजिंठ्याचा ‘लघु कालक्रम’ ठरवला. उदाहरण द्यायचं झाले, तर डॉ. स्पिंक यांनी अजिंठ्याच्या विहारांमध्ये असणाऱ्या खोल्यांचा अभ्यास केला.

इथल्या लेणींमध्ये १९० च्या आसपास खोल्या आहेत, ज्यांचा वापर बौद्ध भिक्खू आणि इतर लोकांच्या राहण्यासाठी करण्यात येत असे. या खोल्यांच्या दरवाजांची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकूण चार पद्धतीचे दरवाजे स्पिंक यांना अजिंठ्यात आढळले. त्यांनी या प्रकारांना ए, बी, सी, डी अशी नावं देऊन वर्गीकरण केलं. ए प्रकारात खोल्यांना दरवाजे नाहीत.

ज्या खोल्यांना चौकटीच्या आतील बाजूस वरच्या बाजूला केवळ एकच गोलाकार खाच दिसून येते, त्यांना बी प्रकारात वर्गीकृत करण्यात आले. ज्या खोल्यांच्या आतील बाजूस वर आणि खाली अशा दोन्ही बाजूस गोलाकार खाच दिसते, त्यांना सी प्रकारात टाकण्यात आलं. आणि ज्या खोल्यांच्या चौकटीमध्येच दरवाजे बसवण्यासाठी खाचा केलेल्या दिसून येतात, त्यांना डी प्रकारात टाकण्यात आले.

अजिंठ्याच्या आसपास घनदाट जंगल होतं. जॉन स्मिथ जेव्हा पहिल्यांदा इथल्या लेणीमध्ये आला, तेव्हा तो एका वाघाची शिकार करत होता. मेजर रॉबर्ट गिल यानं आपल्या अजिंठा इथल्या वास्तव्यादरम्यान तब्बल दोनशेच्या आसपास वाघ मारल्याची नोंद उपलब्ध आहे. ब्रिटिशांच्या आधी, जवळ जवळ चौदाशे वर्षांपूर्वी वाकाटक, अश्मक आणि उपेंद्रगुप्त लेणींची निर्मिती करत होते. बौद्ध भिक्खू तिथे वास्तव्य करत होते.

अशा परिस्थितीत विषारी प्राण्यांपासून आणि इतर घटकांपासून त्यांचं संरक्षण व्हावं, ही प्राथमिक गरज होती. त्यासाठी खोल्यांना दरवाजे असणं स्वाभाविक आहे. पण अजिंठ्याच्या काही लेणींमध्ये आपल्याला दरवाजे लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय केलेली आढळून येत नाही.

लेणी क्र. १, १७ आणि २० मध्ये आपल्याला बी प्रकारातील दरवाजे आढळून येतात. पण यामध्ये एक उणीव आढळून येत होती. दरवाजे लाकडांपासून विशेषतः बांबूपासून तयार केलेले असत. गोलाकार खाचेत बांबूचे एक टोक अडकवून दरवाजा उघडता-बंद करता येई. पण यामुळे दरवाजा पूर्ण लागत नसे. अर्धवट उघड्या राहिलेल्या दरवाजाच्या फटी मधून सरपटणारे प्राणी आतमध्ये येण्याची भीती होती.

या गोष्टीचा विचार करता दोन्ही बाजूला खाचा तयार कराव्यात आणि त्यात दरवाजा बसवावा, असे ठरले. या सी प्रकारातील दरवाजे आपल्याला बऱ्याच लेणींमध्ये आढळून येतात (उदा. लेणी क्र. १, १७, १९, २०). पण, अजिंठ्याचे काम जेव्हा इसवी सन ४७४ नंतर काही काळासाठी बंद पडले, तेव्हा इथले कारागीर मध्य प्रदेशमधील बाघच्या लेणींमध्ये काम करण्यासाठी निघून गेले.

तिथून परत अजिंठ्याला येण्यासाठी दोन-तीन वर्षांचा कालावधी लोटला. परत येताना ते अनेक नव्या गोष्टी आपल्यासोबत घेऊन आले. जसे की शिल्पाच्या ऐवजी चित्रकाम, दरवाजे बसवण्याची नवी पद्धत, खिडक्यांना आतील बाजूने खाचा तयार करून बंद करण्याची पद्धत... जेव्हा डी प्रकारातील दरवाजांची निर्मिती होऊ लागली, तेव्हा या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला.

चौकटीच्या आतमध्येच दरवाजा बसवण्यात येऊ लागल्यामुळे खोलीचे प्रवेशद्वार संपूर्णपणे बंद होऊ लागले आणि कोणत्याही प्रकारची भीती किंवा धोका उरला नाही. कोणत्या प्रकारचे दरवाजे खोल्यांना बसवण्यात यायला हवेत, हा विचार करण्यासाठी दोन- तीनशे वर्षांचा कालावधी लागेल हा विचार हास्यास्पद आहे.

अजिंठा इथल्या लेणीच्या उत्क्रांतीच्या टप्प्यातील आणि त्याचा लघु कालक्रम ठरवण्याच्या प्रक्रियेत ‘दरवाजे'' हा अतिशय महत्त्वाचा घटक असल्याचं डॉ. स्पिंक यांनी नमूद करून ठेवलंय. अजिंठ्याचा खगोलशास्त्रीय संबंध सुद्धा डॉ. स्पिंक यांनी प्रकाशझोतात आणला. यासाठी लेणी क्र. १९ व लेणी क्र. २६ अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे. लेणी क्र. २६ हे एक चैत्यगृह आहे. इतर चैत्याप्रमाणेच लेणी गजपृष्ठकार असून खांबांची रांग आणि मध्यबिंदूवर असणारा स्तूप अशीच रचना आहे.

पण येथील डाव्या आणि उजव्या बाजूच्या खांबांचं स्तूपापासून असणारं अंतर कमी-जास्त आहे. डावीकडील खांब स्तूपापासून उजवीकडील खांबांपेक्षा काही इंच फरकानं लांब आहे. हा फरक का असावा, असा प्रश्न डॉ. स्पिंक यांना पडला. तीस वर्षांपूर्वी कोलोरॅडो विद्यापीठातील खगोलशास्त्रीय अभ्यासक ‘डॉ. केनेथ मालविल’ यांची मदत घेऊन त्यांनी या प्रश्नाचं उत्तर शोधलं आणि जे उत्तर मिळालं ते अचंबित करणारे होते.

स्तूपाचे मुख्य प्रयोजन हे दोन्ही बाजूला आणि मागील बाजूला असणाऱ्या खांबाच्या मध्यबिंदूवर करण्यात येते. पण या लेणीत तसा प्रकार आढळून आला नाही. कारण जर मध्यबिंदूवर स्तूपाची निर्मिती करण्यात आली असती, तर त्याचा अक्ष ६४.४६ अंश आला असता. पण स्तूप त्याच्या मूळ जागेवरून काहीसा उजवीकडे सरकवल्या गेल्यामुळे त्याचा अक्ष ६७.७१ अंश असा झाला.

तीन अंशांचा फरक आणि हिवाळ्यातील सूर्याचा संक्रमणअवस्थेतील किरणांचा खेळ लेणीमध्ये होऊ लागला. सूर्यप्रकाश थेट स्तूपापर्यंत यावा म्हणून तीन अंशांने तो उजवीकडे सरकवण्यात आला. हीच तडजोड आपल्याला लेणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर असणाऱ्या चैत्य कमानीसोबत सुद्धा केल्याचं ठळकपणानं जाणवतं.

उजवीकडील बाजू ही डाव्या बाजूपेक्षा कमी आहे आणि त्यावर शिल्पांची रचना ही डाव्या बाजूप्रमाणे सुटसुटीत नाही हे आपल्या लक्षात येतं. एवढंच नाही, तर स्तूपाच्या डाव्या बाजूला आपल्याला तीन बौद्ध उपासकांच्या खंडित प्रतिमा दिसतात. पण उजवीकडं अशी कोणतीही प्रतिमा दिसत नाही, त्याउलट त्या ठिकाणी आपल्याला खड्डा तयार केलेला दिसतो. जेव्हा लेणींचं काम बंद पडले होते, तेव्हा उजव्या बाजूचा खडक आधीच फोडून झाला होता.

काम पुन्हा सुरू झाल्यावर डाव्या बाजूस शिल्लक असलेल्या दगडावर तीन बौद्ध उपासकांची प्रतिमा तयार करण्यात आली. पण उजव्या बाजूला तसं करण्यासाठी दगडच नव्हता. म्हणून त्याजागी खड्डा तयार करून त्यामध्ये लाकडी प्रतिमा लावली असावी, असे डॉ. स्पिंक यांनी लिहून ठेवलंय.

अजिंठ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे असणारी चित्रे. लेणी क्र. १ मध्ये असणाऱ्या पद्मपाणीचे चित्र अजिंठ्याची ओळख आहे, साऱ्या जगात प्रसिद्ध आहे. या लेणीचा निर्मिती कालखंड दोन-अडीचशे वर्षांचा ठरवण्यामागे एक चित्र कारणीभूत आहे, ते म्हणजे ‘पर्शियन शिष्टमंडळाचे’. बरेच अभ्यासक या चित्राचा संबंध चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याच्या दरबारात आलेल्या खुसरो दुसरा या पर्शियन राजाच्या शिष्टमंडळाशी लावतात.

ही परंपरा जेम्स बर्जेस आणि फर्ग्युसन यांच्यापासून चालत आलेली आहे. पण, १९९६ मध्ये जर्मन संशोधक डॉ. श्लिंगलॉफ यांनी हे चित्र ‘महासुदर्शन जातक’ कथेमधील एका प्रसंगावर आधारित असल्याचं सप्रमाण सिद्ध केलं. त्यामुळे अजिंठ्याचा निर्मिती कालक्रम, जो दोन-अडीचशे वर्षांचा सांगण्यात येत असे, तो खोडला गेला.

अजिंठ्याच्या लेणींमध्ये अशा भरपूर रोमांचकारक गोष्टी आहेत. अजिंठा भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी निर्मिती आहे. मागील शंभर वर्षांपासून संपूर्ण जगाला या लेणींचे वेड लागले आहे. डॉ. वॉल्टर स्पिंक सारखे इतिहास संशोधक या लेणीच्या अभ्यासासाठी भारतात आले. त्या योगानं घारापुरी, घटोत्कच, वेरुळ सारख्या लेणींवर नवा प्रकाशझोत पडला.

भारताच्या इतिहासाला ‘लघु कालक्रम’ पद्धतीची देणगी मिळाली. एका लेणीच्या निर्मितीमागे झटणारे वाकाटक हेच भारताचं खरे सुवर्णयुग निर्माणकर्ते होते, हे सिद्ध करता आलं. अजिंठा वेड लावणारे आहे. अजिंठा ही प्रेमकविता आहे. अजिंठा भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा थक्क करणारा असा वारसा आहे.

(लेखक पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT