- केतन पुरी, ketan.author@gmail.com
अजिंठ्याच्या लेणींची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण मागील काही लेखांमधून केला. अजिंठा असं नाव उच्चारलं, की आपसूकपणे वेरुळचं नाव आपल्यासमोर येतं. कित्येक लोकांचा हा गैरसमज असतो, की अजिंठा आणि वेरुळ एकदम जवळ आहे किंवा एकाच जागी आहे. वास्तविकदृष्ट्या, अजिंठा आणि वेरुळमध्ये तब्बल १०० किमी चे अंतर आहे.
जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणापासून, म्हणजे छत्रपती संभाजीनगरपासून वेरुळ तीस किलोमीटर तर अजिंठा वेरुळच्या विरुद्ध दिशेला शंभर किलोमीटर अंतरावर आहे. वेरुळ महत्त्वाचं ठिकाण आहे. अगदी पूर्व मध्ययुगीन काळापासून उत्तर मध्ययुगापर्यंत वेरुळ कायम महत्त्वाच्या राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी राहिले आहे.
राष्ट्रकूट राजांनी याच वेरुळमधून कित्येक वर्षे कारभार हाकला. महाराष्ट्रात उदयास आलेल्या अनेक राजवटींपैकी राष्ट्रकूट एक बलाढ्य राजसत्ता म्हणून पूर्व मध्ययुगात वावरली. संपूर्ण दख्खन भागावर त्यांचं वर्चस्व होतं. यादवांनी याच भागातून राज्यवाढीसाठी मोहिमा आखल्या. वेरुळपासून जवळच असलेल्या देवगिरी किल्ल्यावर त्यांचे सत्ताकेंद्र होते. दख्खनमधील पहिलं परकीय आक्रमण याच भूमीवर झाले.
उत्तर मध्ययुगीन काळात मालोजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात वेरुळ गावचा कारभार चालत होता. भोसले घराण्याकडे या गावाची परंपरागत पाटिलकी होती. आजही भोसले घराण्याच्या स्मृती वेरुळने जपून ठेवल्या आहेत. वेरुळपासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खुलताबाद गावामध्ये अडीच हजारांपेक्षा जास्त कबरी आहेत. त्यात काही सुफी संतांच्या आहेत, काही मुस्लिम धर्मगुरुंच्या आहेत.
काही महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींच्या आहेत. त्यामध्ये मुघलांचा सहावा बादशाह औरंगजेबाची कबर, त्याचा मुलगा आणि सुनेची कबर आहे. नगरच्या निजामशाहीमधील पहिल्या दोन राजांची, त्यांच्या बेगमेची, गोवळकोंडा येथील बादशाह अबुल हसन तानाशाह, हैदराबाद निजामशाहीचा संस्थापक असफ जाह पहिला, त्याचा मुलगा, प्रसिद्ध सरदार मलिक अंबर यांसारख्या कित्येकांच्या कबरी या परिसरात आहेत.
इसवी सन पाचव्या-सहाव्या शतकात वेरुळच्या परिसरात लेणींची निर्मिती होण्यास सुरुवात झाली. अजिंठा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मागे असणाऱ्या लेणी, घटोत्कच लेणी असा प्रवास करत करत प्रतिभासंपन्न कारागीर वेरुळला येऊन पोचले. तिथल्या डोंगरावर सुरुवातीला बौद्ध लेणींची निर्मिती करण्यास सुरवात केली. वज्रयान संप्रदायाला या लेणी समर्पित करण्यात आल्या होत्या.
वेरुळला ३४ लेणी पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यांपैकी १ ते १२ क्रमांकाच्या बौद्ध लेणी आहेत. १३ ते २९ क्रमांकाच्या लेणी हिंदू तर लेणी क्र. ३० ते ३४ जैन लेणी आहेत. एकाच ठिकाणी बौद्ध, जैन, हिंदू धर्माचा झालेला संगम त्या भागाचे धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय महत्त्व सांगण्यासाठी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीची कल्पना देण्यासाठी पुरेसे आहे.
वेरुळच्या लेणींचा पहिला उल्लेख आढळतो राष्ट्रकूट राजा कर्क द्वितीय याच्या ताम्रपटात. त्यानंतर संत ज्ञानेश्वर आणि चक्रधर स्वामी यांच्यावर आधारित असलेल्या लीळाचरित्रमध्ये वेरुळच्या लेणींचा विशेषतः कैलास लेणीचा उल्लेख आढळतो. वेरुळवर पहिल्या शास्त्रशुद्ध अभ्यासाला सुरुवात झाली इसवी सन १८०१ मध्ये. ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी ''चार्ल्स मॅलेट'' याने ''जेम्स मॅनली'' हा सहकारी आणि गंगाराम नामक ''ड्राफ्ट्समन'' हाताशी धरला आणि कैलास लेणीचा प्लॅन तयार केला.
थॉमस डॅनिअल आणि जेम्स वेल्स यांनी वेरुळच्या लेणींची अप्रतिम चित्रे रेखाटली. त्यानंतर इसवी सन १८३४ मध्ये जे. बी. सिली याने ''The Wonder of Ellora'' नामक ग्रंथ तयार केला. वेरुळचं त्याने ''भव्य'' आणि ''अद्भुत'' शब्दांत वर्णन केले. या ग्रंथामुळे आणि काढलेल्या चित्रांमुळे वेरुळच्या लेणींचा युरोपात सर्वत्र प्रचार-प्रसार झाला.
हा तोच काळ होता, ज्या वेळी अजिंठ्याच्या लेणींचे आकर्षण युरोपात वाढू लागले होते. त्यापासून शंभरेक किमी अंतरावर असणाऱ्या या वेरुळच्या लेणीसुद्धा अभ्यासक, संशोधक, चिकित्सक, चित्रकार, पर्यटकांना खुणावू लागल्या होत्या. यामुळे साइक्स, ग्रिंडले, जेम्स बर्जेस, जेम्स फर्ग्युसन सारखे अभ्यासक वेरुळच्या लेण्यांवर अभ्यास करण्यासाठी येऊ लागले.
दुसरीकडे, याच काळात मराठा साम्राज्यात भयंकर राजकीय उलथापालथी होत होत्या. यशवंतराव होळकर यांचा भारताच्या राजकीय पटलावर उदयाचा तो काळ... यानंतर अवघ्या सतरा वर्षांनी मराठा साम्राज्य अस्ताला गेले. तरीसुद्धा एका ''मराठी'' व्यक्तीचे वेरुळवर चिकित्सक, अभ्यासू किंवा संशोधनात्मक दृष्टीने ''मराठी भाषेतून'' लिखाण प्रसिद्ध होण्यासाठी किती काळ ओलांडावा? तब्बल १५७ वर्षे.
चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वरांपासून वेरुळवर सुरू असणारा लिखाणाचा प्रवाह मध्येच खंडित झाला. इंग्रजांच्या कार्यानंतर सुद्धा ''मराठीत'' पहिल्यांदा वेरुळच्या लेणीला न्याय दिला म. न. देशपांडे या थोर पुरातत्त्व अभ्यासकानं. सन १९५८ मध्ये ''मराठवाडा'' दिवाळी अंकात वेरुळविषयी सविस्तर निबंध देशपांडेंनी प्रसिद्ध केला. ढवळीकर, माटेंसारख्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांनी इंग्रजीतून प्रचंड काम केले होते. पण मराठीतून सर्वसामान्य लोकांना समजावं आणि खऱ्या इतिहासावर आधारित असावं असे काम प्रकाशित व्हायला दीड शतक वाट पाहावी लागली.
आजही वेरुळ अनेक गैरसमजानं व्यापून गेले आहे. आपल्याच पूर्वजांनी घडवलेलं हे अद्भुत विश्व परग्रहवासीयांनी निर्माण केलं, अशी माहिती सांगणारी कित्येक मंडळी युट्यूब, गुगल सारख्या माध्यमात अग्रेसर झाली आहेत. कैलासची निर्मिती ‘पांडवांनी एका रात्रीत केली’ असं म्हणताना मानवी कलेच्या सर्वोच्च कर्तृत्वाकडे आपण डोळेझाक करतो.
अजिंठ्याप्रमाणे वेरुळ विस्मृतीत गेलं नाही. त्याच्या वाट्याला उपेक्षा आली नाही अथवा काळाच्या गर्तेत वेरुळ हरवलं सुद्धा नाही. अगदी अलीकडेच अहिल्यादेवी होळकर यांनी त्याचा जीर्णोद्धार केला होता. पण वेरुळ मात्र प्रचंड गैरसमजुतीच्या फेऱ्यात अडकलं आहे.
वेरुळ दख्खनचं प्रतिबिंब आहे. दक्षिणेचा आणि मध्य भारताचा मिलाफ झालेलं ठिकाण आहे. हिंदू, जैन, बौद्ध धर्माचा ''महासमन्वय'' झालेलं ठिकाण आहे. कधी कधी वाटतं, अजिंठा सुदैवी आहे कारण त्या लेणींना ''वॉल्टर स्पिंक'' सारखा चाणाक्ष अभ्यासक लाभला. वेरुळविश्वाला सुद्धा अशाच एका ''वॉल्टर'' ची गरज आहे.
(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.