Egypt sakal
सप्तरंग

भारत-इजिप्त संबंध एक धोरणात्मक भागीदारी

भारत आणि इजिप्त हे दोन्हीही जगातील अतिशय प्राचीन संस्कृती असलेले देश आहेत. या दोन संस्कृतींमध्ये गेली हजारो वर्षं सतत संपर्क होत राहिलेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

भारत आणि इजिप्त हे दोन्हीही जगातील अतिशय प्राचीन संस्कृती असलेले देश आहेत. या दोन संस्कृतींमध्ये गेली हजारो वर्षं सतत संपर्क होत राहिलेला आहे.

- अजित गुप्ते, saptrang@esakal.com, @AjitVGupte

भारत आणि इजिप्त हे दोन्हीही जगातील अतिशय प्राचीन संस्कृती असलेले देश आहेत. या दोन संस्कृतींमध्ये गेली हजारो वर्षं सतत संपर्क होत राहिलेला आहे. फेरोनिक काळात (सुमारे इ.स.पू. ३१५० ते इ.स.पू. ५०) मम्मीजचं लेपन करण्यासाठी ज्या तेलांचा वापर होत असे, ती सारी तेलं समुद्रमार्गे भारतातूनच आणली जात असत, असं मानलं जातं. इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकातील आज्ञापत्रात सम्राट अशोकाने द्वितीय टॉलेमीबरोबर असलेल्या आपल्या संपर्काचा उल्लेख केलेला आढळतो. आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या जानेवारीतच सांगितलं की, गुजरातमधील लोथल या प्राचीन बंदरात, इजिप्तमधून ४००० वर्षांपूर्वी आणल्या गेलेल्या कलाकृती होत्या.

या दोन देशांत शतकानुशतकं सागरी दळणवळण सुरू होतं. मालाची आणि वस्तूंची सागरी मार्गाने देवाण-घेवाण होत होती. आज इजिप्तमध्ये आंबा सर्वत्र आढळतो. भारतीय व्यापाऱ्यांनीच तो तिथं आणला याबद्दल शंका नाही.

इजिप्तमध्ये कोशियारी नावाचा एक पदार्थ मोठ्या आवडीने खाल्ला जातो. हा खाद्यपदार्थ जवळजवळ आपल्या खिचडीसारखाच आहे. पहिल्या महायुद्धात हजारो भारतीय सैनिक इजिप्त आणि पॅलेस्टाईनमध्ये ओटोमन साम्राज्याविरुद्ध आणि जर्मनीविरुद्ध लढले आणि सुमारे चार हजार भारतीय सैनिक याच भूमीवर धारातीर्थी पडले, ही गोष्ट लोकांना फारशी माहीत नाही; पण या सैनिकांच्या सन्मानार्थ कैरो शहरातील हेलिओपोलिस इथं एक भव्य स्मारक उभारण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धातही १९४२ मध्ये झालेल्या अल-अलामीनच्या प्रसिद्ध लढाईत तीन हजारांपेक्षा जास्त सैनिक मृत्युमुखी पडले. अल अलामीन शहरातील कॉमनवेल्थ स्मारकात त्यांचीही स्मृती जपली गेलेली आहे.

या दोन्ही राष्ट्रांतील स्वातंत्र्यचळवळींनी परस्परांना प्रेरणा दिलेली आहे. साद झघलौल या इजिप्शिअन नेत्याशी महात्मा गांधींचा दाट संपर्क होता. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्त होताच आपल्याशी राजनैतिक संबंध सुरू करणाऱ्या पहिल्या काही राष्ट्रांत इजिप्तचा समावेश होता. आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दुल नासेर या दोघांत दुर्मीळ स्वरूपाची अतिघनिष्ठ मैत्री होती.

पन्नासच्या दशकातील या मैत्रीचा परिपाक म्हणून १९५५ मध्ये या दोन देशांत ‘मैत्रीचा करार’ करण्यात आला. नंतर १९६१ मध्ये भारत, इजिप्त आणि युगोस्लोव्हिया यांनी मिळून अलिप्त राष्ट्रसमूह चळवळ उभारली, तेव्हापासून या देशांनी बहुराष्ट्रीय व्यासपीठावर परस्परांना घनिष्ठ सहकार्य केलं. या देशांत उच्चतर पातळीवर सतत संपर्क राहिला आणि पुढील अनेक दशके त्यांचे द्विपक्षीय संबंध सातत्याने गतिमान राहिले.

दुसरा एक योगायोग असा की, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फतेह अल-सीसी आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही एकाच वर्षी म्हणजे २०१४ मध्ये सत्तेवर आले. उभय देशांतील संबंध त्यानंतर सतत सुधारतच गेले आहेत. राष्ट्राध्यक्ष सीसी यांनी सुरुवातीच्या काळात भारताला दोन वेळा भेट दिली आहे. ऑक्टोबर २०१५ मध्ये ते आशिया-आफ्रिका मंच शिखर परिषदेला आले होते आणि नंतर सप्टेंबर २०१६ मध्ये ते अधिकृत शासकीय दौऱ्यावर आले. तेव्हापासून आजवर उभय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही परस्परांच्या देशांना भेटी दिल्या आहेत. याशिवाय मंत्रिपातळीवरही अनेक महत्त्वपूर्ण भेटी झालेल्या आहेत.

कोरोनाच्या महासाथीने या आंतरक्रियांना काहीशी खीळ बसली. मार्च २१ मध्ये मी राजदूत म्हणून माझ्या पदावर रुजू झालो तेव्हा दोनेक वर्षे फारसा परस्परसंवाद होऊ शकलेला नव्हता. माझ्या कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांचं व कर्मचाऱ्यांचं लसीकरण रीतसर पूर्ण झाल्याची खात्री पटताच सर्वप्रथम संरक्षण क्षेत्रातील सहकार्य आणि व्यापारी संबंध यांना प्रोत्साहन देत मी उभय देशांतील दीर्घकालीन संबंध पूर्ववत करायला सुरुवात केली.

कोरोनाची महासाथ जोरातच असली तरी खुद्द इजिप्तला मात्र त्याचा तीव्र तडाखा बसलेला दिसत नव्हता. इजिप्तने जुलै २०२१ मध्ये प्रत्यक्ष स्वरूपात व्यापार प्रदर्शनं आणि मेळावे आयोजित करावयास सुरुवात केली. आम्ही भारतीय कंपन्यांना या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी पुरेपूर प्रोत्साहन दिलं. आमच्या कित्येक निर्यात प्रोत्साहन मंडळांनी आणि चेंबर्स ऑफ कॉमर्सनी आपली शिष्टमंडळं इजिप्तला धाडली.

महामारीच्या या प्रदीर्घ कालखंडात आपण प्रथमच भारताबाहेर जात असल्याचं त्या साऱ्यांनीच मान्य केलं. २०२१ च्या जुलैपासून आजवर ६०० हून अधिक कंपन्यांनी इजिप्तमधील एकूण १५ व्यापार प्रदर्शनांत सहभाग नोंदवला. २०२१-२२ या आर्थिक वर्षात आमचा द्विपक्षीय व्यापार विक्रमी ७५ % नी वाढला आणि त्यात आम्ही ७.२६ अब्ज अमेरिकन डॉलर अशी आजवरची सर्वोच्च पातळी गाठली, ही बाब आम्हाला विशेष प्रोत्साहक वाटते.

या दोन देशांतील संरक्षण संबंधही आपण अधिक बळकट केले. ऑक्टोबर २०२१ मध्ये, इतिहासात प्रथमच, आम्ही उभय देशांच्या हवाई दलाच्या लढाऊ विमानांचा संयुक्त सराव आयोजित केला. भारताचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ मध्ये इजिप्तला भेट दिली. पाठोपाठ जुलै २०२२ मध्ये इजिप्तच्या हवाई दल प्रमुखांनी भारताला भेट दिली. भारतीय नौदलाच्या जहाजांच्या अनेक इजिप्त भेटी घडवून आणायला आपल्या वकिलातीने मदत केली. या जहाजांनी बंदराला लागल्यावर इजिप्शियन नौदलाच्या साथीने सागरी कवायती केल्या.

जून २०२२ मध्ये कैरो इथं आयोजित, महिनाभराच्या ‘रणनीतिक नेतृत्व कृती-कार्यक्रमात’ सहभागी होऊन आपल्या निष्णात लढाऊ वैमानिकांनी इजिप्तच्या हवाई दलाच्या अग्रणी लढाऊ वैमानिकांच्या साथीने अनेक गुंतागुंतीची सराव प्रात्यक्षिकं करून दाखवली, तेव्हा दोन्ही राष्ट्रांच्या हवाई दलांच्या खास संबंधांनी एक नवी उंची गाठली.

अशा रीतीने आपले सरंक्षण संबंध आणि परस्परांतील विश्वास वृद्धिंगत होत असतानाच इजिप्तने, आपले संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना कैरो भेटीचं आमंत्रण दिलं. २०२२ च्या सप्टेंबर महिन्यात इजिप्तमध्ये त्यांचं अत्यंत आपुलकीने भव्य स्वागत करण्यात आलं. या भेटीदरम्यान भारत आणि इजिप्त यांनी संरक्षण सहकार्याबाबतच्या एका सामंजस्य करारावर सह्या केल्या. संरक्षण साधनांची संयुक्तपणे निर्मिती करणं आणि परस्परांतील सहकार्य वाढवणं यावर भर देण्याबाबत या दोन्ही राष्ट्रांची सहमती झाली.

आपले परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान इजिप्तला भेट दिली. द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासंबंधी त्या वेळी झालेली चर्चा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांविषयीच्या परस्परांच्या दृष्टिकोनांचं आदान-प्रदान यामुळे आपले मैत्रबंध अधिकच घट्ट व्हायला खूपच मदत झाली. यापाठोपाठ आपले पर्यावरणमंत्री श्री. भूपेंद्र यादव COP-२७ च्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीसाठी इजिप्तला आले. नोव्हेंबर २०२२ मध्ये शर्म अल-शेख या शहरात सागरकिनाऱ्यावरील एका सुंदर पर्यटक निवासात ही बैठक झाली.

दोन्ही देशांतील वाढतं बहुआयामी सहकार्य ध्यानी घेऊन जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या आपल्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष सीसी यांना आमंत्रित करण्याचं भारताने ठरवलं. जी २० राष्ट्रसमूहाच्या आपल्या अध्यक्षपदाच्या कालावधीत इजिप्तला अतिथी देश म्हणून आमंत्रित करण्याचा निर्णयही आपण घेतला. २४ ते २६ जानेवारी २०२३ दरम्यान झालेली राष्ट्राध्यक्ष सीसी यांची ऐतिहासिक भारतभेट आणि आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात इजिप्शियन सैन्यदलाच्या एका पथकाचा सहभाग, हा उभय राष्ट्रांच्या स्नेहसंबंधांतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

राष्ट्राध्यक्ष सीसी आणि आपल्या नेत्यांमध्ये उत्कृष्ट भावबंध आणि सौहार्द निर्माण झालं आणि त्यातून आपलं नातं अधिक उंचावून त्याचं रूपांतर ‘रणनीतिक भागीदारी’मध्ये करण्याचा निर्णय घेतला गेला. जानेवारी २०२३ पासून आजवर द्विपक्षीय संबंध अधिक विकसित करण्याच्या हेतूने माहिती व तंत्रज्ञानमंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री अशा इजिप्तच्या तीन प्रभावशाली मंत्र्यांनी भारताला भेट दिली. पुढील तीन महिन्यांत मंत्रिपातळीवरील आणखी भेटींचं, तसंच संयुक्त कार्यकारी गटांचंही नियोजन करण्यात आलं आहे. या सर्व गोष्टींमुळे आपलं कार्यात्मक सहकार्य अधिक सखोल बनेल.

आपल्या या संबंधांतील एक रोचक बाब अशी की, भारतातील ५० हून अधिक मोठमोठ्या कंपन्यांनी इजिप्तमध्ये ३.२ अब्ज रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. इजिप्तमधून विकसित राष्ट्रांना होणाऱ्या निर्यातीत या कंपन्यांचा वाटा लक्षणीय आहे. इजिप्त हा युरोपच्या जवळ आहे. तिथं पुरेशी वीज आणि प्रशस्त मोकळ्या जागाही उपलब्ध आहेत. त्यामुळे भारतीय कंपन्यांच्या दृष्टीने आखाती देश, युरोप आणि आफ्रिकेतील बाजारपेठांमध्ये शिरकाव करण्यासाठी इजिप्त हे उपयुक्त उत्पादन स्थळ ठरू शकतं. साहजिकच भारतीय कंपन्या नजीकच्या भविष्यकाळात इजिप्तमध्ये आणखी ८० कोटी डॉलर इतकं भांडवल गुंतवण्याच्या योजना आखत आहेत.

फेरोनिक मंदिरं आणि आपली हिंदू मंदिरं यांमधील साम्य निरखणं हा इजिप्तमध्ये मला मिळालेला एक अद्‍भुत अनुभव होता. कारण त्यांची रचना आश्चर्य वाटावं इतकी सारखीच दिसते. फेरोनिक कालखंडात इजिप्शियन लोक देवदेवतांची भक्ती करत. उदाहरणार्थ - आमुन-रा हा त्यांचा सूर्यदेव होता, इसिस ही प्रेमदेवता होती, थोठ हा ज्ञानाचा देव होता... असे अनेक देव ते पूजत असत. या देवदेवतांच्या मूर्ती आपल्या गाभाऱ्याप्रमाणेच मंदिराच्या आतल्या बाजूला अतिपवित्र पुण्यागारात ठेवल्या जात.

आपल्या मंदिरात करतात तसंच तिथलेही पुजारी रोजच्या रोज दूध, तूप, मध आणि पाण्याने या मूर्ती शुद्ध करत. बाहेरच्या बाजूला एक छोटी खोली असे. राजे लोक आणि सरदार मंडळी ईश्वरभक्तीसाठी तिथं बसत. अगदी बाहेरच्या बाजूला एक मोठा कक्ष असे. तिथं सामान्य प्रजा एकत्र जमे. हिंदू संस्कृतीप्रमाणेच मंदिरं आणि राजवाडे नाईल नदीच्या पूर्वेला बांधलेले होते. कबरी मात्र नदीच्या पश्चिमेला बांधलेली होती. लक्सर शहराला भेट देणाऱ्याला ३५०० वर्षांपूर्वी बांधलेली मंदिरं आजही पाहता येतात. हजारो वर्षं अज्ञात राहिलेली आणि एकोणिसाव्या किंवा विसाव्या शतकातच शोधून काढलेली आकर्षक कबरीसुद्धा हे पर्यटक पाहू शकतात.

आणखी एक आश्चर्यकारक साम्य आपल्याला इथं आढळतं. भारतीय आणि इजिप्शियन लोक दिसायला सारखेच आहेत. दोघांच्याही चेहऱ्यांची ठेवण जवळपास सारखीच दिसते. अर्धेअधिक इजिप्शियन लोक अगदी भारतीय लोकांसारखेच दिसतात. इजिप्शियन लोक भारतात आले की, आपले लोक बरेचदा त्यांना भारतीयच समजतात. त्याचप्रमाणे बरेच इजिप्शियन माझ्याशी अरबीत बोलत असतात, ते मला त्यांच्यातलाच समजतात! इजिप्शियन संस्कृतीही बरीचशी आपल्यासारखीच आहे.

कौटुंबिक नात्याला तेही लोक फार महत्त्व देतात. त्यांना बॉलिवूड कमालीचं आवडतं. त्याचप्रमाणे भारतीय संगीत आणि नृत्यही त्यांना फार प्रिय आहे. बच्चन आणि शाहरुख खान ही नावं इजिप्तच्या घराघरांत घेतली जातात. तुम्ही भारतीय आहात हे समोरच्या इजिप्शियन माणसांना कळलं रे कळलं, की ते उत्तेजित स्वरात ओरडतात, ‘‘अमिताभ बच्चन! शाहरुख खान!’

भारत आणि इजिप्त या दोन देशांतील संबंध सर्वांगाने आणि वेगाने वृद्धिंगत होत असल्याचा एक साक्षीदार होता आलं आणि या वृद्धीत थोडाफार वाटाही उचलता आला, हीच माझ्यादृष्टीने माझ्या इथल्या नियुक्तीसंदर्भातली सर्वाधिक लक्षणीय आणि समाधानाची बाब होय.

(लेखक भारताचे इजिप्तमधील विद्यमान राजदूत आहेत.)

अनुवाद : अनंत घोटगाळकर

anant.ghotgalkar@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT