Tianwen-1 Sakal
सप्तरंग

‘ड्रॅगन’ची मंगळभरारी

अंतराळ संशोधनात आघाडी घेण्याची महत्वकांक्षा बाळगणाऱ्या चीनने नुकतीच १४ मे रोजी मंगळावर यशस्वीरित्या बग्गी उतरविली.

अजेय लेले

अंतराळ संशोधनात आघाडी घेण्याची महत्वकांक्षा बाळगणाऱ्या चीनने नुकतीच १४ मे रोजी मंगळावर यशस्वीरित्या बग्गी उतरविली. लॅंडिंगनंतर प्रणालीला जोडलेले सौर पंखे उघडण्यासाठी आणि पृथ्वीवर परत संदेश पाठविण्यासाठी बग्गीला १७ मिनिटे लागली. पृथ्वी मंगळापासून ३२ कोटी किलोमीटर अंतरावर असून मंगळावरून रेडिओ संदेश पृथ्वीवर पोचण्यास १७ ते १८ मिनिटे लागतात, ही बाब येथे ध्यानात घेण्याजोगी. काही दिवसांनंतर या बग्गीने तेथील पृष्ठभागावर फिरण्यास सुरुवात केली आहे. झुरोंग (अग्निदेवता) असे नाव असलेली ही बग्गी मंगळावर तीन महिने राहणे अपेक्षित आहे. मंगळावरील युटोपिया प्लॅनिटिया भागात ती व्यवस्थित उतरली.

चीनने आपली महत्वाकांक्षी ‘तियानवेन-१’ ही अंतराळ मोहिम २३ जुलै २०२० रोजी सुरू केली. त्यात ‘लाँग मार्च ५’ या प्रक्षेपकाच्या मदतीने पाच टन वजनाचे ‘तियानवेन - १’ हे यान अंतराळात पाठविण्यात आले. त्यात ऑर्बिटर आणि बग्गीचाही समावेश आहे. सुमारे सात महिन्यांच्या प्रवासानंतर या यानाने १० फेब्रुवारी २०२१ रोजी मंगळाच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला. तेंव्हापासून यान मंगळाभोवती भ्रमण करत होते. मंगळावर बग्गी उतरविण्यासाठी योग्य जागा निश्चित करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निरीक्षणेही यानाने ‘हाय रिझोल्युशन’ कॅमेरांच्या मदतीने टिपली. त्यानंतर, पॅराशूटच्या मदतीने बग्गी उतरिवण्यात आली.

‘झुरोंग’ ही सौरऊर्जेवर चालणारी सहाचाकी बग्गी असून तिचे वजन २४० किलो आहे. मंगळाचा अभ्यास करण्यासाठी बग्गीवर सहा वैज्ञानिक उपकरणेही बसविलेली आहेत. त्यात, कॅमेऱ्यासह पृष्ठभागावरील रडार, स्पेक्ट्रोमीटर, मॅग्नेटोमीटर आणि वातावरणीय सेन्सरचा समावेश आहे.

मंगळावरील पाण्याच्या अस्तित्वाबद्दल नेहमीच कुतूहल आहे. मंगळाचा पृष्ठभाग खोदून त्याखाली बर्फाळ स्वरूपात पाणी आहे का, याचा शोधही घेण्यात येणार आहे. मंगळाची भूमी लक्षात घेऊन कॅमेरे बनविले असून माती आणि खडकांचे रासायनिक विश्लेषण करण्याच्या दृष्टीने सेन्सरची रचना केली आहे. त्याचप्रमाणे, हवामान स्थानक आणि चुंबकीय क्षेत्र शोधकाचाही (डिटेक्टर) या उपकरणांत समावेश आहे.

‘तियानवेन १’ या ऑर्बिटरवर सात पेलोड आहेत. मंगळाची भौगोलिक रचना आणि भूशास्त्राचा अभ्यास करणे, हा या अंतराळमोहिमेचा वैज्ञानिक हेतू आहे. मंगळाच्या जमीनीची जाडी आणि तिच्या उपथरांच्या वितरणाच्या अभ्यासाचाही प्रयत्न केला जाईल. व्यापक विचार करता, मंगळाचा पृष्ठभाग, हवामान आणि वातावरणाची रचना समजून घेणे, हा मोहिमेचा अजेंडा आहे. हे ऑर्बिटर दिवसाचे २४ तास किमान एक वर्ष मंगळाचा अभ्यास करेल. प्रथमच मंगळाच्या पृष्ठभागावर पाठविण्यात आलेले चुंबकीय क्षेत्र शोधक किंवा डिटेक्टर, हे या मोहिमचे वेगळेपण आहे. बग्गीवरील मॅग्नेटोमीटर ‘तियानवेन-१’ ऑर्बिटरवरील मॅग्नेटोमीटरशेजारी काम करेल. मंगळाच्या चुंबकीय क्षेत्राच्या निरीक्षणामुळे या ग्रहाच्या इतिहासाविषयी रोमांचक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. मंगळावरील खडकाच्या चुंबकीय गुणधर्माबद्दल अधिकचे ज्ञान मिळाल्याने हे शक्य होईल.

यापूर्वीही चीनने २०११ मध्ये ‘यिंगहुओ-१’ अंतराळमोहिमेच्या माध्यमातून मंगळाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता. दुर्देवाने,ही मोहिम अयशस्वी ठरली. चीनचे यिंगहुओ -१ आणि रशियाचे ‘फोबोस-ग्रंट’ अंतराळ यान ८ नोव्हेंबर २०११ रोजी ‘झेनिट’ या युक्रेनियाच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने एकत्र प्रक्षेपित केले होते. या दोन्ही यानांचे उद्दिष्ट वेगळे होते. चीनच्या यानाची रशियाच्या यानाबरोबर गुंतागुंत झाली. यिंगहुओ ऑक्टोबर २०१२ मध्ये फोबोस-ग्रॅंटपासून विभक्त होणे अपेक्षित होते. चीनचे यान जवळपास दोन वर्षे मंगळाच्या कक्षेत फिरून निरीक्षणे नोंदविणार होते. तर रशियाचे यान मंगळाच्या ‘फोबोज’ या चंद्राच्या पृष्ठभागावरील नमुने जमविणार होते. प्रक्षेपणानंतर ‘फोबोस-ग्रंट’ला पृथ्वीची कक्षा सोडून मंगळाच्या दिशेने प्रवास करण्यासाठी दोनदा ज्वलनांची गरज होती. मात्र, ते न झाल्याने मोहिमेची अपयशी सांगता झाली. या अपयशी मोहिमेनंतर चीनला पुढच्या अंतराळ मोहिमेसाठी दशकभर वाट पाहावी लागली.

मंगळ मोहिमेसाठी प्रक्षेपण करण्याची संधी २६ महिन्यांतून एकदाच मिळते, कारण पृथ्वी आणि मंगळ एवढया महिन्यांनंतर एकमेकांपासून सर्वांत जवळच्या बिंदूवर येतात. नुकतीच चालू वर्षी तियानवेन - १ च्या माध्यमातून ही संधी केवळ चीनने साधली नाही, तर अमेरिका, संयुक्त अरब अमिरातींनी आपल्या मंगळ मोहिमांना सुरुवात केली. अमिरातीने या मोहिमेतंर्गत ‘होप’ हे यान मंगळावर पाठविले असून त्याने फेब्रुवारी २०२१ मध्ये नुकताच मंगळाच्या वातावरणात प्रवेश केला. आता हे यान व्यवस्थित काम करत आहे. त्याचप्रमाणे, अमेकिनेही ३० जुलै २०२० रोजी ‘पेर्सेवेरन्सस’ या यानाचे प्रक्षेपण केले. यानाची बग्गी १८ फेब्रुवारी २०२१ रोजी मंगळावर यशस्वीपणे उतरली. अमेरिकेची ही मोहिमही मंगळावर समाधानकारकरित्या असून नुकतेच मंगळाच्या पृष्ठभागावर ड्रोनही उडविण्यात आले. मंगळाच्या व्यापक निरीक्षणाची उद्दिष्टे असणारी ही अमेरिकेची प्रगत अंतराळ मोहिम आहे.

तियानवेन -१ / झुरोंगचे यश हे चीनच्या अंतराळ कार्यक्रमाचे एकमेव यश नव्हे. चीनने अल्पावधीत अंतराळ मोहिमांमध्ये गगनभरारी घेतली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चीनची बग्गी आधीपासूनच काम करतेयं. लवकरच त्यांचे अंतराळ स्थानकही कार्यान्वित होईल. रशियाबरोबर चंद्र संशोधन केंद्राची उभारणी करण्याचेही चीनचे नियोजन आहे. चीन अंतराळ संशोधनाची विविध क्षेत्रे एकाचवेळी कवेत घेत आहे, हेच यातून सूचित होते. चीन अंतराळ क्षेत्रातही सुनियोजित व विचारपूर्वक गुंतवणूक करत आहे. अंतराळाचे वैज्ञानिक, व्यावसायिक व सामारिक पैलू लक्षात घेवून सुस्पष्ट योजनेद्वारे हा देश प्रगती करत आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे बग्गी उतरविल्याने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात जगभरात चीनची प्रतिष्ठा वाढणार आहे.

(लेखक संरक्षण विषयातले तज्ज्ञ असून विज्ञान क्षेत्रातील घडामोडींचेही अभ्यासक आहेत)

(अनुवाद : मयूर जितकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT