Rain Sakal
सप्तरंग

पाऊस पडला कुणीकडे!

भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा देशात सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तविला असला, तरी महाराष्ट्रासाठी मात्र कमी पावसाची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अमोल कुटे

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे लांबलेले आगमन, मान्सून दाखल झाल्यानंतरही अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून कमकुवत असलेले प्रवाह यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही.

यंदा एल-निनो वर्ष असल्याने दुष्काळाचे सावट असल्याची चर्चा सुरू असतानाच, पावसाचा लहरीपणा, पावसातील खंड यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. मान्सून २०२३ ची सद्यस्थिती आणि पुढील वाटचालीचा घेतलेला हा आढावा...

भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा देशात सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तविला असला, तरी महाराष्ट्रासाठी मात्र कमी पावसाची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गुरुवार (२० जुलै) पर्यंत राज्यात सरासरी ३९४.१ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ९५ टक्के पाऊस झाला आहे.

राज्यातील प्रमुख चार विभाग विचारात घेता, कोकणात सरासरीपेक्षा १२ टक्के अधिक पाऊस झाला आहे. विदर्भात पाच टक्के; तर मराठवाड्यात १२ टक्के कमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने आतापर्यंतच्या पावसात १९ टक्क्यांची तूट असल्याचे दिसून आले आहे.

सांगली जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस झाला असून, मध्य महाराष्ट्रातील नगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर मराठवाड्यातील जालना, हिंगोली, बीड, विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यात पाऊस खुपच कमी आहे.

कोकण, घाटमाथ्यासह, पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने मुंबई, पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे चिंताजनक स्थितीतील पाणीसाठ्यात वेगाने सुधारणा होऊ लागली आहे. राज्याच्या लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांमध्ये मिळून ३७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी हा पाणीसाठा ६४ टक्के होता.

दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील पर्जन्यछायेचा प्रदेश, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. जुलै महिनाअखेरच्या टप्प्यात आला असताना राज्यातील तब्बल ३३५ गावे आणि ९८५ वाड्यावस्त्यांना ३०९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यात नाशिक आणि पुणे विभागातील गावे आणि वाड्या-वस्त्यांची संख्या अधिक आहे.

यंदा पावसाचे आगमन लांबले, यातच पूर्वमोसमी पावसानेही दडी मारल्याने खरीप पिकांच्या पेरण्या लांबल्या. जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्यानंतर पेरण्यांनी वेग घेतला. कृषी विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत राज्यात ७६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात सोयाबीन आणि मका वगळता इतर पिकांखालील क्षेत्र खुपच कमी आहे.

आता पावसाला सुरुवात झाली असली, तरी अनेक पिकांचा पेरणीचा कालावधी निघून गेला आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट असून, पुढील काळात उर्वरित पेरण्यांना गती येणार आहे. परिणामी खरीप पीकांच्या उत्पादनांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

यंदाच्या मान्सूनविषयी बोलताना, ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले, मान्सून काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात सरासरी इतका पाऊस पडणार असून, आतापर्यंत चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. पश्चिम विदर्भात मात्र पावसाचे प्रमाण कमी आहे.

मराठवाड्यात कमी पावसाची शक्यता असून, २० जुलैपर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण आतापर्यंत अत्यल्प असल्याने पेरण्या रखडल्या आहेत. पाऊस सुरू होताच पेरण्यांना वेग येऊ लागला आहे. उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस असून, धुळे, जळगाव जिल्ह्यांत पाऊस काहीसा कमी आहे.

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये आता पावसाचे प्रमाण वाढू लागले आहे. सातारा, सांगली जिल्ह्यांच्या दुष्काळी पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता होती. या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांतही पावसाचे प्रमाण कमी आहे. कोकणात पालघर, ठाणे जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण चांगले आहे. उर्वरित कोकणातही चांगला पाऊस आहे.

जून आणि जुलैमध्ये खंड पडणार असल्याने पेरणीची घाई करू नका, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला होता. ज्या भागात पेरण्या झाल्या, त्या भागात दुबार पेरणीची वेळ आली आहे. अंदाज तंतोतंत बरोबर आल्याचे समाधान वाटते. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मात्र सरासरीइतक्या पावसाचा अंदाज आहे. आता राज्यात बऱ्यापैकी पावसाला सुरुवात झाली आहे.

यंदाच्या मान्सूनचा विचार करता, आतापर्यंत अरबी समुद्राची शाखा पूर्णपणे कमकुवत दिसून आली; तर पावसाचे वातावरण जे तयार झाले ते बंगालच्या उपसागरातील शाखेमुळे तयार झाले. जुलैअखेरपर्यंत बंगालच्या उपसागरात शाखेमुळेच ढग वाहून आणले जात आहेत. उत्तर भारतातदेखील यात वाऱ्यांमुळे पाऊस सुरू असून, अतिवृष्टीही झाली आहे.

उत्तर भारतात हवेचे दाब कमी असल्याने उपसागरावरील वारे तिकडे जात होते. अजूनही बंगालच्या उपसागरावरील वाऱ्याची दिशा, पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे आहे. पूर्व भारत, उत्तर भारताच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे. गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पूर्वेकडील वाऱ्यांमुळे पावसाचे प्रमाण वाढलेले आहे.

एकूण हंगामाचा विचार करता राज्यातील धरणे आतापर्यंत भरायला हवी होती. मात्र गतवर्षीच्या याच वेळेच्या तुलनेत निम्मीच म्हणजे ३० ते ३५ टक्केच धरणे भरलेली आहेत. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस पडणार असला, तरी यंदा कमी पावसाचे वर्ष राहील, अशीच स्थिती आहे.

यापुढे पेरणी होणारी पिके चांगली येणार असली, तरी उडीद आणि मूग या पिकांचे उत्पादन कमी होऊन तुटवडा भासेल. शिवाय पाऊस कमी झालेल्या भागात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासणार असून, टंचाई निवारणाच्या उपाययोजना कराव्या लागतील. उपलब्ध पाण्याचा वापरदेखील काटकसरीने करावा लागणार आहे.

भविष्यात नैर्ऋत्य मान्सून कमकुवत असल्याने दुष्काळी वर्षाची शक्यता दिसत असतानाच कृत्रिम पावसाचे प्रयोग राबविण्याविषयी नियोजन ठेवले पाहिजे. यासाठी परदेशांवर अवलंबून राहण्यापेक्षा शासनाने स्वतःची सुसज्ज यंत्रणा तयार करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.

हवामान विभागातील निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, २०२३ मध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच एल-निनोची उत्पत्ती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानुसार भारतीय हवामान खात्याने देशातील पाऊस सरासरी इतका असल्याचे भाकीत केले. एल-निनोच्या पार्श्वभूमीवर यंदा मान्सून उशिराने दाखल झाला. दाखल झाल्यानंतरही पावसाचा अपेक्षित जोर दिसला नाही.

विशेष म्हणजे कोकण आणि घाटमाथ्यावर आलेला पाऊस पुढे सरकलाच नाही. ऑगस्ट महिन्यात स्थिती बदलणार असली, तरी सह्याद्रीच्या पूर्व उतारावरच तो रेंगाळण्याची स्थिती दिसतेय. त्यामुळे संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील वर्षा छायेतील प्रदेश हा अजूनही पावसाला भुकेला आहे. या भागात समाधानकारक पाऊस झालेलाच नाही. कोकण आणि विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये पाऊस झाल्याने पावसाची आकडेवारी वाढल्याचे दिसून येत आहे.

प्रत्यक्षात पावसाचे विभागानुसार वितरण झालेले नाही. मध्य महाराष्ट्रातील जिल्हे, विदर्भातील काही जिल्हे, नांदेडवगळता मराठवाड्यातील जिल्ह्यात पाऊस पडलेला नाही. यंदा मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचा विचार करता, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी आवश्यक असलेली मान्सूनची बंगालच्या उपसागरातील शाखाही यंदा कमकुवतच दिसून आलेली आहे.

जुलै महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात मान्सून जोर धरणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवाड्यात राज्यातील अनेक धरणे ७० टक्क्यांपर्यंत भरण्याची शक्यता आहे. २०२३ च्या मान्सूनसाठी आशादायी चित्र असताना, आतापर्यंत तसे घडलेले दिसत नाही. त्यामुळे खरीप पिके अवलंबून असलेल्या कालावधीत पाऊस झालेला नाही. यंदा १५ जुलैनंतरदेखील राज्यात दुबार पेरणीची वेळ आल्याची स्थिती आली आहे. पेरणी झाली नाही त्या भागात जुलैअखेरपर्यंत चांगल्या पावसाची शक्यता असल्याने राहिलेल्या क्षेत्रावर पेरणी होऊ शकेल.

मान्सूनच्या उर्वरित काळात एल-निनो स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. जून आणि जुलै महिन्यात एल-निनो सक्रिय नसताना, तसेच या काळात हिंदी महासागरातील द्विधृवीयता (इंडियन ओशन डायपोल-आयओडी) सर्वसाधारण स्थितीत असल्याने त्याचे घातक परिणाम नसतानाही या काळात राज्यात पाऊस झालेला नाही ही बाब लक्षात घेतली पाहिजे. आता उर्वरित दोन महिन्यात एल-निनो तीव्र होण्याबरोबरच, आयओडीदेखील धन अवस्थेत जात असला, तरी महाराष्ट्रातील उर्वरित पावसाविषयी भाकित वर्तविणे संयुक्तिक राहणार नाही, असे मत माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT